४ नोव्हेंबर : आजचा इतिहास

०४ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ४ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. वासुदेव बळवंत फडके, जमनालाल बजाज, विजया मेहता, तब्बू आणि माल्कम मार्शल यांच्याविषयी.

आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके (जन्म १८४५)

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांची आज जयंती. पनवेलजवळच्या शिरढोण इथं जन्मलेले फडके लहाणपणापासूनच कूस्ती, तलवारबाजी, घोडेस्वारीत पारंगत होते. शिक्षणानंतर ते इंग्रज सैन्यातही रुजू झाले. आई आजारी असतानाही इंग्रज अधिकाऱ्याने सुट्टी न दिल्याने त्यांना पारतंत्र्याची तीव्र जाणीव झाली. महाराष्ट्रातील कोळी, मातंग, धनगर आणि रामोशी समाजाला संघटीत करून शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिलं. इंग्रजांसोबतच्या उठाव केले. १८७३ ला  स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. समाजात एकता राहण्याच्या उद्देशाने ऐक्यवर्धिनी संस्था सुरु केली. वासुदेव बळवंत फडके यांचं १७ फेब्रुवारी १८८३ ला निधन झालं. १९८४ ला त्यांच्या स्मरणार्थ ५० पैशांचं तिकीट भारतीय टपाल विभागाने प्रसिद्ध केलं.

गांधीवादी उद्योगपती जमनालाल बजाज (जन्म १८८९)

प्रसिद्ध उद्योगपती, स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांची आज १२९ वी जयंती. १९२० ला नागपुर सत्रासाठी काँग्रेस पक्षाच्या रिसेपशन समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली. महात्मा गांधीचे अनुयायी असलेले बजाज दांडी यात्रा आणि असहकार चळवळीत सहभागी झाले. त्यांनी देशी वस्तूंचा पुरस्कार केला. जातिभेदाविरोधात लढा दिला. १९२६ ला त्यांनी प्रसिद्ध बजाज कंपनीची स्थापना केली. जमनालाल बजाज यांचा ११ फेब्रुवारी १९४२ ला वर्ध्यात मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी विधायक काम करणाऱ्यांना जमनालाल बजाज पुरस्कार दिला जातो.

विजया मेहता (जन्म १९३४)

नाट्य दिग्दर्शक विजया मेहतांचा आज ८४ वा वाढदिवस. विजयाबाईंनी १९८६ ला पहिल्यांदा ‘रावसाहेब’ या नाटकाचं दिग्दर्शन केलं. या नाटकामुळेच त्यांना प्रसिद्धी मिळाली. विजय तेंडूलकर आणि श्रीराम लागू यांच्यासोबत त्यांनी मुंबईत ‘रंगायन’ ग्रुप सुरू केला. अजब न्याय वर्तुळाचा, एक शून्य बाजीराव, एका घरात होती, मला उत्तर हवयं, मादी, वाडा चिरेबंदी आणि श्रीमंत ही विजयाबाईंची गाजलेली नाटकं आहेत. नुकतंच त्यांचं ‘झिम्मा’ नावाचे आत्मचरित्र आलंय. विजया मेहतांच्या नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीवर ‘बाई-एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास’ हे पुस्तक प्रसिद्ध झालंय. नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी त्यांना संगीत नाटक अकादमी आणि पद्मश्रीने गौरवण्यात आलंय.  

 तब्बू (जन्म १९७१)

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचा आज ४७ वा बड्डे. हैदराबादेत जन्मलेल्या तब्बूच पूर्ण नाव तब्बसुम फातिमा हाश्मी. तब्बूने बॉलीवूडसोबतच मराठी, तेलगू, तमील, मल्याळम सिनेमातही काम केलं. वयाच्या १४ व्या वर्षी १९८५ ला आलेल्या ‘हम नौजवान’ सिनेमातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. ‘कुली नंबर १’मधे तब्बू मुख्य भूमिकेत दिसली. १९८७ ला बोनी कपूरच्या ‘रुप की रानी चोरो का राजा’ आणि ‘प्रेम’ सिनेमातही तब्बूनं काम केलं. १९९६ ला तब्बूचे ८ सिनेमे आले, त्यापैकी ‘माचीस’साठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. २००० मधे रिलीज झालेल्या ‘अस्तित्व’ या मराठी सिनेमात तब्बूने अभिनय केला होता. ‘चांदणी बार’साठी तब्बूला दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. बॉर्डर, चाची 420, बीवी नंबर 1, हेराफेरी, शिकारी, चांदणी बार, आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया, चीनी कम, ओम शांती ओम, जय हो, दृश्यम हे तब्बूचे सिनेमे लोकप्रिय ठरले. तब्बूला आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय, सहा वेळा फिल्मफेअर आणि पद्मश्रीने पुरस्काराने गौरवण्यात आलं.

माल्कम मार्शल (मृत्यू १९९९)

माल्कम मार्शल हा वेस्टइंडिजचा वेगवान गोलंदाज होता. त्याचा आज स्मृतीदिवस. त्याने १९७८ ला भारताविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं. कसोटीतील ८१ सामन्यातील १५१ डावात त्यानं ३७६ विकेट्स घेतल्या. त्याने २२ वेळा ५ विकेट्स तर ४ वेळा १० विकेट्स घेण्याची कामगिरी केली. वनडेतील १३६ सामन्यात १५७ विकेट्स घेतले. १८ धावा देवून ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.