१७ नोव्हेंबर : आजचा इतिहास

१७ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १७ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

रत्नाक्षरं ८० रत्‍नाकर मतकरी (जन्म १९३८)

अलबत्या गलबत्या आणि आरण्यक ही आज तुफान चालणारी दोन्ही नाटकं रत्नाकर मतकरी यांची आहेत. यावरून त्यांची लोकांना आकर्षून घेण्याची ताकद तर लक्षात येतेच शिवाय बालनाट्यापासून महाभारताच्या अंतिम पर्वाच्या भाष्यापर्यंतची प्रचंड मोठी रेंजही दिपवून टाकते. आज रत्नाकर मत्कारीचा ८०वा वाढदिवस आहे. नाट्यलेखनाबरोबरच गूढकथा लेखनातही त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे ३० हून अधिक कथासंग्रह प्रकाशित झालेत. सोळाव्या वर्षी पहिली एकांकिका लिहिल्यानंतर ते आजवर सतत लिहिते राहिले आहेत. अनेक प्रयोगशील तरीही लोकप्रिय नाटकं त्यांनी दिलीत. शिवाय कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य यातही त्यांनी ठसा उमटवलाय. संगीत नाटक अकादमीचा आणि साहित्य अकादमीसह अनेक महत्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेत.

बेबी शकुंतला (जन्म १९३२)

६० पेक्षा जास्त मराठी आणि ४० पेक्षा जास्त हिंदी सिनेमा गाजवणाऱ्या बेबी शकुंतला यांचा आज जन्मदिन. ४० आणि ५० चं दशकातला ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना त्यांनी गाजवला. काळ्या पांढऱ्या पडद्यावर त्यांचं निखळ सौंदर्य उजळून दिसायचं. त्याला सहज अभिनयाचीही जोड होती. त्यांचं माहेरचं नाव शकुंतला महाजन आणि सासरचं उमादेवी खंडेराव नाडगोंडे. पण त्या बालकलाकार म्हणून गाजल्यामुळे बेबी हा शब्द त्यांच्यापुढे लागला, तो कायमचाच. रामशास्त्री सिनेमातलं त्यांची भूमिका आणि त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं 'दोन घडीचा डाव' लोकप्रिय ठरलं. त्यानंतर त्यांचा सिनेमातला प्रवास सुकर झाला. त्या काळातल्या सगळ्या आघाडीच्या दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. त्यांचे अनेक सिनेमे गाजले. यशाच्या शिखरावर असताना अवघ्या बाविसाव्या वर्षी त्यांनी एक बड्या जमीनदाराशी लग्न करून सिनेसृष्टीला रामराम केला. २०१५ला त्यांचं निधन झालं.

अशोक सिंघल (निधन २०१५)

रामजन्मभूमी आंदोलनात सक्रीय भूमिका घेणारे विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचा आजच्या दिवशी निधन झालं. डिसेंबर २०११ मधे प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी विहिंपचं अध्यक्षपद सोडलं. त्यानंतरच प्रवीण तोगडिया यांच्याकडं सुत्रं आली. आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या सिंघल यांच्यामुळे विहिंप जनमानसात लोकप्रिय झाली. सुरवातीच्या काळात शास्त्रीय संगीताचे धडे गिरवणाऱ्या सिंघल यांनी विहिंपचं काम जगभरात पोचवलं. त्यामुळं त्यांना विहिंपचा चेहरा आंतरराष्ट्रीय करणारा संघटक म्हणून ओळखलं जातं. १९२६ मधे जन्मलेल्या सिंघल यांनी १९४२ मधे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कामाला सुरवात केली.

चंदा कोचर (१९६१)

जगातल्या शक्तीशाली महिलांमधे समावेश असलेल्या बँकर चंदा कोचर यांचा आज वाढदिवस. फोर्ब्सच्या २०१७च्या सगळ्यात ताकदवाद महिलांच्या यादीत भारतातल्या ५ महिलांचा समावेश होता. त्यात चंदा कोचर यांचंही नावं होते. आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर चंदा कोचर यांचा या यादीत ३२ वा नंबर होता. २००५ पासून कोचर यांचा नाव फोर्ब्सच्या यादीत येतंय. २००९ मधे चंदा कोचर यांची आयसीआयसीआय बँकेच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यावर सगळ्या भारतीयांचा ऊर भरून आलं होतं. काही दिवसांपूर्वीच विडिओकॉन प्रकरणात त्यांचं नाव आलं. अधिकाराचा वापर करून विडिओकॉनला कर्ज देताना झुकत माप दिल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. यासंबंधीची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना बँकेनं बेमुदत काळासाठी रजेवर पाठवलंय.

युसूफ पठान (जन्म १९८२)

भारताचा डावखूरा ऑलराऊंडर युसूफ पठाणचा आज बड्डे. युसूफचा छोटा भाऊ इरफान पठाणही भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू आहे. टी२० चा जमाना सुरू होण्याच्या आधी पठाण बंधूच्या या जोडीनं भारताला काही मॅच एकहाती जिंकून दिल्यात. युसूफ पठाणनं एकूण ५७ वनडे आणि २२ टी-२० मॅच खेळल्या. झटपट खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या युसूफला एकाही कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही. २००७ मधे पाकिस्तानविरुद्धच्या टी२० मॅचने युसूफच्या करिअरला सुरवात झाली. २०१२ मधे साऊथ आफ्रिकेविरुद्ध त्याने शेवटची मॅच खेळली. पाकिस्तानविरुध्द खेळूनच त्याची वनडेत एंट्री झाली. २०१२ मधे पाकिस्तानविरुद्धचं त्यानं शेवटची मॅच खेळली. वनडेमधे त्याने दोनदा सेंच्यूरी आणि तीनवेळा हाफ सेंच्यूरी काढली.