१८ ऑक्टोबरः आजच्या इतिहासात काय आहे?

१८ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १८ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, थॉमस अल्वा एडिसन, ओम पुरी, मार्टिना नवरातिलोवा आणि वीरप्पन यांच्या विषयीच्या.

जन्मतारीख माहीत नसणाऱ्या ओम पुरींचा जन्म (१९५०)

हरयाणामधल्या अंबाला इथे जन्म. बाप तुरुंगात आणि आई मोलकरीण. गरीबीमुळे जन्मतारिख माहीत नव्हती, ना जन्माचा दाखला होता. शाळेत ठोकून दिलेल्या तारखेवर गाडं सुरू होतं. आईने सांगितलं, १९५०च्या दसऱ्याच्या आसपास जन्म झाला. त्यामुळे त्या वर्षातल्या दसऱ्याची तारीख शोधली. ती १८ ऑक्टोबर होती. 

पुढे जाऊन अभिनयाचा मापदंड बनलेल्या ओम पुरींचा प्रवास प्रचंड संघर्षाचा होता. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून मजुरी केली. चहाही विकली. कष्ट करत दिल्लीच्या `नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा`मधे शिक्षण घेतलं. पुढे पुण्याच्या `एफटीटीआय`मधे. ते तिथे विद्यार्थी असताना तिथेच विजय तेंडुलकरांच्या `घाशीराम कोतवाल` या नाटकावर सिनेमा बनत होता. तो ओम पुरींचा पहिला सिनेमा. तेंडुलकरांनीच लिहिलेल्या `आक्रोश`मधे त्यांनी साकार केलेला लहान्या भिकू गाजला. त्यांना फिल्मफेअर मिळालं. श्री. दा. पानवलकरांच्या सूर्य या मराठी कथेवर आलेल्या `अर्धसत्य`ने त्यांना ओळख मिळवून दिली. `आरोहण` पाठोपाठ दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कारही दिला.

नोंदवायलाच हवेत असे त्यांचे सिनेमे म्हणजे `भवनी भवाई`, `सद्गती`, `नासूर`, `मिर्च मसाला` ते `धारावी` असे समांतर सिनेमे. `गांधी`, `माय सन इज फॅनेटिक`, `इस्ट इज इस्ट`, `द पॅरोल ऑफिसर`, `वूल्फ`, `द घोस्ट इन द डार्कनेस` हे आंतरराष्ट्रीय सिनेमे. `जाने भी दो यारों` आणि `कक्काजी कहिन`पासून सुरू झालेला कॉमेडीचा थाट `चाची ४२०`, `हेराफेरी`, `मालामाल विकली`पर्यंत लक्षात राहिला. शिवाय बॉलीवूडच्या मुख्य प्रवाहात `डिस्को डान्सर`, `घायल`, `नरसिम्हा`, `माचिस`, `रंग दे बसंती`, `बजरंगी भाईजान`, `ओ माय गॉड` आणि त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला `ट्यूबलाईट`. शिवाय `चार्ली विल्सन्स वॉर` या हॉलीवूडपटात त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झिया उल हक यांची भूमिका साकारली होती. नाईण्टिजमधे रमणाऱ्यांना त्यांची `आस्था`मधली रेखाच्या नवऱ्याची भूमिका अनेक कारणांनी लक्षात राहिली.

६ जानेवारी २०१७ ला त्यांचं हार्ट अटॅकमुळे निधन झालं. त्यानंतरच्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात त्यांना आवर्जून श्रद्धांजली वाहण्यात आली.

डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना (१९०६)

देशातल्या दलितांच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनच्या स्थापनेकडे पाहता येईल. अहमदनगरमधे एका कार्यक्रमात भिंगार नावाच्या गावातील अस्पृश्य महर्षी शिंदेंना भेटले. त्यांनी त्यांची दुःख सांगितली. त्यानंतर त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य अस्पृश्यांसाठी वाहण्याचा निर्धार केला. ते प्रार्थना समाजाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. पण अस्पृश्यांच्या कामामुळे त्यांना प्रार्थना समाजापासून दूर जावं लागलं. त्यांनी न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ड्रिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची मुंबईत स्थापना केली. ते त्याचे सेक्रेटरी होते.

लेखन आणि भाषणांतून त्यांनी अस्पृश्यांबरोबरच कथित सवर्णांमधेही अस्पृश्यता संपवण्यासाठी जागृती केली. त्यांनी मुंबईत परळ, देवनार, कामाठीपुरा या भागांत त्यांच्यासाठी मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या. अनाथ स्त्रियांसाठी निराश्रित सेवासदन सुरू केलं. मुंबईबाहेर पुणे, मनमाड, अकोला, अमरावती, नागपूर, महाबळेश्वर तसेच भावनगर, हुबळी, धारवाड, बंगलोर, चेन्नई अशा ठिकाणी मिशनच्या शाखा काढल्या. मिशनच्या स्थापनेनंतर सहा वर्षांतच १४ शहरात २३ शाळा, ११०० विद्यार्थी, ५ वसतिगृहं, इतर १२ संस्था असा व्याप उभा केला. पुण्यात अहल्याश्रम ही इमारत बांधली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदयानंतर त्यांनी १९२३ला मिशन अस्पृश्यांच्या स्वाधीन केलं आणि त्यातून बाहेर पडले.

आपल्याला प्रकाश देणाऱ्या एडिसनची प्राणज्योत मालवली (१९३१)

आज आपण अंधारात प्रकाशासाठी बल्ब पेटवतो, सिनेमा बघतो, विजेवर धावणाऱ्या ट्रेनने प्रवास करतो किंवा फोनवर बोलतो, त्या प्रत्येक वेळेस आपल्याला थॉमस अल्वा एडिसनची आठवण यायला हवी. १०९३ शोधांची पेटंट नावावर असणारे एडिसन हे जगातल्या महान संशोधकांपैकी एक आहेतच. त्यांच्या नावापुढे अमेरिकेचे सर्वात महान संशोधक असं बिरूद कायम लावलं जातं. ढ म्हणू शाळेतून काढून टाकलेल्या एडिसनला लहानपणापासूनच प्रयोग करायची आवड होती. प्रवासाच्या मोकळ्या वेळेत काम करता यावं म्हणून त्यांनी लहानपणीच ट्रेनच्या मालडब्यात प्रयोगशाळा सुरू केली होती. त्यांचं हे वेड ८४ वर्षांचं समृद्ध आयुष्याच्या शेवटपर्यंत कायम राहिलं.

एडिसननी आवज रेकॉर्ड करणारा आणि ऐकवणारा फोनोग्राफ, सिनेमाचा उत्तम कॅमेरा, दीर्घकाळ चालणारा लाईट बल्ब हे त्यांचे शोध महत्त्वाचे ठरलेच. त्यांच्या शोधांनी अनेक उद्योगांचा पाया रचला. ते फक्त शोध लावून शांत राहिले नाहीत. तर त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी कारखानेही उभे केले. आपल्यासारख्याच शास्त्रज्ञांना एकत्र आणून जगातली पहिली औद्योगिक प्रयोगशाळा उभी केली. त्यामुळे एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांचं योगदान होतं, तितकंच एक उद्योजक आणि टीम लीडर म्हणूनही होतं.

१८ ऑक्टोबर १९३१ ला त्यांचं डायबेटिसमुळे निधन झालं. उद्योजक हेन्री फोर्ड यांनी एडिसनचा शेवटचा श्वास एका नळीत भरून आठवण म्हणून जपला. तो आजही आपल्याला डेट्रॉइट येथील हेन्री फोर्ड म्युझियममधे पाहता येतो.

टेनिसची सम्राज्ञी मार्टिना नवरातिलोवाचा जन्म (१९५६)

जगभरातल्या टेनिसप्रेमींची एक पिढी मार्टिना नवरातिलोवाला लॉन टेनिस खेळताना बघून मोठी झाली. ऐंशीच्या दशकात आणि नव्वदच्या दशकाच्या सुरवातील तिने टेनिस कोर्टवर राज्य केलं. सिंगल्समधे तब्बल ३३२ आठवडे ती नंबर १ वर होती आणि डबल्समधे २३७ आठवडे. तिने १८ ग्रँड स्लॅम किताब जिंकलेत आणि ३१ मोठ्या मॅच. १२ वेळा विम्बल्डनच्या फायनलमधे ती खेळलीय. ८२ पासून पुढची ९ वर्षं ती सलग विम्बल्डनच्या फायनलमधे होती. ८२ पासून पुढची पाच वर्षं ती नंबर १ ही होती. या काळात तिने खेळलेल्या ४४२ मॅचपैकी ४२८ जिंकल्या होत्या. ८३ साली तर ती ८७ मॅच खेळली, त्यापैकी फक्त एका मॅचमधे ती हरली.

१९८१ साली आपण बायसेक्शुअल असल्याचं तिने सांगून टाकलं. तिच्या या घोषणेनं खूप गदारोळ उडाला होता. तिने काही पुस्तकंही लिहिलीत. त्यात तीन कादंबऱ्याही आहेत. आज मार्टिना ६५वा वाढदिवस साजरा करतेय.

इंडियाज मोस्ट वॉँटेड वीरप्पनचा खात्मा (२००५)

मोठ्या मिशांचा वीरप्पन हा खलनायक असला तरी दक्षिण भारतातल्या आधुनिक आख्य़ायिकांचा नायक आहे. तो खरं तर चंदन तस्कर. हस्तिदंतासाठी शेकडो हत्तींना मारणारा क्रूर शिकारी. पैशांसाठी सर्रास अपहरण करणारा. एक दोन नाही तर ४० जणांच्या खुनाचं कारण बनलेला. पण तरीही त्याचं व्यक्तिमत्त्व कायम कुतूहलाचा विषय बनलं. 

वणियार नावाच्या गुराखी जातीत जन्मलेला वीरप्पन त्याच्या समाजासाठी आणि जंगलांमधल्या गावांसाठी रक्षणकर्ता होता. तो त्यांचा रॉबिनहूड होता. त्यामुळे तो क्वचितच पोलिसांच्या हाती लागला. अनेकदा हाती लागूनही निसटला. त्याची दहशतही प्रचंड होती. त्याच्या जोरावर त्याने कर्नाटकातल्या चंदनाच्या जंगलांवर अनेक दशकं राज्य केलं. त्याला पकडण्यासाठी कर्नाटक सरकारने सैन्यदलाच्या मदतीने एक विशेष पथक उभारलं होतं.

नक्कीरन नावाच्या तामिळ साप्ताहिकाचा रिपोर्टर गोपालन याने वीरप्पनची मुलाखत घेतली तेव्हा तो सेलिब्रेटी बनला होता. त्याच्यावर अनेक सिनेमे बनले. पुस्तकंही लिहिली गेली. १८ ऑक्टोबर २००५ला त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. त्याला श्रद्धांजली म्हणून वणियारांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएमकेने पक्षाचा झेंडा अर्ध्यावर आणला होता.