२१ डिसेंबरः आजचा इतिहास

२१ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २१ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

भूमिका घेणारे लेखक यू आर अनंतमूर्ती (जन्म १९३२)

आपल्या स्पष्ट, परखड भूमिकेमुळे साहित्य न वाचणाऱ्या लोकांमधेही यू. आर. अनंतमूर्ती हे नाव ओळखीचं आहे. १९६५ मधे आलेली ‘संस्कार’ ही त्यांची सर्वांत लोकप्रिय आणि वादगस्त कादंबरी ठरली. यामधे अनंतमूर्तींनी ब्राम्हणी मुल्यव्यवस्थेवर कठोर प्रहार केले. यानंतरच कन्नड साहित्यात नव्या नावाचं प्रगती, आधुनिकतेची भाषा करणारं नवं आंदोलन सुरू झालं. भव, भारतीपूर, अस्वस्थ आणि बारा या त्यांच्या साहित्यकृती गाजल्या.

समाजवादी आणि उदारवादी विचारांच्या अनंतमूर्तींना अनेक पुरस्कार मिळाले. १९८४ मधे ते राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर गेले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर आपण देश सोडून जाणार असल्याच्या त्यांच्या इशाऱ्याने एकच खळबळ उडाली होती. २०१४ मधे मोदी पंतप्रधान झाल्यावर अनंतमूर्तींना धमक्याही आल्या. या सगळ्यांचा अतिरेक झाला तो, २२ ऑगस्ट २०१४ मधे अनंतमूर्ती वारल्यानंतर. भारतीय परंपरेत माणूस मेल्यावर त्याच्याबद्दल वाईट बोलत नाहीत. पण काही अतिउग्र हिंदुत्ववाद्यांनी अनंतमूर्तींच्या मृत्यूनंतर जल्लोष केला होता.

रेडिओचं दुसरं नाव अमीन सयानी (जन्म १९३२)

‘भाइयो और बहनो’ असं आपल्या गोड आवाजात आवाहन करणाऱ्या अमीन सयानी यांची कधीकाळी रेडिओचं दुसरं नाव म्हणून ओळख होती. रेडिओ सिलोनवरचा ‘बिनाका गीतमाला’ हा त्यांचा शो भारतातचं नाही तर अख्ख्या आशिया खंडात लोकप्रिय झाला. एवढंच नाही तर आजही अनेक आरजे अमीन सयानी यांची कॉपी करतात. 

एका गुजराती कुटुंबात वाढलेल्या अमीन सयानी यांची आई गांधीवादी विचाराची होती. गांधीजींच्या सुचनेवरून सुरू केलेल्या हिंदी, गुजराती आणि उर्दूत मॅगझिनचं काम आईने मला दिलं. आणि तिथूनच मला भाषेचा गोडवा लागला, असं सयानी सांगतात. गायक होण्यासाठी मुंबईत आलेले अमीन सयानी १९५१ मधे मुंबईत रेडिओमधे कामाला लागले. रेडिओ अनाउन्सर म्हणून त्यांनी आतापर्यंत ५४ हजार शो केलेत. आता त्यांच्या या सगळ्या शोंच्या कॅसेट, सीडीज बाजारात उपलब्ध आहेत. यूट्यूबवरही त्यांची गीतमाला खूप फेमस आहे. 

संशोधक चरित्रकार न. र. फाटक (निधन १९७९)

इतिहास संशोधक, चरित्रकार, पत्रकार, संत साहित्याचे समीक्षक, मराठीचे प्राध्यापक न. र. फाटक यांचा आज स्मृतीदिवस. कोकणातल्या कमोद गावच्या फाटकांचा जन्म १५ एप्रिल १८९३ सालचा. वडिल सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांचं भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण झालं. त्यानंतर काही काळ विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नवा काळ या नियतकालिकांमधे काम केलं. प्रचलित विचारप्रवाहाविरुद्ध मतप्रदर्शन करून वाद निर्माण करणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य होतं.

१९४७ मधे हैद्राबादला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. मुंबईच्या रुईया कॉलेजमधून मराठीचे प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले. पण संशोधक चरित्रकार म्हणून त्यांची ख्याती झाली. ‘न्यायमूर्ती महादेव गोविद रानडे’ ‘अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष’, ‘ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी’, ‘श्री एकनाथः वाङ्मय आणि कार्य’ यासोबतच लोकमान्य, आदर्श भारत सेवक, नाट्याचार्य कृ. प्र. खाडिलकर यांची चरित्रं फाटकांनी लिहिली.

विरार का छोरा गोविंदा (जन्म १९६३)

कॉमेडी, रोमँटिक किंवा मग अॅक्शनपट अशा सगळ्या सिनेमांमधे फिट बसणारा अॅक्टर म्हणजे गोविंदा. बॉलीवूडच्या प्रत्येक कॅटेगरीतला एक नंबरी कलाकार हे बिरुद त्याच्या नावापुढे आहे. पण कॉमेडी अॅक्टर म्हणून तो आजही आपल्या फॅनच्या लक्षात आहे. 'पार्टनर', 'हसीना मान जाएगी' यासारख्या सिनेमांसाठी त्याला बेस्ट कॉमेडियनचा अवॉर्ड मिळालाय. सिनेमातलं काम थंडावल्यावर गोविंदा २००४ मधे काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून लोकसभेत गेला होता. 

१९८६ मधे 'इल्जाम'  सिनेमाने बॉलिवूडमधे एंट्री केली. सुरवातीच्या काळातच तीन आठवड्यातच ४९ सिनेमांसाठी करार केला. त्यामुळे एका वर्षात सर्वाधिक सिनेमात काम करणारा अॅक्टर हा मान अजूनही गोविंदाच्या नावावरच आहे. अॅक्टर, डायरेक्टर असलेल्या आई वडलांकडूनच गोविंदाला सिनेमाचा वारसा मिळाला. गोविंदाने दीडशेहून अधिक सिनेमात आपली कलाकारी दाखवलीय. 'प्यार करके देखो', 'प्यार मोहब्बत', 'सच्चाई की ताकत', 'गरीबों का दोस्त', 'हीरो नं १', 'आंटी नं १', 'बेटी नं १', 'जोड़ी नं १' यासारख्या सुपरहिट सिनेमात काम केलं. 

धुरंधर क्रिकेटपटू के.श्रीकांत (जन्म १९५९)

क्रिकेटमधे ओरिजनल हार्ट हिटर अशी ख्याती असलेल्या कृष्णामाचारी श्रीकांत यांचा आज जन्मदिवस आहे. ‘चीका’ नावाने प्रसिद्ध श्रीकांत यांनी ८० च्या दशकात आपल्या आक्रमक खेळीने विरोधी संघांना धडकी भरवली होती. इंजिनिअर असलेल्या श्रीकांत यांनी १९८१ मधे क्रिकेटमधे पदार्पण केलं. पहिल्याच मॅचमधे लिट्ल मास्टर सुनील गावसकरसोबत ओपनिंगला बॅटिंग करण्याची संधी मिळाली. त्यांनी ४३ टेस्टमधे २,०६२ तर १४६ वनडेत ४,०९१ रन ठोकले.

वनडेमधे हाफ सेंच्युरी काढणारा आणि ५ विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. १९८३ मधे वर्ल्डकप विजेत्या भारतीय टीममधे ते होते. नंतर कॅप्टन झालेल्या श्रीकांत यांच्या नेतृत्वातच सचिन तेंडूलकर या मास्टर ब्लास्टरची क्रिकेटमधे एंट्री झाली. आता त्यांची मुलं अनिरुद्ध आणि आदित्य श्रीकांतही क्रिकेटमधे आहेत.

(दिनविशेष, इतिहासात आज २१ डिसेंबर today in history)