६ जानेवारीः याच दिवशी पहिल्या तारेने इतिहास घडला

०७ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ९ मिनिटं


६ जानेवारीला संदेशवहनातली एक महत्त्वाची घटना घडलीय. १८३८ला पहिला आधुनिक टेलिग्राम म्हणजे तार पाठवली गेली. आता तार बंद झाली असली, तरी तिनेच अत्याधुनिक आयटी टेक्नॉलॉजीचा पाया रचलाय. तारसेवेचा आणि तिचा निर्माता सॅम्युएल मोर्स याची गोष्ट वाचण्यासारखीच आहे. 

एक घोडेस्वार त्या चित्रकारापर्यंत धापा टाकतच आला. त्यांना त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची बातमी दिली. तेव्हा ते कुठेतरी बाहेरगावी होते. पोहचेपर्यंत पत्नीचा अंत्यविधी झालेला होता. ते आपल्या पत्नीचं अंतिम दर्शनही घेऊ शकले नाहीत. वर्षभरात वडील गेले. त्यानंतर पुढील तीन वर्षांनी आई गेली. याही वेळी ते बाहेरगावीच होते. या तिघांच्याही मृत्यूच्या वेळी त्यांच्यापर्यंत वेळेत संदेश पोहचला नाही. ते कुणालाच शेवटच्या क्षणी पाहू शकले नाहीत. त्यावेळी त्या हताश चित्रकाराला वाटलं की लवकरात लवकर संदेश पोचवणारी एखादी टेक्नॉलॉजी असती, तर किती बरं झालं असतं. 

या चित्रकाराने संदेश जलद पोहचवण्यासाठी प्रयोग आणि संशोधन केलं. त्याच्यातील वैज्ञानिक जागृत झाला. आणि जगाला थक्क करणारी टेलिग्राम सेवा त्यांनी दिली. या टेलिग्राम सेवेचं पहिलं डेमॉन्स्ट्रेशन आजच्याच दिवशी ६ जानेवारी १८३८ला झालं. त्या महान संशोधकाचं नाव होतं सॅम्युएल मोर्स. 

सॅम्युएल मोर्स असे घडले 

त्यांचा जन्मअमेरिकेत २७ एप्रिल १७९१ला झाला. त्यांचे वडील धर्मशास्त्राचे अभ्यासक आणि भूगोल विषयाचे तज्ज्ञ होते. सॅम्युएल यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. ते उत्तम चित्रकारदेखील होते. अमेरिकेतील विद्यापीठात त्यांचं शिक्षण सुरू होतं. त्या दरम्यानच त्यांना इलेक्ट्रीसिटी या विषयात अधिक गोडी वाटायला लागली. . 

पदवी मिळाल्यानंतर बोस्टन बुक पब्लिशर या प्रकाशनसंस्थेत ते क्लार्क म्हणून काम करू लागले. त्यांची चित्रकलेतली रुची वाढतच होती. ते पाहून त्यांच्या पालकांनी १८११ मधे त्यांना इंग्लंडमधे चित्रकलेच्या शिक्षणासाठी पाठवलं. त्याकाळात फोटोग्राफीचा शोध लागला नव्हता. त्यामुळे हौशी आणि श्रीमंत लोक स्वतःची चित्रं चित्रकारांकडून काढून घेत. या कामाचे चित्रकारांना चांगले पैसेदेखील मिळत. 

१८१५ मधे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते आपल्या घरी परतले. नव्या पिढीला चित्रकारीचं शिक्षण आणि मार्गदर्शन हा हेतू डोळ्यांसमोर ठेवला. त्यांनी एक प्रशिक्षण केंद्र सुरू करावं असं ठरवलं. यातूनच ‘नॅशनल अकॅडमी ऑफ डिजाईन’ची स्थापना झाली. सॅम्युएल स्वतः १८२६ ते ४५ दरम्यान अकॅडमीचे अध्यक्ष होते.

मोर्सच्या आधीही संदेशवहनासाठी अनेक प्रयोग झाले होते. सुरूदेखील होतेच. मात्र सॅम्युएल मोर्स यांनी टेलिग्रामचा शोध लावल्यामुळेच आधुनिक संदेशवहनाची खऱ्या अर्थाने सुरवात झाली. रेडिओ आणि टीवीदेखील त्याचीच प्रोडक्ट आहेत. एकदा १८३२ मधे ते फ्रान्समधून जहाजाने परत येत होते. तेव्हा चार्ल्स जॅक्सन नावाच्या संशोधकाने त्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिकची स्पंदनं दूरवर कशी जातात, या शोधाची माहिती दिली. तिथून त्यांना टेलिग्रामची कल्पना सुचली. १८३७ पासून ते पूर्णवेळ याच विषयावर कामाला लागले.

टेलिग्राम सोपा करण्यासाठीचा झगडा

लिओनॉर्ड गेल यांनी जोसेफ हेन्री यांच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिजमची ओळख करून दिली. अल्फ्रेड वेल यांनी त्यांच्या लोखंडी कामाच्या कारखान्यातील वस्तू, कामगार आणि इतर मदत पुरवण्याचं आश्वासन दिलं. हे गेल आणि वेल हे सॅम्युएलचे पार्टनर्स झाले.  त्यांना आता संदेश पाठवण्याचं तंत्रज्ञान गवसलं होतं. मात्र ते अपूर्ण होतं. सॅम्युएल मोर्स यांनी आपल्या नव्या टेक्नॉलॉजीने मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयोग फसला. 

तेव्हा त्यांना लक्षात आलं की संदेशाची भाषा अथवा लिपी मोठी होत आहे. मग सॅम्युएल यांनी अल्फ्रेडच्या सहकार्याने एक सांकेतिक आणि सोपी भाषा तयार केली. त्याला मोर्स कोड हे नाव मिळालं. कम्प्युटरमधे 0 झिरो आणि 1 वन ही बायनरी लँग्वेज काम करते. यात शून्य आणि एक या दोनच अंकाचा वापर होते. त्यामुळे तिला बायनरी लँग्वेज म्हणतात. अशीच दोन कॅरेक्टरची कोड लँग्वेज सॅम्युएल मोर्स यांनी कम्युटरच्या शोधाच्या कितीतरी दशके आधी तयार केली होती.

आताच्या बायनरी लँग्वेजसारखे तेव्हाही दोनच चिन्हं सॅम्युएल यांनी वापरले. त्यातील एक डॉट म्हणजे टिंब (.) तर दुसरा डॅश (-) होता. आजही मोर्सकोडचा वापर अनेक ठिकाणी होतो. इलेक्ट्रिक पल्सेसच्या आधाराने हा संदेश पाठवायचा असतो. जिथे हा संदेश पाठवायचा तिथल्या मशीनवर कागदाच्या रोलवर त्या खुणा उमटत असत. मोर्स यांनी सुरुवातील प्रत्येक शब्दासाठी एक कोड तयार केला. त्यामुळे याचा आवाका खूप जास्त झाला. प्रत्येकवेळी तो कोड जवळच्या पुस्तकात पाहावा लागायचा. 

कोड सोपा करण्यासाठी त्यांनी इंग्रजी अल्फाबेटसाठी डॉट आणि डॅशमधून कोड तयार केले. इंगजीत ई हे कॅरेक्टर खूप जास्त वेळा वापरलं जातं. त्यामुळे त्यांनी ईसाठी फक्त एक डॉट नेमला. अशा प्रकारे यांनी पूर्ण इंग्रजी अल्फाबेटससाठी फक्त डॉट आणि डॅशच्या सहाय्याने कोड दिले. त्यानंतर या कोडमधे सर्वांत आधी बायबलमधील वाक्य `What hath God wrought` देवाने काय घडवलंय, असं लिहिलं गेलं. तो दिवस ६ जानेवारी १८३८ होता. 

शोध लावला, पण पेटंटसाठी संघर्ष 

अमेरिकेच्या संसदेने सॅम्युएलना या प्रोजेक्टमधे आर्थिक मदत केली. त्यामुळे दूरवरचा पहिला टेलिग्राम बाल्टीमोर ते वॉशिंगटन असा पहिला संदेश २५ मे १८४४ ला पाठवणं शक्य झालं. मोर्स कोडने काम केलं. आपल्या टेलिग्राफीच्या शोधाचं पेटंट मिळावं म्हणून १८३७ मधे सॅम्युएल यांनी सरकारकडे अर्ज केला. मात्र ते मिळालं नाही. मग त्यांनी स्वतःचीच कंपनी सुरू केली. पुढे १८५४ मधे सरकारने त्यांना पेटंट दिलं. या संघर्षाच्या काळात तर त्यांनी हा संशोधनाचा नाद सोडून केवळ चित्रकारीच करावी असादेखील निर्णय घेतला होता. 

चार्ल्स जॅक्सन या माणसाचा त्रास सॅम्युएल यांना बराच सोसावा लागला. टेलिग्रामच्या शोधाची कल्पना आपलीच असून ती सॅम्युएलने चोरल्याचा दावा या जॅक्सनने केला. हाच तोच जॅक्सन होता जो सॅम्युएलला जहाजावर भेटला होता. पुढे सुप्रीम कोर्टाने १८५४ मधे सॅम्युएलच्या बाजुने निकाल दिला. सॅम्युएल यांनी तोपर्यंत टेलिग्राम संदेशांची मर्यादा ४० फुटांवरून १००० फुटांपर्यंत नेली होती. आयुष्याच्या उत्तरार्धात सॅम्युएल यांचा संघर्ष थांबला. आर्थिकदृष्ट्यादेखील ते स्थिरावले. परोपकार आणि सत्कर्म करत २ एप्रिल १८७२ मधे सॅम्युएल मोर्स यांनी जगाचा निरोप घेतला.  

पुढे मार्सकोडवर आवाज पोचवण्याचेही प्रयोग झाले. शॉर्टफॉर्मचादेखील वापर व्हायला लागला. आज आपण जसं ‘ओके’ साठी फक्त ‘के’ वापरतो, तसाच हा प्रकार होता. दुसऱ्या महायुद्धात या कोडचा प्रचंड वापर झाला. माणसाने भाषा विकसित होण्याआधी संवादासाठी संकेतांचा म्हणजेच कोडस् यांचा वापर केला होता. तसाच हा मोर्स कोड. हा अजूनही वापरला जातो. 

भारतात तार आली आणि…

ब्रिटिशांनी त्यांच्या कंपनीसाठी भारतात ही तार सेवा सुरू केली. व्यवसायाने सर्जन असलेल्या शौनगेसीला गवर्नर लॉर्ड डलहौसीने तारसेवेची जबाबदारी दिली. भारतात पहिली तार लाईन १८५० मधे हुगळी नदीच्या परिसरात तेव्हाचं कलकत्ता ते डायमंड हार्बरपर्यंत टाकली हेाती. शिबचंद्र नंदी यांचा डायमंड हार्बरवरून पाठवलेला संदेश गवर्नरच्या साक्षीने वाचण्यात आला. १८५४ मधे तार सेवा सार्वजनिकही झाली. 

आज आपल्याला तार माहीत आहे, ती सिनेमांमुळे. तार म्हणजे कुणाच्या तरी निधनाची खबर, असं इतकं समीकरण झालं होतं. पूर्वी तारेसाठी वेगळं ऑफीस असायचं. मग ते पोस्ट ऑफीसला मर्ज झालं. ब्रिटीशांनी या तारसेवेचा उपयोग वारंवार केला. १८५७च्या आंदोलनात इंग्रजांना अनेक सूचना या तारेनेच मिळायच्या. ब्रिटीशांना त्यांच्या हालचाली, कारवाई करण्यासाठी या तारसेवेचा उपयोग व्हायचा. १८५७च्या उठावात ब्रिटीशांना तारसेवेचं महत्त्व कळलं. भारतभरातलं आपलं कम्युनिकेशन नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी काम सुरू केलं. 

२३ जून १८७० मधे इंग्लंडला मुंबईहून इंटरनॅशनल तार पाठवण्यात आली. जगातील अनेक देशांमधे तारसेवा सुरू झाली होती. त्याचे दर हे वेगवेगळे असायचे. ब्रिटनमधे तारेत विरामचिन्ह वापरण्यासाठी अतिरिक्त पैसे लागायचे. मग लोक फूलस्टॉप देण्याऐवजी चक्क ‘स्टॉप’ असंच वाक्यात लिहायचे. १८८५-८६ मधे पोस्ट आणि तार विभाग एक झाले. १ जानेवारी १८८२ मधे आंतरदेशीय प्रेस टेलिग्राम सेवा सुरू झाली. याचा फायदा वृत्तपत्रांनाही झाला. 

बातम्या पाठविण्यासाठी तारेचा वापर केला जायचा. १८८२ मधे प्रेसला तार पाठवण्याठी विशेष कार्ड दिलं जायचं. वृत्तपत्रांसोबतच रेडिओलाही अत्यंत वेगाने इथूनच बातम्या जायला लागल्या. इंग्रजांनी सुरू केलेली सेवा इंग्रजांच्याच अंगावर उलटली. स्वातंत्र्याने प्रेरीत भारतीय पत्रकारांनी याच तारांनी ब्रिटीश सत्तेविरोधातल्या बातम्या पाठवणे सुरू केलं. इंग्रजांनी मीडियासाठी ही सेवा बंद करण्याचं ठरवलं. पण ते बंद करू शकले नाहीत.

इंटरनेटने पूर्ण संपवली तार

भारत स्वतंत्र झाल्यावर हिंदीमधून तार पाठवण्याची सुविधा झाली. १९५७ ते ५८ या वर्षात ३ कोटी १० लाख तारा लोकांनी पाठवल्यात. त्यातील ८० हजार या हिंदीत होत्या. फॅक्स वगैरे मशीन येण्यापूर्वी म्हणजे अलीकडे ७०-८०च्या दशकांपर्यंत तारेनेच बातम्या पाठवल्या जात. स्टॉक एक्सेंजचे आकडेही तारेनेच मिळत. एवढंच नव्हे तर इंडियन एव्हिडंस अॅक्ट नुसार तारेची साक्ष ही मान्य असायची. भारतात कोर्टदेखील तारेचा उपयोग करत असे. नोटीस बजावणं, अटक करणं अशा आदेशांच्या तार पाठविल्या जात.  

मागच्या शतकातल्या ९०च्या दशकांपर्यंत तार खूप मोठ्या प्रमाणात वापरली जायची. तारसेवेवरती पहिला आघात टेलिफोनच्या शोधाने केला. मृत्यू आणि अन्य तातडीचे संदेश टेलिफोनद्वारा पाठवणे लोकांना सोयीचे वाटू लागले. व्यावहारिकदृष्ट्या ते बरोबरही होतं. मग पाठोपाठ इंटरनेट आणि मोबाईल आले. काही काळाने हा मोबाईल सर्वांच्या खिशाला परवडण्यासारखा झाला. टेलिफोनच्याही तुलनेत आता संदेशांची देवाणघेवाण वेगाने होऊ लागली. 

अलीकडच्या काळात इंटरनेट सार्वत्रिक आणि सहज झालं. त्यामुळे तारही इंटरनेटच्या माध्यमातून पाठवली जाऊ लागली. वेब बेस्ड टेलिग्राफ मेलिंग सर्विस काम करू लागली. हळूहळू तारेचं वैभव जाऊ लागलं. कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर खर्चही निघत नव्हता. त्यामुळे ही तारसेवा १९९०मधे बीएसएनएलकडे गेली. परवडतच नसल्यामुळे शेवटी १५ जुलै २०१३ला कायमस्वरूपी बंदच झाली.  

पंडित नेहरू ते राहुल गांधी कनेक्शन

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९४७ मधे ब्रिटीश प्रधानमंत्री क्लेमेंट अॅटली यांना काश्मीरप्रश्नाच्या संदर्भात तार पाठवली. त्यात त्यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. त्यात एकूण शब्द होते १६३. विलक्षण योगायोग असा की १६३ वर्षं सेवा देऊन तारसेवा विसावली. पंडितजींचे नातू आणि माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. भारतात तारसेवा बंद झाली त्या दिवशी शेवटची तार राहुल गांधी यांना पाठवण्यात आली. पणजोबा ते पणतू असा भारतीय तारेचा आणि नेहरू घराण्याचा प्रवासही आगळाच म्हणायला हवा.