८ नोव्हेंबरः आजचा इतिहास

०९ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ८ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या.

नोटाबंदीची अनागोंदी (घोषणा २०१६)

बरोबर दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक ५०० आणि १०००च्या नोटा बंद करून काळ्या पैशाला धक्का द्यायची घोषणा केली. पण तो धक्का सर्वसामान्य माणसालाच बसला. कामधंदा सोडून त्याचे काही महिने रांगांमधेच गेले. लाखो लोक बेरोजगार झाले. शंभराहून अधिक जणांचा जीवही गेला. पण मोठे बिझनेसमन कधीच रांगांत उभे राहिले नाहीत. त्यामुळे काळा पैसा उघड झाला नाही. ९९.३ टक्के रुपये बँकांमधे परत आले. सरकार या निर्णयाचं समर्थन करत राहिलं. पण अर्थतज्ज्ञांनी या निर्णयावर टीका केली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्याला कायदेशीर लूट असं म्हटलं. तेव्हापासून भारतीय अर्थव्यवस्था अद्याप सावरलेली नाही.

भाजपचे माजी लोहपुरुष लालकृष्ण अडवाणी (जन्म १९२७)

स्वातंत्र्याआधी १९२७ला कराचीमधे त्यांचा जन्म झाला. फाळणीने विभागलेल्या वातारवणात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. प्रचारक बनले. दिल्लीत नगरसेवकपदापासून सुरू झालेली त्यांची वाटचाल जनसंघाचे अध्यक्ष बनेपर्यंत झाली. त्यानंतर जनता पार्टीच्या सरकारात माहिती आणि जनसंपर्क मंत्रीपद. भाजपच्या स्थापनेनंतर पहिल्या लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर अडवाणींकडे पक्षाची जबाबदारी आली. त्यांनी रथयात्रा काढून अयोध्या राममंदिराचा मुद्दा ऐरणीवर आणला. पक्षाला कट्टर हिंदुत्वाच्या मार्गावर नेलं. नेत्यांची नवी पिढी घडवली. त्यामुळे भाजपने शून्यातून सत्तेपर्यंत मजल मारली. अडवाणी पंतप्रधान बनू शकले नाहीत. पण ते उपपंतप्रधान बनले. आताही भाजपचं सरकार सत्तेत आहे. त्याचा पाया अडवाणींनीच रचलाय. भले आता ते मार्गदर्शक मंडळात साईडलाईन झालेत.

कथ्थकची राणी सितारादेवी (जन्म १९२०)

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला गूगलने सितारादेवींचं डूडल बनवून त्यांना मानवंदना दिली होती. त्यांचं कर्तृत्व आहेच इतकं मोठं. आज कथ्थक नृत्याला ख्याती आणि मान्यता मिळालीय, त्यात त्यांचं योगदान फार मोठं आहे. चार वर्षांपूर्वी नव्वदीत निधन होईपर्यंत कथ्थक हीच त्यांचं जीवन होतं. आयुष्यभर त्यांनी आपल्या नृत्यकौशल्याने कथ्थकला देशविदेशात नेलं. कथ्थकच्या बनारस आणि लखनौ घराण्यांचा मिलाफ त्यांच्या नृत्यात होता. भारदस्तपणा हे त्यांच्या व्यक्तित्वाचं वैशिष्ट्य होतं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना कथ्थकक्वीन असा किताब दिला होता. मुळात त्या हिंदी सिनेमात रमल्या होत्या. प्रसिद्ध दिग्दर्शक के. आसिफ हे त्यांचे पती. १९३४ ते १९७४ पर्यंत त्यांनी नृत्यप्रधान भूमिका करून हिंदी सिनेमे गाजवले. रोटी, आबरू, अंजली अशा सिनेमांतले त्यांचे नाच खूपच लोकप्रिय झाले. हिंदी सिनेमात आज रूढ झालेला नागिन डान्स त्यांनीच पहिल्यांदा केला. पण सिनेमाच्या ग्लॅमरपेक्षा त्यांना नृत्याची आराधना महत्त्वाची वाटली. त्यांनी सिनेमा सोडला आणि कथ्थकमधेच रमल्या.

 

आघाडीचा अभिनेता उपेंद्र लिमये ( जन्म १९६९)

जोगवा मधल्या तायप्पा या जोगत्याच्या भूमिकेसाठी मराठीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या उपेंद्र लिमये यांचा आज वाढदिवस. त्यांनी नेहमीच पठडीबाहेरच्या भूमिका केल्या. त्यांची सुरवातही नाटकांपासूनच झाली. मुक्तामधून ते मराठी सिनेमात आले. त्यानंतर बनगरवाडी, कथा दोन गणपतरावांची, सरकारनामा, ध्यासपर्व, जत्रा, येलो, प्यारवाली लवस्टोरी, गुरुपौर्णिमा असे त्यांचे सिनेमे येत राहिले. त्यात त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. चांदनी बार, पेज थ्री, सरकारराज, ट्राफिक सिग्नल अशा हिंदी सिनेमांतही ते लक्षात राहिले.

 

पॉप क्वीन उषा उत्थुप (जन्म १९४७)

भायखळ्याच्या पोलिस कॉलनीत लहानपण गेलेल्या उषा उत्थुप यांना आपल्या आवाजाचा वेगला पोत लहानपणीच कळला. शास्त्रीय संगीत शिकताना त्यांना जाणवलं की आपला आवाज रॉक, जॅझ, पॉप या पाश्चात्त्य गायकीला अधिक सूट होणारं आहे. रेडियोवर ते हे वेस्टर्न म्युझिक ऐकत आणि शिकत. मुळात शास्त्रीय संगीताच्या मास्तरांनी त्यांना गाण्यासाठी अयोग्य ठरवलंच होतं. अमिन सयानींनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांना रेडियोवर गाण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी अनेकदा रेडियोवर पॉप गायलं. पहिल्यांदा स्टेजवर गायलं ते चेन्नईच्या जेम्स नाईट क्लबमधे. तेही अगदी सहज. सात दिवस तिथे गायल्या म्हणून क्लबने त्यांना कांजीवरम साडी दिली. तीच पुढे त्यांची ओळख बनली. साडीत भारतीय वेशभुषेत उषा अनेक नाईट क्लबमधे गात. त्यांचे अनेक अल्बमही आले. त्यांचे स्टेज शो ही गाजले. हरे राम हरे कृष्णा सिनेमात त्यांना पहिल्यांदा संधी मिळाली. मग आरडी बर्मन आणि बप्पी लहिरी यांनी त्यांना खूप संधी दिली. त्यांनी भारतीय जवळपास सर्वच मोठ्या भाषांमधे गायलं आहेच. पण इंग्लिशसह डच, फ्रेंच, जर्मन, ईटालियन, सिंहली, स्वाहिली, रशियन, स्पॅनिश, नेपाळी, झुलूसह अनेक विदेशी भाषांमधेही गायलं आहे. सात खून माफ या सिनेमात त्यांनी अभिनयही केलाय.