शोध तुकोबांच्या मंचरी अभंगांचा

२२ मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


तुकाराम महाराजांच्या गाथा सगळ्यांना माहीत आहेत. तुकाराम महाराज आणि गाथा हे समीकरणच होऊन बसलंय. तुकोबांचे मंचरी अभंगही खूप महत्त्वाचे आहेत. ते आजही आपल्याला लिखित स्वरूपात बघायला मिळतात. त्या अभंगांच्या आणि तुकोबांच्या पाऊल खुणांचा घेतलेला हा शोध.

भल्या सकाळी उठून एसटीने मंचरचा रस्ता धरला. चाकणच्या पुढे तीसेक किलोमीटरवर हे एक छोटं शहर. मृग नक्षत्राला सुरवात होऊन दहा-बारा दिवस उलटले होते. पावसाचा अजूनही पत्ता नव्हता. पांढऱ्या ढगांनी आकाश व्यापलं होतं. ट्रॅक्टरने नांगरुन टाकलेली शेतं भकास दिसत होती. बाया-माणसं शेतात मशागतीचं काम करताना दिसत होती.

कोरडे पडलेले कॅनॉल मधेच कुठेतरी दिसायची. तर अधून-मधून शेळ्यामेंढ्यांचे कळपं गवत खुरटताना नजरेस पडायची. भरभर सुटलेला वारा, पण पावसाच्या खुणा काही दिसत नव्हत्या. यंदा पश्चिम महाराष्ट्रातही दुष्काळाच्या खुणा स्पष्ट जाणवताहेत. हा अनोळखी परिसर मनात घोळत असतानाच मंचर गाठलं.

पुणे-नाशिक हायवेवरचं हे बाजरपेठेचं हे छोटं शहर. तुकाराम महाराजांचे मंचरी अभंग याच गावाच्या नावावरून प्रसिद्ध आहेत. या अभंगांची मूळ वही आजही इथल्या महाजन कुटुंबाकडे आहे. त्या महाजनांच्या घरी निघालो. आळे फाटा इथल्या भुजबळ गुरुजींना फोन करून काही व्यक्तींची नावं, नंबर मिळवले. या आधारे मी विचारत विचारत मंचर गावाच्या वेशीच्या आत गेलो.

महाजनांचं घर वेशीच्या आत आहे. त्यांच्या घरी जाऊन राजेंद्र महाजन यांना येण्याचं कारण सांगितलं. आणि 'मंचरी वही' आणि 'मंचरी उत्सवा'बद्दल विचारले. मग त्यांनी मंचरीचा सगळा पूर्वइतिहासाचं सांगायला सुरवात केली. 

तुकाराम महाराजांसोबत वेगवेगळ्या समाजातले, आठरपगड जातींचे लोकं भजन-कीर्तनाला असायचे. शिवाय विणेकरी आणि टाळकरी म्हणूनही असायचे. तुकाराम महाराजांची विद्यावंशज परंपरा निळोबाराय- शंकर महाराज शिऊरकर- मलप्पा महाराज अशी आहे. विण्याचा मान त्यांच्याकडे आल्याचा मलप्पा महाराजांना तुकोबारायांचा दृष्टांत झाला होता. त्यानुसार ते वीणा मान घेत असत.

पण लोकं विण्याच्या मानावरून त्यांच्यावर शंका घ्यायला लागले. लोक त्यांना खोट ठरवत होते. ते मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी गावचे रहिवाशी. खरेपणा सिद्ध करण्यासाठी ते देहूला गेले. इंद्रायणीकाठी ज्या डोहात गाथा बुडवली होती, तिथे जाऊन बसले. त्यांना परत दृष्टांत झाला.

महाराज म्हटले, का बसलास इथे. मंचरला जा. महाजन घरी अभंगांची वही प्रसाद म्हणून दिलीय. ती वही तुम्ही घ्या. मलप्पा महाराज मंचरला आले. त्यांनी महाजन कुटुंबाकडे अभंगांची वही देण्याची मागणी केली. मला महाराजांचा दृष्टांत झालाय वही द्या. महाजन आणि गावतले लोक म्हणाले, तुम्ही काही तरी प्रचिती दाखवा. यावर सर्वांनी मिळून तोड काढली.

घराबाहेर ५० फुटांवरून धावा करायला सांगितलं. वही तुमच्याकडे आली तर, तुम्ही घ्या. मलप्पांनी धावा केला. अनेक ग्रंथांच्या चवडीतून ती वही त्यांच्या हातात जाऊन पडली. ती वही त्यांना देण्यात आली. तेव्हापासून विण्याचा मान वंशपरंपरेने मलप्पा महाराजांच्या कुटुंबाकडे आहे. तर त्याची मुळ प्रत लिहून महाजन कुटुंबांकडे ठेवली.

आताही राजेंद्र सदाशिव महाजन यांच्याकडे मंचरी वही आहे. तुकाराम महाराजांनी हे अभंग मंचर इथे लिहिले म्हणून हे अभंग 'मंचरी अभंग' म्हणून ओळखले जातात. महाराजांनी मंचरला अभंग का लिहिले? महाराजांचा आणि महाजन कुटुंबांचा संबंध कसा? असं विचारल्यावर त्यांनी यासंदर्भातील इतिहास सांगायला सुरवात केली.

तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य ओतूरचे. ओतूरला जाताना महाराज देहू- कडूस- मंचर- वडगाव काशिंबे- ओतूर असा प्रवास करायचे. मंचरला आल्यावर महाजनांच्या घरी मुक्कामाला यायचे. त्याच काळात त्यांनी इथे अभंग लिहिले. प्रसाद म्हणून त्यांनी महाजनांना अभंगांची वही दिली. महाराज जिथे मुक्काम असायचे, त्यांना प्रसाद म्हणून काही तरी द्यायचे.

तुकाराम महाराजांनंतर जवळपास अडीचशे वर्ष मलप्पा महाराज यांच्याकडे ती वही गेली. तर महाजनांकडे असलेली लिखित प्रत त्यांच्या अकराव्या पिढीचे प्रतिनिधी राजेंद्र महाजन यांनी आजही जपून ठेवलीय. यात महाजन कुटुंबावरही एक अभंग आहे.

घोंगडे नेले सांगू मी कोणा ।।
दुबळे माझे ना नीति मना ।।१।।
पुढती मज न मिळे आता ।।
जवळी सत्ता दाम नाही ।। २।।
शेटे महाजन एका कोणी ।।
घोंगडियाची करा शोधणी ।।३।।
घोंगडियाचा करा बोभाट ।।
तुका म्हणे जव भरला हाट ।।४।।

बरीच वर्षे हा इतिहास विसरला गेला होता. पण नंतर मलप्पा महाराजांचे वंशज विवेकानंद महाराज वास्कर आणि विठ्ठल महाराज वास्कर या बंधुंनी मंचर इथे 'मंचरी गाथा उत्सव' सुरु केला. ते वाशीवरुन वारकरी, टाळकरी घेऊन येतात आणि पाच दिवस मंचरी ग्रंथाचं परायण करतात. अधिक मासात हा उत्सव भरतो. राजेंद्र महाजन यांना त्यांच्या चुलत्याने मंचरी वही दिली. तर एक चुलते स्वातंत्र्यसैनिक आहेत. ५२ वर्षाच्या महाजन यांचं कटलरीचं छोटं दुकान आहे.

‘आम्ही लिंगायत आहोत. पांडुरंग आमचे कुलदैवत आहे. आम्ही वारकरी आहोत. शिवलिंगासोबतच आम्ही गळ्यात माळ घालतो. मंचरी आमचे धन आहे. मंचरीचं वाचन करतो. इथल्या विठ्ठलपुजेचा मान आमच्याकडे आहे. जो कोणी मंचरी वहीचा नीट सांभाळ करील आणि हा वारसा जतन करील, मग तो माझा मुलगा असो की भावाचा मुलगा, त्याच्या हाती हे वंशपरंपरेनं चालत आलेलं धन सोपवेल,’ असं वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा चालवणारे राजेंद्र महाजन अत्यंत तळमळीने आणि उदार अंतकरणाने सांगत होते.

तुकाराम महाराजांच्या लिखित अभंगांचा ठेवा या कुटुंबाने जपलाय. त्यांचा निरोप घेऊन मी अवसरी फाट्यावरच्या नाथांच्या टेकडीकडे निघालो. वारकरी संप्रदायाचं हे अत्यंत मौलिक धन लाखो माणसांना श्रीमंत करणार आहे. नव्या पिढ्यांसाठी ही शिदोरी जगण्याची नवी ऊर्जा देत राहील.

कडूस.

मंचरहून दुपारी एकच्या सुमारास कडूस गावात पोचलो. खेडपासून म्हणजेच राजगुरुनगरच्या पश्चिमेला १४ किलोमीटरवर हे गाव आहे. तिथे तुकाराम महाराजांचे एक ब्राम्हण टाळकरी आणि शिष्य गंगाजीबुवा मवाळ यांचा वाडा आणि विठ्ठलाचं मंदिर आहे. गाव बरंच मोठं आहे. विचारत विचारत मंदिरात पोचलो. तिथे असलेल्या एक-दोघांना मंदिराबद्दल माहिती विचारली. त्यांनी मला प्रभाकर महाजन यांच्या घरी जायला सांगितलं.

छोट्या बाजारपेठेत असलेल्या महाजन यांच्या घरी मी पोचलो. त्यांचे चिरंजीव संजय महाजन यांनी मला बसायला सांगितलं. गावाबद्दल आणि इतर बऱ्याच विषयांवर आमच्या गप्पा रंगल्या. काही वेळातच ८४ वर्षाचे महाजन बैठकीत आले. मी पत्रकार असून मवाळ आणि मंदिराबद्दल मला माहिती हवी असल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनी गंगजीबुवा मवाळांचा आणि तुकाराम महाराजांचा इतिहास आणि संबंध सांगायला सुरवात केली.

गंगजीबुवा मवाळ हे तळेगाव दाभाडे इथले ब्राम्हण होते. त्यांच्या घरी गुरंढोरं होती. त्यांची म्हैस एकदा चरत चरत देहू परिसरात गेली. ते शोधत शोधत देहूला आले. आजूबाजूला फिरत होते. तेव्हा महाराजांनी त्यांना समोरच्या डोंगरावर जायला सांगितलं. तिथे त्यांची म्हैस चरत होती. या दृष्टांतानंतर मवाळांनी तुकाराम महाराजांना गुरु करून घेतलं.

तुकाराम महाराजांसोबत सर्व जातीजमातींची टाळकरी होते. त्यात मवाळही टाळकरी झाले. एकदा तुकाराम महाराजांचं जवळच असलेल्या चास इथे कीर्तन झालं. तेव्हा त्यांना साक्षत्कार झाला. त्यांनी सोबत आणलेली पांडुरंगाच्या मूर्तीची  कडूसमधल्या कुलकर्णीच्या मातीच्या वाड्यात प्रतिष्ठापन केली.

गंगाजीबुवा मवाळांना इथे ठेवलं. त्यानंतर गावकऱ्यांनी इनाम म्हणून जागा दिली. त्याठिकाणी मंदिर बांधलं. हे मवाळांचा वाडा किंवा मवाळांचे मंदिर म्हणून ओळखलं जातं. हे मंदिर खूप जुनं आहे. आत मवाळांची एक खोली आहे. या मंदिराला दोन दरवाजे आहेत. उजव्या दरवाजाला तुकाराम पायरी म्हणतात. मोडकळीस आल्याने सध्या मंदिराचं बांधकाम सुरु आहे. 

माघ शुद्ध दशमी ते पौर्णिमेला मोठा सप्ताह होतो. भजन, कीर्तन, आरती, पूजन असे धार्मिक कार्यक्रम चालतात. ३५० वर्षांपासून हा उत्सव चालू आहे. या उत्सवाला भाविकांची खूप गर्दी होते. यासाठी ब्राम्हण समाजाचा पुढाकार असतो. पण गावातले सगळ्या जाती-जमाती लोक मिळून हा उत्सव करतात. ब्राम्हण समाज स्वतः पुढाकार घेऊन, सर्व कामं आणि अन्नदान करतो, हे इथल्या उत्सवाचं वैशिष्ट्ये आहे.

सहा दिवस अन्नदान केलं जातं. अन्नदानाचा पहिला मान अर्थात मवाळांचा असतो. गोडसे, पानसरे, शिंपी समाज यांचेही मान असतात. या मानाव्यतिरिक्त २० वर्षांपासून तर चिट्या टाकून, ज्याचं नाव निघेल त्याला अन्नदानासाठी संधी दिली जाते. देशभरात नोकरी-कामानिमित्त गेलेला सर्व ब्राम्हण समाज या सप्ताह उत्सवासाठी ६ दिवस कडूसला येतो.

 पूर्वी इथे ब्राम्हणांचे ३०० उंबरे होते. आता फक्त ८-१० घरं राहिलीत. त्याचबरोबर प्रतिपदेला मंदिरात २५० ते ३०० समया लागता. या दिव्यांच्या आरासीने मंदिर उजळून निघतं.

उत्सवात इथे पाऊल घडी होते. म्हणजे पंढरीचे पांडुरंग ६ दिवस इथे मुक्कामाला येतात. या सहा दिवसात पूर्वी पंढरपुरला आरती व्हायची नाही. देव कडूसला गेले असं सांगितलं जायचं. आता ही प्रथा बंद झाली. म्हणून प्रतिपंढरपुर अशी या गावाची ओळख पडली. तुकाराम महाराज ७ दिवस इथे असायचे. वीणा घेऊन देवाजवळ उभे राहायचे. ते हयात असेपर्यंत अंदाजे २८ वर्षे इथे येत होते. असा या उत्सवाचा इतिहास आहे.

तुकाराम महाराजांनी अभंग म्हणायचे आणि ते अभंग मवाळ लिहून काढायचे. ती ५०० ते ६०० पानांची लिखित गाथा कडूसमधे होती. मवाळांचे वंशज पुण्यात गेले, त्यांच्याकडे आताही तो ग्रंथ उपलब्ध आहे. गंगाजीबुवा मवाळ आणि तुकाराम महाराजांचा वारसा कडूसवासीय विशेषता इथले ब्राम्हण मोठ्या उत्साहाने चालवतात.

वारकरी संप्रदायाची धुरा अत्यंत नेटाने पुढे पुढे नेणारं हे गाव, संतांची सर्व जातीधर्म समान ही भूमिका प्रत्यक्ष कृतीने आचरणात आणतं. अन्नदानची इथली परंपरा मी स्वतः अनुभवली. प्रभाकर महाजन यांच्या घरी दुपारचं भोजन घेऊनचं मी पुण्याचा रस्ता धरला.

-  लेखक हे मुक्त पत्रकार असून अक्षरदान या दिवाळी अंकाचे संपादक आहेत.