खान्देशाचा दसरा दिवाळी म्हणजेच आखाजी

०७ मे २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. खान्देशात आजच्या दिवशी आखाजीचा सण साजरा केला जातो. यानिमित्त खान्देशात दिवाळी, दसऱ्यासारखाच उत्साह असतो. गावोगावी खापरावरचे मांडे तयार केले जातात.

हिंदू धर्माप्रमाणे साडेतीन मुहू्र्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला खान्देशातल्या अहिराणी भाषेत 'आखाजी' म्हटलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी, दसऱ्याला महत्त्व आहे. तसंच खान्देशात आखाजी साजरी होते. आखाजी हा शब्द आखा तीज यावरून आलाय. आखा तीजचा अपभ्रंश आखाजी झाला. माहेवाशिणींचा सण म्हणून आखाजी मोठ्या उत्साहात खान्देशात साजरी केली जाते.

शेतीसंस्कृतीशी जोडलेला सण

आखाजी साजरी करण्याच्या पद्धतीवरून हा सण शेतीशी निगडीत असल्याचं दिसून येतं. पूर्वीच्या काळी बहुतांशी कुटुंबं ही शेतीवर अवलंबून होती. वर्षभर शेतीची कामं केल्यानंतर पाऊस येण्याआधी उन्हाळ्यात सासरवाशिण आपल्या माहेरी जायची. त्यासाठी आखाजी हे निमित्त असायचं.

आखाजी म्हटल्यावर डोळ्यासमोर येतात, ते खापरावरचे मांडे, आमरस, भात, काळ्या मसाल्याची आमटी, कुरडया, पापड, कैरीचं पन्हं अशा खाद्य पदार्थांची मेजवानी. खान्देशातल्या घराघरांत या पदार्थांची मेजवानी बघायला मिळते. हा दिवस कर्ज फेडण्याचा दिवस असल्याने आपल्या पितरांना गोडधोड जेवण देण्याची प्रथा आहे. या दिवशी मातीची लाल घागर आणून त्यात वाळा टाकला जातो. त्यावर डांगर-खरबूज ठेवून पूजा केली जाते.

हेही वाचाः प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक

महिलांमधे, माहेरवाशिणींमधे आकर्षण

महिलांमधे आखाजीला खूप महत्त्व आहे. याच दिवशी चैत्र गौरीचे विसर्जन केलं जातं. गावागावात घरासमोर, चौकात, शेतातल्या झाडाला झोके बांधले जातात. युवती, महिला उंच झोके घेताना दिसतात. ग्रामीण भागात अहिराणी भाषेत लोकगीतं गायली जातात. आखाजीसह इतर सणांनी अहिराणी भाषेतली काव्य रचना अधिक प्रगल्भ केलीय.

आपल्या कवितेच्या माध्यमातून खान्देशाची आणि अहिराणी भाषेची जगाला ओळख करून देणाऱ्या बहिणाबाईंनीही आखाजी सणावर कविता लिहिलीय. त्या लिहितात,

आखाजी

आखाजीचा आखाजीचा मोलाचा सन देखा जी
निंबावरी निंबावरी बांधला छान झोका जी 

माझा झोका माझा झोका चालला भिरभिरी जी।
माझा झोका माझा झोका खेयतो वाऱ्यावर जी

गेला झोका गेला झोका चालला माहेराले जी
आला झोका आला झोका पलट सासराले जी

माझा झोका माझा झोका जीवाची भूक सरे जी
भूक सरे भूक सरे वाऱ्यानं पोट भरे जी

आला वारा आला वारा वाऱ्यानं जीव झुले जी
जीव झुले जीव झुले झाडाची डांग हाले जी

डांग हाले डांग हाले नजर नहीं ठरे जी
झाली आता झाली आता धरती खालेवऱ्हे जी

आंगनांत आंगनांत खेयती पोरीसोरी जी
झाल्या दंग झाल्या दंग गाऊनी नानापरी जी

झाला सुरू झाला सुरू पहिला माझा पिंगा जी
फुगड्यांचा फुगड्यांचा चालला धांगडधिंगा जी

दारोदारीं दारोदारीं खेयाची एक घाई जी
घरोघरी घरीघरीं मांडल्या गवराई जी

संगातीनी संगातीनी बोलव बोलवल्या जी
बोलवल्या बोलवल्या टिपऱ्या झाल्या सुरूं जी

टिपऱ्याचे टिपऱ्याचे नादवले घुंगर जी
कीती खेय कीती खेय सांगू मी काय काय जी

खेयीसनी खेयीसनी आंबले हातपाय जी
चार दीस चार दीस इसावल्या घरांत जी

आहे पुढें आहे पुढें शेतीची मशागत जी

बहिणाबाईंनी आपल्या कवितेच्या माध्यमातून आखाजीची अख्खी धामधुमी जगापुढे मांडली. सासरवाशीण आपल्याला माहेरातून कुणीतरी घ्यायला येणार या आशेने गाणी गातात. या गाण्यात आतुरता, उत्साह, आनंद अशा भावना प्रकट होतात.

आखाजी सारा सण। सूनबाई टिपरना खेवाले।।
बाप उना लेवाले। चाल पोरी आखाजी खेवाले।।
भाऊ उना लेवाले। चाल बहीण टिपरना खेवाले।।
भावजायी कशी म्हणे। चाल चाल नवीनबाई फुगडी खेवाले।।

हेही वाचाः गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय?

अक्षय तृतीयेची आख्यायिका

हिंदू धर्म परंपरेमधे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी अक्षय्य तृतीया कृत युगाचा अंत होऊन त्रेता युगाचा प्रारंभ झाला. तसंच परशुरामांचा जन्मही याच दिवशी झाला होता. त्यामुळे परशुरामाचीही पूजा केली जाते. जैन धर्मातही या दिवसाला महत्व असल्याचं मानलं जातं.

भगवान वृषभदेव याने पूर्वत्व प्राप्त करण्यासाठी एक वर्ष अन्नपाण्याचा त्याग केला होता. त्यानंतर हस्तिनापूरचा राजा श्रेयांस याने वृषभदेव यांना उसाचा रस पाजला होता. त्यामुळे राजाची भोजनशाला अक्षय्य झाली. यामुळे या तिथीला ‘अक्षय्य तृतीया' असं नाव पडल्याची आख्यायिका आहे.

हेही वाचाः साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?

खापरावरचे मांडे फेमस

आखाजीसाठी खान्देशातल्या खेड्यापाड्यांत पुरणपोळ्यांचे म्हणजेच खापरावरचे मांडे तयार केले जातात. या मातीचं खापर उलटं टाकून हातावर पुरणाचे मांडे तयार करून ते खापरावर भाजतात. आपल्या मॉर्डन भाषेत सांगायचं तर रुमाली रोटीमधे पुरण टाकून ती हातावर तयार करून खापरावर भाजली जाते. गावराण तूप आणि आमरस हा बेत या सणाचं खास वैशिष्ट्य आहे. सध्या मांडे घरात न बनवता, बाहेर ऑर्डर देण्याची पद्धत तालुक्याच्या गावापर्यंत येऊन पोचलीय.

काही वर्षांपूर्वीपर्यंत हा सण आठवडाभर चालायचा. पण आता काळाच्या ओघात एकाच दिवसात आखाजीचा प्रोग्राम साजरा केला जातो. सणासाठी एकत्र आलेली मुलं गावातल्या झोपाळ्याऐवजी अँड्रॉइड फोनच्या भोवती रेंगाळलेली दिसताहेत. दळवळणाची साधनं वाढल्याने सासरवाशिणी अधूनमधून माहेराला येत असल्याने या सणाचं म्हणावं तितकं महत्त्व राहिलं नसल्याची खंत अनेक बुजुर्ग व्यक्तींनी बोलून दाखवली.

हेही वाचाः जळगाव जिल्ह्याचा कंट्रोल कुणाकडे हे ठरवणारी निवडणूक

आखाजीचा वॉट्सअप मेसेज

#आखाजी मामानं गाव. पत्तास ना डाव. मावशीसना मान. मामीले तान. बहिनीसना हेका. पाहिजे झोका. आम्बान जेवन. ऊना आखाजी ना सण. आखाजीन्या बठ्ठासले  शूभेच्छा।।

आखाजीनिमित्त शहरासह ग्रामीण भागात पत्त्यांचे डाव रंगू लागतात. वडाच्या झाडाखाली, शेतात मोकळ्या जागी, कधी अक्षरश: मंडप टाकून पत्ते खेळण्याचा आनंद मोठ्यांबरोबर लहानही लुटतात. त्यात तीन पानी, रमी, फटकी असे विविध प्रकार पैसे लावून खेळले जातात. या पत्त्यांच्या खेळात हजारो रूपयांनी उलाढाल होत असते.

आखाजीला कोण किती जिंकलं आणि कोणी किती गमावले याची चर्चा गावात पुढचे आठ दिवस असते. आखाजीच्या चार दिवस अगोदर आणि नंतर चार दिवस असे आठ दिवस पत्त्यांचा अड्डा सुरू असतो. यामुळे बऱ्याचदा पत्त्यांच्या अड्ड्यांवर वादही निर्माण होतात. मात्र आखाजी आटोपली, की हे वादही मिटतात.

हेही वाचाः 

जळगावात भाजपचे नेते पक्षाच्या व्यासपीठावर WWF का खेळले?

चला आता आपण राज ठाकरेंना प्रश्न विचारुया

काँग्रेसच्या हातातून संधी निसटून जातेय का?

कितीही टाळा फ्रॉइडने सांगितलेला सेक्स आडवा येणारच!