अंधारात आनंद आहे, असं सांगणाऱ्या अक्किथम यांना यंदाचा ज्ञानपीठ

०१ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


मल्याळम कवी, लेखक अक्किथम अच्युतन नंबुद्री यांना २०१९ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. मल्याळम कवितेत आधुनिकतेच तत्त्व पेरणारा थोर लेखक म्हणून अक्किथम यांना गौरवलं जातं. अक्किथम स्वातंत्र्य चळवळीसोबतच यांचा समाजकार्यात सक्रिय आहेत. ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्याचाच नाही तर जीवनाचाही गौरव करण्यात आलाय.

‘वेलिचम धुकामानुनी, थमसालो सुगाप्राधन’ या मल्याळम भाषेतल्या ओळी. याचा अर्थ होतो ‘प्रकाशात दुःख आहे. अंधारात आनंद आहे.’  या ओळी कोणत्या लेखकानं लिहिल्यात, का लिहिल्या, कशासाठी लिहिल्या, कोणत्या संदर्भात लिहिल्या हे कळलं नाही तरीही या दोनच ओळी वाचणाऱ्याला भारावून टाकतात. अंधारातलं आणि प्रकाशातलं आपलं जगणं आपल्याला आठवत राहतं. या दोन ओळी बरोबर घेऊन जणू वेगवेगळ्या वाटा शोधत आपण भूतकाळाच्या प्रवासाला जाऊ लागतो.

माणसाला ठार वेड लावतील इतकं सामर्थ्य या दोन ओळींमधे आहे. म्हणूनच या ओळी लिहिणाऱ्या माणसाला आज जग ओळखतंय. अक्किथम अच्युतन नंबूदरी असं या लेखकाचं नाव. त्यांच्या मल्याळम भाषेतल्या पुस्तकात या ओळी आहेत.

‘एपिक ऑफ द ट्वेन्टीथ सेंच्युरी’ या नावानं याचं मल्याळम पुस्ताकाचा अनुवादही करण्यात आलाय. याचं मराठी रूपांतर करायचं झालं तर ते  '२० व्या शतकातलं महाकाव्य' असं होईल. या पुस्तकातून मल्याळम कवितेत आधुनिकतेचं तत्त्व पेरणारा थोर लेखक म्हणून अक्किथम यांना गौरवलं जातं. परवाच अक्किथम यांना ५५ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय.

वांग्देवतेची ऐतिहासिक मूर्ती

साहित्य क्षेत्रातला सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणून ज्ञानपीठ पुरस्काराकडे पाहिलं जातं. मराठीत पाचेक वर्षांआधी भालचंद्र नेमाडे यांनाही या पुरस्कारने सन्मानित करण्यात आलंय. १९६५ पासून दरवर्षी एका मोठ्या साहित्यिकाला हा पुरस्कार दिला जातो. ११ लाख रूपये, सन्मानपत्र आणि वांग्देवतेची प्रतिमा असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

ही प्रतिमा मूळ धार, मालवा इथल्या सरस्वती मंदिरातली मूर्ती आहे. या मंदिराची स्थापना विद्यावाचस्पती राजा भोज यानं इसवी सन पूर्व १०३५ मधे केली होती. आता या मंदिरातली मूळ प्रतिमा लंडनमधल्या म्यूझियममधे आहे. ही प्रतिमा बुद्धीचं प्रतिक मानली जाती.

हेही वाचा : पुरूषसत्तेचा धर्म उलथवणाऱ्या पेट्रूनियाची गोष्ट

वयाच्या ८ व्या वर्षी लिहिली कविता

केरळच्या पलक्कड जिल्ह्यातल्या कुमारनेल्लूर गावात ८ मार्च १९२६ ला अक्किथम यांचा जन्म झाला. गावातल्या शाळेतच अक्किथम यांनी संस्कृत, संगीत आणि ज्योतिषशास्त्र शिकायला सुरवात केली. माध्यमिक शाळेचं शिक्षण घ्यायला ते मोठ्या शाळेतही गेले. पण शिक्षण त्यांनी अर्धवट सोडलं आणि परत गावाकडे आले.

वयाच्या ८ व्या वर्षी अक्किथम यांनी पहिली कविता लिहिली. मोठ्या मोठ्या साहित्यिकांच्या संगतीत राहिल्यानं, आणि गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यानं त्यांच्या साहित्याला प्रगल्भतेची धार आली.

त्यांचं लेखन १९५० च्या आसपास प्रसिद्ध व्हायला लागलं. त्याच सुमारास लिहिलेल्या २० व्या शतकातल्या महाकाव्याने त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या या पुस्तकामुळे त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. अक्किथम यांच्या नावावर आजपर्यंत ४५ पुस्तकं नोंदवली गेली आहेत.

हेही वाचा : संविधान ग्रेट भेट : मुलांना संविधान समजावून सांगणारं पुस्तक

२०१७ चा पद्मश्री पुरस्कार

कविता, दर्जेदार नाटकं, लघुकथा, कांदबरी अशा सगळ्या साहित्यप्रकारात अक्किथम यांचा हातखंडा आहे. ‘प्रकाशात दुःख आहे. अंधारात आनंद आहे’ या ओळी त्यांनी वयाच्या २५ व्या वर्षी लिहिल्या. यावरून त्यांच्या प्रतिभेचा आणि साहित्यिक प्रगल्भतेचा अंदाज बांधता येईल.

अक्किथम यांचं ‘बळीदर्शनम’ म्हणजेच ‘द विजन ऑफ बळी’ हा कवितासंग्रहही फार गाजला. या कवितासंग्रहासाठी त्यांना १९७३ सालचा केंद्र साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. याशिवाय अरंगेतम, निमिशा क्षेत्रम, अमृताघाटीका, कविताकाल, उपनयनम हे त्यांचे कवितासंग्रह फार प्रसिद्ध आहेत. मल्याळम साहित्यातला मानाचा वायलर पुरस्कारही त्यांना २०१२ मधे देण्यात आला. २०१७ मधे त्यांना पद्मश्री सन्मानाही नावाजण्यात आलं.

वयाची ८० वर्ष उलटून गेली तरीही अक्किथम कधीही स्वस्थ बसले नाहीत. आजही ते साहित्यनिर्मिती करतच आहेत. नुकताच 'श्रीमद भागवताम' या ग्रंथाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रकाशित झालाय. एकूण १४,६१३ कडवी आणि २,४०० पानांचा हा ग्रंथ आहे. अनुवादासोबतच काव्याविषयीचं आपलं ज्ञान, आपले दृष्टांत त्यांनी त्यात मांडलेत. त्यामुळेच या ग्रंथाचं मूल्य अन्यन्यसाधारण होतं.

हेही वाचा : महात्मा गांधी प्रत्येकाला वेगवेगळे उमगतात, त्याची गोष्ट

अस्पृश्यतेवर टीका करणारे अक्किथम

कविता आणि साहित्य याबरोबरच काळानुसार समाजात बदल घडवून आणण्याचं कामही अक्किथम यांनी केलं. ते समाजसुधारकही आहेत. केरळातल्या नंबुथिरी ब्राम्हण समुदायांमधे जातपात निर्मूलनाचं काम त्यांनी योगक्षम सभा या संस्थेमार्फत केलं. ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर लोकांमधे वेदांची खरी शिकवण परवण्याचं काम ते करत. १९४७ मधे अस्पृश्यतेविरोधात चाललेल्या पलीयम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. अस्पृश्यतेसारख्या क्रुर प्रथेवर ते नेहमीच टीका करतात.

वयाच्या ९३ व्या वर्षी अक्किथम यांना ज्ञानपीठ मिळालाय. ज्ञानपीठानं त्यांच्या साहित्याचाच नाही तर संबंध जीवनाचा गौरव झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांची साहित्यप्रतिभा फार मोठी आहे. अक्किथम यांचं साहित्य वाचणाऱ्या प्रत्येकाच्या भावविश्वात एकप्रकारची प्रगल्भता येते. तेव्हा ही प्रगल्भता मराठी माणसांतही यावी आणि अक्किथम यांच्या साहित्याचा प्रसार व्हावा यासाठी त्यांच्या साहित्याचं मराठी भाषांतर करणं गरजेचं आहे.

हेही वाचा : 

जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट

इथे रस्त्यावरच उलगडतात विज्ञानातली रहस्यं

ग दि माडगूळकर: भूमिकेला माणूसपण देणारा कलाकार

‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं