आता इंडिया गेटला दोन अमर जवान ज्योती अखंड तेवणार

२७ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


एअर स्ट्राईकच्या आदल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीच्या इंडिया गेटजवळ शहीद सैनिकांना आदरांजली म्हणून युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. स्वतंत्र भारताने १९४७ पासून आजवर लढलेल्या युद्धात वीरमरण आलेल्या जवानांचं हे स्मारक आहे. त्याची कल्पना मांडल्यानंतर तब्बल साठ वर्षांनी ते वास्तवात येतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारीला देशातलं पहिलं राष्ट्रीय युद्ध स्मारक देशाला समर्पित केलंय. स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या सैनिकांच्या आठवणीत बनवलेलं राष्ट्रीय युद्ध स्मारक दिल्लीच्या इंडिया गेटजवळ आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी १७६ कोटी इतका खर्च आलाय.

स्वातंत्र्यानंतर भारताची पाकिस्तानशी ४७, ६५, ७१ आणि ९९ अशी चार युद्ध झालं. चीनविरुद्ध ६२चं युद्ध झालं. त्यात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मृती जपण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आलंय. हे स्वतंत्र भारतातलं पहिलं सर्वसमावेशक नॅशनल वॉर मेमोरियल आहे.

कशासाठी आहे हे स्मारक?

अशाप्रकारचं  राष्ट्रीय युद्ध स्मारक असायला हवं ही कल्पना पहिल्यांदा मांडली गेली ती १९६१ मधे. तेव्हापासून या स्मारकाच्या उभारणीचा विचार सतत पुढे येत होता. चार वर्षांपूर्वी म्हणजे ७ ऑक्टोबर २०१५ ला केंद्रीय मंत्रिमंडळाने या स्मारकाच्या उभारणीवर शिक्कामोर्तब केलं. २०१७ ला काम सुरू झालं. मागच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्यानंतर इंडिया गेट परिसराजत स्मारकाची जागा नक्की करण्यात आली. फेब्रुवारीमधे त्याच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरूवात झाली.

स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीत आणि सुरक्षेत सैनिकांच्या कामगिरीची ओळख सर्वसामान्य नागरिकांना करून देण्यासाठी हे स्मारक उभं करण्यात येतंय, असं चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल पी. एस. राजेश्वर यांनी गेल्या रविवारी प्रीलाँच इवेंटमधे स्पष्ट केलं. ते म्हणाले की, ही राष्ट्राची सशस्त्र दलांप्रति व्यक्त केलेली श्रद्धांजली आहे. हुतात्म्यांचा सन्मान आणि नव्या पिढीला प्रेरणा हे या स्मारकामागचे मुख्य हेतू आहेत.

राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या निर्मितीसाठी २०१६ ते २०१७ मधे एका राष्ट्रस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. त्यातून यशस्वी झालेल्या रचनेनुसार याचं डिझाइन ठरवण्यात आलं. यात एक मुख्य मेमोरियल आहे. त्याभोवती ४० एकर क्षेत्रातल्या कॉम्प्लेक्समधे एकूण तीन लॉन आहेत. इथं एकावेळेस २०० ते २५० लोक सामावले जाऊ शकतात. इंडिया गेटच्या दृश्यात कोणताही अडथळा नको म्हणून स्मारकाचा मोठा भाग जमिनीच्या खाली बनवण्यात आलाय.

अशी आहे याची रचना

राष्ट्रीय युद्ध स्मारकाची एकूण ४ चक्रांत विभागणी करण्यात आलीय. सगळ्यात आतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं चक्र हे अमर चक्र आहे. त्यात अमर ज्योत आहेच. त्यावर १५.०५ मीटर उंच स्मारक स्तंभ उभारलाय. तो शहीद सैनिकांच्या स्मृतींचं प्रतीक आहे. हे स्मारकाचं केंद्र आहे. इथं नेहमी अमर ज्योत तेवत राहिल.

सगळ्यात बाहेर सुरक्षा चक्र आहे. तिथं ६९५ झाडं लावलीत. ती देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांची प्रतीक आहेत. त्याच्या आतलं दुसरं चक्र त्याग चक्र आहे. त्यात १६ भिंती आहेत. स्वातंत्र्याच्या नंतर झालेल्या युद्धात वीरमरण आलेल्या सेनादल,  हवाई दल आणि नौदलातल्या २५,९४२ शहीद सैनिकांची नावं त्यांच्या रेजिमेंटनुसार सोनेरी अक्षरांमधे ग्रेनाईटवर कोरलेली आहेत.

तिसरं चक्र हे वीरता चक्र आहे. त्यात भारतीय सैन्याने लढलेल्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्व लढायांची माहिती आहे. त्यात १९४७ – ४८चं पाकिस्तान युद्ध , चीनबरोबरचं १९६२चं युद्ध, १९६५चं भारत-पाक युद्ध, १९७१चं बांग्लादेश युद्ध आणि १९९९ मधली कारगीलची लढाई याची सगळी माहिती दिलेली आहे.

परमवीरांची प्रेरणा देणारे चौक

मुख्य स्मारक परिसराच्या शिवाय भारतीय सैन्यातला सर्वोच्च सन्मान असलेल्या परमवीर चक्र मिळवणाऱ्या दोन सार्वजनिक चौक आहेत. त्याला परम योद्धा स्थळ असं नाव दिलंय. आजपर्यंतच्या २१ परमवीर चक्र मिळवलेल्या सैनिकांच्या धातूच्या मूर्ती आहेत.

राष्ट्रीय युद्ध स्मारक पाहण्यासाठी कोणतंही तिकीट नसेल. पण ते पाहण्यासाठीची वेळ मात्र ठरलेली आहे. हे स्मारक नोव्हेंबर ते मार्च या काळात सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आणि एप्रिल ते ऑक्टोबरमधे ९ ते ७.३० या वेळात चालू असेल.

मुळात हे युद्ध स्मारक जिथे उभारलंय तो परिसर म्हणजे इंडिया गेट हेदेखील वॉर मेमोरियल आहे. पहिल्या महायुद्धात ब्रिटिश आर्मीकडून जगभर युद्ध करताना धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ दिल्लीत जवळपास ९० वर्षांपूर्वी इंडिया गेट उभारण्यात आला. त्यावर अफगाण युद्धातल्या वीर सैनिकांची नावंदेखील कोरण्यात आलीत.

इंडिया गेटच्या जवळच १९७१ च्या बांग्लादेश युद्धातल्य भारताच्या विजयात बलिदान दिलेल्या सैनिकांच्या स्मृती जागवण्यासाठी अमर जवान ज्योत उभारण्यात आली. हे छोटंसं देखणं स्मारक भारतीय सैनिकांच्या शौर्याचं प्रतीक बनलंय. जानेवारी १९७२ला अमर जवान ज्योतीच्या स्मारकाचं उद्घाटन इंदिरा गांधींनी केलं होतं.

तेव्हापासून आजतागायत ही ज्योत अखंड जळत असते. आता त्याच्या जवळच नव्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातही नवी ज्योत लवकरच पेटवली जाईल. त्यामुळे इंडिया गेट परिसरात सैनिकांच्या शौर्याची आठवण करून देणाऱ्या दोन अमर जवान ज्योती आपल्याला प्रेरणा देत राहतील.