गोव्याचा सायबा मोदींच्या बाजूने कौल देणार का?

३० एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


लहानशा गोवा राज्यात दोन लोकसभेच्या जागा आहेत. त्या दोन्हीही भाजप जिंकतं तेव्हाच भाजपला पाच वर्षं सत्ता मिळवण्या इतका कौल देशभरात मिळतो. त्यामुळे दक्षिण गोव्याची खासदारकी भाजप टिकवेल का, याकडे गोवेकर लक्ष ठेवून आहेत. पण ते यश मिळवून देणारे मनोहर पर्रीकर आता नाहीत. पर्रीकरांनंतर गोव्याच्या राजकारणाचं चित्र कसं असेल, हेदेखील लोकसभेचे निकाल ठरवणार आहेत.

देशभरात सर्वंत्र लोकसभेची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे, पण गोव्यात मात्र वेगळंच चित्र आहे. इथे लोकसभा निवडणुकीपेक्षा चर्चा आहे ती इथल्या चार विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीची. लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भवितव्य निश्चित होईल. पण पोटनिवडणुकीत गोव्यातलं भाजप आघाडी सरकारच्या टिकेल का, याचा निकाल लागेल. 

पर्रीकरांच्या निधनाची सहानुभूती आहे? 

अडीच दशकांनंतर पहिल्यांदाच गोव्यातला भाजप मनोहर पर्रीकरांच्या गैरहजेरीत निवडणुकीला सामोरं जातोय. १७ मार्चला मनोहर पर्रीकरांचं निधन झालं आणि २३ मार्चला निवडणुकीची घोषणा झाली. पण या लोकसभा निवडणुकीवर मनोहर पर्रीकर यांच्या निधनाच्या सहानुभूतीची लाट विशेष आढळली नाही. पण पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत मात्र ही लाट निश्चितच असेल. किंवा ती भाजपला तयार करावी लागेल.

गोव्यात लोकसभेच्या फक्त दोन जागा. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यावेळी पाचव्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत. ते सतत चारवेळा खासदार म्हणून निवडून आलेत आणि केंद्रात आयुष खात्याचं मंत्रीपद भूषवत आहेत. ते गोव्यातल्या बहुजन समाजाचे प्रतिनिधी मानले जातात. गोव्यातल्या राजकीय गोळाबेरजेत बहुजन समाजाचं महत्व मोठं आहे. त्यामुळेच मोदी सरकारात पर्रीकर संरक्षण मंत्री बनल्यानंतरही श्रीपाद नाईकांचं मंत्रीपद कायम ठेवण्यात आलं. 

श्रीपाद नाईक अजातशत्रू उमेदवार

स्वच्छ चारित्र्य, निष्कलंक, अजातशत्रू अशी श्रीपाद नाईक यांची प्रतिमा इथल्या जनमानसात आहे. यापूर्वी वाजपेयी सरकारातही ते मंत्री होते. पण केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेली विशेष उल्लेख करण्यालायक एकही गोष्ट नमूद करता येणार नाही. यावेळेस त्यांना आयुष खातं दीर्घकाळ मिळालं. त्याचा त्यांनी गोव्याला उपयोग करून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शेवटच्या टप्प्यात आयुष हॉस्पितळाचा पायाभरणी ही त्यांची एकमेव लक्षणीय गोष्ट.  

ते राज्यात भाजपचे संस्थापक सदस्य आणि नेतेही. परंतु मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाच्या उजेडात श्रीपादभाऊ नेहमीच काळोखात राहिले. पण अडीअडचणीच्या वेळी दिल्लीत गेलेल्या गोमंतकीयांना राहण्याच्या व्यवस्थेसह कोणतीही मदत करण्यात ते तत्पर होते. त्यांची राजकीय कारकीर्द ही प्रामुख्याने राजकीय कर्तबगारीवर उभी राहिली नाहीच. पण लोकांची आपुलकी हाच त्यांच्या यशाचा मंत्र ठरला.

हेही वाचा: एक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा

फिर एक बार श्रीपादभाऊ कशाला? 

पण आता चारवेळा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर श्रीपाद नाईक यांच्याविषयी अँटी इन्कम्बन्सीच पाहायला मिळाली. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसकडे तोलामोलाचा उमेदवार नसल्याने अखेर गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना त्यांच्याविरोधात उभं केलं होतं. पण गिरीश चोडणकरांचं काम हे प्रामुख्याने दक्षिण गोव्यापुरतंच सिमित आहे. पण तरीही काँग्रेसश्रेष्ठींनी गिरीश चोडणकर यांना उत्तर गोव्याची उमेदवारी दिली. तेही नाईकांच्याच भंडारी समाजाचे असल्याने हा निर्णय घेतला असावा. 

या निवडणुकीत श्रीपाद नाईक यांच्यापाशी ‘फिर एक बार, मोदी सरकार’ हा एकच मंत्र होता. पण फिर एक बार, श्रीपाद नाईक कशासाठी, याचं उत्तर भाजपकडे नाही. त्यामुळे केंद्रात मोदी हवे असतील तर श्रीपाद नाईक यांना निवडून आणा, असं आवाहन करण्याची वेळ भाजपवर आली. 

दुसरीकडे पर्यटन व्यावसायिक, टॅक्सी व्यावसायिक, खाण अवलंबित यांच्या रोषाला श्रीपाद नाईक यांना सामोरं जावं लागलं. हे दोन्ही विषय केंद्र सरकारशी निगडीत असल्याने खासदार आणि केंद्रीयमंत्री म्हणून त्यांनी काय केलं, असा सवाल करून पीडितांनी त्यांना निरूत्तर केलं. अर्थात हा रोष मतांत दिसेल का, हे निकालानंतर स्पष्ट होईल. 

हेही वाचा: एक्झिट अंदाजः मुंबईसह चौथ्या टप्प्यावर राज्य कुणाचं?

सायलेंट वोटर ठरवणार भवितव्य

मुळातच संघटन किंवा नियोजन या गोष्टींचं काँग्रेसला वावडं असल्याने निवडणुका जाहीर झाल्या की मिळेल त्याला हाताशी धरून पंजाचे बावटे नाचवायचे ही त्यांची पद्धत राहिलीय. तरीही प्रदेश अध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर चांगली संघटना बांधणी केल्यामुळे गिरीश चोडणकर यांना त्याचा काही प्रमाणात फायदा झाला. 

भाजपच्या महागड्या आणि दणकेबाज प्रचारासमोर काँग्रेस आणि चोडणकर दिसले नाहीत, हे खरं असलं तरी जिथं घुसायचं होतं तिथं ते बऱ्याच अंशी घुसले. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीतल्या श्रीपाद नाईक यांच्या सुमारे एक लाख मताधिक्याला ते सुरुंग लावणार, हे मात्र स्पष्ट झालंय. चोडणकर नाईकांचा पाडाव करतील, असे म्हणणं खूपच आगाऊपणाचे ठरेल.

पण अर्थातच उत्तर गोवा लोकसभेचा निकाल हा भाजपसाठी धोक्याची घंटा ठरेल, एवढं मात्र नक्कीच म्हणता येईल. यावेळी ‘सायलंट वोटर’ हा निवडणुकीतला महत्वाचा फँक्टर आहे आणि या सायलंट मतदारांच्या मनांत नेमके काय दडलंय, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.

हेही वाचा: मनोहर पर्रीकरः शून्यातून विश्व उभं करणारा नेता

दक्षिण गोवा उघडतो दिल्लीचे दरवाजे 

दक्षिण गोवा हा गोव्याचा दुसरा लोकसभा मतदारसंघ. लोकसंख्येच्या दृष्टीने हा हिंदूबहुल असला तरी राजकीयदृष्ट्या या मतदारसंघावर नेहमीच ख्रिश्चन मतदारांचा पगडा राहिलाय. या मतदारसंघात आत्तापर्यंत काँग्रेसने केवळ अल्पसंख्याक नेत्यालाच उमेदवारी दिलीय आणि काही अपवाद वगळता निवडूनही आणलं. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात भाजपने रमाकांत आंगले या हिंदू उमेदवाराला १९९९ च्या निवडणुकीत निवडून आणलं होतं. तेव्हाच केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार स्थापन झालं. यानंतर हा चमत्कार २०१४ च्या निवडणुकीत झाला. भाजपचे सध्याचे खासदार अॅड. नरेंद्र सावईकर विजयी ठरले आणि पुन्हा एकदा केंद्रात भाजपचं सरकार आलं.

दक्षिणेत भाजपचा खासदार निवडून आला की दिल्लीत भाजपचं सरकार येतं, हा योगायोग भाजपवाल्यांच्या मनात घट्ट बसलाय. त्यामुळे भाजपने आपली सगळी ताकद इथे खर्ची घातलीय. अॅड. नरेंद्र सावईकर यांच्याविरुद्ध काँग्रेसचे माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन उभे आहेत. सार्दिन हे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते एकदा भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीही बनले होते. गेल्या निवडणुकीतत्यांना उमेदवारी नाकारली होती. आता मात्र तोडीचा उमेदवार नसल्यामुळेच काँग्रेसला पुन्हा सार्दिन यांना गळ घालून उमेदवारी द्यावी लागली. 

दक्षिण गोव्यातील सासष्टी हा ख्रिस्ती मतदारबहुल तालुका. या एकाच तालुक्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. हे सगळेच ख्रिस्तीबहुल आहेत आणि तिथे हमखास काँग्रेसला आघाडी मिळते. ही आघाडी अन्य मतदारसंघातून भरून काढली तरच भाजपला विजयाची शक्यता आहे. भाजपने यावेळी सासष्टीची आघाडी भरून काढण्याचं नियोजन केलंय. भाजपकडे अनेक अल्पसंख्याक नेते आहेत आणि त्यामुळे त्यांचाही भाजपला उपयोग होऊ शकतो. 

हेही वाचा: डॉ. प्रमोद सावंत आहेत कोण आणि ते कसे बनले गोव्याचे मुख्यमंत्री?

पर्रीकरांची कमतरता भाजपला जाणवणार

भाजपने सासष्टी वगळता अन्य ठिकाणच्या मतदारसंघातील हिंदूबहुल मतदारांना आपल्याकडे वळवण्याचेही प्रयत्न केलेत. यापैकी काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघातल्या हिंदू मतदारांना मोदींच्या नावाने प्रचार करून खिंडार पाडण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस गोव्यातल्या चर्चसंस्थेने उघडपणे भाजपविरोधी संदेश दिलाय. तिचा इथे पगडा असल्याने तोदेखील एक महत्वाचा फॅक्टर ठरेल.

मनोहर पर्रीकर यांची अल्पसंख्याक मतदारांमधेही एक वेगळी प्रतिमा होती. आतापर्यंत या मतदारसंघात भाजपने दोन वेळा विजय मिळवला त्यात पर्रीकरांची भूमिका महत्वाची ठरली होती. यावेळी पर्रीकर नसल्याने त्याचाही फटका भाजपला बसू शकतो. 

दक्षिण गोव्यात आम आदमी पार्टीचे एल्विस गोम्स उमेदवार आहेत. ते सासष्टी तालुक्यातले असल्याने ते सासष्टीत काँग्रेसची मतं फोडतील. त्याचा भाजपला फायदा होईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येतेय. पण चर्चने हे ओळखून मतांच्या विभाजनाचा फायदा भाजपला फायदा होण्याची शक्यता सांगून ख्रिस्ती मतदारांना सावध केलंय.

या अनेक परस्परविरोधी फॅक्टरमुळे दक्षिण गोव्याची लढत खूपच चुरशीची असेल. त्यात भाजपने यश मिळवलं तर भाजपच्या संघटन कौशल्याला सलाम करावाच लागेल. पण बहुसंख्य फॅक्टर सध्यातरी काँग्रेसच्या बाजूनेच जाताना दिसत आहेत. 

हेही वाचा: गोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं 

(लेखक गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत. )