कोलाजचा पहिला बड्डेः अभिनंदन नहीं करोगे हमारा!

०१ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ३ मिनिटं


कोलाज खऱ्या अर्थानं सुरू झालं ते १ जानेवारी २०१९ ला. बातम्यांशी थेट संबंध असणारे आणि नसणारेही लेख प्रकाशित करणारी अशी ही वेबसाईट आहे. फिचरमधून साजरा करायचा हा आमचा फिचरोत्सव उत्सव आहे. मागच्या वर्षाकडे वळून पाहताना कोलाजनं काय काय मिळवलं आणि काय काय मिळवायचं राहिलं हे आज सांगायलाच हवं!

मायबाप वाचकहो,

कोलाज डॉट इन तसं सुरू झालं ते २०१८ च्या दसऱ्याला. पण त्याला काही अर्थ नव्हता. पहिले दोन महिने साईटची आणि आमची दुरुस्ती करण्यातच गेले. कोलाज खऱ्या अर्थाने सुरू झालं ते १ जानेवारी २०१९ ला. त्यामुळे आज कोलाजचा पहिला बड्डे. 

वर्षभर धावत असताना आज थोडा रेंगाळायचा दिवस आहे. मागे वळून बघण्याचा दिवस आहे. हा कोलाजमधला ११५७ वा लेख आहे. कमी खर्च, हे कोलाजचं रेवेन्यू मॉडेल आहे. त्यामुळे कमीत कमी इन्फ्रास्ट्रक्चरमधे चांगल्या दर्जाचे इतके लेख तयार करणं, ही आमच्यासाठी एक अचिवमेंट आहे. 

त्यातले बहुसंख्य लेख कोलाजमधे काम करणाऱ्या आम्ही मित्रमैत्रिणींनी लिहिलेत, अनुवादित केलेत किंवा लेखक मित्रांकडून नव्याने लिहून घेतलेत. त्या प्रत्येक लेखकाचं मानधन द्यायलाच हवं, हा एक पत्रकार म्हणून आमचा आग्रह आहे. कोलाज आहे तोवर हे व्रत सुरू ठेवता यावं इतकंच. त्याचं बळ तुम्ही वाचकच आम्हाला देत असता.

हेही वाचा : २०१९ चा निरोपः आपला मोबाईल कसा बदलला?

कोलाज काही लेख नियतकालिकांतून, पुस्तकांतून किंवा सोशल मीडियातून घेतं. घेताना ते आमच्या पद्धतीने संपादितही करतो. लेख देणाऱ्या बहुसंख्य मराठी वेबसाईट लेख कुठून घेतलेत ते नोंदवत नाहीत. पण आम्ही ते आग्रहाने नोंदवतो. हा प्रामाणिकपणा कायम टिकायला हवा. कारण तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

लेख घेतो त्या अंकांचे, वेबसाईटसचे मिळतील ते संदर्भ, संपर्कही आम्ही देतो. कोलाजच्या वाचकांनी मूळ पुस्तक, अंक, वेबसाईट किंवा फेसबूक वॉलपर्यंत जावं, अशी इच्छा त्यामागे असते. यात अजूनही दुर्लक्षित नियतकालिकं, सोशल मीडियातले लेखक जोडायचे आहेत. तुम्हाला काही लिहावंसं वाटत असेल, तर तुमचंही स्वागत आहे.

कोलाजमधले सामाजिक, राजकीय लेख सर्वाधिक वाचले जातात. पण जगण्याच्या सगळ्याच अंगांना स्पर्श करणारे लेख असावेत, असा कोलाजचा आग्रह आहे. टेक्नॉलॉजीपासून इतिहासापर्यंत आणि सिनेमापासून पर्सनल फायनान्सपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर लेख करण्यात मजा येते. पण त्यात सातत्य टिकवणं कठीण आहे. पण आमचे प्रयत्न चालूच आहेत.

कोलाज सुरू करताना एक भूमिका मांडली होती, 'आम्ही पत्रकार आहोत. आम्ही म्हणजे मी कोलाजचा संपादक सचिन परब, माझे सहकारी आणि मित्र. आमचा आनंदही बातम्यांत आणि दुःखही. आम्ही बातम्यांच्या पुढे, मागे, आत खोल शिरतो, तेव्हा त्याचा आनंद वाढत जातो. पत्रकार आपापल्या काळाचं सेलिब्रेशन करत असतो. त्यातून फिचर घडतात. वेगवेगळ्या प्रकारचे लेख बनतात. बातम्यांशी थेट संबंध असणारे आणि नसणारेही लेख. अशा लेखांची ही वेबसाईट आहे. फिचरमधून साजरा करायचा हा आमचा उत्सव आहे. शब्दांचा खेळ करायचा, तर हा आमचा फिचरोत्सव आहे.'

हेही वाचा : २०१९ चा निरोप : गेल्या वर्षभरात स्त्रियांच्या जगात काय काय झालं?

'थिंक.सेलिब्रेट.' ही कोलाजची टॅगलाईन. आम्ही ती आमच्यापरीने जगलो. वर्षभर कोलाजने अनेक आनंदाचे क्षण दिले. मुख्य माध्यमं मांडत नाहीत, ते लिहित राहिलो. सर्व विचारांच्या लेखकांना लिहितं केलं. चंद्रपूरपासून गोव्यापर्यंत नवे-जुने लेखक मिळवले. आमची मैत्रीण शर्मिष्ठा भोसले कुंभमेळा कवर करायला अलाहाबादला गेली. सदानंद घायाळने झारखंडची विधानसभा निवडणूक तिथे जाऊन कवर केली. अनेक महत्त्वाची भाषणं वेगळ्या पद्धतीने मांडली. देशभरातलं महत्त्वाचं लिखाण अनुवादित करून मराठीत आणलं. अनेक प्रयोग केले. त्यात अनेकदा तोंडघशी पडलो. लोकसभा निवडणुकांच्या आकलनामुळे तर हसं झालं.

तरीही भूमिका घेत प्रवास सुरूच राहिला. साध्या सोप्या भाषेत लिहित राहिलो. अनेक लेख तुम्हाला आवडत असल्याचं तुमच्याच फीडबॅकवरून कळत राहिलं. काही लेख प्रचंड वायरल झाले. त्यांनी कोलाजला ओळख मिळवून दिली. पण आम्ही आमचे लेख सोशल मीडियातून आपल्यापर्यंत पोचवण्यात खूप कमी पडतोय. त्यासाठी काम करायचंय.

आज वर्षभरानंतर वाटतंय की आता कुठे स्थिरावलोय. गेल्या वर्षभरात अनेक अडथळे आलेत. पुढेही येतील. पण आपली मंझिल लांबची आहे. आपल्याला कपारीत पाय रोवून उभं राहायचंय हे पक्कं आहे. उद्या आपलाच आहे. डिजिटल मीडियाचाच आहे. कोलाजचाच आहे.

कोलाजला उभं करणाऱ्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार.

आपला, 

सचिन परब 
कोलाज डॉट इनचा संपादक

 

हेही वाचा :

सेल्फी विथ कुंभः अकाली प्रौढ करणारं 'अध्यात्म'

कॅलेंडर माणसाला वर्तमानात राहायला शिकवतं!

भाजपला हरवणारे हेमंत सोरेन हे झारखंडचे उद्धव ठाकरे!

२०१९ चा निरोपः जगाच्या सारीपाटावर परिणाम करणाऱ्या पाच घटना

लोकसभा सदस्यांची संख्या वाढवून प्रतिनिधित्व मिळणार की वाद होणार?