अरुणा सबानेः एकटेपणाचा खंबीरपणे सामना करण्यासाठीची प्रेरणा

०२ जून २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


लेखिका, आकांक्षा मासिकाच्या संपादक, प्रकाशक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांचा साठीनिमित्त सत्कार करण्यात आला. खूप कमी महिलांच्या वाट्याला असे गौरवसोहळे येतात. यानिमित्त अरुणा सबाने यांच्या गौरवार्थ 'दुर्दम्य' या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यातल्या एका लेखाचा हा संपादित अंश.

अरुणाची आणि माझी पहिली भेट झाली त्याला जवळजवळ वीस वर्षे झालीत. त्यापूर्वी दोघी एकमेकींना माहीत होतो, पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. बहुधा २००० सालातला मे महिना असावा. नवेगावला जाण्यापूर्वी आम्ही नागपूरला सहकुटुंब सरकारी पाहुणचारगृहात थांबलो होतो. तिला कळवल्याप्रमाणे ती तिथे भेटायला आली. मी बाल्कनीतून पाहिलं तर ती एका आलिशान ग्रे कलरच्या गाडीतून उतरली. ती आयकॉन फोर्ड होती. मी जरा चौकारलेच. बरीच श्रीमंत दिसतेय, मनाने पहिली नोंद घेतली. वर आली आणि पाचच मिनिटात आम्ही कित्येक वर्षांच्या मैत्रिणी आहोत अशा आमच्या गप्पा रंगल्या. एकमेकींच्या मतांची नाळ कुठेतरी जुळत होती. आणि समानधर्म भेटल्याची खूण दोघींच्या चेहऱ्यावर होती.

तिची पहिली भेट

त्यावेळी ती चाळीसएक वर्षांची असेल. उंचीपुरी, अंगाने सुदृढ, ठसठशीत कुंकू आणि चेहेऱ्यावर एक विलक्षण हास्य. त्यावेळची तिची मनात ठसलेली प्रतिमा आजही तशीच आहे, तितकीच ताजी! मधे इतकी वर्ष लोटली, पण काळाने तिच्या व्यक्तित्वावर एवढीशीही खूण उमटवलेली नाही. त्यानंतर अनेकदा गाठीभेटी झाल्या. ती पुण्याला माझ्याकडे आली.

मला तिने नागपूरला आवर्जून बोलावलं. चर्चासत्राचं अध्यक्षपद दिलं. पुरोगामी लेखकांपुढे माझं भाषण ठेवलं. माझं खास नागपुरी आदरातिथ्य केलं. तिच्या ‘आकांक्षा’ मासिकाचे अंक नियमित माझ्याकडे येऊ लागले. मी त्यात लेखन करू लागले. तिने भेट दिलेल्या तिच्या दोन्ही कादंबऱ्या मी आवर्जून वाचल्या. तसं पुणं-नागपूर अंतर भरपूर म्हणून वारंवार भेटी झाल्या नाहीत. फोनवरून समाधान मानून घ्यावं लागलं; पण या सगळ्यातून मला अरुणा थोडी थोडी समजत गेली. खूप कळली असं मी म्हणणार नाही, पण जे तिचं दर्शन घडलं ते चकित करणारं होतं.

तिच्या खासगी गोष्टींबद्दल मी कधीच चौकशी केली नाही. तिनेही गप्पांच्या भरात बोलताना कधी लपवाछपवी केली नाही. पण दोघींच्या मैत्रीत या गोष्टी महत्त्वाच्या नव्हत्याच. प्रत्येकवेळी मनावर ठसला तो तिचा प्रचंड आत्मविश्वास. अगदी तिच्या वागण्याबोलण्यापासून तिच्या पेहरावापर्यंत. त्याचबरोबर तिच्यामध्ये असलेली प्रचंड ऊर्जा, सतत कार्यमग्न आणि एकाचवेळी चालू असलेली अनेक कामं!

हेही वाचाः पाण्याचीही साहित्य संमेलनं होऊ शकतात!

वंचित, शोषित, परित्यक्तासाठी अभियान

मला वाटतं, तिच्या कामाचा दिवस सोळा तासांऐवजी वीस तासांचा असावा. पाणीप्रश्न असो, शेतीप्रश्न असो, पूर्णा खोरे मित्रमंडळाचा कार्यक्रम असो किंवा दलित मानवाधिकार समितीचा, डॉ. देवींचे दक्षिणायन असो किंवा मग स्थानिक प्रश्न! इतक्या विविध समस्यांशी ती निगडित आहे की, हे सगळं तिला कसं जमतं, कसं झेपतं याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं आणि त्यासाठी भारतभर आणि भारताबाहेरही तिची सतत पायाला चाकं लावल्यासारखी भ्रमंती चालू असते. सामाजिक कार्यकर्ती हे पद ती सहजपणे अंगावर बिरुदासारखे धारण करते.

पण माझ्या दृष्टीने ती सगळ्यात महत्त्वाचं आणि जीव ओतून काम करते ते वंचित, शोषित स्त्रियांसाठी! परित्यक्ता स्त्रियांसाठी तर तिने मोठं अभियान सुरू केलं होतं. ती प्रथम भेटली तेव्हा ती त्यांच्यासाठी एक लेडिज हॉस्टेल चालवत होती. सुमारे पाचएक हजार परित्यक्तांच्या मुलाखती घेऊन त्यांना मिळणाऱ्या पोटगीच्या रकमेत वाढ व्हावी म्हणून तिने केलेल्या प्रयत्नांना यश आलं.

नागपूर आणि आसपासच्या भागातल्या कोणत्याही प्रकारची स्त्रियांची समस्या असो, बलात्कार, कौटुंबिक भांडणे, अत्याचार, नोकरीतील दडपशाही, अन्याय, सायबर गुन्हे - स्त्रिया हक्काने तिला मदतीसाठी हाक घालतात, किंवा तिला कळल्यावर ती आपणहून धाव घेते. प्रश्न तडीस नेल्याशिवाय तिला गप्प बसवत नाही. ही तळमळ कशातून येते? मला वाटतं, तिच्या वाट्याला जे आयुष्य आलं त्यातून ती हतबल, एकाकी झाली नाही.

एकटेपणातून आलेला खंबीरपणा

एकटी स्त्री समाजाच्या अवहेलनेचा, विकृत कुतूहलाचा आणि सहजसाध्य असल्याचा समाजाचा ‘गैर’समज असतो. या सगळ्यांना ती पुरून उरली आणि तिने समाजाला सिद्ध करून दाखवलं की, एकटी स्त्रीसुद्धा किती परिपूर्ण आयुष्य जगू शकते. तिच्या मुलांसाठी तर तिने आई आणि वडील या दोन्ही भूमिका समर्थपणे पेलल्याच. पण आपल्या वाट्याला जे एकटेपण, शोषण आणि अन्याय आले ते इतर स्त्रियांच्या वाट्याला आले तर त्यांना त्यातून खंबीरपणे उभं करण्यासाठी तिच्यातली स्त्री कार्यकर्ती सतत जागरुकपणे काम करत राहिली.

स्त्रीवादाच्या उपपत्ती मांडताना ज्या सक्षम, परिपक्व स्त्रीचे चित्र मी मांडते, त्यात अरुणा अगदी चपखल बसते. म्हणूनच तिच्याबद्दलचे एक आकर्षण माझ्या मनात खोलवर रुजत गेलं.

हेही वाचाः लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?

साहित्यिक समाजभान

अरुणाच्या व्यक्तित्वाला शेकडो पैलू आहेत. त्यातील एक ठसठशीत महत्त्वाचा म्हणजे तिला असलेलं साहित्यिक अंग! एखादं मासिक सातत्याने १५ वर्ष चालवणं, दिवाळी अंक, विशेषांक काढणं या गोष्टी आजच्या काळात सोप्या राहिलेल्या नाहीत. आर्थिकदृष्ट्या तर अजिबातच नाही. पण तिने नेटाने सातत्य आणि दर्जा दोन्ही टिकवून ठेवलंय.

काळाच्या मागणीप्रमाणे ते इ-बुक आणि डिजिटल स्वरूपातही तिने उपलब्ध करून दिलंय. तीच गोष्ट प्रकाशनाची. आकांक्षा प्रकाशनाने आतापर्यंत कितीतरी वाङ्मयीन आणि दर्जेदार पुस्तके प्रसिद्ध केलीत. डॉ. द. भि. कुलकर्णी, किशोर सानप, श्रीधर शनवारे, तारा भवाळकर, डॉ. मिराजकर, श्रीपाद भालचंद्र जोशी ही मला माहिती असलेली ठळक उदाहरणं! संपादक, प्रकाशक या पैलूंमधला तिसरा लखलखीत पैलू म्हणजे, तिचं स्वतःचं लेखन!

‘आंबेडकर आणि स्त्री’, ‘साहित्यातून समाजाकडे’, ‘स्त्रीवाद’ अशी वैचारिक अंगाने जाणारी पुस्तकं तिनं लिहिली असली. पण अरुणा खरी सापडते ती तिच्या सर्जनशील लेखनात. कथा, कादंबरी हे तिचं खरं क्षेत्र! तिला समाजाचा असलेला प्रगाढ अनुभव, संवेदनशीलता, सहज संवाद साधण्याचं कौशल्य आणि बारीकसारीक अनुभवातून माणसं नेमकेपणाने टिपण्याची बौद्धिक आणि भावनिक क्षमता यातून तिचं लेखन जन्माला आलं.

तिचं स्वतःचं आयुष्य, त्यातील कडूगोड अनुभव, समाजामधे झटून काम करताना दिसणारी माणसांच्या स्वभावाची विविध रूपं, स्त्री प्रश्नांच्या वाचन-लेखनाने तिला आलेलं भान याचं एक संपृक्त पर्यावरण तिच्या कादंबरीत फार महत्त्वाची भूमिका बजावतं. स्त्रीमुक्तीची एक साधी सरळ व्याख्या म्हणजे माणसासारखं जगणं ही प्रत्येक स्त्रीची भूक आहे.

अरुणाच्या दोन्ही कादंबऱ्यांमधल्या मध्यवर्ती स्त्रिया असं आयुष्य जगण्यासाठी जीवनाशी आणि स्वतःशीही संघर्ष करतात. अरुणाने जसं शून्यापासून आपलं आयुष्य खंबीरपणे लढा देत उभं केलं तशा ‘मुन्नी’ आणि ‘विमुक्ता’तील वैदेही आणि वसुधा स्वतःच्या मानसिक बळावर निर्भयपणे उभ्या राहतात आणि ज्या समाजातून त्या वर आल्या त्याच्यासाठी आपलं योगदान देणं हे आपलं कर्तव्य मानतात.

हेही वाचाः आपण खरंच सावित्रीच्या लेकी आहोत का?

जगावेगळा अरुणोदय स्फुर्ती देणारा

अरुणाची जगण्याविषयीची मतं आणि तिचं हे लिखाण अभिन्न आहे, म्हणूनच त्याला अस्सलपणाचा सुगंध आहे. त्यात कल्पनेच्या भराऱ्या आणि कृत्रिमता नाही. वाहत्या जीवनातून उचलून काढावीत अशी ही जिवंत माणसं आहेत.

उत्तम लेखन करण्यासाठी आपल्या स्वतःच्या आयुष्यावर आपली पकड लागते. नकाराशी दोन हात करावे लागतात. नैराश्याला नेस्तनाबूत करावे लागते आणि मुख्य म्हणजे स्वतःवर आणि आयुष्यावर प्रेम करावं लागतं. जेव्हा केव्हा अरुणा भेटते ती उत्साहाने नवीन कामाबद्दल सांगते. तिच्या चेहऱ्यावर मला कधीच उदासीनता, नकारात्मकता दिसत नाही.

प्रत्येक घटनेबाबत तिला तिचं स्वतःचं एक मत असतं. आणि कोणाच्या रागलोभाची पर्वा न करता ती ते स्पष्टपणे मांडते. तिचा हा स्पष्टवक्तेपणा मला फार लोभस वाटतो, कारण त्यात त्या व्यक्तीबद्दलचा कडवटपणा नसतो.

माझ्या पाहण्यात तरी आजपर्यंत षष्ट्यब्दीपूर्तीचे गौरव अंक आणि समारंभ फक्त पुरुषांच्याच वाट्याला आले आहेत. त्यामुळे जिच्या मैत्रीबद्दल अभिमान वाटावा अशा आपल्या सखीच्या गौरवग्रंथाचा मला मनापासून आनंद वाटतो आहे. तिला आरोग्यपूर्ण, सर्जनशील दीर्घायू लाभो ही तर मनोकामना आहेच. पहिल्यांदा ती आलिशान कारमधून आली तेव्हा मला ती खूप श्रीमंत आहे असे वाटले होते, त्याच मताला खऱ्याखुऱ्या फांद्या फुटल्या आहेत की, ती मनाने, गुणाने, कर्तृत्वाने, लेखनाने आणि दातृत्वाने अधिक संपन्न आहे. ही श्रीमंती उत्तरोत्तर वाढती राहावी अशी मनापासून इच्छा!

हेही वाचाः 

कस्तुरबाई १५०: आपण दोघं ‘दोघं’ नाही

तेरवं : शेतकरी विधवांच्या जगण्याच्या मर्दानी कहाण्या

महिलांना उमेदवारी देतानाही घराणेशाहीचंच कार्ड

नऊ जणांच्या हौतात्म्यातून झालेल्या कृषी विद्यापीठाची पन्नाशी

सनातन्यांनो, धर्माधिकाऱ्याला धर्म शिकवू नकाः न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी