सध्या भारतीय सिनेमांमधे चरित्रपट अर्थात बायोपिकची लाट आलीय. आपल्या आसपासच्या व्यक्तिकेंद्रीत घडामोडींनी हे प्रेरणादायी बायोपिकविश्व उभं केलंय. अंतराळात पाऊल ठेवून भारताचं नाव रोशन करणाऱ्या राकेश शर्मा यांच्यावरही लवकरच बायोपिक येऊ घातलाय. शाहरूख खान त्यात राकेश शर्मांचं काम करतोय. आज राकेश शर्मांचा सत्तरावा वाढदिवस.
गेल्या काही वर्षांमधे वेगवेगळ्या प्रकारचे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. बायोपिकच्या या इंडस्ट्रीने भारतीय सिनेमाला अक्षरशः वेड लावलंय. सगळ्याच भाषांमधे बायोपिक करण्याचा ट्रेंड आलाय. मराठीत २००९ मधे म्हणजे १० वर्षांपूर्वी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ सिनेमाने बायोपिकचा ट्रेंड रुजला. मधला काळ सुनासुना असताना आता पुन्हा बायोपिकने उचल खाललीय.
‘लोकमान्य’, ‘बालगंधर्व’, ‘डॉ. प्रकाश आमटे’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ आणि ताज्या `भाई`ने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी गल्ला जमवला. आता फिल्म इंडस्ट्रीनेही येत्या काळात यशाचा हाच फॉर्म्युला वापरण्याचा बेत केल्याचं दिसतंय.
मराठीत हा ट्रेंड रुजलाय तो हिंदीतून. ‘एम.एस. धोनी: अनटोल्ड स्टोरी’, ‘अजहर’, ‘मेरी कोम’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘दंगल’, ‘सोरमा’, ‘संजू’, ‘हसीना पारकर’, ‘डॅडी’, या गाजलेल्या व्यक्तिमत्वांवरच्या बायोपिकसोबतच सर्वसामान्यांचं आयुष्य मांडणारे ‘नीरजा’, ‘सरबजीत’, ‘शहीद’, ‘रुस्तम’, ‘पॅडमॅन’, ‘मांझी’ असेही सिनेमे हिंदीत बघायला मिळाले.
बॉलीवूडने रोमँटिक, मसालेदार स्टोरीच्या भरवशावर अनेक दशकं प्रेक्षकांना नादाला लावलं. पण बॉलीवूडमधे आता बदलाचं वारं आलंय. किंबहुना अवतीभोवतीच्या बदलाच्या वातावरणानेच बॉलिवूडला आता बदलायला भाग पाडलंय. बायोपिकच्या निमित्ताने बॉलीवूडने बदलाची ही संधी घेतलीय.
बायोपिक्स बनवण्यामागेसुद्धा अर्थकारण आहे. आपण सगळेच जण कुणामुळे कधीतरी खूप प्रभावित झालेले असतो. वॉट्सअप, फेसबूकवर येणाऱ्या त्यांच्या स्टोऱ्या आपल्याला रडवतात, प्रेरणा देतात. त्यांची आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष छापही पडते. सोशल मीडियावर चालणाऱ्या, खपणाऱ्या संघर्षाच्या, यशाच्या या स्टोऱ्यांमागचं हे यश बॉलीवूडनेही चांगलंचं ओळखलं.
जगण्यातलं ट्विस्ट असलेल्या या गोष्टींचा विचार करुन डायरेक्टर आपली पुढची गणितं ठरवतो. सध्याचा काळ फॉलोअर कल्चरचा आहे. सिनेमाही ‘नवीन काय सुरूय’ याच्या शोधात असतो. बॉलिवूडनेही हा फॉलोईंग ट्रेंड ओळखून बायोपिकला आपलंस केलंय. त्यामागचं आर्थिक गणितं जमतं, तर कधी बिघडतं. त्यातला एक उप ट्रेंड हळूहळू निर्माण होतोय. तो आहे अवकाश संशोधकांवरच्या बायोपिकचा.
मुळातच अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल आपल्याला कुतूहल असतं. पण तिथे काम करणारी माणसं असतात कशी, ती तिथंवर पोचतात कशी हे काही आपल्याला सहजासहजी कळत नाही. तसा कुठला मार्गही आपल्याला सापडतं नाही. पण या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अशाच व्यक्तींना बायोपिकने आपल्या कॅमेऱ्यात कैद करायला सुरवात केलीय.
के. राधाकृष्णन हे इस्रोचे माजी चेअरमन असून त्यांच्या मंगळयान मोहिमेवरच्या योगदानाचा परामर्श घेणारा ‘मिशन मंगल’ हा सिनेमा येतोय. तसंच इस्रोतले शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्यावर ‘चंदामामा डोर के’ हा सिनेमा येतोय. त्यात अभिनेता आर. माधवन मेन रोलमधे असणार आहे. नारायणन यांना १९९४ मधे झालेली अटक आणि त्यानंतर न्यायासाठी त्यांनी केलेला संघर्ष असं साधारण या सिनेमाचं कथानक आहे. भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला हिच्यावरच्या बायोपिकचीही सध्या खूप चर्चा आहे.
त्यासोबतच भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्माच्या जीवनावरही ‘सारे जहाँ से अच्छा’ हा बायोपिक येतोय. येत्या मेमधे हा बायोपिक येणार आहे. यात राकेश शर्माच्या भूमिकेत दिसणार आहे किंग खान. मिल्खा सिंग, सुनील गावस्कर आणि राकेश शर्मा हे किंग खानच्या काळाचे हीरो. शाहरुखच्या पिढीवर या तिघांचा खूप मोठा प्रभाव राहिलाय. आता राकेश शर्माच्या रोलमधे किंग खान पडद्यावर दिसणार आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी राकेश शर्मा हा एक मार्काचा प्रश्न आहे. अंतराळात पाऊल ठेवणारा पहिला भारतीय माणूस म्हणजे राकेश शर्मा, हे झालं त्या प्रश्नाचं साधंसरळं उत्तर. हे उत्तर दिल्यावर एक मार्कही मिळेल आणि मिळतोही. पण या राकेश शर्मा नावाच्या माणसाने खूप मोठी क्रांती केलीय. प्रेरणा दिलीय. त्यामागची स्टोरीही संघर्षाची, तितकीच प्रेरणादायी आहे.
राकेश शर्मा यांच्यामुळे भारत अंतराळात पाऊल ठेवणारा जगातला १४वा देश ठरला. जागतिक पटलावर मिरवण्याची संधी राकेश शर्मांनी मिळवून दिली. जगाच्या इतिहासामधे स्वत:चं आणि आपल्या देशाचं नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवणाऱ्या राकेश शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९४९ या दिवशी पंजाबच्या पतियाळा शहरात झाला. लहानपणापासूनच विज्ञान आणि प्रयोगांमधे रस असणाऱ्या राकेश यांनी आपलं शिक्षण हैद्राबादच्या उस्मानिया युनिवर्सिटीतून घेतलं.
पुढे त्यांची नॅशनल डिफेन्स अकॅडमीमधे निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची टेस्ट पायलट म्हणून नेमणूक झाली. १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांना आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यांच्या नामी कामगिरीमुळे ते भारतीय वायू दलात विंग कमांडर या पदापर्यंत पोचले.
इथेच त्यांच्यासाठी आणखी एक संधी दार ठोठावतं होती. अंतराळ संशोधनात भारत आणि सोविएत युनियन आताचा रशिया यांच्यात भागीदारीतून काम सुरू होतं. इस्रो आणि सोविएत इंटर कॉसमॉस स्पेस प्रोग्राम यांच्या अवकाश मोहिमेमधे अवकाशयात्री म्हणून भारताकडून राकेश शर्मा यांची निवड करण्यात आली. रवीश मल्होत्रा हेही त्यांच्यासोबत होते.
प्रशिक्षणासाठी त्यांना तेव्हाच्या सोवियत संघाच्या कजाकीस्तान इथल्या अंतराळ केंद्रात पाठवण्यात आलं. इथेही त्यांनी आपल्या अव्वल कामगिरीची चुणूक दाखवली. अंतराळात जाणारे ते पहिले भारतीय आणि जगातले १३८ अंतराळवीर ठरले. २ एप्रिल १९८४ ला राकेश शर्मा यांनी सोयूज टी-११ मोहिमेअंतर्गत अवकाशयानामधून सॅल्यूट ७ स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली. अंतराळात ८ दिवस राहून त्यांनी रिमोट सेन्सिंग आणि बायोमेडिसीनवर ३३ प्रयोग केले.
अंतराळात असताना सर्व मोहीमवीरांनी थेट अंतराळातून रशियाचे अधिकारी आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी टेलिविजन न्यूज कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. तेव्हा अवकाशातून आपला भारत कसा दिसतो असा संवाद इंदिरा गांधींनी विचारला. त्यावर त्यांनी ‘ सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा’ असे उद्गार काढून भारतीयांच्या अभिमानाला वेगळी उंची दिली. मोहिमेवरून परत आल्यावर राकेश शर्मा यांना सोविएत युनियनचे हिरो म्हणून सन्मानित करण्यात आलं. तसेच भारत सरकारने देखील ‘अशोक चक्र’ देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
आज वयाच्या सत्तरीत प्रवेश करताना राकेश शर्मा अंतराळातील आपली ती अद्भुत सफर विसरलेले नाहीत. त्या आठवणी आजही अंतराळातील अढळ ताऱ्यांप्रमाणे त्यांच्या मनाच्या पटलावरही कायम आहेत. ह्या सगळ्या आठवणी आजच्या पिढीपर्यंत पोचतील. आणि म्हणून येणाऱ्या बायोपिकची उत्सुकता अधिक आहे.
संशोधक, शास्त्रज्ञ ही मंडळी आपल्यासाठी तशी दुर्लक्षितच जमात. त्यांना खरंच गांभीर्याने आपण घेतो? १९९० मधे तपन सिन्हा यांचा एक सिनेमा आला होता. ‘एक डॉक्टर की मौत’. पंकज कपूर आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत होते. कुष्ठरोगावर संशोधन करणाऱ्या एका डॉक्टरची गळचेपी यात दाखवलीय. संशोधक सुभाष मुखोपाध्याय यांच्या आयुष्यावर हा सिनेमा होता. त्यानंतर २०११ मधे ‘आय एम कलाम’ हा सिनेमा आला. पण तो डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा बायोपिक नाही.
आयुष्यमान खुराना, मिथुन चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘हवाईजादा’ हा २०१५ चा सिनेमा. राइट बंधूंनी विमान बनवण्याआधी आठ वर्षं आधीच भारतीय शास्त्रज्ञ शिवकर बापूजी तळपदे यांनी विमानाचा शोध लावला होता म्हणे. त्याची गोष्ट या सिनेमात आहे. पण मुळात त्यात खरं किती आणि कल्पनाविलास किती, हे कळलंच नाही.
महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन नशीबवान ठरले. २०१४ला त्यांच्यावर तामिळ सिनेमा आला. तोच इंग्रजीतही डब करण्यात आला. पुढच्याच वर्षी ब्रिटिश डायरेक्टर मॅथ्यू ब्रोनस यांनी ‘द मॅन हू न्यू इन्फीनिटी’ हा हॉलीवूडचा सिनेमा बनवला. त्यात रामानुजन यांचं गणित शास्त्रज्ञ म्हणून असलेलं योगदान आणि त्यासाठीचा संघर्ष दाखवलाय.
‘अमेरिकन जीनियस’ नावाची एक वेबसीरिज हॉलिवूडमधे आहे. या सीरिजमधे अमेरिकन शास्त्रज्ञांची ओळख अभ्यासपूर्ण पद्धतीने करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच मार्क झुकेरबर्ग यांच्यावर आलेला ‘सोशल नेटवर्किंग’ हाही सिनेमा त्या अर्थाने हॉलीवूडची कलात्मकता, दर्जा आणि मांडणी दाखवणारा आहे. आपल्याकडे हा असा दर्जा दिसत नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राकेश शर्मा यांच्यावरील बायोपिकची वाट पाहिली जातेय. त्याचं नाव आधी `सॅल्युट` असं ठरलं होतं. पण आता हा सिनेमा `सारे जहां से अच्छा` या नावाने रिलीज होण्याची शक्यता आहे. `द लिजंड ऑफ भगतसिंग` या बायोपिकचा अनुभव असणाऱ्या अंजुम राजाबलींनी हा सिनेमा लिहिलाय. `ब्रोकन थ्रेड` या गाजलेल्या इंग्रजी सिनेमाचा डायरेक्टर महेश मथाई याचं दिग्दर्शन करतोय.
खरं तर राकेश शर्मांचा हा रोल अमीर खानसाठी लिहिला होता. पण तो महाभारतावरच्या सिनेमाच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमधे गुंतलाय. त्यानेच शाहरूख खानचं नाव सुचवलं. पण तो `झीरो`मधे अडकला होता. झीरोतून बाहेर पडल्यावर शाहरूखने आता आपलं सगळं लक्ष राकेश शर्मावर केंद्रीत केलंय, अशा बातम्या आहेत. लवकरच हा सिनेमा येऊ शकेल. पुढच्या वर्षी राकेश शर्मांच्या ७१व्या वाढदिवशी आपण कदाचित त्यांच्याबरोबर हा सिनेमा बघत असू. त्याबरोबर अवकाश संशोधकांवरच्या बायोपिकची नवी स्पेस निर्माण होऊ शकते.