भुपेश बघेलः केडरलेस काँग्रेसचा कार्यकर्ता लीडर

२२ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या बघेल यांना काँग्रेसने छत्तीसगडमधे केडरलेस, लीडरलेस पार्टीचं नेतृत्व दिलं. अजित जोगीसारख्या कुणाचाही गेम करण्याची ताकद असणाऱ्या हायकमांडच्या माणसाला बाजूला सारत बघेल यांनी नवं संघटन उभं केलं. एका अर्थाने ही बघेल काँग्रेस आहे. एका जमिनीवरच्या कार्यकर्त्याची मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचा हा प्रवास.

२५ मे २०१३ ही तारीख म्हणजे भारताच्या राजकारणातला एक काळा दिवस. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह २९ जण मारले गेले. एखाद्या हल्ल्यात एवढ्या संख्येने राजकीय नेत्यांचा बळी जाण्याची ही तशी स्वातंत्र्यानंतरची पहिलीच घटना. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांच्यासह नक्षलवाद्यांविरोधात 'सलवा जुडूम' मोहीम उघडणारे महेंद्र कर्मा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश पटेल यांचा समावेश होता. या हल्ल्यातून माजी मुख्यमंत्री अजित जोगी बालंबाल बचावले.

नक्षली हल्ल्याने काँग्रेसला संपवलं

या हल्ल्याने नक्षल्यांनी दोन गोष्टी साधल्या. एक, राज्यात दहशत निर्माण केली. दुसरं, गेल्या १० वर्षांपासून राज्यात विरोधी बाकड्यावर बसलेल्या काँग्रेसची टॉप लीडरशीप संपवली. त्यामुळे काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ला. भाजपाने डॉ. रमणसिंग यांच्या ९० पैकी ४९ जागा जिंकत नेतृत्वाखाली पुन्हा एकहाती सत्ता मिळवली. मे २०१४ च्या निवडणुकीतही ११ पैकी १० जागा मिळवल्या.

अशा बिकट परिस्थितीत काँग्रेसने अजित जोगींना बाजूला सारून ऑक्टोबर २०१४ मध्ये भूपेश बघेल यांना प्रदेशाध्यक्ष केलं. खंगलेल्या काँग्रेसचा लीडर त्यांना करण्यात आलं होतं. ती लीडरलेस काँग्रेस होती. संघटनेतला माणूस असलेल्या बघेल यांनीही शुन्यातून सुरवात केली. पक्षाची नव्याने बांधणी सुरू केली. ही काँग्रेसची आगामी विधानसभा निवडणुकांची तयारीच होती.

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांमधे काँग्रेसला सगळ्यात मोठा विजय मिळाला तो छत्तीसगडमधे. हा विजय एवढा मोठा आणि अनपेक्षित होता की अनेक राजकीय पंडितांना देखील या निकालाचा मतितार्थ सहजासहजी उलगडता येत नव्हता. भाजपचा हा पराभव धक्कादायक होता. या सगळ्यांचा परिपाक म्हणून काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून भूपेश बघेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

बघेल झाले रमणसिंग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

छत्तीसगडमधल्या कुर्मी या शेतकरी जातीत जन्मलेल्या बघेल यांनी वयाच्या २५ व्या वर्षी १९८६ मधे यूथ काँग्रेसमधे प्रवेश केला. त्यावेळी मोतीलाल वोरा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तेही दुर्ग जिल्ह्यातलेच. तेव्हा छत्तीसगड हा मध्य प्रदेशचाच भाग होता. १९९३ मधे दुर्ग जिल्ह्यातल्या पाटण मतदारसंघातून लढवून बघेल पहिल्यांदा विधानसभेत पोचले. त्यानंतरची निवडणूक जिंकल्यावर ते दिग्विजय सिंग यांच्या सरकारमधे मंत्री झाले.

मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता असताना २००० मधे छत्तीसगड हे वेगळं राज्य अस्तित्वात आलं. छत्तीसगडमधेही काँग्रेसचं संख्याबळ अधिक असल्यामुळे अजित जोगी हे पहिले मुख्यमंत्री झाले. या मंत्रीमंडळातही बघेल कॅबिनेट मंत्री होते. २००३ मधे पहिल्यांदा वेगळ्या छत्तीसगडमधे विधानसभेची निवडणूक झाली. त्यात काँग्रेसची सत्ता गेली. भाजपचे डॉ. रमणसिंग मुख्यमंत्री झाले.

काँग्रेसने बघेल यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं. बघेल यांनी २००४ आणि २००९ सालची लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती. मात्र दोन्हीही वेळा त्यांचा पराभव झाला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले.

आदिवासीबहुल राज्यात ओबीसी चेहरा

छत्तीसगड हे आदिवासी तोंडवळा असलेलं राज्य. त्यामुळेच काँग्रेसने आपलं बहूमत होतं तेव्हा आदिवासी समाजातून येणाऱ्या अजित जोगींना मुख्यमंत्री केलं. छत्तीसगडच्या निर्मितीपासूनच काँग्रेसने इथं आदिवासी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला. पण सलग तीनदा झालेल्या पराभवानंतर २०१४ मधे काँग्रेसने खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने बघेल या ओबीसी जातीतल्या पुढाऱ्याला प्रदेशाध्यक्ष केलं. हा काँग्रेससाठी आत्मघातकी निर्णय होता.

काँग्रेसच्या या निर्णयाला अजित जोगी उघड उघड विरोध करायचे. आपलं आदिवासी कार्ड दाखवायचे. पण काँग्रेस नेतृत्वाने आपला निर्णय बदलला नाही. याच काळात जोगींवर मुख्यमंत्री डॉ. रमणसिंग यांचा काँग्रेसमधला माणूस अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. नंतर तर हे सगळ्यांसाठी उघड गुपित झालं. २०१३ च्या नक्षली हल्ल्यात काँग्रेसची लीडरशीप संपवण्यामागे जोगींचाच हात असल्याचं बोललं जायचं. अशा बेरकी व्यक्तिमत्त्वाच्या जोगींविरोधात बोलायची कुणाची हिंमत होईना. जोगींकडे आदिवासी कार्डासोबतच सतनामी संप्रदायाचंही कार्ड होतं. छत्तीसगडमधे या संप्रदायाचा चांगलाच प्रभाव आहे. 

थेट अजित जोगींवरच घाव

बघता बघता २०१६ साल उजाडलं. पक्षांतर्गत कुरघोड्या सुरूच होत्या. दुसरीकडे बघेल यांनी नव्याने संघटना बांधणीचं काम हाती घेतलं होतं. जानेवारीच्या सुरवातीलाच अजित जोगींचा मुलगा अमितची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्याच्यावर २०१४ मधे झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपसाठी फिक्सर म्हणून काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्याचवेळी अजित जोगींच्या हकालपट्टीसाठी परवानगी मागणारा ठराव प्रदेश काँग्रेसने दिल्लीला पाठवला होता.

या सगळ्यामागचं डोकं होतं ते भुपेश बघेल यांचं. कारण कुणाचाही गेम करण्याची ताकद असलेल्या जोगींच्या हकालपट्टीची भाषा करणं ही काही ‘किसीके बसकी बात’ नव्हती. हे भुपेश बघेलचं करू शकत होते. त्यांनी आपल्या नव्या संघटनेच्या बळावर हे मिशन तडीस नेलं. बघेल यांच्या आपलं मिशन पार पाडण्याच्या या धाडसी चालीने पक्षातल्या जुन्या नेत्यांचीही घाबरगुंडी उडाली होती. कारण त्यावेळच्या अख्ख्या काँग्रेस लीडरशीपवर डॉ. रमणसिंग यांची बी टीम असल्याचा आरोप व्हायचा. त्यामुळे जोगींच्या बाजूने बोलायला कुणी पुढे येईना.

बघेल यांनी जोगी पितापुत्रांविरोधात मोहिम उघडली असताना त्यांची बायको आमदार डॉ. रेणू जोगींना मात्र पक्षात ठेवलं. बघेल यांनी अजित जोगींच पक्षातलं वर्चस्व पार धुळीला मिळवलं. त्यानंतर जूनमधेच अजित जोगींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत नव्या पक्षाची स्थापना केली. 

जोगी स्टाईल राजकारणाला प्रत्यूत्तर

पक्षाचं नाव ठेवलं जनता काँग्रेस छत्तीसगड. काँग्रेसशी मिळतं जुळतं. ही खास जोगी स्टाईल. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जोगींचा निसटता पराभव झाला. भाजपचे चंदू लाल साहू विजयी झाले. पण जोगींनी इथं एक करामत केली होती. चंदूलाल साहू याच नावाचे तब्बल ११ उमेदवार उभं केले होते. नवा पक्ष काढणारे जोगी आपलं गांधी घराण्याशी कुठलंच वैर नसल्याचं सांगायचे.

जोगींच्या बोलण्यातली ही गोम बघेल यांनी ओळखली होती. त्यामुळे जोगी हा रमणसिंग यांचा माणूस असल्याचा राज्यभर प्रचार सुरू केला. बहूजन समाज पार्टीशी युती करून निवडणूक लढवणारे जोगी आपणच किंगमेकर असल्याचं सांगायचे. जोगींमुळे सगळ्यात जास्त फटका काँग्रेसलाच बसणार आणि भाजप चौथ्यांदा सत्तेत येणार असं बोललं जाऊ लागलं.

आताची काँग्रेस एका अर्थाने बघेल काँग्रेसच

इकडे बघेल यांचे राज्यभरात दौरे सुरू होते. प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी आपल्या गाडीने राज्यात जवळपास तीन लाख किलोमीटरचा प्रवास केला. अख्खा छत्तीसगड पिंजून काढला. जोगींना दणका दिल्यामुळे काँग्रेसमधे दुसरे पुढारीही वठणीवर आले होते. त्यांनाही सोबत घेत पक्ष संघटनेचं काम केलं. जुने कार्यकर्ते गोळा केले. त्यांना विश्वासात घेतलं. हायकमांडला विश्वासात घेत स्वतःच नवं संघटन उभं केलं. आताची काँग्रेस एका अर्थाने बघेल काँग्रेस आहे. 

भाजपच्या १५ वर्षांच्या सत्तेविरोधात राज्यातल्या वेगवेगळ्या समाज घटकांमधे असंतोष होता. स्वस्त तांदूळ मिळवून देणारे रमणसिंग लोकांमधे ‘तांदुळवाले बाबा’ म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे मीडियातून त्यांचा कल्याणकारी चेहरा दिसायचा. ही गोष्ट काँग्रेसच्या पुढाऱ्यांना रमणसिंग यांच्या बाजूची वाटायची. त्यामुळे गेल्या दहा बारा वर्षांत रमणसिंग सरकारविरोधात काँग्रेसने कुठलंच मोठं आंदोलन केलं नाही. 

पण बघेल मात्र सरकारवर हल्ला चढवायचे. थेट रमणसिंग यांच्यावर आरोप करायचे. त्यामुळे पक्ष संघटनेत आपोआपचं जाण येत गेली. लोकांनाही काँग्रेस भाजपला फाईट देऊ शकते याचा विश्वास तयार झाला. २०१७ मधे विनोद शर्मा या पत्रकाराला जेलमधे टाकण्यात आलं. बीजेपी नेत्याच्या कथित सेक्स प्रकरणाच्या सीडी तयार केल्याचा आरोप पत्रकारावर होता.

निवडणुकीच्या तोंडावर १४ दिवस जेलमधे

याविरोधात थेट भूमिका घेत बघेल यांनी रमणसिंग यांच्यावर टीका केली. या प्रकरणात बघेल यांच्यावर या सेक्स सीडी वायरल केल्याचा आरोप झाला. प्रकरण कोर्टात गेलं. सप्टेंबर २०१८ मधे कोर्टाने १४ दिवसांची शिक्षा सुनावली. पत्रकारालाही शिक्षा झाली. काँग्रेससाठी हा खूप मोठा धक्का होता. राजकीय जाणकार आता बघेल यांचं राजकारण संपलं म्हणायचे.

निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकरणात बघेलही जामीन घेतील, असं सगळ्यांना वाटत होतं. पत्रकाराने जामीन घेतला. पण बघेल १४ दिवस जेलमधे राहिले. जामीन घेण्याचं टाळलं. हा एक प्रकारचा सुसाईड बॉम्बिंगचाच प्रकार होता. पण बघेल यांनी राजकीय विद्वानांच्या नजरेत स्वतःचा आत्मघात करून घेतला. लीडरलेस, कॅडरलेस काँग्रेसचं नेतृत्व करणं हाही त्यांचा आत्मघातचं होता. 

निवडणूक येता येता बघेल यांची पक्ष संघटनेवर पक्की मांड बसली. त्यामुळे त्यांना विधानसभा उमेदवारीचं वाटप करताना गटबाजीला फाट्यावर मारणं सहज शक्य झालं. हा एका अर्थाने काँग्रेसच्या विजयाचा श्रीगणेश होता. पण या जोडीला जातीचं समीकरण जुळवून आणण्याचंही आव्हान त्यांच्यासमोर होतं. कारण अजित जोगींनी आपलं सतनामी संप्रदायासोबत आदिवासी समाजाचं कार्ड बाहेर काढलं होतं.

सगळ्यांना सोबत घेण्याचं राजकारण

बघेल यांनीही वेगवेगळ्या जातींना सोबत घेण्याचं राजकारण केलं. सोबतच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मानस कन्या करुणा शुक्ल यांनाही पक्षात आणत थेट रमणसिंग यांच्याविरोधात उभं केलं. निवडणुकीच्या सुरवातीच्या ट्रेंडमधे शुक्ल आघाडीवर होत्या. एवढंच नाही तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर सतनामी समाजाचे गुरू बलदास यांना काँग्रेसमधे आणलं.

छत्तीसगडच्या लोकसंख्येत सतनामी समाजाचा वाटा १६ टक्के आहे. गेल्यावेळी या समाजाचा प्रभाव १० पैकी ९ जागा भाजपने जिंकल्या होत्या. गेल्यावेळच्या निवडणुकीत भाजपला काँग्रेसहून १० जागा जास्त मिळाल्या होत्या. वोट शेअरिंगमधे भाजप काँग्रेसपेक्षा ०.७७ टक्क्यांनी पुढे होती. यंदाच्या निवडणुकीत सतनामी समाजाने काँग्रेसला भरभरून पाठिंबा दिल्याचं निवडणूक निकालावरून स्पष्ट होतंय.

यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसला चमत्कारिक यश मिळालं. एक्झिट पोल, ओपिनियन पोल, सट्टा बाजार या सगळ्यांना फेल करत काँग्रेसने ९० पैकी ६८ जागांवर विजय मिळवला. तीनवेळच्या सत्ताधारी भाजपला केवळ १५ जागांवर समाधान मानावं लागलं. किंगमेकर होण्याचं मुंगेरीलालचं स्वप्न बघणाऱ्या अजित जोगींच्या आघाडीला ७ जागा मिळाल्या. यातल्या दोन जागा मायावतींच्या आहेत. 

काँग्रेसचं नवं राजकारण

संघटनेतला माणूस असलेल्या असलेल्या बघेल यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. या अर्थाने ते काँग्रेसमधेल एकमेव मास लीडर आहेत. संघटना आणि दांडगा लोकसंपर्क असं दुहेरी रसायन असलेल्या या नेत्याने काँग्रेसचा १५ वर्षांचा सत्तेचा वनवास संपवला.

तीन राज्यांमधे सगळ्यात छत्तीसगडचा मुख्यमंत्री सगळ्यात शेवटी ठरला. कारण इथे शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या बघेल यांच्यासोबतच राजघराण्याचा आणि राजकारणाचा वारसा असलेले टीएस सिंहदेव आणि २०१४ च्या निवडणुकीतही खासदार झालेल्या ताम्रध्वज साहू यांचंही नाव चर्चेत होतं. तीन तुल्यबळ उमेदवारांत मुख्यमंत्री निवडणं काँग्रेस हायकमांडच्याही नाकीनऊ आलं होतं. या सगळ्यात काँग्रेसने कुठलाही वारसा नसलेल्या शेतकऱ्याच्या पोराला मुख्यमंत्री केलंय.

राज्यात ४८ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समुदायातला माणूस मुख्यमंत्री करून काँग्रेसने नवं गणित मांडलंय. आदिवासी बहूल छत्तीसगडमधे काँग्रेसने हा नवा पॅटर्न तयार केलाय. भाजपसोबत असलेल्या ओबीसी समाजाला जवळ करण्याचा हा मार्ग बघेल यांनीच तयार करून दिलाय.