नव्या वर्षात घराची सजावट करण्याआधी कलर ऑफ द इअर माहीत हवा

०८ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


पॅन्टोन ही सुप्रसिद्ध अमेरिकन रंग कंपनी दरवर्षी एका खास रंग जाहीर करते. यंदा २०२० साठी पॅन्टोनने क्लासिक ब्ल्यू रंग निवडलाय. कंपनीकडून गेल्या २० वर्षांपासून डिसेंबर महिन्यात अशा प्रकारची घोषणा केली जाते. आणि मग लोक पॅन्टोनने जाहीर केलेला रंग, कपडे, घराच्या भिंती, पडदे, घर सजावट, फॅशनच्या वस्तू अशा कितीतरी गोष्टींसाठी या रंगाला पसंती देतात.

पॅन्टोन ही सुप्रसिद्ध अमेरिकन रंग कंपनी दरवर्षी एका खास रंग जाहीर करते. यंदा २०२० साठी पॅन्टोनने ब्ल्यू क्लासिक निवडलाय. कंपनीकडून गेल्या २० वर्षांपासून डिसेंबर महिन्यात अशा प्रकारची घोषणा केली जाते. आणि मग लोक पॅन्टोनने जाहीर केलेला रंग, कपडे, घराच्या भिंती, पडदे, घर सजावट, फॅशनच्या वस्तू अशा कितीतरी गोष्टींसाठी या रंगाला पसंती देतात.

दोन दशकांआधी झाली सुरवात

२० वर्षांपूर्वी १९९९ मधे पॅन्टोन या अमेरिकन रंग कंपनीने रंग जाहीर करायला सुरवात केली. तेव्हा जग नव्या शतकाच्या उंबरठ्यावर होतं. एक शतकही संपत आलं होतं. त्याचवेळी वायटूके समस्या उद्भवली होती. म्हणजे संगणक १९०० च्या पुढचे वीसशे स्वीकारत नव्हता आणि सगळी तज्ञ मंडळी हवालदिल झाली होती. त्यावेळेस कंपनीने आशेचा किरण दाखवणाऱ्या चमकदार निळ्या रंगाला निवडलं होतं आणि आता पुन्हा २० वर्षांनी त्यांनी गहिरा निळा रंग नक्की केलाय.

रंगाची निवड करताना कंपनीकडून अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जातात. यात पर्यावरण, मानवी समस्या, भावना, हवामान अशा कितीतरी गोष्टी लक्षात घेऊन ते रंग नक्की करतात. २०१९ चा रंग कॅरोल म्हणजे म्हणजे समुद्रातल्या शेवाळाच्या रंगाची निवड करण्यात आली होती. आता साधारण तोच पोत त्यांनी घेतलाय. पण हा निळा रंग तिन्ही सांजेच्या वेळेला आकाशात जो निळा रंग असतो तो त्यांनी पसंत केलाय.

यंदाच्या रंगाबद्दल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, क्लासिक ब्ल्यू हा रंग उद्याबद्द्ल चांगले विचार मनात आणतो. तो उद्या आशादायक चित्र असेल असं भासवतो. मुळात हा निळा रंग विश्वास, भक्ती, आत्मविश्वास, सातत्य यांच्याशी निगडीत आहे. आज माणसाला याचीच गरज आहे. अनेक ताणतणावांमुळे माणसं पिचून गेलीत. त्यांच्या मनाला उभारी देणारा असा हा रंग आहे.

हेही वाचाः दिल्ली निवडणूक जाहीरः नरेंद्र मोदी नाही तर केजरीवालांभोवती फिरणार प्रचार

निळ्या रंगाचं महात्म्य

एकूणच निळ्या रंगाचं भारतीय संस्कृतीतही महात्म्य आहेच. सर्वांचा आवडता देव श्रीकृष्ण हा निळ्या रंगाचा घननिळा मानला जातो. त्याच्या रूपाचं वर्णन करताना त्याच्या निळ्या रंगाचा संदर्भ नेहमीच येतो. निळ्या रंगाचे मोराचे पीस आपल्या मुकूटात खोवणाऱ्या श्रीकृष्णाने गोकुळात रासलीला रचली आणि गोपींसह प्रेमाच्या उत्कट भावनेला गहिरा रंग दिला. त्याच निळ्या सावळ्याने कुरूक्षेत्रावर गीतोपदेश करून महाभारतही घडवलं.

अशा या कृष्णावर सर्व भारतीय भाषेत अनेक गीत रचना झाल्यात. मराठीतल्या जानकी सिनेमात सुधीर मोघेंचं ‘झुलतो बाई रासझुला’ हे गाण आहे. यात त्यांनी शेवटी ‘नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा’ अशी ओळ दिलीय. ती अतिशय भावूक आहे. एवढं एकच उदाहरण कृष्णाच्या निळ्या रंगाबाबत पुरेसं आहे.

सारा निळ्या रंगाचा करिश्मा

नभ निळं आहे असं जाणवतंच. दुपारच्या वेळेस निरभ्र आकाश निळंभोर दिसतं. विज्ञान म्हणते सूर्यापासून निघणारी किरणं सप्तरंगी असतात. त्यातली काही जमिनीवर येताना झटक्यात येतात. काही खूप लांब प्रवास करून येतात. मधल्या धुलीकणांमुळे माणसाच्या डोळ्यांना या सप्तरंगातले लगेचच पोचतात.

निळा रंग तेवढा प्रकर्षाने दिसतो म्हणून आकाश आपल्याला निळ्या रंगाचं वाटतं. असू दे ते निळेशार आहे म्हणून शांत वाटते आणि त्याचेच प्रतिबिंब पाण्यात पडल्याने कुठलाही रंग मोठ्या मनाने स्वीकारणारे पाणीसुद्धा निळे वाटते. काही ठिकाणचा समुद्र निळाशार दिसतो. उदाहरण द्यायचं तर मॉरिशचचं देता येईल. आपल्याकडे अंदमानलासुद्धा समुद्र निळा दिसतो. असा समुद्र खूपच आकर्षक वाटतो. निळ्या रंगाचा हा करिश्मा आहे.

निळे डोळेसुद्धा अथांग आणि गहिरे वाटतात हे या आकाश आणि समुद्रामुळेच. एक काळ होता सिने रसिकांवर निळ्या डोळ्यांचा राज आणि शम्मी कपूर बंधूंचा पगडा होता. रूपवती ऐश्वर्या रायनेसुद्धा तिच्या निळसर हिरवट डोळ्यांनीच सर्वांवर भुरळ घातली. गोऱ्यांच्या देशात निळे डोळे ही बाब विशेष ठरत नाही. तिथे अनेकांचे डोळे निळे असतात. हे बाकी खरं.

हेही वाचाः तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो?

टीम इंडियाचे मेन इन ब्लू

निळ्या रंगाला टीम इंडियाने आणखी उजळवलंय. या रंगाचे कपडे गेली कित्येक वर्षे भारतीय खेळाडू घालताहेत. निळ्या रंगाच्या छटा बदलत असतील, पण निळा रंग असतोच. म्हणूनच आता टीम इंडियेला मेन इन ब्लू म्हटलं जातं. सध्या आपली टीम तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधे जोशात आहे. म्हणून भारतीय प्रेक्षकही निळ्या रंगाचे कपडे घालून जिथे तिथे गर्दी करताना दिसतात. आणि एक निळा सागरच स्टेडियमवर अवतरल्याचा भास घडवतात. निळा रंग अर्जेन्टिना, उरुग्वे यांच्या झेंड्यात असल्याने त्यांच्या विविध खेळांमधले खेळाडू आपल्या जर्सीच्या रंगात निळ्याचा जरूर समावेश करतात.

निळा रंग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आवडता रंग होता. हा रंग शांत म्हणून आणि आकाशाचाही हाच रंग असल्याने व्यापक म्हणून त्यांना खूप आवडायचा. १९४२ मधे त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन ऑफ इंडिया नावच पक्ष काढला होता. त्याचा झेंडा त्यांनी निळ्या रंगाचा ठेवला होता आणि मधोमध होतं अशोकचक्र.

पुढे स्वातंत्र्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन झाला तेव्हा हाच झेंडा स्वीकारला गेला आणि जणू काही निळा रंग शोषित, वंचित, दलित समाजाचं प्रतिक बनला. आंबेडकरांचे फोटो नेहमी निळ्या कोटमधे दाखवले जातात. आंबेडकर जयंती आणि पुण्यतिथीला त्यांचे अनुयायी चैत्यभूमीवर गर्दी करतात तेव्हा समोर असलेल्या समुद्राला समांतर निळ्या रंगाचा जनसागर लोटल्याचं नेहमीच म्हटलं जातं.

हेही वाचाः नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?

सुख, शांतीचा संदेश

निळा रंग हवाई दलाशीसुद्धा निगडीत आहे. आकाशात सतत झेपावणारे वैमानिक निळ्या रंगाच्या गणवेशात शोभून दिसतात. अनेक हवाई कंपन्यांनीसुद्धा जरूर निळ्या रंगाला प्राधान्य दिल्याचं जाणवतं. लेखक मंडळीही निळ्या रंगाची शाई पसंत करतात. निळा रंग शांती, प्रेम, बंधुत्वाचं प्रतीक आहे.

आज जीन्सची पॅन्ट हा प्रकार पुरूष आणि स्त्रियांसाठी अगदी सर्वसाधारण झालाय. सगळेच जण जीन्सच्या पॅन्टचा रंग निळा पसंत करतात. त्याच्या छटा गडद, फिकट असतील पण रंग निळाच सर्वांना भावतो. एकत्र या रंगाच्या जीन्सवर कुठल्याही रंगाचा सूट आणि फॉर्मलसुद्धा हल्ली पसंत केले जातात. निळा रंग स्त्री, पुरूष असा भेदाभेद करणारा नाही असं म्हटलं जातं.

पॅन्टॉनने निळा रंग जाहीर करून जगात सुख, शांती, समाधान, सहिष्णूता, सौदार्हता, स्नेह याचं राज्य येवो अशी जणू इच्छा प्रदर्शित केलीय. माणसांमाणसांमधला दुरावा वाढतोय. जो तो आत्मकेंद्रित होत चाललाय. जीवन संघर्षमय झाल्याने दडपून गेलाय. उदास झालाय. त्याला आता आधार हवाय दुसऱ्याचा. माणूसच माणसाला आधार देऊ शकतो. म्हणूनच निळा रंग त्याला शांती, स्नेह याची दिशा जरूर दाखवेल असा हा विचार आहे. २०२० माणसांमधला जिव्हाळा, स्नेह वृद्धिंगत करणार ठरू दे म्हणून या निळ्याची निवड झालीय.

हेही वाचाः 

कॅलेंडर माणसाला वर्तमानात राहायला शिकवतं!

शिवाजी पार्कवर निळा समुद्र भरून आला होता तेव्हा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला का विरोध केला पाहिजे?

आपण वापरत असलेल्या कॅलेंडरला आहे हजारो वर्षांचा इतिहास

एनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था?