पर्रीकरांचं फोटोसेशन भाजपच्या अंगलट

१५ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


पर्रीकरांचं दर्शन घडवा नाहीतर श्राद्ध घाला, या काँग्रेसच्या आव्हानानंतर गोव्यातली भाजप बिथरली. त्यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बैठकांचे फोटो रिलीज केले. पण त्यातून त्यांचं गलितगात्र दर्शन झाल्याने भाजप सध्या टीकेचं लक्ष्य बनलीय.

एखाद्या युद्धात रणांगणावर लढताना सेनापतीच कोसळतो. तेव्हा लढणाऱया सैनिकांची तारांबळ उडते. ते लढाईची दिशाच हरवतात आणि सैरावैरा पळत सुटतात. तशीच काहीशी परिस्थिती गोव्यात भाजपची झालीय. गोवा भाजपच्या एकखांबी तंबूचे सेनापती म्हणजे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. आजतागायत त्यांचे आदेश इमानेइतबारे पाळण्याचं काम त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं. आजवर स्वतःहून निर्णय घेण्याचा प्रश्नच आला नव्हता. त्यामुळे आता पर्रीकर गंभीर आजारी असल्याने त्यांचं इमानी सैन्य हवालदिल झालंय.

काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विचारांची आणि धोरणांची कोणतीही जवळीक नसलेल्या मित्र पक्षांना एकत्र आणून भाजपने गोव्यात सत्तेचा मांड मांडला. आता सेनापतीच आजारी आहेत म्हटल्यावर याच आघाडीतल्या पक्षांनी भाजप संघटनेलाच सुरुंग लावण्याचे प्रयत्न चालवलेत. गोवा फॉरवर्ड सारख्या महत्वाकांक्षी प्रादेशिक पक्षाने आपल्या विस्ताराचे स्पष्ट संकेत दिलेत. त्याकडे भाजप अगतिकतेने पाहत बसलाय.

केंद्रातील श्रेष्ठींकडून आदेश आहे की कोणत्याही परिस्थितीत आघाडी घटकांना दुखवायचं नाही. लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी नाहीच. काहीही करून लोकसभा निवडणुकीत दगाफटका होता कामा नये. परंतु या तडजोडीमुळे भाजपच्या नेत्यांनी अथक परिश्रम घेऊन उभारलेली संघटना मात्र ढेपाळत चाललीय. अर्थातच दिल्लीतल्या श्रेष्ठींना याचं काहीच पडलेलं नाही.

सरकार टिकवण्यासाठी भाजप श्रेष्ठींचा हट्ट

आजारी पर्रीकरांना खरं तर विश्रांतीची गरज आहे. होत नाही, तरी ते मुख्यमंत्री पदी कायम आहेत. त्यामागे भाजप श्रेष्ठींचा हट्टच असल्याचं म्हटलं जातंय. असंही सांगितलं जातंय की पर्रीकरांनी स्वतःहून नेतृत्वाची धुरा दुसऱ्याकडे द्यायला सांगितलं होतं. पण दुसरा कुणीही मुख्यमंत्री बनला तर आघाडीची कसरत त्याला झेपणार नाही. त्यामुळे सरकार टिकवण्यासाठी दिल्लीच्या आदेशानुसार परिस्थिती जैसे थे आहे.

मुख्यमंत्र्यांचं दर्शन लोकांना घडलंय. त्याला आता बराच अवधी झालाय. वीडियो किंवा आवाजातून होणारा त्यांचा लोकसंपर्कही आता बंद झालाय. त्यामुळे विरोधकांचा दबाव वाढत चाललाय. त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याबाबत खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा सपाटाच भाजपच्या पदाधिकाऱयांनी लावलाय. गोव्यासारख्या छोट्या प्रदेशात गुपित काहीच राहत नसतं. त्यामुळेच या पदाधिकाऱयांचा खोटारडेपणा आपोआप उघड होतो. त्यामुळे पक्षाचं हसं होतंय.  

विचारशक्ती कोलमडली की आपोआप चुका होत राहतात. तशीच काहीशी अवस्था गोवा भाजपची बनलीय. त्यातूनच अलिकडे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन बैठकांचं आयोजन करण्यात आलं. त्यातले मुख्यमंत्र्यांचे फोटो प्रसिद्ध करण्याचा नादानपणा  सध्या टीकेचं लक्ष्य बनतंय.

उत्तम नियोजन अंगलट

खरं तर उत्तम नियोजन करून हे फोटो प्रसिद्ध करण्यात आले. मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठणठणीत आहे आणि ते प्रशासकीय कामं उत्तम करत असल्याचा भास त्यातून निर्माण करण्यात आला. पण हा प्रयोग भाजपवरच बुमरॅंग झाला. या फोटोतून जनतेला जे कळायचं होतं ते कळलं. आजारी मुख्यमंत्र्‍यांना त्रास देऊन केलेला हा प्रकारण माणूसकीशून्य आणि क्रूर असल्याची टीका भाजपवर झाली.

या साऱ्या प्रकाराला कारण ठरले ते एकेकाळची काँग्रेसची तोफ असणारे माजी आमदार जीतेंद्र देशप्रभू. २००० ते २००५ या भाजपची सत्ता असतानाच्या काळात काँग्रेसची अवस्था दयनीय झाली होती. तेव्हा काँग्रेसचं अस्तित्व टिकून राहिलं ते देशप्रभूंच्या पत्रकार परिषदा आणि तेव्हाचे युवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांची आंदोलनं यामुळेच.

आता गिरीश चोडणकर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनलेत. काँग्रेस वाढवण्यासाठी ते उत्साहाने धडपडत आहेत. त्यांना सोबत मिळालीय ती बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा पक्षाचे प्रवक्ते बनलेल्या जीतेंद्र देशप्रभू यांची. त्यांनी पुन्हा एकदा टीकेची आतषबाजी सुरू केलीय. थेट पर्रीकरांवरच तोफ डागून त्यांनी सत्ताधाऱ्यांसह स्वकीयांनाही घायाळ केलंय.   

पर्रीकरांचं दर्शन घडवा नाहीतर श्राद्ध वाढा, असं देशप्रभूंनी पत्रकार परिषदेतच म्हटल्यानंतर भाजपमधे जणू धरणीकंपच झाला. देशप्रभूंची टीका भाजपच्या जिव्हारी लागली. भाजपने त्याची गंभीरतेने दखल घेतली. खरं तर भाजपपेक्षाही पर्रीकरांच्या निकटवर्तीयांना हे सहन झालं नाही. देशप्रभूंना सडेतोड प्रत्त्युत्तर देण्याच्या नादात असाध्य आजारपणाचा सामना करणाऱ्या पर्रीकरांचे फोटो मुख्यमंत्री कार्यालयाने वायरल केले. पर्रीकर आता बरे झालेत आणि आजारपणातही ते सरकारी कामं करतच आहेत, असं दाखवून त्यांचं उदात्तीकरण करण्याचा हा खटाटोप होता. पण तो भाजपच्या अंगलट आला.

लोकांच्या गराड्यात वावरणारे पर्रीकर

मनोहर पर्रीकर हे कायम लोकांच्या गराड्यात वावरणारे नेते. आजारपणामुळे ते पहिल्यांदाच जनतेपासून दुरावलेत. त्यांचं नेमकं आजारपण काय, ते कधी बरे होतील आणि त्यांचं दर्शन पुन्हा कधी घडेल, याची लोक वाट पाहत आहेत. तब्बल दीड महिना वाट पाहिल्यानंतर गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे फोटो प्रसिद्ध करून ही प्रतीक्षा संपवण्याचे प्रयत्न झाले.  

फेब्रुवारी महिन्यापासून पर्रीकरांना पोटदुखीचा त्रास सुरू झालाय. तेव्हापासून त्यांना काय झालंय, हे अधिकृतपणे सांगितलंच गेलं नाही. या गोपनीयतेमुळे अफवा पसरू लागल्या. शेवटी आठ महिने पत्रकारांच्या प्रश्नांचा उबग आलेले आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पर्रीकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचं सांगून टाकलं. त्यानंतर अधिकृतपणे हे गूढ गोव्याला उकललं.

सत्तेचे लाभार्थी, कट्टर कार्यकर्ते आणि भाजपच्या भक्तांना पर्रीकरांविरुद्ध एक चकार शब्द सहन होत नाही. पर्रीकरांचं आजारपण लपवून ते कसे काम करत आहेत, असं चित्र सोशल मीडियावरून तयार केलं जातंय. पण पर्रीकरांच्या आजारपणामुळे साध्या मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकाही होऊ शकत नाहीत, हे माहीत असल्यामुळे लोक सहज खरंखोटं करू शकत आहेत.  

अशाच काही भक्तांनी देशप्रभूंच्या आव्हानाची संधी घेऊन पर्रीकरांचं दर्शन घडवण्याचा प्लान आखला. पण मंत्रिमंडळ बैठकीऐवजी थेट गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक ठरवली. यापूर्वी गुंतुवणूक मंडळाची बैठक विडियो कॉन्फरन्सिंगद्वारे झाल्याचं सांगण्यात आलं. काँग्रेसने त्याचे पुरावे मागितल्याने मंडळ तोंडघशी पडलं. आपली चूक लपवण्यासाठी मागील बैठकीचा पाठपुरावा म्हणून पर्रीकरांच्या हजेरीत पुन्हा बैठक घेतल्याचं नेपथ्य रचण्यात आलं. आजारी मुख्यमंत्र्यांना वेठीला धरून बोलावलेल्या बैठकीत तितकेच महत्त्वाचे आणि राज्याच्या भल्याचे प्रस्ताव आले असतील, अशी अपेक्षा होती. पण झालं भलतंच. कुणाचे तरी हितसंबंध जपण्यासाठीच हा सगळा खटाटोप घडवून आणला होता की काय, अशी शंका घेण्यास जागा निर्माण झालीय.  

या बैठकीपूर्वी विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्रीकरांची भेट घेतली, असं सांगितलं गेलं. या एकाच दिवशी या दोन्ही बैठकांचे फोटो मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून जारी झाले. हे फोटो माहिती आणि प्रसिद्धी खात्याकडून पत्रकारांना अधिकृतपणे देण्यात आलेच नाहीत.

फोटोमागचा हेतू

दोन्ही फोटोंमधे मुख्यमंत्री एका सोफ्यावर दोन्ही बाजूंनी उशाच्या आधाराने एकाच ठिकाणी एकाच अवस्थेत बसलेले पाहायला मिळाले. सभापती डॉ. सावंत यांनी यापूर्वी दावा केला होती की त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मग पुन्हा भेट का झाली, याचं कारणही कळलं नाही. डॉ. सावंत हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळावी, असाच कदाचित या फोटोंचा हेतू असावा.

या दोन्ही फोटोंमधून मुख्यमंत्री ठणठणीत आहेत, असं काहीच दिसलं नाही. उलट ते बरेच थकले आहेत. त्यांना विश्रांतीची गरज आहे. पण तरीही ते काम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंच दिसलं. ते लवकरच कामावर रूजू होतील, हा भाजपचा दावाही या फोटोंनी फोल ठरवला.  

देशप्रभूंच्या टीकेमुळे हे फोटोसेशन घेण्याची मुळात गरज काय होती. त्यासाठी भाजपने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या आरोग्याची नेमकी माहिती दिली असती. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी निवेदन केलं असतं. तरीही ते पुरेसं होतं. पण भाजप नेते आपल्याच वक्तव्यांच्या जाळ्यात अडकलेत. ते पर्रीकरांच्या तब्येतीची खात्री देतात. पण ती प्रत्यक्षात दिसत नाहीत. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही म्हटलं होतं की मुख्यमंत्री दिवाळीनंतर पुन्हा कामावर रूजू होतील. पण ते दिवाळीनंतर कामावर रूजू झालेले नाहीत. अशीच दिशाभूल सुरू असल्यामुळे फक्त सर्वसामान्यच नाही तर कार्यकर्तेही नेत्यांवर रागावलेत.

पहिल्या दिवशीच्या फोटोंबाबत लोकांच्या मनांत संशय बळावला म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री हात उंचावून बोलत असल्याचा फोटो जारी केला. पण त्यातूनही काही साध्य झालं नाही. आपला नेता सक्रिय नसल्याने गोव्यातली भाजप हतबल झाल्याचं चित्र त्यातून दिसतंय. भाजप हा गोव्यात एकखांबी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय.