विनोबा भावे : सुळी दिलेले संत (भाग २)

१६ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : १३ मिनिटं


आज १५ नोव्हेंबर. विसाव्या शतकातल्या भारतावर सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या महामानवांपैकी एक विनोबा भावेंचा स्मृतिदिन. दीर्घकाळ विनोबांच्या सहवासात राहिलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा विनोबांविषयी इनसाइट देणारा हा सविस्तर वैचारिक पट तीन भागांत.

विनोबा केवळ प्राचीन भारताचे प्रतिनिधी किंवा भाष्यकार होते का? आजच्या आणि उद्याच्या जगासाठी विनोबांचं काही औचित्य आहे का?

सॅम्युअल हंटिंगटन हा हार्वर्ड मधला प्रोफेसर. त्याने १९९६ मधे एक पुस्तक प्रकाशित केलं, ‘दी क्लॅश ऑफ सिविलायझेशनस’. लक्षात घ्या, तोपर्यंत शीतयुद्ध संपलेलं आहे. मग पुढची युद्धं कुठल्या मुद्द्यांवर होणार? तो इतिहास तपासतो आणि भाकीत करतो की यापुढे जगातले संघर्ष हे सांस्कृतिक मुद्द्यांवर होतील. यात भाषा आली, धर्म आला, वंश आला, राष्ट्रीय अस्मिता आली. स्थानिक संघर्ष देखील वंश, धर्म, भाषा आणि अस्मिता यामुळे होतील.

जागतिक संघर्ष हे देशांमधले नाही तर वेगवेगळ्या संस्कृतींमधे होतील. मुख्य संघर्ष असतील, पाश्चिमात्य संस्कृती विरुद्ध चिनी संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती विरुद्ध इस्लामिक संस्कृती. हंटिंगटनचे अनेक विचार जरी पटण्यासारखे नसले तरी याबाबत मात्र त्याने अचूक भाकीत वर्तवलं आहे. यापुढे संघर्ष होणार ते सांस्कृतिक मुद्द्यांवर.  

जगभर अस्मितेचे संघर्ष

आज आपण हे सर्वत्र घडताना पाहत आहोत. अस्मिता संघर्ष वाढला आहे. स्पेनमधून कॅटालोनिया वेगळं होऊ पाहतो. ब्रेग्झिट करून इंग्लंड युनायटेड युरोप मधून बाहेर पडलं. मध्यपूर्वेमधे आयसिस आहे, तालिबान आहे. इस्लामिक जगत तर पूर्ण धार्मिक संघर्षाने पेटलं आहे. भारताकडे पाहता काश्मीर प्रश्न आहे, हिंदुत्वही आहे, दलितांचे आणि आदिवासींचे संघर्षही आहेत. सोबतच जाट, मराठे आणि राजपुतांचेही संघर्ष आहेत. भारत धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक संघर्षांनी पेटला आहे. भारतच नाही तर सबंध जगच संघर्षाच्या उंबरठ्यावर उभं आहे. 

विज्ञानामुळे संपूर्ण जग आणि माणसं फार जवळ आली आहेत. प्रत्येक जण आपापली संस्कृती घेऊन एकत्र येत आहेत. मग यांच्यात संघर्षच होणार का? हा संघर्ष झालाच तर विज्ञानामुळे तो महाभयंकर होणार हे नक्की. उत्तर कोरिया तर बॉम्बच्या बटनवर हात ठेवूनच बसला आहे. अशा स्थितीत संघर्षापासून जगाला कसं वाचविता येईल? संघर्षाची बीजं तर वाढतच आहेत. 

प्रचंड आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. यावर मार्क्स ने वर्ग संघर्ष सांगितला. त्यातून आर्थिक समता येईल असं भाकीत केलं. आर्थिक समता फार सुंदर गोष्ट राहिली असती, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. फुले, आंबेडकरांनी आपल्याला वर्ण संघर्ष आणि सामाजिक समता सांगितली. पण अजूनही आपल्या मनातील जात गेलेली नाही. जातीय संघर्ष पेटलेलाच आहे. दलितांना जाळलं जातच आहे. 

थॉमस पिकेटी आपल्या, ‘कॅपिटल इन ट्वेंटी फर्स्ट सेन्चुरी’ या पुस्तकात सांगतोय,  या शतकात जगातील विषमता वाढली आहे. जगातील ५० टक्के उत्पन्न हे १ टक्के लोकांचं आहे. ९० टक्के मालमत्ता ही २ टक्का लोकांकडे आहे. केवढी आर्थिक विषमता वाढली आहे! सामाजिक विषमता तर आपण पहातच आहोत. आणि हिंदुत्व तर समतेची सोडा आता श्रेष्ठत्वाची भाषा बोलतं आहे. 

या सर्व पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित होतो की समतेचा आधार काय असू शकतो? सामाजिक, आर्थिक समता हवी असेल तर या समतेचा आधार काय? का म्हणून माणसं सारखी मानायची? 

समतेचा आधार साम्य

याबाबत युरोपने ह्युमनिझम किंवा लिबरॅलिझम हा विचार मांडला. माणूस सर्वोच्च हा विचार त्यात अंतर्निहीत आहे. विनोबा मात्र भारतीय भाषेत समतेचा वेगळाच विचार आपल्याला सांगतात. ते म्हणतात, समतेचा आधार आहे साम्य! समता आणि साम्य या दोन्ही शब्दात फरक आहे. समता म्हणजे इक्वलिटी आणि साम्य म्हणजे युनिटी, एकरूपता. विनोबा त्यांच्या साम्यसूत्रात पहिलंच सूत्र सांगतात, ‘अभिधेयम् परम् साम्यम.’ सर्वोच्च ध्येय काय आहे तर परम साम्य. पूर्णपणे एकरूपता. मी आणि तू समान नाही तर एकच आहोत. 

समता तर हवीच पण ते अपुरं ध्येय. म्हणून विनोबा म्हणतात, राजकीय, सामाजिक, आर्थिक समता हवीच आहे. पण या तिन्ही समता जगात तेव्हाच प्रस्थापित होऊ शकतात, स्थिर होऊ शकतात जेव्हा हृदयामधे मानसिक समता असेल. आणि त्याचा आधार आध्यात्मिक साम्य हाच असू शकतो. ईशावास्यं इदम् सर्वम. इथे जे जे काही आहे त्यात ईश तत्वाचं वास्तव्य आहे. ईश्वर तुझ्यातही आहे, तोच माझ्यातही आहे. हेच आपल्यात साम्य आहे. तोच ईश्वर दोघांमधे वसतो आहे. 

हा आध्यात्मिक विचार समतेच्या कल्पनेला आधार देतो. क्लॅश ऑफ सिविलायझेशनच्या जगात तो सबंध मानवजातीलाच नव्हे तर विश्वातल्या सर्व प्राणिमात्रांना, वृक्षांना, पर्यावरणाला, सृष्टीला, परग्रहांना एकरूपतेचा आधार देतो. विज्ञान एकीकडे आपल्याला म्हणणार की सगळंच कणमय आहे म्हणून  आपण सगळे सारखे आहोत आणि दुसरीकडे विनोबा आध्यात्मिक दृष्टीकोनातून सांगणार की ‘अभिधेयम् परम् साम्यम.’ विज्ञान आणि आध्यात्माला एकत्र आणून विनोबा आपल्याला विलक्षण असा एकरूपतेचा दृष्टीकोण देतात. 

१९६३ मधे विनोबांचं बोट धरून मी बंगालमधे चालत होतो. त्या काळात ते ‘जय जगत’ अशी घोषणा आमच्याकडून करून घ्यायचे. कल्पना करा. चीनचं आक्रमण झालंय. दोन राष्ट्रांमधला संघर्ष पेटला आहे. जगामधे त्यावेळी शीतयुद्ध सुरू आहे. रशिया आणि अमेरिकेने आण्विक शस्त्रांचे ढीग तयार करून ठेवले आहे. अशा जगामधे अशी वैश्विक कल्पना मांडणारा, ‘जय महाराष्ट्र’ नाही, ‘जय हिंद’ही नाही तर ‘जय जगत’ म्हणणारा हा पहिला महापुरुष होऊन गेला. 

ज्ञानयोगी आणि कर्मयोगीही

हा माणूस ज्ञानयोगीही होता. २२ भाषा जाणणारा. वेल्लोर तुरुंगात गेले तेव्हा गेल्या गेल्या त्यांनी तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम अशी चारही भाषांची पुस्तकं मागितली आणि एकाच वेळी या चारही भाषा शिकायला सुरुवात केली. कुणी तरी त्यांना म्हणालं की तुम्ही चार चार भाषा एकाचवेळी कसे शिकता? यावर विनोबा म्हणाले, कारण पाचवी भाषाच नाही म्हणून चार शिकतो. पाचवी कुठली दक्षिण भारतीय भाषा असती तर ती देखील शिकलो असतो. पदयात्रेमधे आम्ही रात्री गाढ झोपून असायचो. विनोबा तीन वाजता उठायचे आणि अध्ययन करायचे. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी चिनी भाषा शिकायला सुरुवात केली. असा हा ज्ञानयोगी. 

तो कर्मयोगीही होता. ‘स्नेह सन्निधि’मधे ते आपल्याला पाहायला मिळतं. आठ आठ, बारा बारा तास हा माणूस केवळ सूत कताई करायचा. आठ आठ तास फक्त कुदळीने विनोबांनी खड्डे खणले आहे. एवढं मोठा ज्ञानी, एवढा मोठा योगी. तो काय करतो आहे? तर कुदळीने माती खणतो आहे. झेनपंथामधे साक्षात्कार झाल्यानंतर काय घडतं, याचं सुंदर वर्णन आहे. 

Before enlightenment, chop wood, carry water. 
After enlightenment, chop wood, carry water.

साक्षात्कारी व्यक्ती तीच साधी कर्मं करत राहते. आत परिवर्तन घडलं तरी बाह्य कर्मं सोडत नाही.  
विनोबा खादीशास्त्राचे भीष्माचार्य होते. खादीशास्त्राचा बराचसा भाग विनोबांनी आपल्या शिष्यांसोबत वर्ध्याच्या आश्रमात प्रयोग करून रचला. भाऊ पानसे नावाचे विनोबांचे एक शिष्य होते. एका तासामधे ४६० तार कातण्याचा त्यांचा भारतातला विक्रम होता. विदर्भातला कापूस घेऊन तो रेचायचा कसा, त्यातून सरकी कशी काढायची, रुई कशी वेगळी करायची, पिंजायचे कसे, त्याचे पेळू कसे करायचे, त्याच्या तारा कशा करायच्या, त्या मोजायच्या कशा आणि विणायच्या कशा या अख्ख्या खादीशास्त्राचे विनोबांनी अनेक वर्षे प्रयोग केले. 

एकदा गांधीजींकडे खादी कातणारे मजूर गेले. तेव्हा कदाचित एका गुंडीला दोन पैसे असा कातण्याचा दर होता. मजूर म्हणाले, ‘बापू पोटच भरत नाही. अर्धपोटी राहावं लागतं.’ त्याचवेळी खादीचे व्यवस्थापक म्हणत होते की सूत कातण्याचे दर वाढवले तर खादी खूप महाग होईल. लोक खादी विकत घेणारच नाहीत. 

गांधीजींनी विनोबांना बोलावलं आणि विचारलं की या खादी कातणाऱ्या मजुरांच्या मजुरीचा दर काय असावा? विनोबा म्हणाले, ‘मला सहा महिने द्या.’ सहा महिन्यांनी ते गांधींजवळ परतले. वजन ३० पाउंड कमी झालं होतं. गांधीजी म्हणाले, ‘विनोबा हे काय झालं?’ विनोबा गांधीजींना म्हणाले, ‘गेले सहा महिने मी दररोज आठ तास फक्त सूत काततोय. या कातण्याची जी मजुरी मिळत आहे तेवढ्याच पैशात मी जेवतोय. तर माझी अशी अवस्था झाली.’ थोर ज्ञानी, पण खादी कातणाऱ्यांची मजुरी काय असावी यासाठी स्वतःवर प्रयोग करून निर्णय सांगतोय. 

असा हा ज्ञानयोगी, कर्मयोगी, भक्त आणि संन्यासी सर्व एका पुरुषाच्या देहामधे आपल्याला साक्षात बघायला मिळाला. अजिबात अतिशयोक्ती न करता मी असं म्हणणार आहे की दधिची, शंकराचार्य, ख्रिस्त, ज्ञानेश्वर आणि गांधी या पाचही महापुरुषांचा संगम विनोबा या एका माणसात होता.  

अंतिम पर्वः शोकांताला अपवाद नाही

बहुतेक महापुरुषांचं अंतिम पर्व हा अटळपणे शोकांत असतो. श्रीरामचंद्राच्या जीवनामधे बघा, वनवासातून परत आले, सीतेचा त्याग करावा लागला. सीता धरणीमधे गेली. लक्ष्मणाला जीव दे, असा आदेश द्यावा लागला. शेवटी रामचंद्राने स्वतः शरयू नदीत बुडून समाधी घेतली. 
कृष्णाच्या जीवनात बघा, महाभारताचं युद्ध जिंकलं पण महासंहार झालेला आहे. कृष्ण द्वारकेला येतो तेव्हा त्याला दिसतं, आप्तस्वकीय दारू पिऊन आपसात लढून मेले आहेत. वंशसंहार झालेला आहे. हे सगळं बघायला कृष्ण जिवंत आहे. शेवटी वनामधे एकटा उदास बसलेला आहे. त्यावेळी बाण लागून कृष्ण देहत्याग करतो. 

ख्रिस्ताला सुळावर चढवलं. गांधींना तर त्यांच्या अंतिम पर्वामधे देशाची फाळणी बघावी लागली. हिंदू मुस्लीम दंगे बघावे लागले. कॉंग्रेसने गांधींचा अस्वीकार केला. तेही त्यांना बघावं लागलं. शेवटी तीन गोळ्या छातीत झेलाव्या लागल्या. विनोबा देखील याला अपवाद नव्हते.

वर्ष १९७०. वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. गेली वीस वर्षे भारताची पदयात्रा, वाहनयात्रा करत होते. राज्याराज्यात, गावागावात जाऊन भूदान मागत होते. लोकांना आर्थिक आणि सामाजिक समतेचा, ग्राम स्वराज्याचा विचार समजावत होते. आता शरीर थकलं आहे, जर्जर झालं आहे. सामाजिक कर्तव्य आता पूर्ण झालं, असं म्हणून १९७० मधे त्यांनी भूदान, ग्रामदान आणि पदयात्रेतून निवृत्ती घेतली आणि आपल्या जीवनातील एक अंतिम प्रयोग सुरू केला. 

कर्मयोगाची नॅनो टेक्नॉलॉजी

विनोबांच्या जीवनातला हा अंतिम प्रयोग अतिशय धोकादायक सिद्ध झाला. आपल्याला समजण्यासाठी त्यांनी याला ‘सूक्ष्मात प्रवेश’ असा शब्दप्रयोग केला. म्हणजे ‘सगळ्या कर्मांपासून मी आता निवृत्त होतो आहे.’ संन्यासाची आपल्या देशात परंपराच आहे. पण विनोबांनी त्या पुढचा अतिशय कठीण प्रयोग मांडला. 

गीतेच्या पाचव्या अध्यायामधे असं द्वंद्व आहे की कर्मयोग श्रेष्ठ की संन्यास श्रेष्ठ. विनोबांनी स्वतः म्हटलंय की ‘गीतेतला हा मला सर्वात कठीण प्रश्न वाटला. जोपर्यंत माझ्या मनात या प्रश्नाविषयी स्पष्ट उत्तर तयार झालं नाही तोपर्यंत मी गीतेचा अनुवाद, गीताई लिहिणं सुरू केलं नाही. तोपर्यंत मी थांबून राहिलो.’ कर्मयोगी काय करतो? तर तो कर्म करूनही निर्लेप राहतो. निष्काम कर्मयोग, जे विनोबांनी जवळपास ५० वर्षे, १९२० ते १९७० या काळात केलं. 

आता विनोबांनी बाह्य कर्म सोडलं आणि म्हणाले, ‘आता माझं केवळ आंतरिक कर्म, सूक्ष्म कर्म सुरू राहणार. मी काहीही बाह्य कर्म करणार नाही पण गीतेच्या पाचव्या अध्यायात म्हटलेलं जर खरं असेल तर माझ्या आंतरिक कर्मातून, अकर्मातून, व्यापक कर्म घडेल.’ आपल्याला समजायला जरा कठीणच आहे. 

हे कसं घडेल याबाबत गीता प्रवचनामधे एका जागी विनोबा समजवतात. आई आपल्या लहान मुलाला चूक झाली म्हणून मारते. मातृहृदयच आहे, पण त्याला शिक्षा करते. हे झालं कर्म. त्यामुळे मूल कदाचित बाह्यतः सुधारतं पण परिमाण कमी. पण आईने त्या मुलाशी बोलणंच सोडलं. हे झालं अकर्म. मारत नाही आणि बोलतही नाही. तरी मुलावर त्याचा प्रचंड परिणाम घडतो. अकर्मातून कर्म घडू शकतं, परिणाम होऊ शकतो. 

त्यामुळे विनोबांनी आता बाह्य कर्मयोगाचा भाग सोडला आणि सन्यस्त होऊन अकर्मातून कर्म सुरू केलं. कर्मसंन्यास घेतला, क्षेत्रसंन्यास घेतला आणि सूक्ष्मात प्रवेश केला, म्हणाले की आता यापुढे माझं कर्म असं सूक्ष्मच राहणार. दिसणार नाही. पण माझी श्रद्धा आहे की त्याचा परिणाम व्यापक होईल. आपण असं म्हणूया की विनोबा कर्मयोगाच्या नॅनो टेक्नोलॉजीचा प्रयोग करतात आहेत. सूक्ष्मातिसूक्ष्म कर्म. मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवरती कर्म. पण त्याचा परिणाम मानवजातीवर जास्त व्हावा. 
विनोबा नॅनो टेक्नालॉजीचे प्रयोग करत होते. पण आम्हाला फक्त लोहाराची हातोडी समजते. त्यांचं अकर्मातून कर्म आम्हाला समजलंच नाही. स्वीकार्यही झालं नाही. म्हणून नंतरच्या म्हणजे १९७२ ते १९८२ या दहा वर्षाच्या काळात विनोबांच्या या सूक्ष्माची, क्षेत्रसंन्यासाची मराठी लेखक पत्रकारांनी यथेच्छ खिल्ली उडविली. त्यांचं पात्र जेवढं होतं तसे ते वागले. 

अंतिम वर्षांतले दोन आरोप

अंतिम दहा वर्षात विनोबांवर जे अनेक आक्षेप आणि आरोप झाले त्यात मुख्य दोन आरोप आहेत. एक म्हणजे जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनाला समर्थन का दिलं नाही, इंदिरा गांधी विरुद्ध सत्याग्रह का केला नाही हा पहिला आक्षेप. आणि दुसरा, आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ असं प्रशस्तीपत्र का दिलं? विनोबांविषयी अख्ख्या महाराष्ट्राच्या मनातलं भावविश्व या दोन प्रश्नांनी कलुषित झालं आहे. त्यामुळे या दोन्ही प्रश्नाविषयी आज विस्ताराने चर्चा करावी असं मला वाटतं. 

या दोन प्रश्नांचं उत्तर शोधायचं असेल तर सुरुवात वेगळीकडून करावी लागते. कारण या प्रश्नांचं उत्तर दृष्टीकोनाच्या भेदामधे लपलेलं आहे. गीता प्रवचनात विनोबा एक कथा सांगतात. रामचरित्र सांगण्यात येत आहे. तुलसीदास की रामदास सांगतात आहेत आणि हनुमान वेषांतर करून कथा ऐकण्यासाठी येऊन बसला आहे. एका जागी तुलसीदास म्हणाले की हनुमान लंकेमधे सीतेच्या शोधासाठी गेला, तिथे सगळीकडे शुभ्र फुले फुलली होती. 

हे ऐकताच हनुमान उभा राहिला आणि म्हणाला, तुम्ही खोटं सांगत आहात. ती फुलं पांढरी नव्हे लाल होती. तुलसीदास म्हणाले, नाही ती फुलं शुभ्रच होती. हनुमान म्हणाला मी स्वतः तिथे पाहिलं. फुलं लाल होती. दोन भक्तांमधे वाद झाला; न्याय कोण करणार? ते दोघे प्रभू रामचंद्राकडे गेले. रामचंद्र म्हणाले, ‘फुलं तर पांढरीच होती पण हनुमान एवढा क्रोधित झाला होता की त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्यामुळे त्याला सगळं लाल दिसत होतं.’ तात्पर्य हे की दृष्टिकोनामुळे त्याच वास्तवाचं वेगळंच दर्शन आपल्याला होतं. 

द्वैत की अद्वैत

दोन दृष्टीकोन आहेत. एक आहे द्वैतवादी दृष्टीकोन, जो मानतो की जगामधे द्वैत आहे, द्वंद्व आहे. दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. आणि त्यांच्यामधे द्वंद्व आहे, त्यांच्यामधे संघर्ष आहे. द्वंद्व हेच वास्तव आणि संघर्ष हाच उपाय असा हा दृष्टीकोन सांगतो. या विचारातून स्वाभाविकपणे युद्ध होतात. 

दुसरा अद्वैत दृष्टीकोन आहे. तो म्हणतो, सर्व काही एकरूप, एकात्मच आहे. त्यामुळे यातून समन्वयाचा मार्ग निघतो. सगळं जर एकच असेल तर द्वंद्व होऊच शकत नाही. संघर्षाला जागाच नाही. जीवनात छोटी छोटी द्वैतं आणि द्वंद्व असतात पण ती व्यापक अशा विशाल अद्वैताच्या, एकात्मतेच्या पोटात असतात. 

आता वास्तवाला बघायचं कसं हे दृष्टिकोनावर अवलंबून असतं. आपल्या दृष्टीला जग हे छोटे छोटे द्वंद्व आणि द्वैताने बनलेलं आहे असं भासतं. विनोबांनी नेहमीच व्यापक अद्वैत पाहिलं आणि अनुभवलं. विनोबांचा हा मूलभूत आणि तात्विक दृष्टीकोन समजून घेतल्याशिवाय विनोबांना समजूनच घेता येत नाही. विनोबांच्या जीवनात अद्वैत इतकं ओतप्रोत भरलं होतं की त्यांनी द्वैतासोबत वाद करणं देखील नाकारलं. 

विनोबा १८ वर्षाचे होते तेव्हाची गोष्ट. ब्रह्माच्या शोधात, मोक्षाच्या शोधात ते हिमालयाकडे निघाले होते. वाटेत काशीला काही काळ थांबले. तेथे ते संस्कृत आणि वेदाचा अभ्यास करत होते. त्या काळात काशीमधे पंडितांच्या मोठमोठ्या वादसभा भरायच्या. एक वादसभा भरली, द्वैतवादी विरुद्ध अद्वैतवादी. भारतीय तत्वज्ञानात हे वाद कायमच राहिले आहेत. काशीमधल्या त्या वादामधे द्वैतवादी हरले, अद्वैतवादी जिंकले. 

आता ते उठणार आणि विजयाचा उत्सव साजरा करणार तेवढ्यात श्रोत्यांमधून विनोबा उभे राहिले. अठरा-एकोणीस वर्षाचा मुलगा. म्हणाले, ‘तुमचं चुकतंय. द्वैतवादी तर वादात पराजित झाले. ते स्पष्टच आहे. पण अद्वैतवाद्यांनी द्वैतवाद्यांशी वाद स्वीकारला. म्हणजे मुळातच त्यांनी द्वैत स्वीकारलं. खरा अद्वैतवादी द्वैत आणि अद्वैत यामधे देखील अद्वैतच बघेल. त्यामुळे तो वादच करू शकत नाही. द्वैती लोकांशी तुम्ही वादाला उतरल्याने तुम्ही अद्वैतवादी तर मुळातच पराजित झालात.’ 

कुणीच परका नाही, सारे माझेच

अद्वैताची खरी कसोटी ही द्वैताशी देखील न लढण्यात आहे, असं विनोबा मानतात. कठीण बाब आहे आपल्यासाठी. मला आणि तुम्हाला वाद झाल्यावर हाती तलवार घेऊन किंवा बुद्धीची शस्त्र परजून भांडायची सवय आहे. आणि विनोबा म्हणत आहेत की सगळंच काही एकरूप आहे, अद्वैत आहे. मग मी द्वैत कल्पून वादात कशाला पडू? ज्याच्या दृष्टी आणि वृत्ती मधे अद्वैत ओतप्रोत भरलं आहे त्या माणसासाठी कोणीच परका नाही. सर्वच माझे आहेत. 

त्याही पुढे जाऊन विनोबा म्हणतात, सर्वच मी आहे. तुकारामांनी वर्णन केलं आहे. ‘जो जो भेटे तो तो वाटे मी असे.’ ही संतांची वृत्ती असते. त्यांचं हृदय या पातळीवर असतं. कुणाशी वाद कसला आणि कुणाशी शत्रुत्व कसलं? आणि या ‘सर्वच मी’ चा आधार आहे ‘ईशावास्यं इदम् सर्वम.’ सर्वत्र जर ईश्वर वसलेला आहे; मग द्वैत कसं असू शकतं? संघर्ष कसा असू शकतो? 

गीतेमधे अर्जुन आपल्यासारखा आहे. तो जागोजागी द्वंद्व उभे करतो. ज्ञान श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ? निर्गुण भक्ती श्रेष्ठ की सगुण भक्ती श्रेष्ठ? या प्रश्नाचं उत्तर जेव्हा गीता प्रवचनात विनोबा देतात तेव्हा ते कोणतीही एक बाजू घेणं नाकारतात. ही सगळी द्वैतं, सगळी द्वंद्वं काल्पनिक आहेत. त्यांच्यामधे मूलभूत अद्वैत आहे असं ते म्हणतात, आणि अद्भुत अद्वैताचं दर्शन आपल्याला घडवतात. 

पाचव्या अध्यायामधे कर्म आणि संन्यासाचं अद्वैत विनोबा दाखवतात. बाराव्या अध्यायात सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती मधे कोणती श्रेष्ठ यावर शतकानुशतकं वाद चालले आहेत. पण विनोबा दाखवतात की दोन्ही एकच आहे. त्यांच्यामधे द्वैतच नाही. 

गीता प्रवचनात सतराव्या अध्यायात तर विनोबा आणखीनच कमाल करतात. परमेश्वराचं नाम घेण्याचा अधिकार कोणाला आहे, असा प्रश्न विचारला आहे. तो पुण्यवानाला आहे असं कुणीही म्हणेल. पण विनोबा सतराव्या अध्यायाच्या शेवटच्या वाक्यात याचं अद्भुत उत्तर देतात. ‘परमेश्वराचं नाम घेण्याचा अधिकार पुण्यवानाला आहे, कारण तो पुण्यवान आहे. परमेश्वराचं नाम घेण्याचा अधिकार पाप्याला आहे, कारण तो पापी आहे.’ त्याला गरज आहे. पापी आणि पुण्यवान यातही विनोबा अद्वैत बघतात. 
कुरुक्षेतत्राच्या युद्धभूमीवर सांगितलेल्या गीतेमधे देखील विनोबा अद्वैत बघत आहेत. त्यामुळे गीतेला त्यांनी नाव दिलं आहे ‘साम्ययोग’. गीतेमधे वेगवेगळ्या भाष्यकारांना वेगवेगळं अंग दिसलं, भावलं. टिळकांचा कर्मयोग, ज्ञानेश्वरांचा भक्तियोग, शंकराचार्यांचा ज्ञानयोग, महात्मा गांधींचा अनासक्तियोग. तसा विनोबांचा साम्ययोग. 

आपल्यात हिंसा मुरली आहे

साम्ययोगातून केवळ अहिंसा जन्माला येऊ शकते. सगळंच जर मी आहे आणि परका कोणी नाहीच आहे, मला कोणी शत्रूच नाहीच तर हिंसा कशी करता येईल? पण आपल्या मानसिक अडचणी बघा. आपल्यात हिंसा मुरली आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास ‘पराक्रम’ हा शब्द बघा. आपण पराक्रम करतो. त्यांचं कौतुक करतो. पराक्रम म्हणजे काय तर पर+आक्रम. दुसऱ्यावर आक्रमण म्हणजे पराक्रम. इतर माणसांना ‘पर’ समजणं ही पहिली हिंसा. म्हणजे आधीच द्वैत. त्यावर आक्रमण करणं म्हणजे दुसरी हिंसा. हिंसेचा गुणाकार म्हणजे पराक्रम. आणि त्या पराक्रमाचं आपण किती कौतुक करीत असतो. 
विनोबांच्या जीवनात मात्र सातत्य आहे. काशीला द्वैतासोबत त्यांनी वाद नाकारला. ब्रिटिशांसोबत पूर्णपणे अहिंसक राहून हा माणूस सत्याग्रह करू शकेल हे गांधींना माहीत होतं. म्हणून त्यांनी विनोबांना पहिला वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवडलं. तेलंगणात जमिनीसाठी वर्ग संघर्षातून साम्यवादी हिंसा करीत होते. विनोबांनी हिंसा नाकारली आणि भूदान सुरू केलं. भूमिवान आणि भूमिहीन दोघेही ईश्वराचीच मुलं.

गावांतील पक्ष, दुही आणि तंटे मिटवायला त्यांनी ग्रामदान, सर्वसंमती हे प्रयोग सुरू केले. विनोबा सर्वत्र अद्वैत कल्पतात आहेत. चंबळच्या डाकूंना देखील त्यांनी आपलं म्हटलं. आश्चर्य म्हणजे त्या डाकूंना देखील असं वाटलं की हा संत आपल्याला खरंच आपलं मानतो आहे. त्यामुळे विनोबांवर विश्वास ठेवून त्यांनी शस्त्र समर्पित केलीत. विनोबांचा हा अहिंसक प्रेमभाव डाकूंना समजला, त्यांनी विश्वास ठेवला. आपल्याला तो समजला नाही.

याच लेखाचा पुढचा पहिला भाग : विनोबा भावेः सुळी दिलेले संत (भाग १)

याच लेखाचा पुढचा तिसरा भाग : विनोबा भावेः सुळी दिलेले संत (भाग ३)

(एमकेसीएलने तयार केलेल्या vinoba.in या वेबसाईटच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणावर आधारित हा लेख साधना साप्ताहिकाच्या सौजन्याने तीन भागांत देत आहोत.)