फ्रेंच सरकारने लुई ब्रेल यांचा मृतदेह कबरीतून बाहेर का काढला?

०४ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


कालच रमाकांत आचरेकर सरांचे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत. महाराष्ट्र सरकार चुकलंच. पण फ्रेंच सरकारने अशीच एक चूक सुधारली होती. त्यांनी अंधांच्या बोटांना डोळे देणाऱ्या लुई ब्रेल यांचा मृतदेह शंभर वर्षांनी कबरीतून बाहेर काढून पुन्हा सरकारी सन्मानात पुरला होता. ब्रेल यांच्याविषयी इतकी कृतज्ञता वाटण्याचं कारण काय? आज ब्रेलदिनी या गोष्टींचा घेतलेला हा वेध.

फ्रान्समध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी वेगळं घडतं होतं. यातून काही घडणार आहे की बिघडणार आहे, हे कुणालाच माहीत नव्हतं. १०० वर्षांपूर्वी पुरलेला मृतदेह सरकारने बाहेर काढला होता. फ्रान्सचे नागरिक त्या निर्जीव देहाला ‘लुई, आम्हाला माफ करा. आम्ही तुमची महती समजू शकलो नाही’, असं म्हणत माफी मागत होते. राजकीय आणि भावनिक सन्मानासह त्यांचा मृतदेह शासकीय इतमामात पुन्हा दफन करण्यात आला.

कोण होते हे लुई?

लुईच्या जन्माचं दुसरं शतक भारतातही साजरं झालं. द्विजन्मशताब्दीनिमित्त भारत सरकारने २००९ मधे दोन रूपयांचं स्टेनलेस स्टिलचं नाणं काढलं. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पोस्टाचं तिकीटही भारतात निघालं. कोण होते हे लुई? २०० वर्षानंतरही जगाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटण्यामागचं रहस्य काय? या सगळ्यांची कारणही खूप खास आहेत.

लुई सायमन रेने ब्रेल हे त्या महामानवाचं पूर्ण नाव. डोळे नसलेल्यांसाठी, दृष्टी नसलेल्यांसाठी एका नव्या आणि सोप्या लिपीचा त्यांनी शोध लावला. केवळ एक किंवा अनेक बोटांच्या साहाय्याने जगभरात वाचल्या जाणाऱ्या ‘ब्रेल लिपी’चे संशोधक दुसरे कुणी नाही तर लुई ब्रेल होते. त्यांनी आपल्या प्रचंड प्रतिभेने बोटांना डोळे दिले. आज जगभरातल्या अंध व्यक्तींना ब्रेल लिपीने वाचण्याची आणि लिहीण्याची सोय, संधी मिळवून दिलीय. ही लिपी तयार करणाऱ्या ब्रेल यांची कहाणीदेखील तेवढीच चित्तथरारक आहे.

डोळ्यांची चित्तथरारक कहाणी

पॅरिस हे फ्रान्सच्या राजधानीचं शहर. इथून काही मैलांवर असलेल्या छोट्याशा गावात लुईचा जन्म झाला. ४ जानेवारी १८०९ ला वडील सायमन रेने ब्रेल आणि आई मोनिक्यु बॅरन यांच्या पोटी जन्मलेल्या लेकराने एक इतिहास घडवला. दोनशेहून अधिक वर्ष झालीत तरी जग त्यांना विसरलं नाही. आणि विसरावं म्हटलं तरी ते शक्य नाही. पण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास काही साधासरळ नव्हता.

चार भावंडात सर्वांत लहान असलेला चिमुकला ब्रेल सर्वांचा लाडका होता. वडिलांचा घोड्याचे खोगीर, लगाम यासारख्या वस्तू बनवण्याचा धंदा होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे घर, दुकान आणि वर्कशॉप काही वेगवेगळं नव्हतं. त्याकाळात तशी पद्धतही नसावी. फ्रान्सच्या शाही घराण्यांपासून अनेकांची कामं सायमनकडे असायची. ब्रेल तीन वर्षांचे असताना १८१२ मधे त्यांचा अपघात झाला. 

त्याचं झालं असं, की एकादिवशी लुई खेळत खेळत आपल्या वडिलांच्या कामाच्या ठिकाणी आले. दुकानात अनेक लोखंडी अवजारं तिथं पडलेली होती. लुई यांनी एक तीक्ष्ण अवजार हातात घेतलं. खेळता खेळता ते त्यांच्या एका डोळ्यात गेलं. त्यांचा डोळा रक्तबंबाळ झाला. जडीबुटी वगैरे औषधपाणी आणि मलमपट्टी झाली. त्यानंतर लुईंना डॉक्टरकडे नेण्यात आलं. तिथे औषधोपचार झाले. दुखापत झालेल्या डोळ्याची जखमही भरून निघाली.

अपघाताने बदललं लाखोंचं आयुष्य

मात्र पुढे जे घडलं ते अत्यंत भयंकर होतं. कारण एका डोळ्याची दृष्टी तेव्हाच गेली होती. हळूहळू त्या डोळ्याचं इन्फेक्शन दुसऱ्या डोळ्याला झालं. बघता बघता दुसरा डोळाही अधु झाला. दृष्टी गेली. रंगीत स्वप्नांची दुनिया बघायला ज्याने नुकतीच सुरवात केली, त्या लुईसमोर आता जन्मभराचा अंधार शिल्लक उरला.
                                                                                                                                                                                                                                                                               
लुई लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा म्हणून ओळखला जायचा. ते आपल्या क्षमतांचा आणि प्रतिभेचा वापर करत. जेवढी शक्य होती तेवढी कामं ते स्वतः कुणाच्याही मदतीशिवाय करायचे. आई वडील आणि भावंडांनीही त्यांना खूप जीव लावला. त्यांच्यावरची माया कधीच कमी होऊ दिली नाही. चिमुकला लुई  संगीतामधे रमू लागला. सोबतीला निसर्गाचीही साथ असायची. ते पियानोसह अनेक वाद्य वाजवायला लागले. संगीतातील अनेक बारकावे समजून घेत बऱ्यापैकी संगीतकारही झाले.

याच काळात ते फादर अॅबे जॅक पॅलुई यांच्या संपर्कात आले. फादरला छोट्याशा लुईची प्रतिभा पाहून कौतुक वाटायचं. ते त्यांच्यापरीने जेवढं काही ज्ञान लुईला देत येईल तेवढं ते देत राहिले. संगीत, निसर्गासोबतच दुसऱ्या विषयांवरही दोघांत चर्चा रंगायची. त्यांच्या मदतीने गावातल्या सामान्य शाळेत त्यांनी अॅडमिशन घेतलं. पुढे १८१९ मध्ये लुईला शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली.

जादूगार हात

पॅरिसच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड चिल्ड्रन’ या संस्थेत त्यांचं शिक्षण सुरू झालं. त्यांच्या हातात जादू होती. त्यांनी हस्तकलेत अनेक पारितोषिकं आपल्या शालेय जीवनात मिळवलीत. याच संस्थेत १८२६ मध्ये लुई यांनी शिक्षक म्हणूनही काम केलं.

वॅलेंटाईन हॉय यांनी १७८४ मधे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड चिल्ड्रन’ची सुरवात केली. त्यांनी दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विशेष लिपी तयार केली होती. मात्र त्या लिपीला अनेक मर्यादा होत्या. शिवाय ती समजायला थोडी कठीणही होती. कल्पक बुद्धीच्या लुईला सातत्याने वाटायचं की, दृष्टिबाधितांसाठी सोपी आणि सुटसुटीत लिपी असावी.

लुईची शाळा दृष्टिबाधितांची होती. त्यामुळे शाळेत त्यांच्या विषयांशी आणि विश्वाशी संबंधित कार्यक्रमांचं नियमित आयोजन व्हायचं. एका दिवशी शाळेत फ्रान्सच्या सैन्यातले निवृत्त कॅप्टन चार्ल्स बार्बियर यांचं प्रदर्शन आणि व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. कॅप्टन चार्ल्स यांनी सैनिकांना रात्री वाचता येणारी आणि इतरांना न कळणारी एक गुप्त लिपी तयार केली. त्या लिपीला ‘नाईट रायटिंग’ म्हणत. त्यात कागदावर सुईसारख्या वस्तुने टोचून उभार दिलेल्या १२ बिंदूंचा उपयोग केला जात. त्यांचं सादरीकरण लुई काळजीपूर्वक ऐकत आणि अनुभवत होते.

असा झाला ब्रेल लिपीचा जन्म

या लिपीतही बऱ्याच कमतरता होत्या. अनेक चिन्हं यात नव्हती. लुई यांना एक ‘कम्प्लिट’ आणि सोपी लिपी तयार करायची इच्छा होती. त्याने प्रयोग सुरू केले. कॅप्टन चार्ल्सच्या १२ बिंदूंऐवजी लुईने ६ बिंदूंचा वापर केला. अंक, विरामचिन्हंही ब्रेलच्या लिपीत आणली. एवढंच नाही तर संगीतातले नोटेशन्सही ब्रेल यांनी त्यांच्या लिपींतून दाखवण्याचा चमत्कार केला.

लुईच्या वयाच्या १५ व्या वर्षीच १८२४ ला ब्रेल लिपी जन्माला आली. १८२९ मधे लुई यांनी यावर एक पुस्तकही लिहिलं. मात्र त्याही नंतर सलग ८ वर्ष म्हणजे १८३७ पर्यंत लुई आपल्या लिपीवर प्रयोग आणि संशोधन करतच राहिले. १८३७ मधे त्यांनी इतिहासावर तीन खंडांचा ग्रंथ साकारला. आणि जगाला ब्रेल लिपीची देणगी दिली.

कायम लक्षात राहील असं काम

ब्रेल यांनी दृष्टिबाधितांसाठी एक दिव्य लिपी दिली. करोडो लोकांच्या आयुष्यात त्यांनी ज्ञानाचा उजेड आणला. यासाठी दिवसरात्र प्रयोग केले. संशोधन केलं. प्रचंड मेहनत घेतली. अशातच त्यांना टीबी झाला. हळूहळू त्यांचं शरीर खचायला लागलं. यातच ६ जानेवारी १८५२ ला त्यांचं निधन झालं.

ब्रेल यांचं निधन होऊन आता दीडशेहून अधिक वर्ष झालेत. पण ब्रेल लिपीमुळे ते अमर झालेत. डोळे नसलेल्यांना, त्यांनी नवी दृष्टी दिली. त्यांच्याच प्रयत्नांतून बोटांचे डोळे झाले. बोटं निव्वळ लिहिती नाही तर जग वाचायला शिकवती झालीत. त्यांचा ४ जानेवारी हा जन्मदिवस जगभरात ब्रेलदिन म्हणून साजरा केला जातो. 

ब्रेल यांनी दृष्टिबाधितांसाठी तयार केलेली लिपी, त्यांच्याच नावाने ‘ब्रेल लिपी’ म्हणून ओळखली जाते. मानवतेची गोष्ट ही काही कोणत्या देशाच्या सीमेपुरती मर्यादित नसते. ती विश्वात्मकच असते. मानवतेच्या क्षेत्रातल्या ब्रेल यांच्या कार्यामुळे ते आज विश्ववंद्य ठरलेत. जगभरातल्या दृष्टिबाधितांसाठीच नाहीत माणसाचं जगणं सुकर करण्यासाठीच्या त्यांच्या कार्याला, त्यांना मानाचा मुजरा.

हेही वाचाः 

विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?

दीडशे वर्षांनंतरही मराठी कवितेत गालिब जिवंत

कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता

‘अरुणा ढेरेंचं मराठी साहित्यातलं योगदान मानदंडासारखं’