भज्यांची साथ असेल तर नरक आणि स्वर्गातल्या अप्सरांची काय चिंता

१२ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. ज्यांच्या सुटत नसेल वो इस दुनियाकेही नहीं. त्यातही पावसाळा म्हणजे तमाम भजीप्रेमींसाठी सोने पे सुहागा. मस्त एखादं हवेशीर ठिकाण शोधायचं आणि चहाचा झुरका घेत भज्यांवर ताव मारायचा. तोही भरपेट. अशाच आपल्या भजीप्रेमींसाठी कोलाजचा हा गरमागरम ‘भजी’ विशेष लेख.

पातळ उभा चिरलेला कांदा चण्याच्या पिठात कालवून तेलात तळायची पाककृती ज्या कोणी शोधून काढली, ती व्यक्ती भन्नाटच म्हणावी लागेल. त्या व्यक्तीच्या ऋणात तमाम मानवजात सदैव राहील. अख्ख्या मानवजातीवर त्या पामराचे अनंत उपकार आहेत.

भजीचा शोध कोणी लावला माहिती नाही पण डिप फ्राईंग हे जेवणातलं तंत्र मात्र १७ व्या शतकापासून युरोपात वापरलं जातंय. आणि त्यानंतरच १८ व्या शतकात आपलं आवडतं फ्रेंच फ्राईज पहिल्यांदा बनवलं गेलं. हे तंत्र पुढे मिडल ईस्टमधल्या देशांमधे पोहोचलं आणि तिथून आपल्या भारतात आलं. पण भजी, भजियां, पकोडे, बोंडा हे आपले भारतीय प्रकार आहेत. तंत्र दुसऱ्यांच असलं तरी पद्धत, मसाले हे सगळं आपलंच आहे. आणि आपल्या पद्धतीच्या भज्या मॅक्सिको, युके, पाकिस्तान, बांगलादेश, ब्राझीलमधेही  या आपल्या सगळ्यात आवडत्या भजीचे आपल्यावर असलेले  उपकार अनंत पावसाळे फिटणार नाहीत.

सध्या पाऊस सुरु झालाय. मनाला उल्हासित करणारी धुंद पावसाळी हवा. यातच गरमागरम उकळत्या तेलात तळली जाणारी कांदा भजी आणि जोडीला एक कटिंग चाय! स्वर्गसुखाची शहरी कल्पना यापुढे जाणंच अशक्य. पण पावसाळ्या पुरतीच भज्यांची आठवण काढणं हा माझ्या मते, भज्यांचा मोठा अपमान आहे. भजी हा एक असा पदार्थ आहे जो ताजा असल्यास रुचकर आणि शिळा असल्यास अधिक स्वादिष्ट लागतो. अर्थातच शिळेपणाची मुख्य मर्यादा म्हणजे ते घरात बनवलेलं आणि आदल्या दिवशीचे असावेत. भजी खाल्ल्यावर त्यावर पाणी न पिता कधी चहा घेऊन पाहिला आहे? अगदी भिक्करातला भिकार चहा सुद्धा अमृततुल्य वाटू लागतो.

भज्यांचे असेही प्रकार

भज्यांचे तसे विविध प्रकार आहेत. कांदा, मिरची, मूग, अंडी, बटाटा, वांगी, घोसाळं, पनीर इत्यादी जे तुम्हाला वाटेल ते घ्यावं आणि चण्याच्या पिठात घोळवून तेलात सोडावं. तळल्यानंतर सगळेच पदार्थ टेस्टी लागतात असं म्हणतात. याला अपवाद एक कारल्याचा. ते सालं साखरेच्या पाकात जरी घोळवलं तरी कडवेपणा काही सोडत नाही.

भज्यांचे असे विविध प्रकार जरी असले तरी त्यातला कांदा भजी हा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार असून त्याची रेसिपीही सोपी आहे. पातळ उभ्या चिरलेल्या कांद्याला मीठ लावून काही मिनिटं ठेवल्यावर त्याला जे पाणी सुटतं, त्याच पाण्यात चण्याचं पीठ किंवा हरभऱ्याच्या डाळीची  भरड टाकून कालवत गरम तेलात एकापाठोपाठ एक असे भजी सोडायचे. आणि काळे ठिक्कर पडायच्या आत कढईतून प्लेटमधे काढायचे. बाकी, अस्सल स्वयंपाक्याला पदार्थ कधी शिजला, भाजला ते वासावरून लगेचच कळतं म्हणा.

कांदा भज्यांचेही दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे, खेकडा भजी. यात कांदा जास्ती असतो तर दुसरे थोडे सौष्ठव बाळगणारे. थोडक्यात सोनम कपूर आणि सोनाक्षी सिन्हा अर्थात, हा प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा भाग झाला. त्याशिवाय कांदा भजी अधिक टेस्टी बनावी याकरता तुम्ही त्यात ओवा किंवा ओव्याची पानं, धणे, बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा मेथीची भाजीही टाकू शकता. मी एकदा अंडी मिक्स केली होती. टेस्ट भारी लागली पण प्रयोग पोटाला काही मानवला नाही.

हेही वाचा: श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय?

भजी आणि बटाटेवड्याची दिलजमाई

भज्यांवर प्रेम करणारे तसे या जगात अनेकजण होऊन गेलेत. केवळ या या ठिकाणी भजी चांगली मिळतात एवढ्या लौकीकावर लोकं गाडीचं तेल जाळण्यापासून ते पायाचे तुकडे पडेपर्यंत चालत जाण्यासाठी तयार असतात.

आम्हां भारतीयांमधे व्यसनं फार. त्यातही चहा कॉफीचं तर अपरंपार. तरीही रणरणत्या उन्हात गरमागरम चहा पिण्याचं साहस एखादा चहाबाजही करणार नाही. पण चहा ऐवजी जर त्याला नुकतीच तेलातून काढलेली भजी द्याल तर तो क्षणाचाही वेळ न दवडता त्यांचा फडशा पाडेल. भजी आणि बटाटावडा. या दोन तळलेल्या पदार्थांना मराठी माणूस कधीही आणि केव्हाही नाही म्हणू शकणार नाही.

भज्यांपुरती आनुवंशिकता वाट्याला

काही गोष्टी आनुवंशिक असतात असं म्हणतात. माझ्या दोन्ही आजोबांना अर्थात आई  वडिलांकडून प्रत्येकी एकाला भजी खाण्याची सवय होती. कांदा भजी आणि सोबत हिरवीगार मिरची. त्यातली भज्यांपुरती आनुवंशिकता व्यसनासारखी माझ्या वाट्याला आली.

तुम्ही कधी व्हेजसाठी नॉनव्हेज बाजूला सारल्याचं वाचलं किंवा ऐकलंय? नाही ना तर माझा स्वानुभव सांगतो, एका संध्याकाळी घरात भजी बनवली. इतकी की, सगळ्यांनी खाऊन देखील दुसऱ्या दिवशी सात आठ उरलीच आणि त्या दिवशी चिकन का मटण आणलेलं. आता दोन्हीही मला प्रिय. पण जेव्हा ताटात नॉनव्हेज वाढून आलं तसं त्यातले सगळे पीस बाजूला काढून रात्रीची शिल्लक राहिलेली भजी रस्श्यासोबत मी खाऊन टाकली.

हेही वाचा: मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?

तर नरकयातना आणि स्वर्गीय अप्सरांची साथ दोन्ही सारखंच

माझं  भज्यांवर खूप प्रेम आहे. चुकून उद्या जर मी मेलो आणि सगळं काही सोपस्कार उरकून मला गुंडाळून तिकडे घेऊन गेलात. आणि शेवटच्या क्षणाला जर तेलात सोडलेल्या भज्यांचा वास आला तर. भज्यांशपथ पुन्हा सरणावरून उठून उभा राहीन आणि भज्यांची एखाद दुसरी प्लेट उडवूनच पुढच्या प्रवासाला जाईन.

माझी एक इच्छा आहे. आयुष्यात अनेक पापं केल्यामुळं स्वर्ग तर मिळणं शक्य नाही. पण नरकातच जायचं असेल तर देवा तिथे एखाद्या मराठी भजीवाल्याला पाठवून दे. भज्यांची जर साथ असेल तर नरकयातना काय आणि स्वर्गीय अप्सरांची साथ काय, दोन्ही सारखंच.

हेही वाचाः 

आयट्यून बंद झालं, आता आपल्याला हे ३ पर्याय मिळणार

१९९२ मधे पाकिस्तानने जे केलं, ते यंदा दक्षिण आफ्रिका करू शकते?

प्रचंड बहुमताने जिंकलेल्या भाजपला हरवता येऊ शकतं, हे सांगणारा निकाल