नागपाड्यातल्या भिंतीवरचा गालिब पाहिलाय का?

१५ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


गालिबप्रेमींसाठी मुंबईत एक चांगला पॉईंट तयार झालाय. नागपाडा जंक्शनला गालिब यांच्यावरच म्युरल तिथे उभारण्यात आलंय. गालिबवरच मुंबईतलं हे पहिलचं म्युरल. १० फुट उंच आणि ४२ फुट लांब असलेली ही कलाकृती गालिबप्रेमींना मोहात पाडणारी आहे. याचं भित्तीचित्राच्या निमित्तानं वैचारिक सौहार्दही दिसून आलं. गालिबच्या १५०व्या स्मृतिदिनानिमित्त त्याची भेट.

नागपाडा भाग तसा अतिशय गजबजलेला. वर्दळीचा. कामाठीपुरा अगदीच हाकेच्या अंतरावर असलेला. आज मात्र एका वेगळ्याचं कारणानं चर्चेत आलाय. किंबहुना मेनस्ट्रीम मीडियाच्या बातमीचा विषय झालाय. सेल्फीप्रेमींचं आकर्षण बनलाय. कारणही अगदी तसंच खासमखास आहे. नागपाड्याला न्यूजच्या केंद्रस्थानी आणलयं ते उर्दू कवी चचा गालिब यांनी. गालिबचं भित्तीचित्र अर्थात म्युरल साकारण्यात आलंय. तेही नागपाड्यात. याला एक विशेष महत्व आहे. कारण गालिबवरचं हे मुंबईतलं पहिलचं म्युरल आहे.

भित्तीचित्रामागची आयडिया

कुठल्याही गालिबप्रेमीला मोहात पाडेल असंच हे म्युरल आहे. आता जायचं कसं हा प्रश्न पडेल. तर मुंबईकरांचा आवडीचा मार्ग आहे. लोकल घ्यायची आणि मुंबई सेंट्रल स्टेशनला उतरायचं. तिथून थेट बेलासीस रोडवरुन पुढे चालत यायचं. अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर नागपाडा जंक्शन लागतं. इथे जवळपास गार्डन कुठंय असं विचारलं की, माणसं रोडच्या पलीकडे बोट दाखवतात. गार्डनचं काम काही झालेलं नाही. मात्र तिथलं गालिबचं म्युरल मात्र आपलं वेलकम करण्यासाठी तयार आहे.

मुंबई महापालिका म्हणजेच नागपाड्याचे स्थानिक नगरसेवक रईस शेख यांच्या विशेष प्रयत्नातून हे भित्तीचित्र उभं झालंय. खरंतर एका मोठ्या कवीला दिलेली ही मानवंदना आहे. गेल्या २८ जानेवारीला या चित्राचं अनावरण करण्यात आलं. सुप्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार जावेद अख्तर आणि कथा, संवाद लेखक जावेद सिद्दीकी यांच्या उपस्थितीत हे भित्तीचित्र आपल्या सगळ्यांसाठी खुलं करण्यात आलं.

गालिबसारखा एक मोठा उर्दू शायर. खरंतर उर्दू शायरीतला बाप माणूस. इथे म्युरलमधेही कलेच्या आधारानेच त्याला चितारलं गेलंय.

हेही वाचाः दीडशे वर्षांनंतरही मराठी कवितेत गालिब जिवंत

मराठी कलाकारांनी साकारलं 

तुषार शिंदे आणि दामोदर आवारे या दोन मराठी कलाकारांनी या भित्तीचित्रातून गालिब उभा केलाय. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मधलं त्यांचं शिक्षण. तीन महिने अथक परिश्रम घेऊन त्यांनी हे भित्तीचित्र उभं केलंय. त्यासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा खर्च आला.

झी चोवीस तासला दिलेल्या प्रतिक्रियेत हे कलावंत म्हणतात, ‘सुरवातीला आम्हाला गालिबविषयी काहीच माहीत नव्हतं. हळूहळू वेगवेगळी पुस्तक वाचली आणि गालिब समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी हे चित्र उभं करता आलं. आपल्याला एका पठडीतला गालिब माहितीय. पण तो काही वेगळाच होता. हे त्याला समजून घेतल्यावर  कळत गेलं.’

‘नक्श-ए-गालिब’चा अनोखा अंदाज

या भित्तीचित्राची ओळख ही नक्श ए गालिब अर्थात गालिबचं चित्र अशीच होणार आहे. मात्र या चित्रात गालिबला दोन भागांमधे उभं करण्यात आलंय. यात दोन प्रसंग आहेत. पहिला मिर्झा गालिब यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामधे त्यांच्या काही रचना आपल्याला याचि देही याची डोळा बघायला मिळतात. 

है और भी दुनिया में सुखनवर बहोत अच्छे
कहते है के गालिब का है अंदाजे बयां और

अशा गालिब यांच्या रचनेचा वापर करत एक वेगळा अंदाज या भित्तीचित्रातून समोर येतो. गालिब दिल्लीत राहायचे. त्यामुळे इथल्या म्युरलमधे लाला किल्ल्याची पार्श्वभूमी दाखवण्यात आलीय. १८५७ च्या उठावात गालिब यांच घर, साहित्य जाळण्यात आलं. त्यामुळे या दोन गोष्टींचा समावेश यात करण्यात आलाय. याला स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमीही आहे.

तरुणाईसाठी नवं सेल्फी पॉईंट

‘इश्क़ ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया वर्ना हम भी आदमी थे काम के’ असं म्हणणाऱ्या या शायरची तरुणाई खुप मोठी फॅन आहे. जगभरात त्याचे चाहते आहेत. या सगळ्यांसाठी हे ठिकाण येत्या काळात नक्कीच औत्सुक्याचं ठरेल हे नक्की. गालिबच्या अनेक शेरोशायऱ्या या आपल्या जगण्याचाच भाग झालेल्या असतात. अशा चाहत्यांसाठी हा सेल्फी पॉईंट ठरेल. बाजूला लागूनचं गार्डन आहे. जे काही दिवसात नव्या दिमाखात उभं राहीलं. त्यामुळे काही दिवसांतच मुंबईच्या पर्यटनातलं हे आणखी एक महत्वाचं केंद्र झालं तर त्याच नवलं वाटू देऊ नका.

नागपाड्याची एक वेगळी ओळख यानिमित्ताने मुंबईला होईल. चचा गालिबांना अधिक समजून घेण्यासाठी हे भित्तीचित्र मोहितही करेलं. नागपाडा आणि आसपासचा परिसर हा नेहमीच वर्दळीचा आहे. त्यामुळे मीडियावाले तिकडे फिरकत नाहीत. निदान गालिबच्या निमित्ताने का होईना मीडियाला तिथे जाता येईल.

हेही वाचाः मोमीनच्या या शेरावर खुद्द गालिबही फिदा

आता आपणही एक व्हायला हवं

गालिब हा तसा रूढ विचार, परंपरांच्या पलीकडचा. त्याने लिखाणातूनही जुनाट, रुढीग्रस्त विचारांना फाट्यावर मारलं. म्युरलचा लोकार्पण कार्यक्रमही यादृष्टीने खूप वेगळा ठरला. कार्यक्रम सरकारी असला तरी त्याला वेगळी किनार आहे. ती म्हणजे वेगवेगळ्या विचारधारा फॉलो करणारे लोक एकत्र येण्याची. कार्यक्रम महापालिकेच्या अख्यत्यारीतला. गालिबच्या भित्तीचित्रासाठी विशेष प्रयत्न केले ते समाजवादी पक्षाचे स्थानिक नगरसेवक रईस शेख यांनी.

भित्तीचित्राच्या अनावरणासाठी बोलावण्यात आलं जावेद अख्तर आणि जावेद सिद्दीकींना. सोबत शिवसेना, एमआयएम या पक्षांचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी. असं एक वेगळ कॉम्बिनेशन गालिबच्या निमित्ताने बघायला मिळालं. जे एरवी तसं अशक्यचं. वेगवेगळ्या विचारधारांना एकत्र आणण्याचं काम गालिबनं आणि त्याच्या या भित्तीचित्राने केलंय. आता आपणही तिकडे जायला आणि गालिबला फॉलो करायला हवं.

हेही वाचाः 

मिर्झा गालिबना समजून घेताना

विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?

फैज अहमद फैजः जगणं समृद्ध करणारा शायर

`मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`

सफदर हाश्मीः नाटक थांबवत नाही म्हणून त्याचा भररस्त्यात खून केला