१० कारणं : काँग्रेसने मिजोरामचा गड का गमावला?  

१२ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


बाकीच्या राज्यांत काँग्रेसला अच्छे दिन आले तरी मिझोराममधे काँग्रेसची असलेली सत्ता हातातून जाईल, असे अंदाज एक्झिट पोलनी वर्तवले होते. पण काँग्रेसचं इतकं पानिपत होईल, असं स्थानिक पत्रकारांसह कुणालाही वाटलं नव्हतं. आता मिझो नॅशनल फ्रंटचे झोरामथंगा मुख्यमंत्री बनू शकतील. 

आज पाच राज्यांचे निकाल आले. त्यात सत्ताधारी भाजप राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ या तिन्ही राज्यांतून पराभूत झालीय. या राजकीय भूकंपामुळे मिझोरामच्या निकालांकडे कुणाचं फारसं लक्ष जाण्याची शक्यता कमीच. पण तिथेही राजकीय भूकंप झालाय. पण तो अनपेक्षित नाही. गेली दहा वर्षं तिथे असलेली सत्ता काँग्रेसच्या हातातून गेलीय. 

१.    काँग्रेसचा शेवटचा गड 

ईशान्येतल्या राज्यांना सेवन सिस्टर म्हणत असलो तरी तिथे सिक्कीम धरून आठ राज्यं आहेत. त्या सगळ्याच्या सगळ्या राज्यांत आताआतापर्यंत काँग्रेसचं किंवा काँग्रेसचा पाठिंबा असलेल्या पक्षाचं सरकार होतं. पण आता तिथला काँग्रेसचा शेवटचा गड मिझोरामही गेलाय. आता ईशान्येत काँग्रेसचं राज्य असलेलं एकही राज्य उरलेलं नाही. केंद्रातली सत्ता गेल्यानंतर एकाही राज्यात आता काँग्रेसचा मुख्यमंत्री उरला नाही. असं अनेक वर्षांनंतर घडतंय.

२.    लालथनहवलांचं संस्थान खालसा 

लालथनहवला १९८४ ला पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. तेव्हापासून काही ब्रेक घेत घेत पाच वेळा मुख्यमंत्री बनलेत. पाचच वर्षांपूर्वी तर त्यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. तेव्हा आता विजय मिळवलेल्या मिझो नॅशनल फ्रंटची अवस्था आताच्या काँग्रेसपेक्षाही बिकट होती. मिझोराममधली जवळपास सगळी महत्त्वाची पदं त्यांनी भूषवलीत. दोन वर्तमानपत्रांचे संपादक असलेले लाथनहवला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे काही काळ अध्यक्षही होते. 

लालथनहवला हे दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवत होते. दोन्ही ठिकाणी ते पराभूत झालेत. चंपाई दक्षिणमधे त्यांना एमएनएफच्या उमेदवाराने पाडलंय तर सरछिप या त्यांना सात वेळा विजयी करणाऱ्या मतदारसंघात माजी अधिकारी लालडुहोमा यांनी हरवलंय. निवडणुकांच्या काही महिने आधी काँग्रेसच्या पाच महत्त्वाच्या नेत्यांनी पक्ष सोडला होता. तेव्हाच या पराभवाची लक्षणं दिसू लागली होती. 

३.    तरुणांपासून तुटलेली काँग्रेस

सलग दहा वर्षं सत्तेत असल्यामुळे अँटीइन्कम्बन्सीचा फटका लालथनहवला यांना बसलाच. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ मिझोराममधे कुणाचंच सरकार आजवर टिकलेलं नाही. या सरकारवर भ्रष्टाचाराचे आणि क्षमता नसल्याचे आरोप झाले. तरुणांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यात काँग्रेसचं सरकार अपयशी ठरलं. त्याला पर्याय म्हणून मिझो नॅशनल फ्रंटने विकासाची योजना तरुणांसमोर मांडली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. शिवाय या सगळ्याला मिझो अस्मितेची फोडणी त्यांनी दिली होती. तोच या पक्षाचा प्रचाराचा मुख्य अजेंडा होता. ८० टक्क्यांहून जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने काँग्रेसच्या विरोधातला असंतोष निकालात दिसेल, असा अंदाज व्यक्त केला गेला. तो खरा ठरला.

४.    मिझो नॅशनल फ्रंटचा दणका 

मिझोराममधे काँग्रेसचा प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप नाहीच. तिथे मिझो नॅशनल फ्रंट म्हणजे एमएनएफच स्पर्धेत आहे. १९८७ मधे मिझोराम हे राज्य बनल्यापासून हेच दोन पक्ष एकमेकांशी लढत आहेत. मागच्या दोन निवडणुकांत दणक्यात पराभव पचवून एमएनएफ पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी सज्ज झालाय. त्याआधी मात्र सलग दोनदा काँग्रेसला आतासारखंच हरवून एमएनएफ विजयी झाली होती. आता कोणत्याही एक्झिट पोलने एमएनएफला वीसपेक्षा जास्त जागा दिल्या नव्हत्या. मात्र एमएनएफने ४० पैकी २६ जागा जिंकत पूर्ण बहुमत मिळवलंय. तिथे काँग्रेसच्या वाट्याला फक्त ५ जागा आल्यात. 

५.    मुख्यमंत्रीपदाचे दावेदार झोरामथंगा 

झोरामथंगा हे १९९८ ते २००८ असे दहा वर्षं दोन टर्म मिझोरामचे मुख्यमंत्री होते. मिझोंच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे नेते लालडेंगा यांचे ते उत्तराधिकारी आहेत. भूमिगत राहून झोरामथंगांनी केलेल्या संघर्षामुळे ते मिझोराममधे आख्यायिकांचा विषय बनलेत. लालडेंगांच्या सरकारात त्यांनी अर्थमंत्री आणि शिक्षणमंत्री अशी पदं भूषवली होती. तेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जातात. ऐझ्वाल पूर्व मतदारसंघातून ते जिंकलेत. विधानसभेतील सध्याचे विरोधी पक्षनेते वनलालझौमा हा एक पर्याय होते. पण ते पराभूत झालेत. पक्षाचे उपाध्यक्ष तॉनलुईया हेदेखील मुख्यमंत्रीपदासाठी पर्याय आहेत. पण मुळात मुख्यमंत्री बनण्याचा निर्णयच झोरामथंगा यांनाच घ्यायचाय.

६.    दोन म्हाताऱ्यांची लढाई

पराभूत मुख्यमंत्री लालथनहवला यांचं वय आता ७६ आहे. त्यामुळे ते यापुढे पुन्हा मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत, असं आपल्याला वाटू शकतं. पण आता मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असणारे मिझो नॅशनल फ्रंटचे अध्यक्ष झोरामथंगा हे लालथनहवला यांच्यापेक्षा ८ वर्षांनी वयस्कर आहेत. साठच्या दशकात राजकारणात आलेले हे दोघेही मिझोरामच्या राजकारणावर घट्ट पकड ठेवून आहेत. निवडणूक कोणताही पक्ष जिंको, या दोन म्हाताऱ्यांपैकी एकजण मुख्यमंत्री बनणार हे नक्की होतंच. 

७.    उंदरांनी घडवलेली राजकारण्यांची पिढी 

मौतम म्हणजे मिझो भाषेत बांबूंचा मृत्यू. ते एका दुष्काळाचं नाव आहे. यात उंदरांची संख्या प्रचंड वाढते. ते बांबूंच्या बिया खातात. त्यामुळे जंगलांमधे बांबूंची संख्या झपाट्याने कमी होते. ३० टक्क्यांपेक्षा जास्त बांबू असलेल्या मिझो टेकड्यांवर त्यामुळे भयंकर दुष्काळ पडतो. १९५८-५९ मधे असाच दुष्काळ होता. त्यात शंभरहून अधिक लोक मेले. २० लाख उंदरांना मारण्यात आलं. तेव्हा मिझोराम आसाम राज्याचा भाग होता. वारंवार विनंती करूनही त्यांनी लक्ष दिलं नाही. 

त्यामुळे असंतोषाचा उद्रेक होऊन स्वतंत्र मिझोरामसाठी हिंसक आंदोलनाला सुरवात झाली. त्यातून लालडेंगांच्या नेतृत्वात अनेक तरुण रस्त्यावर उतरले. त्यात झोरामथंगा तर दुसऱ्या नंबरचे नेते होते. पण काँग्रेसचे मुख्यमंत्री लालथनहवलाही यात आंदोलनातून पुढे आलेत. आजही मिझोरामच्या राजकारणात हीच पिढी अजूनही वर्चस्व गाजवतेय. त्याला आता झोराम पीपल्स मूवमेंटच्या तरुण उमेदवारांनी आव्हान दिलंय. 

८.    मुख्यमंत्र्यांच्या माजी पीएचं आव्हान

मुख्यमंत्रीपदावर असणाऱ्या लालथनहवला यांना त्यांच्या हक्काच्या मतदारसंघातून हरवण्याचा पराक्रम लालडूहोमा यांनी केलाय. लालडूहोमा १९७२ ते ७५ या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्याचे पीए होते. त्यानंतर ते आयपीएस बनले, अशी त्यांची विकीपीडियावरची माहिती सांगते. तर ते माजी आयएएस अधिकारी असल्याचं द मिझोराम पोस्ट हे स्थानिक वर्तमानपत्र सांगतं. सरकारी नोकरी सोडून ते राजकारणात उतरले. काँग्रेसच्या तिकीटावर खासदारही झाले. मध्यंतरी एमएनएफमधेही जाऊन आले.

मागच्या निवडणुकांच्या आधी त्यांनी झोराम नॅशनलिस्ट पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. ते स्वतः आणि एक आमदार निवडून आला. या निवडणुकीत त्यांनी सात स्थानिक पक्षांना एकत्र करून झोराम पीपल्स मूवमेंट अशी आघाडी उभारली. त्यात त्यांच्या पक्षाशिवाय मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स, झोराम एक्सोड्यूस मूवमेंट, झोराम डिसेंट्रलायझेशन फ्रंट, झोराम रिफॉर्मेशन फ्रंट, मिझोराम पीपल्स पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्ष असल्याची माहिती इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीत आहे. 

९.    आव्हानवीरांना काँग्रेसपेक्षा जास्त जागा  

लालडूहोमा यांच्या आघाडीने या पक्षाने जवळपास सगळ्या जागांवर उमेदवार उभे केले होते. मिझोरामच्या विजयी उमेदवारांच्या संख्याबळाच्या याद्यांमधे ८ अपक्ष उमेदवार दाखवत आहेत. हे सगळेच्या सगळे झोराम पीपल्स मूवमेंटचे विजयी उमेदवार आहेत. काँग्रेसच्या परंपरागत मतदारांनी झोराम पीपल्स मूवमेंटला साथ दिल्याचं निकाल सांगत आहेत. शिवाय प्रामुख्याने तरुणांनी या नव्या आघाडीला साथ दिलीय. त्यांचे काँग्रेसपेक्षाही तीन आमदार जास्त निवडून आलेत.

मिझोराम हे ख्रिश्चनबहुल राज्य आहे. चर्च आणि चर्चच्या प्रेरणेने चालणाऱ्या एनजीओ यांचा प्रभाव या राज्यातल्या निवडणुकांवर स्पष्टपणे दिसतो. यंदा चर्चने काँग्रेसला नाकारलेलं दिसतंय. शिवाय एमएनएफबरोबरच झोराम आघाडीच्या उमेदवारांनाही साथ दिल्याचं दिसतंय. 

१०.     भाजपला फक्त एक जागा 

काँग्रेसमधून फुटून आलेले माजी मंत्री बुद्धधन चकमा हे एकमेव भाजपचे एकमेव आमदार निवडून आलेत. बाकी या ख्रिश्चनबहुल राज्यात भाजपला स्थान नाही. त्यांची सारी भिस्त एमएनएफवर होती. कारण हा पक्ष दिल्लीच्या राजकारणात भाजपबरोबर आहे. पण राज्यात मात्र ते भाजपला झिडकारतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकांत भाजपची स्थिती न घरका न घाटका अशी होते. त्यांचे ३८ उमेदवार खूपच वाईट प्रकारे हरलेत. ईशान्येतल्या चार राज्यांत मुख्यमंत्री असणाऱ्या भाजपकडे त्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता.