मोमीनच्या या शेरावर खुद्द गालिबही फिदा

२६ मार्च २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


कवितेतल्या एका एका शब्दात खूप मोठा अर्थ दडलेला असतो. उर्दूतल्या शेरमधे तर आपल्याला अनेक अर्थ सापडतात. १९ व्या शतकातले थोर शायर मोमिन-ख़ाँ-मोमिन यांच्या दोन ओळीच्या एका शेरवर तर गालिबही फिदा झाले होते. त्या शेरचा हा अन्वयार्थ.

मोमिन-ख़ाँ-मोमिन हे १९ व्या शतकाच्या पूर्वार्धातले एक महत्त्वाचे शायर. गालिब आणि जौक यांचे ते समकालीन होते. त्यांनी लिहिलेला एक शेर फार प्रसिद्ध आहे. इतका की गालिबने या एका शेराच्या बदल्यात आपलं सारं काव्य देऊ केलं होतं, अशी आख्यायिका आहे. तो शेर असा,

तुम मेरे पास होते हो गोया
जब कोई दुसरा नही होता।

प्रेमाच्या अनुभूतीचा अलवार स्पर्श झालेल्या या ओळी आहेत. 'नसतानाही खूप असतेस, तुला कधी कळणार नाही', असं कुसुमाग्रजांनी एका कवितेत लिहिलंय. गोया या शब्दाचा फारसी भाषेतला अर्थ आहे 'बोलणारा'. पण हिंदीत त्या अर्थाने हा शब्द क्वचितच वापरला जातो. इथे प्रिय किंवा प्रेमालाप करणारा, करणारी या अर्थाने तो आलाय.

या ओळींचा सरळ अर्थ असा होईल. 'हे प्रिय, तू माझ्या जवळ असतोस/असतेस, जेव्हा दुसरं कोणी असत नाही (तेव्हा).'

व्यंजनेच्या पातळीवर या दोन ओळींचे अनेक अर्थ ध्वनित होऊ लागतात. विशेषतः 'जेव्हा दुसरं कोणी असत नाही तेव्हा', म्हणजे नेमकं कोणत्या वेळी? कोणत्या भावस्थितीत?  असा प्रश्न उपस्थित होतो. जेव्हा दुसरं कोणीही जवळ असत नाही, तेव्हा माणूस खूप एकटा असतो, एकाकी असतो. कदाचित तो अडचणीत असेल, संकटात असेल किंवा दु:खात असेल. त्या वेळी कदाचित कोणीही साथ न दिल्यामुळे तो एकटा असेल. हे एकटेपण काही वेळेला खायला उठते.

पण मोमीन असं म्हणतोय की मी एकटा असेन, पण एकाकी असत नाही. कारण या एकटेपणाच्या काळात तू माझ्याजवळ असतेस. कुसुमाग्रजांच्या शब्दांत 'नसतानाही खूप असतेस'.

हेही वाचाः नागपाड्यातल्या भिंतीवरचा गालिब पाहिलाय का?

एका अर्थाने प्रेमाची ही मिसाल आहे. डॉ. आंबेडकर यांनी एका पत्रात म्हटलंय, 'प्रेम म्हणजे परस्परांचं होऊन राहण्याची कांक्षा'. म्हणजेच कुणी असे म्हणेल की, माझ्या जीवनातून किंवा मनातून तुला वजा केलं, तर मी 'मी' राहणार नाही. प्रेम व्यक्तींना एका अदृश्य पाशात बांधून ठेवतं. प्रेमात असणार्‍या व्यक्तीच्या मनात दुसऱ्याची आठवण पारिजातकाच्या मंद सुगंधासारखी दरवळत असते. त्यामुळेच मोमिन-ख़ाँ-मोमिनच्या या दोन ओळी फार अर्थपूर्ण ठरतात.

इथे जवळ असणं हे शारीर पातळीवरचं नाही, तर ते मानसिक पातळीवरचं आहे. किंवा दुसरं कुणीही जवळ नाही, हे पाहून चोरून भेटण्यातला हा प्रकार नाही, तर दुसरं कुणीही साथ देत नाही, अशा कठीण काळात समंजस साथ सोबत करण्याचा हा प्रयास आहे. प्रत्यक्षात ते देहाने परस्परांपासून दूर असतील, परंतु मनाने खूप जवळ आहेत. म्हणूनच ते हळूवारपणे एकमेकांच्या कानात बोलणारे आहेत.

याचीही आठवण करून द्यायला हवी की, भांडणात लोक मोठ मोठ्याने बोलतात. कारण  भांडणाऱ्या व्यक्तींच्या मनातलं अंतर वाढलेलं असतं. तर प्रेमात हळूवारपणे बोलतात. कारण दोन मनातलं अंतर मिटलेलं असतं. त्यामुळेच हा 'गोया' खूप जवळचा होऊन जातो.

मोमीनच्या या दोन ओळीत थोडा बदल करून हसरत जयपुरी यांनी एक गाणं लिहिलंय. १९६६ मधे आलेल्या 'लव इन टोकियो' या सिनेमातलं ते गाणं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलं. त्याला शंकर-जयकिशन यांनी संगीत दिलं. हे गाणंही खूप गाजलं. ते गाणं होतं,

ओ मेरे शाह-ए-खुबा
ओ मेरी जान-ए-जनाना
तुम मेरे पास होते हो
कोई दुसरा नही होता 

इथे हसरत जयपुरींनी मोमीनच्या शेरमधले दोन शब्द गाळून मोठ्या खुबीने या ओळी गीतामधे वापरल्यात. मोमीनच्या पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द 'गोया' आणि दुसर्‍या ओळीतला पहिला शब्द 'जब' गाळलाय. मात्र हे दोन शब्द गाळल्याने मूळ काव्यातला अर्थ आणि सौंदर्यानुभूती नंतरच्या ओळींमधे जशीच्या तशी येऊ शकली नाही. उलट या काव्यपंक्तीमधे अर्थाच्या पातळीवर जमीनास्मानचा फरक पडलाय.

हेही वाचाः विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?

प्रियवराला उद्देशून वापरलेला गोया हा शब्द काढल्यामुळे मूळची नजाकत, आत्मीयता हरवलीय. इतकंच नाही तर गाण्यातल्या ओळींचा अर्थ पूर्णतः बदललाय. तो संकुचित झालाय. 'फक्त तूच माझ्या जवळ असतोस/असतेस. दुसरं कोणीही असत नाही,' अशी सफाई दिली जाते. म्हणजे जोडीदाराला मुळात प्रेमाच्या विश्वसनीयतेबद्दल शंका आहे, संशय आहे. त्यामुळे हा शंकानिरसन करणारा खुलासा दिला जातो.

जिथे अंत:करणपूर्वक प्रेम असतं, तिथे संशय, खुलासा, शंकानिरसन यांना अजिबात थारा नसतो. प्रेम हे श्वासांइतकं जीवनदायी आणि निरपेक्ष असायला हवं. कवी मोमीन तो प्रेमभाव नेमक्या शब्दांत पकडतात, तर गीतकार हसरत जयपुरी प्रेम भावनेला संशयाचं, संभ्रमाचं वळण देऊन नवं नाट्य जन्मास घालतात. मोमीन प्रेमाच्या अस्सल अनुभूतीस शब्दरूप देतो. म्हणून त्याचे शब्द मनात रुंजी घालत राहतात. एका अर्थाने हा कवीच 'गोया' होऊन राहतो. आपण पुन्हा पुन्हा गुणगुणतो,

तुम मेरे पास होते हो गोया 
जब कोई दुसरा नही होता।।

हेही वाचाः 

तिची कविता, कवितेतली ती

मिर्झा गालिबना समजून घेताना

दीडशे वर्षांनंतरही मराठी कवितेत गालिब जिवंत

फैज अहमद फैजः जगणं समृद्ध करणारा शायर

विष्णू सुर्या वाघ यांनी केलेल्या मरणापूर्वीच्या काही सूचना

 

(लेखक हे साताऱ्याच्या मायणी इथल्या कला, वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)