पीयूष गोयल यांच्याऐवजी निर्मला सीतारामन अर्थमंत्री बनण्याची गोष्ट

१३ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


मागच्या सत्ता काळात अर्थमंत्री म्हणून अरुण जेटलींची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना वारंवार परदेश वाऱ्याही कराव्या लागल्या. जेटलींच्या अनुपस्थितीत त्यांच्याकडच्या खात्याची धुरा सांभाळली ती पीयूष गोयलांनी. यावेळेस पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा होती. मात्र ही चर्चा फोल ठरली. त्यांच्याजागी अचानक निर्मला सीतारामन यांचा नंबर लागला.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सलग दुसऱ्या वेळेस केंद्रात पूर्ण बहुमताचं सरकार आलं. एका गोष्टीची फार चर्चा झाली. ही चर्चा होती अर्थमंत्रीपदावर कोण विराजमान होणार याची. मागच्या सरकारच्या काळात मोदींनी नोटाबंदी सारखे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. बराच गदारोळही झाला. विरोधकांनी सरकारला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अशावेळी जेटलींनी अर्थमंत्री म्हणून सरकारच्या वतीने जोरदार बॅटिंग केली.

मात्र मंत्रिमंडळाच्या रचनेच्या आधीच जेटलींकडून एक पत्र जाहीर झालं. यात त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना आग्रह केला की तब्येतीच्या कारणांमुळे त्यांना नव्या सरकारमधे येणं शक्य नाही. त्यांनीच नकार दिल्यानं त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू झाला.

सुरवातीला पीयूष गोयलांचं नाव जोरदार चर्चेत

या सगळ्या घटनाक्रमानंतर अरुण जेटली नव्या सरकारमधे नसतील हे स्पष्ट होतं. त्यानंतर नवीन अर्थमंत्री कोण असेल या भोवती चर्चेचं गुऱ्हाळ फिरत राहिलं. पुढचे अर्थमंत्री पीयूष गोयलच यावर जवळपास सगळ्यांनीच शिक्कामोर्तब केलं होतं. कारणंही अगदी स्पष्टच होती. २०१९-२० या आर्थिक वर्षाचं हंगामी बजेट त्यांनी सादर केलं होतं. इतकंच नव्हे तर जेव्हा जेव्हा जेटली हे तब्येतीच्या कारणामुळे उपचाराकरता परदेशात गेले तेव्हा त्यांच्या खात्याचा पदभार मोदींनी गोयल यांच्याकडेच दिला.

या सगळ्या गोष्टींमुळे हे जवळपास पक्कं मानलं जात होतं की अरुण जेटलींच्या जागी आता पीयूष गोयल येतील. त्यांची दावेदारी पक्की असण्याच एक महत्त्वाचं कारणही होतं. पंतप्रधानांनंतर जे चार सगळ्यात स्ट्राँग मंत्री मानले जातात. गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि संरक्षणमंत्री या मंत्र्यांचा यात समावेश होतो. नरेंद्र मोदींच्या नव्या सरकारमधे परराष्ट्र आणि अर्थ ही दोन्ही खाती रिकामी झालेली होती. सुषमा स्वराज यांनी आधीच कोणत्याही जबाबदारीपासून लांब राहण्याची घोषणा केलेली होती.

हेही वाचा: निर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, खरंच?

अंदाज ठरले हवेतले बाण

चार खात्यांपैकी दोघांसाठी अमित शाह यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे पीयूष गोयल यांना यापैकी राहीलेलं एक खातं हमखास मिळेल अशीही शक्यता होती. शपथविधीच्या एक दिवस आधी पर्यंत भाजपातली काही मंडळी आपापले अंदाज बांधत होती. अंदाज हाही बांधला जात होता की मागच्या सरकारच्या काळात आधी रेल्वे आणि नंतर व्यापार, उद्योग मंत्रालयाचा कारभार सांभाळलेल्या सुरेश प्रभूंना अर्थमंत्री करण्यात येईल. हे अंदाज मात्र हवेतलेच बाण ठरले.

सूत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदीची निर्मला सीतारामन यांना परराष्ट्र खात्याचा भार देण्याची योजना होती. आताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना या मंत्रालयाचं राज्यमंत्री केलं जाणार होतं. जयशंकर यासाठी तयार नव्हते. अरुण जेटलींनीही नकार दिलेला होता. त्यामुळे पीयूष गोयल यांचा अर्थमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा होता. यात एक अडचण होती. जयशंकर यांना परराष्ट्र खातं देण्यात आलं तर निर्मला सीतारामन यांना कोणतं खात द्यायचं?

असंही म्हटलं जात की राजनाथ सिंह यांना लोकसभेचं अध्यक्षपद देण्याचं आधी ठरलं होतं. पण तो प्लान यशस्वी ठरला नाही. त्यांनी स्वत:च हे पद घ्यायला नकार दिला. त्यानंतर त्यांच्याकडे संरक्षण आणि अमित शहांकडे गृह खातं देण्याचं निश्चित झालं.

हेही वाचा: नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाची पाच वैशिष्ट्यं

इथे अरुण जेटली ठरले सरस

याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधीच्य़ा एक दिवस आधी अरुण जेटलींना भेटायला त्यांच्या घरी गेले. आणि जेटलींना मंत्रिमंडळात येण्याचा आग्रह केला. त्यांचा शपथविधी स्वतंत्रपणे राष्ट्रपती भवनात करण्याचही ठरलं होतं, असं म्हटलं जातंय. या आधी जेव्हा अरूण जेटली उपचारासाठी अमेरिकेत होते तेव्हा पीयूष गोयल यांनाच त्यांचा प्रभार सोपवण्यात आला. अरूण जेटली मंत्रीपदी कायम होते. आताही काहीशी तशीच योजना होती. जेटली मंत्री म्हणून राहतील पण प्रभारी म्हणून तात्पुरत्या स्वरुपात दुसऱ्याला नेमायचं. मात्र स्वत: जेटली यासाठी तयार नव्हते.

भाजपमधल्या सूत्रांनुसार अरुण जेटली तयार होत नाहीत, हे कळताच पंतप्रधानांनी त्यांच्याकडून नव्या अर्थमंत्र्याच्या नेमणुकीसाठी सल्ला घेतला. यात जेटलींनी पीयूष गोयल यांच नाव न घेता थेट निर्मला सीतारामन यांच्या नावाची शिफारस केली. जेटलींनी सांगितलं म्हणे, उद्योग आणि व्यापार खात्याची जबाबदारी सांभाळल्यामुळे या क्षेत्राचा त्यांच्याकडे अनुभवही आहे. त्यामुळे या पदासाठी अधिक योग्य आहेत.

भाजपवाले दावा करतायत, जेटलींच्या या सल्ल्याला टाळणं पंतप्रधानांसाठी सोपं नव्हतं. यानंतर त्यांनी पीयूष गोयल यांच्याऐवजी निर्मला सीतारामन यांना नव्या अर्थमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला. तर पीयूष गोयल यांना नव्या सरकारमधे रेल्वे खात्यासोबतच व्य़ापार आणि उद्योग खात्याचा कारभारही सोपवण्यात आलाय.

हेही वाचा: बजेटविषयी या बेसिक गोष्टी समजून घ्यायलाच हव्यात

(लेखक दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहे. सत्याग्रह या वेबपोर्टलवर आलेल्या या लेखाचा अनुवाद अक्षय शारदा शरद यांनी केलाय. आभार satyagrah.scroll.in)