एक अनुवाद नवराबायकोच्या `ट्युनिंग`चा

२७ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


अनुवादक फक्त पुस्तकंच एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आणत नाहीत, तर एक संस्कृतीही दुसऱ्याला जोडत असतो. दर्जेदार कन्नड पुस्तकांचा मराठीत अनुवाद करणाऱ्या उमा कुलकर्णींचं आत्मचरित्र दोन संस्कृतींचा गोफ गुंफत जातं. अनुवादानं सहजीवनाचं ट्युनिंग कसं जमलं, हा प्रवासही आलाय.

एखाद्या भाषेची ओळख असणं वेगळं आणि थोड्याशा परिचित असलेल्या भाषेचा जाणीवपूर्वक पाठलाग करून ती भाषा आपलीशी करणं हे आणखीनच वेगळं. मराठी भाषिकांना उत्तमोत्तम कन्नड साहित्यकृतींची ओळख घडवणाऱ्या उमा कुलकर्णी यांनी हा समृद्ध प्रवास अनुभवलाय. हा सगळा प्रवास ‘संवादु अनुवादु’ या आत्मकथनातून वाचकांसमोर आलाय.

उमा कुलकर्णी यांचा जन्म बेळगावचा. घरात मराठी वातावरण. विरुपाक्ष कुलकर्णी यांच्याशी लग्न झालं आणि कन्नड या भाषेशी परिचय वाढला. उमा कुलकर्णी यांना कन्नड समजायचं. या भाषेतले विनोदही समजायचे. पण कन्नड बोलता यायचं नाही. त्यामुळं त्यांच्या घरात ‘सीमावाद’ रेंगाळत होता. त्या वादाच्या पलीकडे जाण्याचं वर्णन या पुस्तकात येतं. ‘घरात कन्नड बोललो नाही, तर आपल्याला अनायसा येणारी एक भाषा आपसूक मरून जाईल.’ असं म्हणत विरुपाक्ष यांनी त्यांना कन्नड शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. लग्नानंतर सुमारे दीड वर्षांनी कर्नाटक-महाराष्ट्राचा भाषिक सीमा प्रश्‍न त्यांच्या घरात सुटल्याचं त्या सांगतात.

पहिल्या अनुवादाची गोष्ट

डॉ. शिवराम कारंत यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आणि उमा कुलकर्णी यांना त्यांच्या साहित्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्यांचं साहित्य अधिक समजावं म्हणून त्यांनी त्याचं मराठीकरण केलं. त्यातून त्यांच्या अनुवादाचा प्रवास सुरू झाला. कारंत यांचं अनुवाद केलेलं ‘तनामनाच्या भोवर्‍यात’ हे पुस्तक प्रकाशित झालं. पुढं त्यांनी कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’, ‘मंद्र’, ‘जा ओलांडुनी’, ‘काठ’, ‘परिशोध’, ‘तंतू’ अशा पुस्तकांचा अनुवाद केला. गिरीश कर्नाड यांचे ‘नागमंडल’, ‘तेलदण्ड’ या पुस्तकांचाही अनुवाद केला.

उमा कुलकर्णी यांचा अनुवादक म्हणून हा सगळाच प्रवास आपल्याला जाणकार मराठी वाचकांना परिचित आहे. पण अनुवादक म्हणून त्या घडत असतानाची प्रक्रिया नेमकी काय होती? त्यांच्या आयुष्यात कोणत्या जिवाभावाच्या व्यक्ती आल्या? कोणत्या सुहृदांनी त्यांचा जीवनपट समृद्ध केला? पुस्तकांच्या या जगानं त्यांचं आयुष्य कसं बहरून गेलं? या आणि अशा असंख्य गोष्टी ‘संवादु अनुवादु’ मध्ये वाचायला मिळतात.

अनुवादकाची जडणघडण कशी होते, तो हळूहळू त्याच्यातल्याच उणिवा दूर करत पुढं एकेक पाऊल कसा टाकतो, याचे असंख्य संदर्भ या पुस्तकात वाचायला मिळतात. ‘वंशवृक्ष’चा त्यांनी केलेला अनुवाद शका मेहतांकडे तपासायला गेला. त्यात शुद्धलेखनाच्या खूप चुका होत्या. त्या चुका पुन्हा होऊ नये म्हणून त्यांनी एकेक शब्द दोन दोन पानं लिहायला सांगितला. ही त्यांची सूचना उमा कुलकर्णी यांनीही पाळली.

माणसांचं वैभव पुस्तकात

माणूस त्याला भेटणाऱ्या माणसांनी समृद्ध होत असतो. किंबहुना तेच त्याचं वैभव असतं. उमा कुलकर्णी यांना लाभलेलं हे माणसांचं वैभव त्यांनी पुस्तकात नेमकं टिपलंय. शिवराम कारंत, एस. एल. भैरप्पा, पु. ल. देशपांडे, सुधा मूर्ती, अनिल अवचट, डॉ. द. दि. पुंडे, सुधाकर देशपांडे, कृ. शि. हेगडे, अमोल पालेकर, स्मिता तळवलकर अशी कितीतरी माणसं आपल्याला या पुस्तकातून भेटतात. लेखिकेनं त्यांच्या आयुष्यात आलेल्या या माणसांशी संबंधित घटना प्रसंग उभे करताना त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्वही अप्रत्यक्ष रेखाटलं आहे.

अनुवाद सुरू असताना समांतरपणे उमा कुलकर्णी यांचं वाचन, अभ्यास आणि संशोधन सुरू होतं. त्याचेही तपशील पुस्तकात वाचायला मिळतात. एम.ए. पूर्ण झाल्यावर ‘भारतीय मंदिर शिल्पशास्त्रातील द्रविड शैलीची उत्क्रांती, विकास आणि तिची कलात्मक वैशिष्ट्ये’ या विषयात त्यांनी पीएचडी करायचं ठरवलं होतं. त्यासाठी केलेला प्रवास, पाहिलेली भक्तमंडळी, त्यांची आर्थिक स्थिती हे सगळं टिपण्याचं काम त्यांचं संवेदनशील मन करत होतं. जगण्याच्या अनुषंगानं आयुष्यात येणारे देव, धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा हे विषय सुद्धा या पुस्तकात आले आहेत. त्यावर त्यांची मतं, प्रतिक्रिया यांचाही थोडाबहुत उल्लेख पुस्तकातून वाचायला मिळतो.

काही छापून आल्यानंतर लेखकाला होणारा आनंद या पुस्तकात जागोजागी डोकावतो. आपलं लिखाण कसं छापून आलंय आणि त्यावर लोक काय म्हणतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता असतेच. `महाराष्ट्र टाइम्स`च्या रविवार पुरवणीत पहिल्यांदाच उमा कुलकर्णी यांचा लेख फोटोसह छापून आला. तेव्हा साहजिकच त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यामुळे आपल्याला लोक ओळखायला लागले अशा भावनेसह त्या सकाळी फिरायला गेल्या. हा प्रसंग अगदी थोडक्या शब्दात लेखिकेनं लिहिला आहे. सुरवातीला प्रकाशित होणारं लिखाण आणि त्यासंदर्भातले काही प्रसंग वाचल्यावर लेखक घडताना त्याच्यातली निरासगता कशी जागी असते, लेखकाची स्वतःबद्दल स्वतःशी नेमकी काय प्रतिक्रिया असते, हेही उमा कुलकर्णींच्या मनोगतातून व्यक्त झालं आहे.

लेखकाच्या आयुष्यात शहराचं स्थान

लेखिकेच्या आयुष्यात पुण्याचं महत्त्वाचं स्थान आहे. लग्नानंतर काही काळानेच पती विरुपाक्ष यांच्यासह उमा कुलकर्णी पुण्यात स्थायिक झाल्या. एखाद्या शहराचं एखाद्या लेखकाच्या आयुष्यात असलेलं स्थानही उमा कुलकर्णी यांनी लिहिता लिहिता अधोरेखित केलं आहे.

उमा कुलकर्णी यांनी टीव्ही मालिकांचं लिखाणही केलं आहे. त्याचे अनुभव तर आवर्जून वाचण्यासारखे आहेत. लोकेशनची, पात्रांची निवड, प्रत्यक्ष शूटिंग करत असताना त्यात वारंवार केले जाणारे बदल, वाचकांच्या उलट सुलट प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टी पुस्तकात वाचायला मिळतात. 

अनुवादक उमा कुलकर्णी आपल्याला माहीत असतात. त्याच सोबत चित्रकार उमा कुलकर्णीही आपल्याला या पुस्तकातून माहीत होतात. प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांनी त्यांच्या चित्रांबाबत व्यक्त केलेला अभिप्रायही या पुस्तकात वाचायला मिळतो. ‘स्वतःच्या चित्रांबद्दल आपणच आदर आणि आस्था दाखवायची नाही तर कसं?’, ‘आपण आपल्या चित्राकडे प्रेक्षक म्हणून पाहिलं पाहिजे’, अशी त्यांची वाक्य वाचून वाचक म्हणून आपणही समृद्ध होतो.

अनुवादानं सहजीवनात गोडवा

‘अनुवाद ही स्वतंत्र कलाकृतीच असते.’ हे वाक्य आपण वारंवार ऐकलेलं असतं. पण ही ‘स्वतंत्र कलाकृती’ घडण्यासाठी अनुवादकाला जी धडपड करावी लागते, ती अगदी तटस्थपणे उमा कुलकर्णी आपल्यासमोर ठेवतात. स्वतःच स्वतःशी गप्पा माराव्यात आणि आपल्या त्या कानावर पडाव्यात, इतक्या सहज शैलीत हे पुस्तक लिहीलं गेलंय. एका अनुवादकाच्या मनातला संवाद जाणून घेण्यासाठी हे आत्मकथन आवर्जून वाचायला हवं.

या वाचनासाठी आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. या पुस्तकातला प्रवास फक्त एका व्यक्तीचा नाही तर सहजीवनाचाही आहे. विरुपाक्ष आणि उमा कुलकर्णी या नवराबायकोचं नातं एकमेकांना पूरक असल्याचे कितीतरी संदर्भ पुस्तकात आहेत. ‘साहित्य आणि अनुवाद मला आमच्या सहजीवनातही बरंच काही देत राहिला आहे आणि वैयक्तिक आयुष्यातही. आमचं जीवन आणखी आणखी समृद्ध होत, विस्तारत राहिलं आहे.’ या शेवटच्या वाक्यातून सहजीवनाचं ‘ट्युनिंग’ वाचकांपर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही.

संवादु अनुवादु
लेखिका: उमा कुलकर्णी
पानं ४२६  किंमत ४५० रुपये 
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे