नाथ पै नावाचा झंझावात समजावून सांगणारी पुस्तकं

१७ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


बॅ. नाथ पै ४८ वर्षांचं आयुष्य जगले. ऐन तारुण्यात ते १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात सहभाग झाले. १९५२, ६२ आणि ६७ ला लोकसभेत निवडून आले. त्यांच्या भाषणांनी शब्दशः संसद गाजवलंय. खरंतर नाथ पै हा राजकारणातला झंझावात होता. या झंझावाताची ओळख करून देणारी दोन पुस्तक नव्याने बाजारात आलीत.

नाथ पैंनी आपल्याला वेगळ्या राजकारणाचा आदर्श दिला. त्यांची लोकसभेतली भाषणं गाजायची. ही भाषणं फक्त संसदेतच नाही तर संसदेच्या बाहेरही गाजायची. त्या भाषणांमधे त्यांचा अभ्य़ास असायचा. सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी सुरवातीपासूनच पैंच्या मनात कळवळा होता. त्यांनी भारताच्या राजकारणात आपला एक वेगळा ठसा उमटवला. त्यांनी लोकशाहीला बळकटी देण्याचं काम केलं.

नाथ पै यांच्या आठवणी जागवणारी दोन पुस्तकं नव्याने बाजारात आलीयत. साधना प्रकाशनने प्रकाशित केलेलं ‘लोकशाहीचा कैवारी’ हे त्यांचं चरित्र आणि ‘लोकशाहीची आराधना’ हे त्यांच्या भाषणांचं पुस्तक. पै यांचे जवळचे मित्र आणि सहकारी वासू देशपांडे यांनी लोकशाहीचा कैवारी हे पुस्तकं लिहिलंय. या चरित्रात नाथ पैंच्या आयुष्याचं चित्रण केलंय.

पै मिशनच्या शाळेत रमले

नाथ पैंचा जन्म २५ सप्टेंबर १९२२ला झाला. त्यांचं बालपण कोकणातल्या वेंगुर्ला आणि मालवणमधे गेलं. ते लहान असताना वडलांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या आईने घराचा भार सांभाळला. त्यांचं बालपण घडवण्यात त्यांची आई तापीबाई आणि त्यांचे मोठे भाऊ अंतरराव यांचा वाटा होता. मोठ्या भावाला ते भाई म्हणायचे.

नाथ हे काही त्यांचं खरं नाव नाही. पंढरीनाथ हे खरं नाव. पण त्यांना सगळे प्रेमाने नाथच म्हणायचे. त्यांचं सुरवातीचं शिक्षण वेंगुर्ल्यातच झालं. पुढे ते बेळगावातल्या बेनन स्मिथमधे शिकले. आणि नंतर त्यावेळच्या मुंबईतल्या फेमस मेथॉडीस्ट मिशन शाळा प्रवेश घेतला. ही मिशनची शाळा उदार विचारांची होती.

मिशनच्या वातावरणात पै रमले. संस्कृत आणि इंग्रजीची गोडी लागली. त्यांची स्मरणशक्ती जबरदस्त होती. अवांतर वाचन खूप होतं. इंग्रजीचे कुरियन नावाचे शिक्षक तासाला इंग्रजीतून वाद घडवीत. त्यात नाथ पै यांचा सहभाग असायचा. अभ्यायाबरोबर पै खेळातही अग्रेसर. हॉकी, क्रिकेट हे त्यांचे आवडीचे खेळ. व्यायामशाळा, गणेशोत्सवातही ते पुढे असायचे. मात्र घरात राजकीय स्वातंत्र्याबद्दलच वातावरण त्यांचे मोठे भाऊ भाई पैंमुळे निर्माण झालं.

आणि पैंचा राष्ट्र सेवादलात प्रवेश झाला

पै यांचे भाऊ भाई हे गोपाळराव आगरकरांच्या सुधारक वृत्तपत्रात काम करत. तसंच ते सेवादलातही होतं. याचा प्रभाव पैंवर झाला. आणि १९४२ च्या चले जाव आंदोलनात ते सहभागी झाले. या आंदोलनातच त्यांनी सेवादल कार्याला सुरवात केली. नंतर स्वतः पै सेवादलाच्या कामात सक्रिय झाले.

त्याच काळात बेळगावात स्टुडंट काँग्रेसची स्थापना झाली. सेवादलातली कानडी मराठी मंडळी समाजवादी विचारांची होती. पण तिथे मराठी आणि कानडी लोकांमधे नेतृत्वावरून कुरबुरी होत्या. तरीही शहरात सेवादलाचं काम पुढे खूप वाढलं. बेळगावात ४०-४५ शाखा चालायच्या. आणि तीन-चार हजारोंचे मेळावे घ्यायचे.

हेही वाचा: पंतप्रधानांना देशातल्या तिन्ही सैन्यदलांचा एकच प्रमुख का हवाय?

लोकांची वाढती गर्दी. याचवेळी सेवादलाच्या अभ्यास मंडळावर नाथ पै आले. कार्यकर्त्यांची बौद्धिक तयारी व्हावी म्हणून आठवड्यातून एक दिवस अभ्यास वर्ग चालायचे. नाथ यांनी अनेक कार्यकर्त्यांना तयार केलं.

या अभ्यास वर्गांमुळे बेळगावातला रसरसलेला जिवंतपणा दिसू लागला. १९४५ मधे नाथ पै इंटरची परीक्षा उत्तीर्ण होऊन बीएच्या वर्गात शिकू लागले. त्यावेळी ते आझाद हिंद सेनेच्या कामातही सक्रीय होते. त्यांची भाषणंही गाजू लागली. ते वक्ता म्हणून प्रसिद्धीस येत होते.

पै सलग कोकणात लोकसभेवर निवडून आले

नाथ यांचा पिंड क्रांतिकारकाचा होता. प्रश्न शिक्षकांचा असो, शिक्षणाचा असो, सामाजिक असो की सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात क्रांती व्हावी असं त्यांना वाटायचं. तेव्हा मंडगी बंधू फॉरवर्ड ब्लॉकचं काम बघतं. आझाद हिंद सेना वाढवण्यासाठी त्यांची पैंना मदत झाली.

पुढे पैंनी समाजवादी चळवळीवर भर दिला. १९४६ ला मध्यवर्ती कायदेमंडळ आणि प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणूका जाहीर झाल्या. पैंनी मतदार नोंदणीकडे लक्ष दिलं. जुलै १९४६ला पोस्टमन आणि तार कामगारांचा संप झाला. यात पै समील झाले. संप यशस्वी झाला. आणि पैंनी संघटनेला विधायक वळण दिलं. कार्यकर्त्यांच्या सहाय्याने आजूबाजूच्या खेड्यात जाऊन रस्ते साफ केले.

पै गोव्याच्या मुक्ती संग्रामासाठी संघटनही बळकट करत होते. खेड्यातल्या मोक्याच्या ठिकाणी उभं राहून नाथ लोकांना स्वातंत्र्याच महत्व पटवून देत. त्यांच्या प्रयत्नांतून गोव्याची चळवळ वाढत होती. आणि पुढे १९५१ मधे त्यांनी बेळगाव शहर मतदारसंघातून मुंबई विधानसभा लढवली. नंतर १९५२ आणि नंतर सलग १९६२, १९६७ ला ते कोकणातून लोकसभेवर निवडून आले.

नाथ पै यांच्या भाषणांचं पुस्तक

लोकसभेत नाथ पै यांची भाषणं गाजायची. १९५७, १९६२ आणि १९६७ मधे नाथ हे समाजवादी पक्षाकडून लोकसभेत निवडून आले. त्यांच्या भाषणांच्या वेळी स्वत: जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि विरोधी पक्षातले अनेक लोक आवर्जून उपस्थित असायचे.

लोकशाहीची आराधना हे त्यांच्या भाषणांचा संग्रह असलेलं पुस्तक साधना प्रकाशनाने प्रकाशित केलंय. त्यात त्यांच्या महत्त्वाच्या भाषणांचा समावेश करण्यात आलाय. त्यांची संसदेबाहेरची भाषणही गाजायची. राजकारणासोबतच त्यांनी कला, साहित्य, संस्कृती या विषयांवरही भाषण केलीत. त्यांच्या १५ भाषणांचा समावेश या पुस्तकात आहे.

हेही वाचा: वाजपेयींचे सहकारी दुलत म्हणतात, ३७० हटवल्यामुळे काश्मीरमधे वाढू शकतो दहशतवाद

लोकशाहीवर पै काय म्हणाले?

१९६७ च्या निवडणुकीनंतर लोकसभेचं पहिलं अधिवेशन भरलं. त्यात नाथ पै यांनी घटनादुरुस्ती विधेयकाशिवायही अनेक विधेयक मांडली. तसंच लोकसभेत राज्यपालांच्या नेमणुकी संदर्भातही एक विधेयक मांडलं. राज्यपालांच्या नेमणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता असायला हवी. मान्यता मिळेपर्यंत राज्यपालाने सूत्र हाती घेऊ नयेत. अशी सूचना त्या विधेयकात करण्यात आली.

या विधेयकामुळे संघराज्याचा पाया अधिक भक्कम होईल असं पैंना वाटत होतं. पण हे विधेयक लोकसभेत पास झालं नाही. १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसचं संख्याबळ कमी झालं. नऊ राज्यातली सरकारं हातून गेली होती. मंत्रिमंडळ गडगडणं. पक्षांतर करणं हे नेहमीचंच. यावर पै एकदा म्हणाले,

देशांच्या सीमांना शत्रूकडून धोका असतो, परंतु लोकशाहीला धोका हा अंतर्गत असतो. आपल्या सीमांवर शत्रू वार करू शकतो, पण आमच्या लोकशाहीवर केवळ आम्ही आमच्या चुकांमुळे घाव घालण्याची शक्यता असते. ज्या देशात निष्ठा ही विकत घ्यायची आणि विकायची गोष्ट बनते, त्या देशाचं स्वातंत्र्यही खरेदी, विक्रीची वस्तू बनू शकते. म्हणजेच ते धोक्यात येते.

पैंना बायकोचा खंबीर पाठिंबा

नाथ यांच्या तब्येतीत अनेक वेळा चढ उतार यायचे. त्यांच्या आजारपणात त्यांची बायको क्रिस्टल त्यांची सेवा करायच्या. क्रिस्टल या मूळच्या ऑस्ट्रेलियन. त्यांनी त्यांची मनोभावे सेवा केली. मुलं आनंद आणि दिलीप यांनाही सांभाळलं. त्यांना राजकारणात रस नव्हता. पण त्या उत्तम गृहिणी होत्या. बागकाम, घराची स्वच्छता यात विशेष रस होता.

नाथ कधी रागावले तर त्यांना आवरत आणि बोलतं 'नाथ, इट इज इनफ' नाथ यांची सेवा करताना त्यांच्या कपाळावर कधी आठी नसायची. त्या गृहिणी होत्या तशाच नाथच्या एकप्रकारे सेक्रेटरीही. पत्र पाहणं, कात्रण चिकटवणं, फाईल करणं ही काम त्या आनंदाने करायच्या. त्यांनी पैंना नेहमीच खंबीरपणे साथ दिली.

हेही वाचा: पुरुषोत्तम बोरकरांचं जगणं वावटळीतल्या दिव्यासारखं

राजकारणात नवी संस्कृती आणली

१९७१ च्या काळात पै खूप थकले होते. डॉ. याळगी हे त्यांच्या तब्येतीवर देखरेख ठेवायचे. १८ जानेवारीला बाराच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.  त्यांच्यावर उपचार सुरू झाले पण परिस्थिती हाताबाहेर गेली होती. त्यावेळी त्यांनी बायको आणि मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

या स्थितीतही मला लवकर बर करा उद्या वेंगुर्ल्याच्या माझी सभा आहे असं ते डॉक्टरना सांगतलं. अखेर १२.४५ ला लोकशाहीचा खंदा पुरस्कर्ता काळाच्या पडद्याआड गेला. लोकशाहीची मूल्यं पैंनी प्राणपणाने जपली, जोपासली. नाथ सुसंस्कृतपणे समाजवाद जगले. राजकारणात एक नवी संस्कृती आणण्याचं श्रेय नाथना द्यावं लागेल. या पर्वाची ओळख करून घेण्यासाठी नाथ पैं यांच्यावरची पुस्तकं वाचावीच लागतील.


लोकशाहीची आराधना

लेखक: बॅ. नाथ पै

प्रकाशक: साधना प्रकाशन

पानं: १९२ 

किंमत: २००


लोकशाहीचा कैवारी

लेखक: वासू देशपांडे

प्रकाशक: साधना प्रकाशन

पानं: १९४

किंमत: २००

 

हेही वाचा: 

भारतात बॉलिवूडसारखे आणखी किती वूड आहेत?

अभिनंदन वर्धमान यांना मिळाले ते शौर्य पुरस्कार कोणते आहेत?

जनजागृतीमुळे कंडोम स्वीकारला, तशीच जातही संपवता येऊ शकेल

पाकिस्तानात जन्मलेल्या कलाकारांच्या आठवणींचा सन्मान तिथे होतो का?