अनंत कुमारः उत्तर दक्षिणेला जोडणारा दुवा

१३ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


केंद्रीय संसदीय कार्य मंत्री अनंत कुमार यांचं आज १२ नोव्हेंबरला मध्यरात्री निधन झालं. ते त्यांच्या चांगल्या कामांसाठी कायम लक्षात ठेवले जातील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिलीय. एका सर्वसामान्य पांढरपेशा घरातून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवासही असाच लक्षात राहण्यासारखा आहे.

आणीबाणीविरोधी आंदोलनातून राजकारणात आलेल्या आणि लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेनंतर नेता म्हणून एस्टॅब्लिश झालेल्या भाजपमधल्या नेत्यांच्या पिढीचा सर्वात तरुण चेहरा असलेले अनंत कुमार यांचं निधन अनपेक्षित नसलं तरी धक्कादायक आहे. मे मधे कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच त्यांची तब्येत बरी नसल्याच्या बातम्या येत होत्या. पण तेव्हा त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर असेल आणि यापुढच्या कर्नाटकातल्या निवडणुका भाजपला त्यांच्याशिवाय लढवाव्या लागतील, याची कल्पना कुणालाच नव्हती.

अनंत कुमार अवघ्या ५९ वर्षांचे होते. जन्म २२ जुलै १९५९. त्यांनी खूप तरुणपणापासून राजकारणाची सुरवात केली होती. खूप कमी वयात मोठा पल्ला गाठला. तरीही फार मोठं राजकीय करियर त्यांच्यासमोर होतं. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर देशभरातून सर्वच राजकीय पक्षांतून हळहळ व्यक्त होतेय.

सर्वात तरुण मंत्री

१९९६ साली अटलबिहारी वाजपेयींनी भाजपचं पहिलं तेरा दिवसांचं सरकार बनवलं, तेव्हा अनंत कुमार पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले. हसतमुख चेहऱ्याचे, पत्रकारांसह सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी उत्सुक अनंत कुमार दिल्लीत मिसळून गेले. भाजपनेही त्याच्या आदल्याच वर्षी त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस बनवलं होतं. पण दिल्ली त्यांना नवी नव्हती. त्याच्या अकरा वर्षं आधीच वयाच्या पंचविसाव्या वर्षी ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे केंद्रीय सरचिटणीस बनून दिल्लीत पोचले होते. ते अभाविपमधलं विद्यार्थी प्रतिनिधीसाठीचं सर्वोच्च पद आहे.

१९९६मधे कर्नाटकातून भाजपचे सहा खासदार निवडून आले होते. त्यापैकी अनंत कुमार एकटेच राज्याच्या दक्षिण भागातून होते. बाकी सगळे उत्तर किंवा किनारी भागातले होते. ते हुशार तर होतेच. पण त्यांची हिंदीही अस्खलित होती. दिल्लीत त्यांनी बस्तान आधीच बसवलं होतं. त्यामुळे दक्षिणेतल्या इतर नेत्यांना मागे सारून त्यांनी १९९८च्या सरकारात नागरी हवाई वाहतूक यासारख्या महत्त्वाच्या खात्याचं थेट कॅबिनेट मंत्रिपद पटकावलं. ते वाजपेयींच्या मंत्रिमंडळातले सर्वात तरुण मंत्री होते.

अनंत कुमार यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतःची वेबसाईट असलेले ते पहिले भारतीय राजकारणी होते. १९९८ साली इंटरनेट कशाशी खातात हेही बहुसंख्य राजकारण्यांना माहीत नव्हतं, तेव्हा अनंत कुमारांनी आयटीत हात आजमावले होते. त्यांची ananth.org ही साईट गेली वीस वर्षं सुरू आहे. शिवाय संयुक्त राष्ट्रांमधे कन्नडमधे भाषण करून त्यांनी इतिहास रचला होता.

लोकसभा निवडणुकांत अजिंक्य

कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर अनंत कुमारांनी मागे वळून पाहिलं नाहीच. त्यानंतर जेव्हा कधी केंद्र सरकारात आणि पक्षातही दक्षिणेकडच्या नेत्याला प्रतिनिधित्व देण्याची वेळ आली, तेव्हा त्यांचंच नाव पुढे असायचं. त्यामुळे ते भाजपच्या पहिल्या फळीतले नेते बनले. ते मुळात अडवाणी कॅम्पमधले मानले जात. पण वाजपेयी कॅम्पचे नेते असणाऱ्या प्रमोद महाजनांशीही त्यांचे घनिष्ट संबंध होते. त्यामुळे दिल्लीत थोड्याबहुत कुरबुरी सोडल्यास त्यांचं स्थान अबाधित राहिलं.

ते २२ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत कधीच निवडणूक हरले नाहीत. एकाच मतदारसंघातून ते सलग सहावेळा लोकसभेवर निवडून आले. तसा दक्षिण बंगळुरू हा त्यांचा मतदारसंघ भाजपचा गडच म्हणायला हवा. कारण अनंत कुमार यांच्याआधीही १९९२ साली अर्थशास्त्रज्ञ के. वेंकटगिरी गौडा यांनी भाजपसाठी ही जागा जिंकली होती. पण नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे गौडा यांनी भाजप सोडली.

त्यानंतर हा मतदारसंघ अनंत कुमार यांच्या हाती अलगद आला. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री गुंडू राव यांच्या पत्नी वरलक्ष्मी यांच्यापासून नंदन निलकेणींपर्यंत दिग्गज उमेदवारांशी त्यांचा सामना झाला. पण काँग्रेस आणि जनता दलाच्या मतविभागणीने त्यांना कायम हात दिला. प्रमोद महाजन, व्यंकय्या नायडू, सुषमा स्वराज, अरुण जेटली या त्यांच्या सहकाऱ्यांना हक्काचा मतदारसंघ नव्हता. त्या सगळ्यांच्या तुलनेत अनंत कुमार यांचा जनाधार मजबूत होता.

मुख्यमंत्रीपद दूरच

दिल्लीत कर्नाटकचा आवाज बनलेल्या अनंत कुमार यांना कर्नाटकच्या स्थानिक राजकारणात मात्र शिरकाव करता आला नाही. मुख्यमंत्रिपदाने त्यांना कायम हुलकावणी दिली. मुळात ते ब्राह्मण होते. वक्कलिंग आणि लिंगायत यांचं वर्चस्व असणाऱ्या कर्नाटकात एखादा ब्राह्मण नेता मुख्यमंत्री बनणं कठीणच होतं.

त्यामुळे त्यांनीही आपली ब्राह्मण ही ओळख ठळकपणे समोर येऊ दिली नाही. त्यांनी आपलं शास्त्री हे मूळ आडनाव टाकलं. त्याऐवजी कुमार हे दिल्लीला जवळची वाटू शकणारी नावाची जोड स्वीकारली. सत्तरच्या दशकात विद्यार्थी चळवळीत आडनाव सोडण्याचा प्रघात रूढ होता. त्याचाही हा प्रभाव असू शकेल. तसेही विद्यार्थीदशेत ते आणीबाणीविरोधल्या आंदोलनात सामील होतेच. त्यांनी त्यासाठी तुरुंगवासही भोगला.

माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांच्यासह कर्नाटकात भाजप वाढवण्यात अनंत कुमार यांचंही योगदान महत्त्वाचं होतं. पण येडियुरप्पा आणि त्यांचं नातं विळ्याभोपळ्याचंच होतं. येडियुरप्पांनी तर भाजप सोडताना आपल्याला अनंत कुमारांनी त्रास दिल्याची जाहीर टीका केली होती.

मोदीयुगात महत्त्व कमी

येडियुरप्पांनी पक्ष सोडल्यानंतर भाजपचा २०१३च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाला. त्याचं खापर अनंत कुमारांवर फुटलं. त्यामुळे ते राज्याच्या राजकारणात कायमचे बॅकफूटवर गेले. प्रमोद महाजनांच्या मृत्यूनंतर दिल्लीत त्यांच्यासाठी संधी निर्माण झाली होती. पण त्यांना मान वर करता येऊ नये, अशी जणू व्यवस्थाच करण्यात आली होती.

येडियुरप्पा यांना पुन्हा एकदा पक्षात आणण्यासाठी आग्रही असणारे नरेंद्र मोदी पंतप्रधानपद बनल्यानंतर अनंत कुमारांना त्यांच्या वकुबाला साजेशी जबाबदारी मिळाली नाही. अनेक मोठी खाती सांभाळलेल्या अनंत कुमारांसाठी केमिकल अँड फर्टिलायझर्स हे किरकोळच खातं होतं. पण त्यातही त्यांनी चांगलं काम केलं. कडुनिंब कोटेड युरिया, जेनरिक औषधांचा प्रसार, अँजिओप्लास्टीत वापरण्यात येणाऱ्या स्टेन्स स्वस्त उपलब्ध करून देणं अशी कामं त्यांच्या नावावर लागली.

त्यामुळे २०१६च्या मंत्रिमंडळ पुनर्रचनेत अनंत कुमारांना संसदीय कामकाज खातं मिळालं. बहुमत नसताना राज्यसभेत जीएसटी विधेयक संमत करून त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली. तरीही त्यांना पक्षात आणि सरकारात पूर्वीसारखं महत्त्व मिळालेलं दिसलं नाही. त्यांच्या जागी अनंत कुमार हेगडेंसारखे उथळ आणि वाचाळ नेते अधिक महत्त्वाचे ठरू लागले होते. त्यामुळे अनंत कुमार वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. पण दुर्दैवाने त्यांचं हे वेटिंग शेवटचं ठरलं.

अनंत कुमारांची जागा कोण घेणार?

आता पुढे काय? अनंत कुमार यांच्या जागी कोण? अशी चर्चा त्यांच्या निधनानंतर लगेच होणं योग्य नाही. पण त्यांची तब्येत पाहता त्याचे आडाखे बांधणं आधीच सुरू झालं होतं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटमधे अनंत कुमार यांच्या पत्नी डॉ. तेजस्विनी कुमार यांचा उल्लेख केल्यामुळे त्याच अनंत कुमार यांच्या वारसदार असतील, यावर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जातंय. तेजस्विनी या सामाजिक कामात आधीपासूनच आहेत. त्या अदम्य चेतना या संस्थेतर्फे रोज दोन लाख मुलांना मध्यान्ह आहार पोचवण्याचं काम करतात.

कर्नाटकात भाजपला नुकताच लोकसभा पोटनिवडणुकांत मोठा फटका बसलाय. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर एकत्र राहिल्यास अनंत कुमार यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीत भाजपसाठी मोठंच आव्हान असेल. अनंत कुमार यांच्या निधनाने भाजपमधला उत्तर आणि दक्षिणेला जोडणारा दुवा निखळलाय. कर्नाटकातही भाजपकडे त्यांच्या उंचीचा नेता नाही. अनंत कुमार यांच्या निधनाची सहानुभूती निश्चितच प्रभावी असली तरीही या सगळ्यापेक्षा पोटनिवडणुकीत विजय मिळवण्याचं आव्हान जास्त कठीण आहे.