तीन वर्षंच राहणार स्टॅच्यू ऑफ युनिटीचा विक्रम

३१ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


देशाचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती. यानिमित्त सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी अनावरण करणार आहेत. हा जगातला सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. त्याची निर्मितीप्रक्रिया जशी इंटरेस्टिंग आहे, तसंच त्यामागचं राजकारणही. त्याचं स्वागत जसं होतंय, तसा विरोधही. घोषणेपासून चर्चेत असलेल्या या पुतळ्याविषयी एक माहिती चर्चा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१० ला गुजरातचे मुख्यमंत्री असताना सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वांत उंच पुतळा उभारण्याची घोषणा केली होती. तेव्हा अहमदाबादमधे महापालिकेच्या निवडणुका सुरू होत्या. नंतर या पुतळ्याला अमेरिकेतल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर स्टॅच्यू ऑफ युनिटी असं नावही दिलं. पुढं तीन वर्षांनी २०१३ मधे पुतळ्याच्या कामाला सुरवात झाली. सुरवातीपासून हा पुतळा चर्चेत आहे. अखेर आज या भव्यदिव्य पुतळ्याचं अनावरण होत आहे. अनेक अर्थांनी हा पुतळा वैशिष्ट्यपूर्ण ठरलाय.

स्टॅच्यू ऑफ युनिटीची सगळ्यात जास्ती चर्चा कशावरून होत असेल, तर ती पुतळ्याच्या उंचीवरून. १८२ मीटर म्हणजेच जवळपास ६० मजली इमारती एवढी पुतळ्याची उंची आहे. फुटामधे ही उंची सहाशेच्या घरात जाते. उंचीनुसार पुतळ्याचे हातपायही खूप लांब आहेत. पायांची उंची ८० फूट तर हाताची ७० फूट एवढीय. पुतळ्याच्या उभारणीसाठी २,८८९ कोटी रुपये लागल्याचं सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल इंटिग्रेशन ट्रस्टतर्फे सांगण्यात आलं. या सरकारी संस्थेच्या निगराणीखालीच हे काम सुरू आहे.

१८२ मीटरमागचं गुजराती गुपित

महत्वाचं म्हणजे पुतळ्याचा चौथरा हा २५ मीटर उंच तर प्रत्यक्षात पुतळा १६७ मीटर उंचीचा आहे. पुतळ्यासाठी साडेबावीस हजार टन म्हणजेच सव्वादोन लाख किलो सिमेंट लागलं. सोबतच १८,५०० टन लोखंडी सळयांचा वापर करण्यात आलाय. सळ्या गंजू नयेत म्हणून एम६५ दर्जाचं सिमेंट वापरण्यात आलंय. पुतळ्याचं वजन जवळपास ६५ हजार टन एवढं आहे.

एवढं वजन पेलवण्यासाठी पाया तेवढाच खोल असावा लागतो. ४५ मीटर खोलीच्या पायावर या पुतळ्याची उभारणी करण्यात आलीय. १८५० टन ब्राँझचा वापर झाला. यासाठीचे पॅनल चीनहून आणल्यानं वाद झाला. हा पुतळा १८२ मीटर उंचीचाच उभारण्यामागंही एक गणित आहे. गुजरातच्या विधानसभेत १८२ जागा आहेत. त्यावरून पुतळ्याची उंची १८२ मीटर करण्याचं ठरलं.

३३ महिने साडेतीन हजारांहून अधिक कामगारांनी दररोज दिवसरात्र काम करून स्टॅच्यू ऑफ युनिटी साकारलाय. अडीचशे इंजिनिअरच्या मार्गदर्शनाखाली हे काम झालं. मूळात पुतळ्याच्या कामाला ३१ ऑक्टोबर २०१३ मध्ये सरदार पटेल यांच्या १३८ व्या जयंतीदिवशी सुरवात झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याचवेळी त्यांनी एक घोषणा केली होती.

देशभरातून मागवलं लोखंड

पुतळ्यासाठी जवळपास २० हजार टन लोखंड लागलं. मग एवढं लोखंड आणलं कुठून? २०१३ मधे पुतळ्याच्या कामाचं भुमीपूजन झालं. त्यावेळेसच मोदींनी याचा आराखडा स्पष्ट केला होता. अयोध्येत राम मंदिर आंदोलन सुरू झालं तेव्हा देशभरातून विटा मागवण्यात आल्या होत्या, त्यासारखाच हा आराखडा होता. 

देशभरातल्या शेतकऱ्यांनी आपल्या जुन्या शेती अवजारांचं लोखंड पुतळ्यासाठी द्यावं, असं आवाहन करण्यात आलं होतं. यासाठी देशभरातल्या १ लाख ६९ हजार गावांत ३ लाख रिकामे डब्बे रवाना करण्यात आले. त्यातून २०१६ मधे जवळपास १५ कोटी शेतकऱ्यांकडून १३५ टन लोखंड जमा झालं होतं. त्यामुळंच हा पुतळा म्हणजे एकतेचं प्रतीक असल्याचं सांगितलं जातं. शिवाय गेली काही वर्षं भाजपचे कार्यकर्ते देशभर सरदार जयंतीच्या दिवशी रन फॉर युनिटी नावाने मॅरेथॉन आयोजित करतात.

दोन मराठी हातांचा टच

स्टॅच्यू ऑफ युनिटीची निर्मिती शिल्पकार राम सुतार यांनी केलीय. मूळचे धुळ्याचे आणि मुंबईतल्या जेजे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी असलेले सुतार हे त्यांच्या खास शैलीच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. संसदेच्या आवारात असलेले अनेक पुतळे त्यांनीच साकारलेत. ९३ वर्षांच्या सुतार यांनी मुलगा अनिल यांच्यासोबत वेळोवेळी चीनला जाऊन पुतळ्याला फायनल टच दिला.

सरदार पटेलांच्या १९४९ मधे काढण्यात आलेल्या फोटोवरून हा पुतळा साकारला. सुरवातीला तीन, सहा फुटाच्या मूर्त्या बनवल्या. त्या मूर्त्या सरदार पटेलांना प्रत्यक्ष बघितलेल्या काही लोकांना दाखवून पुतळ्याचं काम सुरू झालं. सुतार यांनी मूळ पुतळा ३० फूट उंचीचा बनवला. त्यावरून १८२ मीटर उंचीचा पुतळा साकारण्यात आला.

२०२१ मधे होणाऱ्या शिवस्मारकातलं शिल्पही सुतार यांच्याच हातानं घडणार आहे. चंबळ देवीची मूर्ती साकारल्यानंतर चर्चेत आलेल्या सुतार यांचं जगभरातले लोक बघायला येतील असं एखादं काम करायचं स्वप्न होतं. ते स्वप्न आज सत्यात उतरलंय.

पुण्याचे प्रभाकर एम. कोल्हटकर यांनी स्मारकासाठीचं संकल्पनाचित्र मांडलंय. दिल्लीत ३३ वर्षं सिटी प्लानर म्हणून काम केलेल्या कोल्हटकर यांना आपल्या घरातूनच शिल्पकलेचा वारसा मिळालाय. सरदार पटेलांशी आपलं जुनंच कनेक्शन असल्याचं ते सांगतात. कोल्हटकरांचे वडील म. का. कोल्हटकर यांनी सरदार पटेलांची तीन शिल्पं बनवलीत.

त्यांनी सरदार सरोवराला भेट दिली तेव्हा त्यांना तिथे पटेलांचं स्मारक असावं असं वाटलं. यासंबंधीची सगळी मांडणी करून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ईमेल केला. त्यानंतर आठच दिवसांनी भेटायला यायचा निरोप आला. मुख्यमंत्र्यांसोबतची १५ मिनिटांची ही नियोजित बैठक ४५ मिनिटं लांबली आणि स्मारक उभारण्यावर शिक्कामोर्तब झालं, असं कोल्हटकरांनी पत्रकारांना सांगितलंय.

सर्वात मागास जिल्ह्यात स्मारक

गुजरातच्या दक्षिणेकडील नर्मदा जिल्ह्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. नर्मदा नदीपात्रातल्या सरदार सरोवर प्रकल्पाजवळ साधू बेटावर हा पुतळा उभारण्यात आलाय. नर्मदा जिल्हा गुजरातमधला सगळ्यात गरीब आणि मागास म्हणून ओळखला जातो. पुतळा बघायला येणाऱ्या पर्यटकांमुळं दोन वेळच्या खायची चिंता असलेल्या इथल्या आदिवासीचं जगणं सुकर होईल, असा दावा केला जातोय.

जगभरातल्या पर्यटकांनी इथं यावं म्हणून या पुतळ्याचं खूप मार्केटिंग करण्यात आलंय. दरवर्षी २५ लाख पर्यटक येतील, असं सांगितलं जातंय. इथं एक ५२ खोल्यांचं थ्री स्टार हॉटेल उभारण्यात आलंय. तसंच दोन टेन्ट सिटी उभारण्याचं काम जोरात सुरूय. यात २५० तंबू उभारले जाणारेत. या स्मारक परिसरात प्रवेशासाठी जवळपास साडेतीनशे रुपये फी वसूल करण्यात येणार आहे.

पुतळ्यामुळे या भागात पर्यटन क्षेत्र वाढावं, हाही स्टॅच्यू ऑफ युनिटीमागचा एक हेतू सांगितला जातो. पण मग एवढा भव्यदिव्य पुतळा पर्यटक बघणार कसं? यासाठी पुतळ्याच्या छातीजवळ १५३ मीटर उंचीवर एक प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलीय. इथून एकावेळी दोनशे लोक पुतळा बघू शकतात. इथपर्यंत पोचण्यासाठी दोन अतिजलद लिफ्टची सोय आहे. या लिफ्टमधून एकावेळी ४० लोकांची ने-आण केली जाऊ शकते.

पुतळ्याचं चीन कनेक्शन 

आता फक्त प्रत्यक्ष पुतळाच तयार झालाय. बाकीच्या सगळ्या गोष्टी तयार व्हायच्या बाकी आहेत. तिथे जायचा रस्ताही तयार व्हायचाच. यावर्षीच्या सरदार जयंतीचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न कसाबसा पूर्ण झालाय. प्रत्यक्ष स्मारकाचं जवळपास निम्मं काम अजून पूर्ण व्हायचंय. ते पूर्ण व्हायला आणखी पाचेक वर्षं लागू शकतात. तरीही अनावरणाचा भव्य दिव्य कार्यक्रम होतोय. यामागचं राजकारण स्पष्ट आहे.

सध्या जगातला सर्वांत उंच पुतळा चीनमधे आहे. चीनच्या लुशान राज्यातील स्प्रिंग टेम्पलमध्ये असलेल्या गौतम बुद्धाच्या पुतळ्याची उंची १५३ मीटर आहे. हा पुतळा उभारायला ११ वर्षे लागली. २००८ मधे या पुतळ्याचं काम पूर्ण झालं. विशेष म्हणजे, ज्या डोंगरावर हा पुतळा उभारण्यात आलाय, त्याला पूर्णाकार देऊन चौथरा बनवला. त्यामुळं पुतळ्याची उंची २०८ मीटरवर जाऊन पोचलीय. स्टॅच्यू ऑफ यूनिटीची उंची न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीहून जवळपास दुप्पट जास्त आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची उंची ९३ मीटर आहे.

भव्यदिव्य स्टॅच्यू ऑफ युनिटीची उभारणी ही पूर्णतः ‘मेक इन इंडिया’ असल्याचं सरकारने सांगितलं. मात्र, काही काळातचं सरकारला माघार घ्यावी लागली. या यू टर्नमुळे सरकारवर खूप टीका झाली. या प्रकल्पाचं मूळ कंत्राट एल अॅण्ड टी कंपनीला मिळालं. पण देशात पुतळ्याचं शेकडो टन वजन पेलवू शकणारं स्ट्रक्चर उभं करणं कुणालाच शक्य होईना. सर्वांनी हात वर केले. त्यामुळे असे भव्य पुतळे उभारण्याचा अनुभव असलेल्या जियांग्झी टोकिन या चिनी कंपनीकडं जावं लागलं.

शिवस्मारक बनणार नं १

सरदार पटेलांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी उण्यापुऱ्या तीन वर्षांसाठीच जगातला सगळ्यात उंच पुतळा असणार आहे. कारण अरबी समुद्रात २०२१पर्यंत शिवस्मारक उभारलं जाणार आहे. इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची ही स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षाही ८ मीटर जास्त असणार आहे.

जवळपास २१२ मीटर उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा इथं उभारण्यात येणार आहे. या कामाचं भुमीपूजनही २४ डिसेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केलंय. या कामासाठी जवळपास ३६०० कोटी रुपये खर्च येणार आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा विक्रम मोडू नये, यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली जातेय, असा आरोपही मराठा संघटनांनी केलाय. पण त्यात तथ्य नसल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. 

आता ठरल्याप्रमाणे शिवस्मारक उभं राहिलं, तर सर्वाधिक उंचीचा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा विक्रम तीनेक वर्षांतच मोडणार आहे. तर मग एवढा अट्टाहास का, असा प्रश्न उभा राहतोच. शिवाय उद्या आणखी एखाद्या राज्याने आणखी एखादा अधिक उंच पुतळा उभारायचं ठरवलं, तर सगळंच मुसळ केरात जाईल.