आपण आजही शालिनीताईंना टाळू शकत नाही

२६ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा करणाऱ्या नेत्या म्हणून शालिनीताई पाटील पुन्हा चर्चेत आल्यात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत धडका मारणाऱ्या शालिनीताई या महाराष्ट्राच्या राजकारणातलं संघर्षपूर्ण वादळ आहे.  निव्वळ वसंतदादांची दुसरी बायको या ओळखीपल्याड त्यांनी ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारण गाजवलं. परखड, सडेतोड, स्पष्टवक्त्या स्वभावाची किंमतही त्यांनी चुकवलीय. पण त्या आपल्या भूमिकेवरून मागे फिरल्या नाहीत.

आपल्या परखड, सडेतोड भूमिकेमुळे नेहमी चर्चेत, वादात राहणाऱ्या शालिनीताई पाटील आता नव्याने चर्चेत आल्यात. २०१९ मधे पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवलीय. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल परवा साताऱ्यात शालिनीताईंचा नागरी सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सत्कार केला. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. आता आतापर्यंत राष्ट्रवादीत असेले नरेंद्र पाटील सध्या भाजपच्या जवळचे झालेत.

पुन्हा निवडणूक लढण्याची इच्छा

सत्काराला उत्तर देताना शालिनीताई म्हणाल्या, ‘कोरेगावच्या जनतेची इच्छा असेल आणि प्रकृतीने साथ दिल्यास मी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढेन. तब्येतीने साथ दिली नाही तर कुटुंबातील कुणीतरी किंवा माझा एखादा कार्यकर्ता निवडणूक लढवेल.’

२००९ मधे कोरेगाव मतदारसंघातून महाराष्ट्र क्रांती सेनेच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवली होती. पण माथाडी कामगारांचे नेते असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशिकांत शिंदे यांनी शालिनीताईंचा पराभव केला. त्यानंतर त्या निवडणुकीच्या राजकारणापासून दूर झाल्या. या काळात वयोमानानुसार त्यांना तब्येतीचेही प्रॉब्लेम सुरू झाले. पण आता पुन्हा नव्या दमाने निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचं सुतोवाच केल्याने साताऱ्याच्या राजकारणात खळबळ उडालीय. 

शालिनीताईंनी कोरेगावमधूनच याआधी १९९९ आणि २००४ मधे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. पण २००६ मधे आयआयटी, आयआयएममधे ओबीसींना आरक्षण देण्यास त्यांनी तीव्र विरोध केला. आर्थिक निकष लावून सगळ्या जातींना आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. यावरून त्यांचं पक्ष नेतृत्वाशी चांगलंच वाजलं. मागासवर्गीय समाजाची उगीच नाराजी नको म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना थेट पक्षातूनच काढून टाकलं.

मराठा आरक्षणाची पहिल्यांदा मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टीनंतर त्यांनी २००६ मधे स्वतःचा नवा राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली. महाराष्ट्रभर फिरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. पवारांनी माझी हकालपट्टी करून जुने हिशोब चुकते केल्याचा दावाही शालिनीताईंनी या दौऱ्यात केला. 

२००३ मधे शालिनीताईंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत आर्थिक निकषांवरील आरक्षणाचा ठराव मांडला होता. अर्थात त्यावेळी त्यांना कुणाचाही पाठिंबा मिळाला नव्हता. राष्ट्रवादी आमदार असताना पक्षाचंही पाठबळ मिळालं नाही. मात्र आपल्या या भूमिकेवर त्या सुरवातीपासून ठाम आहेत. मराठा समाजासाठी त्यांनीच पहिल्यांदा आरक्षणाची मागणी केली. २००६ पर्यंत पक्षाच्या धोरणात आरक्षणाचा मुद्दा घालण्यात त्यांना थोडफार यशही आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी महाराष्ट्र क्रांती सेनाची स्थापना केली. त्यानिमित्ताने महाराष्ट्र पिंजून काढत मराठा आरक्षणासाठी वातावरण निर्मिती केली.

शरद पवारांच्या राजकारणाचं ‘शालिनीताई’वळण

गेल्या तीन चार वर्षांत मराठा क्रांती मोर्चांमुळे आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली. या मोर्चांना सकल मराठा समाजाचा पाठिंबा मिळाला. राज्याचं राजकारण ढवळून मिळालं. देशाच्या राजकारणातही या मोर्चाची चर्चा सुरू झाली. मोर्चाला तूफान प्रतिसाद मिळाला. सगळ्याच राजकारण्यांमधे ही गर्दी आपल्याकडे ओढून घेण्यासाठी चढाओढ लागली. राजकारणातले ५० पावसाळे बघणाऱ्या शरद पवारही मराठा समाजासाठी आर्थिक निकषावरच्या आरक्षणाची भाषा बोलू लागले. हे एका अर्थाने शरद पवारांच्या आरक्षणाच्या भूमिकेला मिळालेलं ‘शालिनीताई’ वळण म्हणता येईल.

गेल्या ऑगस्टमध्ये शालिनीताईंनी मराठा आरक्षणासंबंधी टीवी चॅनलला मुलाखती दिल्या. त्यावेळीही त्यांनी पवारांवर टीका केली. त्या म्हणाल्या, 'आर्थिक निकषाचा मुद्दा मी जाहीरपणे मांडला तर मला पक्षातून काढलं. आता आपण याच मुद्द्याचं समर्थन करत आहात, याचं आश्चर्य वाटतं.  तेव्हा माझं काय चुकलं?’ शालिनीताई मुलाखतीत जे बोलल्या ते खरंच होतं, पण ते अर्धसत्य होतं. शालिनीताई सोयीस्करपणे आपल्या फायद्याची बात करत होत्या.

शालिनीताई मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कायमच आक्रमक राहिल्यात. पण त्याच वेळी त्यांची छबी दलितविरोधी मराठा नेत्या अशी देखील आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी लाईन घेतली होती. त्याचवेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी देखील अपशब्द वापरले होते. त्यांच्या हकालपट्टीमागचं हेही एक महत्त्वाचं कारण होतं. पण शालिनीताई आपलीच ‘मन की बात’ सांगत होत्या. 

राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

आर्थिक निकषांवरील आरक्षणाची मागणी पुढे रेटताना शालिनीताईंनी जातीय आधारावर दिल्या जाणाऱ्या आरक्षणाच्या धोरणावर टीका केली. ‘महात्मा गांधी ज्यावेळी स्वातंत्र्यसंग्रामात कारावास भोगत होते, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर इंग्रज सरकारशी जवळीक साधून सत्तेची फळ चाखत होते,’ असा खळबळजनक दावाही त्यांनी केला होता. या दोन्ही गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात गदारोळ माजला होता. धर्मनिरपेक्ष लाईनवर चालणारी राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली होती. या सगळ्यांची परिणाम म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. या हकालपट्टीतून पवारांनी आपले हिशोब चुकते केल्याचं आजही बोललं जातं.

एका सत्यशोधक कुटुंबात वाढलेल्या शालिनीताईंनी कधीकाळी महिलांसाठी ५० टक्के मतदारसंघ राखीव ठेवण्याची मागणी केली होती. त्यावेळी या मागणीला स्त्रीवादी चळवळीचाही पाठिंबा मिळाला. पण लिंगाधारित महिला आरक्षणापासून आर्थिक निकषावरच्या मराठा आरक्षणापर्यंत झालेल्या त्यांच्या या वाटचालीचं कोडं त्यांच्या राजकीय जडणघडणीत दडलंय.

सत्यशोधक घरातली राजकारणी मुलगी

शालिनीताईंचा जन्म १९३१ चा. त्या काळी कुठलाही पालक आपल्या मुलीला शाळा कॉलेजात टाकायला सहजासहजी तयार नसायचा. मुलगी बहुजन समाजातली असेल तर परिस्थितीत आणखी वाईट असायची. पण सत्यशोधक चळवळीतले कार्यकर्ते असलेल्या वडिल जोतिराव फाळके यांच्या प्रोत्साहनामुळे त्या शिकल्या. जोतिराव फाळके यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबत काम केलेलं. शालिनीताईंनी घरातूनच सत्यशोधक चळवळीचा वारसा मिळालेला. त्यामुळेच त्यांच्या भूमिकांना एक वैचारिक जडणघडणीचा आधार आहे. पण त्याचवेळी आरक्षणासंदर्भातील त्यांची भूमिका आणि सत्यशोधक चळवळीचा वारसा यामधे टोकाचा विरोधाभास बघायला मिळतो.

वीसेक वर्षांच्या असतानाच त्यांचं लग्न झालं. न्यायाधीश असलेल्या शामराव जाधव यांनी शालिनीताईंना लग्नानंतरही शिकवलं. त्या बॅरिस्टर झाल्या. त्यांच्यापासून चार मुलं झाली. याच काळात त्या काँग्रेसमधे सक्रीय होत्या. सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणूनही निवडून आल्या. महिला प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं. १९६४ मधे शामरावांचं निधन झालं. हा शालिनीताईंच्या जीवनातला खूप संघर्षाचा काळ होता. आयुष्यात एकाकीपण आलं होतं. निराधारासारखी अवस्था झाली होती.

अंतुलेंच्या सरकारमधे महसूलमंत्री

याच काळात त्यांचे महाराष्ट्राचे लोकनेते, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या संपर्क वाढला. वसंतदादांनी आपल्याहून वीसेक वर्षांहून लहान शालिनीताईंशी १९६७ ला लग्न केलं. हे लग्न त्या काळी विधवा पुनर्विवाहाचा एक आदर्श ठरलं. लग्नाच्या वेळी वसंतदादा पन्नाशीत होते. वसंतदादांच्या सोबतीने शालिनीताई राजकारणात पुन्हा सक्रीय झाल्या. १९८० मधे सांगली लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या. नंतर मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या मंत्रीमंडळात महसूल मंत्रीही झाल्या. 

शालिनीताईंनी आपल्या महत्त्वाकांक्षा कधी लपवून ठेवल्या नाहीत. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बायको’ यापलीकडे जाऊन आपलं वेगळं अस्तित्व टिकवू ठेवलं. तसं त्यांनी वेळोवेळी स्पष्टपणे बोलूनही दाखवलं.

‘राजकीय कारकिर्दीत मी जे काही मिळवलंय, ते काही फक्त वसंतदादांनी बायको म्हणून नाही. इतर राजकीय नेत्यांच्या बायका देखील आहेतच की. त्यांना कोण ओळखतं?’ असा सवाल शालिनीताई ऐंशीच्या दशकात पत्रकारांना विचारायच्या. या प्रश्नावर पत्रकारही निरुत्तर व्हायचे. अर्थात त्यांचा हा प्रश्नच निर्विवादपणे त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षांची कबुली द्यायचा. आक्रमक, करारी स्वभावाच्या शालिनीताईंना माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम ‘झाशीची राणी’ म्हणायचे.

महाराष्ट्राच्या न झालेल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री 

राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या शालिनीताईंकडे आता आतापर्यंत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून बघितलं जायचं. १९७५ मधेच महिला आरक्षणाची मागणी करून त्यांनी आपल्या पुढच्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली होती. याआधी  १९७१मधे सांगली इथे राज्यातली पहिली महिला बँक शालिनीताईंच्या पुढाकाराने सुरू झाली होती. नंतर हळूहळू ठिकठिकाणी अशा बँका सुरू झाल्या. आपल्याकडे गेल्या तीनेक वर्षांत भारतीय महिला बँकेची कल्पना सरकारने राबवायला घेतलीय. यावरून शालिनीताईंचं दृष्टेपण दिसून येतं.

शालिनीताईंच्या राजकीय महत्वाकांक्षा इतक्या प्रखर होत्या की त्या वसंतदादांनादेखील आपल्या राजकीय प्रतिस्पर्धी मानत असत. या बाबतीतला एक किस्सा असा की फेब्रुवारी १९८३ मधे बाबासाहेब भोसले यांच्यानंतर वसंतदादा दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी हे पद आपल्याकडे यावं म्हणून शालिनीताई यांनीही फिल्डिंग लावली होती. विशेष म्हणजे त्यासाठी वसंतदादांची प्रकृती ठीक नसल्याच्या बातम्या देखील त्यांनी माध्यमांमधून पेरल्या होत्या, असं आताही काहीजण सांगतात.

सर्वाधिक चर्चेतल्या जोडप्याची ताटातूट

वसंतदादा आणि शालिनीताईंमधे बेबनाव असल्याच्या बातम्याही पेपरमधे यायच्या. त्यामुळे त्यांच्या जवळच्या वर्तुळात हा राजकारणी संसार खूप काळ टिकणार नाही, अशी चर्चा व्हायची. नंतर वीसेक वर्षांनी दोघांनी वेगळं राहायचा निर्णय घेतला. आणि महाराष्ट्रातल्या या सर्वाधिक चर्चेतल्या कपलची ताटातूट झाली. त्यानंतर त्या काँग्रेसमधूनही 

जवळपास २० वर्षं एकमेकांसोबत राहिले. पण त्यांचं सहजीवन कसं होतं, याविषयी खात्रीशीररित्या काही सांगता येत नाही. सुरवातीला ते परस्परांना खूपच पूरक होतं. पण राजकारणातल्या अहंकाराच्या लढाईत त्यात कटुता येत गेली असावी. वसंतदादांच्या हयातीतच भालचंद्र धर्माधिकारी यांनी ‘महाराष्ट्राचा महापुरुष’ हे दादांचं चरित्र लिहिलं. यामधे शालिनीताईंचा साधा उल्लेखही सापडत नाही. ‘वसंतदादांच्या कुटुंबीयांची माहिती देताना माझा उल्लेख टाळला तर आहेच शिवाय अनेक संदर्भ चुकीचे दिलेत’ असा दावा शालिनीताईंनी केला. 

२०१३ मधे 'संघर्ष' या आपल्या आत्मचरित्रातून शालिनीताईंनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. वसंतदादांनी आपला केवळ ‘राजकीय प्यादे’ म्हणून वापर केल्याचा आरोप केला होता. शिवाय वसंतदादांच्या लोकनेता म्हणून उदय होण्यामागे आपलाच हात असल्याचा दावाही त्यांनी केला. आपणच वसंतदादांना उभं केलं आणि आपल्यामुळेच दादा मुख्यमंत्री होऊ शकले. कारण फारसं शिक्षण नसल्यामुळं दादांकडे आत्मविश्वासाची कमतरता होती, असा त्यांचा दावा होता. एवढंच काय तर १९८४ मधे यशवंतराव चव्हाणांच्या मृत्यूमागेही वसंतदादांचाच हात असल्याचा आरोप शालिनीताईंनी केला. 

पवारांकडून हिशोब चुकते

वसंतदादा सलग ८ ते ९ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. येत्या काळातही त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार नाही, अशी चर्चा होती. पण याचवेळी मंत्री असलेल्या शरद पवारांनी काही मंत्र्यांना घेऊन वसंतदादांचं सरकार पाडलं. पुलोदचा प्रयोग करत स्वतः मुख्यमंत्री झाले. याविरोधात शालिनीताईंना पवारांवर खूप टीका केली. पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. महाराष्ट्राच्या राजकारणात इथूनच पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा सुरू झाली.

वसंतदादांनी सातारा जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्रातल्या अनेक संस्था उभ्या केल्या. सहकारी बँकिंगच्या रूपाने ग्रामीण विकासाचं एक नवं मॉडेलच उभं केलं होतं. पण शरद पवारांनी मुख्यमंत्री झाल्यावर सहकारी संस्थेचा सलग १० वर्षे चेअरमन होता येणार नसल्याचा कायदा केला. यातून वसंतदादांच्या सहकार क्षेत्रातल्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला. पवारांनी दादांचं राजकारण संपवण्यासाठीच १० वर्षांची ही खेळी खेळल्याचा आरोप त्यावेळी शालिनीताई करायच्या. संधी मिळेल तसं शालिनीताई पवारांवर टीका करायच्या. पण पवारांनी त्यांना थेट कुठलंच प्रत्युत्तर दिलं नाही.

पुढे शालिनीताईंनी पवारांशी नमतं घेत राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला. दोन वेळा आमदार झाल्या. किरकोळ कुरबुरीसोबतच इथे त्यांचं बरं सुरू होतं. पण आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोघांतले मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले. हीच संधी साधत पवारांनी शालिनीताईंची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी केली. या हकालपट्टीतूनच पवारांनी आपले जुने हिशोब चुकते केले. 

नव्या डावपेचांची आखणी

आपला राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी शालिनीताईंनी अनेकवेळा अनेक डावपेच आखले. पण राजकीय पटलावर त्यांचे फासे चुकीचे पडले. त्यामुळे त्यांच्या बऱ्याच राजकीय महत्वाकांक्षा अपूर्ण राहिल्या. आता ८५ हून अधिक वय झालेल्या शालिनीताई मुंबईत आपल्या मुलासोबत राहात आहेत. काही दिवसांपूर्वीच फरशीवरून पडल्यामुळे त्या जायबंदी झाल्या होत्या.

आता निवडणुकीच्या तोंडावर त्या पुन्हा घराबाहेर पडल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठा समाजाच्या नेत्या म्हणून राजकारणाचा सगळा झोत आपल्यावरच कसा राहील याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. शालिनीताईंचं राजकारण आणि त्यांच्या राजकीय भूमिका आपल्याला पटोत किंवा पटणार नाहीत. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, इतकं वादळ मात्र संधी मिळेत तेव्हा शालिनीताई उभं करत असतात.