युतीला कंटाळून शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारा तरुण आता काय म्हणतोय? 

३० नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेनेने भाजपशी युती केल्यानंतर सुहास नाडगौडा या सीमाभागातल्या तरुणाने `कोलाज`वर ‘सेनेला मत देणाऱ्या तरुणाने युतीनंतर का केला शिवसेनेला जय महाराष्ट्र?` असा लेख लिहिला होता. तो खूप वायरलही झाला होता. आता युती तुटलीय. आता या तरूणानं दिलेली प्रतिक्रिया शिवसैनिकाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया मानायला हरकत नाही.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होत असताना इथे बेळगावला ठिकठिकाणी झालेला जल्लोष पाहिला आणि गेल्या वर्षभरातल्या घटना झर्रकन डोळ्यासमोर आल्या. २०१४ मधे तुटलेली आणि सत्तेसाठी एकत्र आलेली युती या वर्षीच्या फेब्रुवारीमधे पुन्हा एकत्र आली. यामुळे सामान्य शिवसैनिकांसह सेनेवर प्रेम असणाऱ्या मराठी माणसाला एक विचित्र धक्का बसला होता. तो धक्का हिंदुत्वाची गोळी देऊन शांत करण्यात आला. पण ती सल प्रत्येकाच्या मनात होती. 

लोकसभेच्या निवडणुकीत धवल यश मिळाल्यानंतरही ती सल मनात होतीच. याचं कारण होतं भाजपने सेनेला दिलेली वागणूक आणि सेनेची होणारी फरफट. लोकसभेला युती करताना विधानसभेचं सूत्र ठरलं आहे. जागा, सत्ता आणि पदं आणि जबाबदाऱ्या यांचं समसमान वाटप होईल, असं जाहीर झाल्यावर शिवसैनिक थोडाफार शांत झाला होता. पण प्रत्यक्षात जागावाटपात फसगत झाल्यावर पुन्हा ती सल वर आली.

उद्धव ठाकरे बोटचेपी भूमिका घेऊन सेनेचं हसं करत आहेत अशीच भावना तयार होत होती. पुढे निवडणुका झाल्या, निकाल लागला आणि त्यापुढचा सगळं इतिहास समोर आहेच. यातील निम्मा इतिहास तर एकट्या संजय राऊत यांनी घडवला असंच गमतीनं म्हणावं लागेल.

हेही वाचा : प्रोटेम स्पीकरच्या नेमणुकीने फडणवीसांचे सत्तास्थापनेचे मनसुबे उधळले

दिल्लीला शेवटी महाराष्ट्रानंच पाणी पाजलं

गेला महिनाभर सगळा तमाशा बघत असताना एक सेनेविषयी आपुलकी असणारा आणि तोही सीमाभागातला मराठी माणूस म्हणून माझ्या भावना फार टोकाच्या झाल्या होत्या. अगदी संजय राऊतांच्या जशा होत्या तशाच. राऊतसाहेब माझीच भाषा बोलत आहेत, असं वाटत राहायचं. सेनेनं आता ठाम राहून भाजपला धडा शिकवला पाहिजे हीच इच्छा होती. त्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच्या तथाकथित आघाडीला माझ्यासारख्या मराठी माणसांची अजिबात हरकत नव्हती.

भाजपच्या दिल्लीश्वरांनी डोळे मिटून घेतलेल्या बोक्याचं सोंग आणि त्यातून खेळलेले खेळ चीड वाढवत होते. पण शेवटी राजकारणातील सध्याच्या घडीचा पैलवान चाणक्य सेनेच्या मदतीला धावला. 'दिल्लीला शेवटी महाराष्ट्रानेच पाणी पाजलं' वगैरे मनःशांती घेऊन आम्ही या नवसाच्या सरकारच्या शपथविधीच्या जल्लोषात बेळगावातून का होईना पण सामील झालो आहोत.

महाराष्ट्रात आता शिवसेनेच्या नेतृत्वात नवीन आघाडी सरकार स्थापन झालं आहे. आता हे असं लिहितांना दरम्यान, 'आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी 'असा किंचाळीसदृश्य आवाज येऊन कुणीतरी राजीनामा दिल्याची खबर येऊ शकते अशी भीती आहेच. पण ते एक असो!

हेही वाचा : म्हणून मी नव्या सरकारला पाठिंबा दिला : आमदार कपिल पाटील

सेनेला संपवणारे मराठी माणसांना आवडत नाहीत

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सेनेवर प्रेम करणारा प्रत्येक मराठी माणूस काही क्षण का होईना भारावून गेला. आनंदित झाला. सत्तेसाठी काही तडजोडी केल्या गेल्या, अगदी टोकाच्या तडजोडी झाल्या पण ठराविक भक्त मंडळी सोडली तर कुणालाही या अनैसर्गिक आघाडीबद्दल काहीही वावगं वाटलं नाही. अख्खी हयात काँग्रेस आणि गांधी घराण्याची टिंगल उडवण्यात गेलेल्या सामान्य शिवसैनिकाला देखील यात काहीही वावगं वाटलं नाही.

सामान्य माणूस, राजकीय नेते, पत्रकार, राजकीय अभ्यासक, विश्लेषक यापैकी कुणाच्याही मनात कधीही न आलेली आघाडी आज सत्तेत आली आहे आणि यात कोणालाही काहीही चुकीचं वाटत नाही यामागची कारणं फार महत्वाची आहेत. 

महिनाभराचा घोळ संपून नवं सरकार आलं आणि शेवट गोड झाला म्हणून सगळं सोडून देण्यात अर्थ नाही. सरकारी यंत्रणांचा सोयीचा वापर आणि गैरवापर करून विरोधकांना आक्रमकपणे संपवण्याचा घाट सामान्य माणसांना आवडला नव्हता. सेनेला मतदान करू किंवा न करू पण सेनेला संपवू बघणारे मराठी माणसाला आवडत नाहीत, हेही या आघाडी सरकारच्या स्थापनेवेळच्या जल्लोषाने दाखवून दिले आहे.

हेही वाचा : कॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी?

हिंदुत्वाच्या नादी लागल्याने सत्ता लांब 

राजकारण कुठल्या पातळीवर गेलं आहे याची कल्पना आता सर्वांना आली आहे. तीन वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन आता राज्य चालवणार आहेत. दोन बोके 'या सरकारचं शिंकं तुटतं कधी आणि आमचं फावतं कधी' या भूमिकेत डोळे नीट उघडे ठेऊन असणार आहेत.

इतकी वर्ष ज्यांच्यावर टीका केली, ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबत समर्थपणे सरकार चालवायचं असल्यास कट्टर हिंदुत्वाऐवजी बाळासाहेबांचा वारसा थोडासा मराठी अस्मितेला जोडून आणि आजोबा प्रबोधनकारांचा वारसा पूर्णपणे अंगिकारून चालण्याशिवाय उद्धव ठाकरेंकडे या घडीला राजकीय विचारसरणीच्या बाबतीत दुसरा पर्याय नाहीय. महाराष्ट्रात पुरोगामी किंवा प्रबोधनकार ठाकरेंचे विचारच सत्तेच्या जवळ नेऊ शकतात, हे सेनेला आतातरी उमजेल अशी अपेक्षा आहे. 

सरकार किती दिवस टिकेल वगैरे गोष्टी असल्या तरीही सेनेने भाजपसोबत फुकाच्या हिंदुत्वाच्या नादी लागून इतके दिवस सत्ता लांब ठेवली होती. असा पक्का समज असणाऱ्या माझ्यासारख्या मराठी माणसाला आज अतिशय आनंद झाला आहे. फुकाचं हिंदुत्व सगळ्यांच्याच अडचणीचं ठरत होतं. मराठी माणसाचं हित आणि प्रादेशिक अस्मिता या दोन गोष्टी सेनेने केंद्रस्थानी ठेऊन कारभार केल्यास सेना पक्ष म्हणून बळकट होईलच पण राज्याला एक उत्तम सरकारदेखील मिळेल.

हेही वाचा : महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?

सीमाभागातल्या लोकांचे अन्याय लक्षात घ्यावेत

बाळासाहेबांना दिलेलं वचन आज उद्धव ठाकरेंनी पूर्ण केलेलं आहे, आता मराठी माणसाला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप काम करावं लागणार आहे. महाराष्ट्रातला शेतकरी सध्या अस्मानी सुलतानी अशा दोन्ही संकटांनी गांजला आहे, अशावेळी शरद पवारांच्या शेतीमधल्या कार्याचा-अनुभवाचा फायदा या सरकारनं घेतला पाहिजे.

भूमिपुत्रांची बेरोजगारी, बंद पडत चाललेल्या औद्योगिक वसाहती, बाजार समित्यांची अवस्था, साखर उद्योगांची हतबलता, रस्त्यांची दुरावस्था, बकाल होत चाललेली शहरे, गढूळ झालेलं सांस्कृतिक क्षेत्र अशा अनेक आघाड्यांवर उद्धव ठाकरेंना काम करावं लागणार आहे.

उद्धव ठाकरे सभ्य-शांत-संयमी-सुसंस्कृत राजकारणी आहेत, प्रसंगी कठोर निर्णय घेणारेही आहेत त्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीला चालना दिली जाईल अशीच अपेक्षा आहे. सोबतच सीमाभागातील मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन त्याबाबतीत काहीतरी ठोस करतील अशीही अपेक्षा आहे.

हेही वाचा : 

उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचं ऐतिहासिक महाभारत

बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

अमित शाहांनी फडणवीसांचा, शरद पवारांनी अजितदादांचा केला गेम?