जॅक सीमः खराखुरा टॉयलेट मॅन

२३ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


नुकतीच मुंबईत वर्ल्ड टॉयलेट समिट भरली होती. त्यानिमित्ताने जगभरातले या विषयावरचे तद्न्य आले होते. त्याचं आयोजन करणारा जॅक सीम हा अफलातून वल्ली आहे. त्याने स्वच्छ आणि सुरक्षित टॉयलेटसाठी एक आंतरराष्ट्रीय संगठन उभारलंय. त्यातून तो जगभर हा विषय़ घेऊन जातोय.

वर्ल्ड टॉयलेट समिटच्या त्या तज्ज्ञांमधले भारतीयही सुटाबुटात असताना, तो एकटाच कुर्त्यावर अस्सल भारतीय जॅकेट चढवून शांतपणे वावरत होता. त्या दिवशीच्या एका परिसंवादात तो एका पॅनलचा प्रमुख म्हणून बसला होता, म्हणून त्याला ऐकता तरी आलं. कारण तो स्टेजवर बोलण्यासाठी फार उत्सुकही नव्हता.

प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा तो विनोदी पद्धतीने लोकांसमोर मांडत होता. ते बऱ्याचदा स्पॉन्सररना दुखावणारं होतं. तरी टॉयलेटच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे मांडण्यासाठी तो सहभागी वक्त्यांना प्रोत्साहन देत होता. त्याचा साधेपणा, टॉयलेट  आणि टॉयलेटशी जोडलेल्या प्रश्नांबद्दल त्याला असणारी आपुलकी त्याच्या विनोदी बोलण्यातूनही सहज वावरत होती. हास्यविनोदातून त्याची टॉयलेट विषयातली तळमळ आणि त्या विषयाचं गांभीर्य सोप्या शब्दांत तो लोकांपर्यंत पोचवत होता.

हाच तो टॉयलेट मॅन जॅक सीम हे नंतर कळतं. मुंबईत नुकतीच झालेली वर्ल्ड टॉयलेट समिट यानेच आयोजित केली होती. अशा १८ इंटरनॅशनल समिट आयोजित केल्यात. त्याला आपण टॉयलेट वेडा म्हणुयात हवं तर. त्याचं त्याला वाईट नाही वाटणार. उलट त्याला ते जास्तच आवडेल. डोळे मिचकावत त्याला हे नाव आवडल्याचं हसत तो कबूलही करेल.

चाळीशीत आयुष्याचा काऊंटडाऊन सुरू

सिंगापूरमधे १६ व्यवसाय, चार मुलं आणि एक बायको एवढं पदरात असताना वयाच्या चाळीसाव्या वर्षी जॅकला प्रश्न पडला, आता भरपूर पैसा कमवून करायचं काय? साधारण ऐंशीव्या वर्षी माणूस मरतो. आता आपल्या हातात चाळीस वर्षं उरली आहेत. या ४० वर्षांत असं काहीतरी केलं पाहिजे, जे पैशांपेक्षा जास्त मौल्यवान असेल. ते नेमकं काय याचं उत्तर ‘सेवा’  या शब्दाने त्याला मिळालं. पण ती सेवा लोकांसाठी महत्त्वाची असायला हवी. अशी सेवा जी फारसं कोणी करत नाही अशा दुर्लक्षित विषयावर आधारीत हवी. या सारा शोध टॉयलेटपर्यंत येऊन पोचला.

समिटसाठी मुंबईत आलेले असताना कोलाजशी बोलताना जिम यांनी टॉयेलट हाच विषय निवडण्याचं कारण सांगितलं. तो सांगतो, टॉयलेट हा लोकांच्या तिरस्काराचा विषय. त्याबद्दल ते बोलणं टाळतात. पण टॉयलेट स्वच्छ नसेल किंवा टॉयलेट नसेलच तर लोक काय करतात? त्यांना त्रास सहन करावा लागतो. मात्र या विषयाचा त्यांना किळस वाटते. म्हणून हाच विषय मी माझ्या सेवेसाठी निवडला.

जॅकने त्याच्या मोबाईलवर काऊंट डाऊन लावलाय. चाळीसाव्या वर्षी त्याने आय़ुष्याचा हिशेब केला. तेव्हा आपल्या आयुष्यात आता किती वेळ उरलाय हे कळावं यासाठी काऊंट डाऊन लावलाय. आज ६१ वर्षांचा असलेला जॅक हा काऊंट डाऊन दाखवतो. तो सांगतो, सगळ्यात किंमती आहे वेळ. ती आपण पैशांसारखी सेव करून ठेवू शकत नाही. म्हणूनच मी सेवेसाठी अत्यंत किंमती गोष्ट इनवेस्ट केलीय.

हगण्यावर हसण्याची संधी

हसण्याविषयी त्याचं जगावेगळं तत्त्वज्ञान आहे. तो म्हणतो, `सुरवातीला लोक माझ्यावर भरपूर हसले. पण लोक हसतात, तेव्हा ते मोकळे होतात. हसताना लोकांचे डोळे मोठे होतात. थोडक्यात नवीन स्वीकारण्यासाठी त्यांचं शरीर आणि मन तयार होतं. माझ्यावर लोक हसायचे तेव्हा मीसुद्धा स्वतःवर हसून घेतलं. लोकांबरोबर हसण्यात सहभागी झालो. तेव्हा मला माझी लाज वाटत नव्हती. मी त्यांचं माझ्यावर हसणं स्वीकारलं होतं.

हगण्यावर हसणं ही जॅकने एक संधी बनवली. तो सांगतो, मला माझा विषय त्यांच्याकडे मांडायचा होता. माझ्यावर हसण्यात मीच त्यांच्यातला एक झालो. मग त्यांनी मला स्वीकारलं. म्हणजे त्यांनी माझं बोलणं ऐकलं. मला तेच आणि तेवढंच हवं होतं. माझा विषय मला त्यांच्यासमोर मांडायचा होता. त्यात मला यश आलं.

त्याचं हे टॉललेट पुराण इथेच थांबत नाही. तो सांगतो, `टॉयलेटमधे माणसं मोकळी व्हायला जातात आणि तिथून आयडीया घेऊन येतात.` पण  संडास या विषयावरच्या संघटनेची आयडीया टॉयलेटमध्ये सुचलेली नाही. जॅकने टॉयलेटचं कॅम्पेन जाणूनबुजून विनोदी केलं. त्याने कमोडवर बसलेला स्वतःचा फोटो कॅम्पेनसाठी वापरला. त्याच्या कॅम्पेनमध्ये त्याने जेम्सबॉण्ड ऐवजी स्वतःचा फोटो वापरुन त्यावर रॉयल फ्लश असा टॅग लिहिलाय. त्याने विनोदातून लोकांशी संवाद साधला. लोक गंभीरपणे विषय मांडतात, तो लोकांपर्यंत पोचत नाही. विनोदातून मात्र तो सहजपणे पोचतो, असा जॅकचा अनुभव आहे.

भारतही तयार नव्हता टॉयलेट डेसाठी

आज वर्ल्ड टॉयलेट डे हा जगभर पॉप्युलर झालाय. ती कल्पनाही जॅकचीच. त्याला सगळ्यात जास्त नकार यासाठीच मिळालेत. अनेक वर्ष अनेक देशांनी यासाठी नकार दिला. त्यात भारतही होता. २०१३ सालात भारतातल्या यूपीए सरकारने भारतात वर्ल्ड टॉयलेट डे  दिवस साजरा करण्याच्या पत्रकावर सही करायला नकार दिला होता. कारण हा दिवस इंदिरा गांधींचा वाढदिवस आहे. भाजपचं सरकार आल्यानंतर तो प्रस्ताव घेऊन जॅक थेट नरेंद्र मोदींकडे गेला. त्यांना सांगितलं, गांधीजींनी म्हटलंय सॅनिटेशन इज इम्पॉर्टंट दॅन इंडिपेंडन्स. त्यांना ते पटलं. आणि भारताची सही झाली. पुढे तर त्यांनी सरकारच्या अजेंड्यावर हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून घोषित केला.

मोनॅको देशाचा १९ नोव्हेंबर हा राष्ट्रीय दिवस. त्यांच्या राजपुत्राचा वाढदिवस. तेव्हा तिथेही नकार दिला. पण जॅकने तिथल्या अधिकाऱ्यांना समजावलं, तुमचा राजपुत्र पाण्यातले खेळ खेळतो. टॉयलेट नसेल तर चांगला खेळाडू परफॉर्म करू शकणार नाही. वर्ल्ड टॉयलेट डे ही संकल्पना त्यांना आवडेल. एकदा बोलून बघा. अधिकारी राजपुत्राशी बोलले. राजपुत्राने  सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे तिथेही १९ नोव्हेंबरलाच वर्ल्ड टॉयलेट डे साजरा होतो.

या खटपटींविषय़ी जॅक सांगतो, `युनायटेड नेशन्सने १९ नोव्हेंबर हा दिवस वर्ल्ड टॉयलेट दिवस म्हणून जाहीर करावा, यासाठी मी अनेक खेटा घातल्या. पण कोणी माझं ऐकलं नाही. या विभागाचा मंत्री निवडणुकीत पडला, तेव्हा मी त्याला माझ्या एका कार्यक्रमाला आमंत्रित केलं. त्याने मोठा इवेंट पाहिला. नंतर त्याने सचिवाला अर्धा तास वेळ देण्याची विनंती केली. प्रत्यक आमची बैठक दीड तास चालली. अखेरीस आपण युनायटेड नेशन्सचा अधिकृत वर्ल्ड टॉयलेट डे साजरा करतोय.` 

शिक्षा झाली तरी बेहत्तर

१९९८ मध्ये जॅकने रेस्टरूम असोसिएशन सुरू केली. त्यानंतर लक्षात आलं, या विषयावर काम करणाऱ्या अनेक असोसिएशन आहेत. ज्यांना हेड क्वार्टर नव्हतं. मग त्याने वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनयाजेशन सुरू केली. डब्ल्यूटीओ हे अब्रिवेशन वापरुन तो जाहीरपणे सांगत फिरू लागला, ‘मी हे अब्रिवेशन वापरणारच. त्यासाठी मला शिक्षा झाली तरी बेहत्तर’. पण तसं काही झालं नाही. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेनचं अब्रिवेशन म्हणून जसा डब्ल्यूटीओचा स्वीकार लोकांनी केला, तसाच वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनयाझेशनचाही स्वीकार केला. मला शिक्षाही झाली नाही, जॅक हसत सांगतो.

सेवा देण्याच्या त्याच्या या विचारामागे कोणती बैठक किंवा तत्त्वज्ञान कोणतं हे विचारलं तेव्हा जॅक मनमोकळं बोलला. सिंगापूरमध्ये अशी कोणतीही एक विचारसरणी नाही. योगामध्ये असं मानलं जातं की तुम्ही रिते झाल्याशिवाय तुम्हाला ध्यान करता येत नाही. तोच विचार तू टॉयलेटबद्दल सांगतोयस का, असं विचारलं तेव्हा त्यानेही त्याला प्रसन्नपणे दुजोरा देत सांगितलं, ‘योग करताना मलादेखील स्वतःला लक्ष केंद्रीत करता येत नव्हतं. मी माझ्या गुरुंना स्वामी चिदानंद सरस्वतींना तसं विचारलं. मला लक्ष केंद्रीत करता येत नाही. तेव्हा गुरुंनी सांगितलं. जे एका विषयावर लक्ष केंद्रीत करुन तुझं त्या दिशेने काम सुरू आहे. ते म्हणजेच लक्ष केंद्रीत करणं. तू एकाग्र होऊ शकला आहेस. जॅक सांगतो तेव्हा लक्षात आलं कोणत्याही लाल रंगाच्या ठिपक्याकडे लक्ष केंद्रीत करुन विचारशून्य होणं म्हणजे एकाग्र होणं नसतं. हे लक्षात आल्यावर माझं काम आणखी निष्ठेने करू लागलो.‘

जॅक सांगतो लोकांना एखाद्या विषयाचं महत्त्व सांगायचं असेल तर ते त्यातून येणाऱ्या उत्पादकतेशी जोडावं लागतं. म्हणजे लोक त्याचा विचार करायला लागतात. उदाहरणार्थ  देशातले टॉयलेट कमी असतील तर लोकांचा अधिक वेळ टॉयलेटच्या रांगेत जाईल, अस्वच्छ टॉयलेट वापरल्याने लोक आजारी पडतील. त्यातून त्यांची उत्पादकता कमी होईल, ज्याचा परिणाम जीडीपीवर होईल. असं सांगितलं की लोक लगेच टॉयलेट बांधण्याचा विचार करतात.

टॉयलेटकडे कसं बघावं?

रेनबो कॅम्पेनबद्दल सांगताना जॅकने एक उदाहरण दिलं. एक चांगल्या सोयी सुविधा पुरवणारी शाळा होती. तिथे टॉयलेट नव्हते. तिथल्या शिक्षक आणि प्रिन्सिपलला त्यांनी सांगितलं, टॉयलेट नसेल तर मुलांचं अभ्यासात, खेळात लक्ष लागणार नाही. आपण एक टॉयलेट बांधू आणि त्याचा मुलांच्या कामगिरीवर होणारा परिणाम बघू. शाळेत टॉयलेट आलं. मुलांच्या कामगिरीवर परिणामही दिसला. तो एक टॉयलेट बांधून देणं आर्थिकदृष्ट्या शक्य होतं. त्यांच्याकडे आहे आपल्याकडे नाही. या तुलनेमुळे शाळाशाळांमधे टॉयलेट आले.

जॅकला त्याच्या या कामाची लाज वाटत नाही. तो सांगतो मला आनंद मिळतो या कामातून. शौचालयाच्या कामाकडे पुरुषी वृत्तीतून नाही. तर स्त्रियांच्या वृत्तीतून पाहिलं पाहिजे. वडील कुटुंबाचं यश असतात. पण आई ही यशाची निर्माती असते. मी यशाचा निर्माता होण्याला अधिक महत्त्व देतो.

दिवसाचे २४ तास आणि प्रत्येक सेकंद या विषयावर समर्पित करणाऱ्या जॅकवर हॉलिवूडमध्ये टॉयलेटमॅन नावाने एक चित्रपटही येणार आहे. जॅक सांगतो टॉयलेट हा फक्त सामाजिक विषय नाही. त्याच्याशी अर्थकारण आणि राजकारणही जोडलेलं आहे. जॅकने त्यातला पैसा ओळखलाय. त्यादृष्टीने पार्टनर आणि स्पॉन्सररही मिळवलेत. थोडक्यात, टॉयलेट या शब्दातला बिझनेस ओळखून त्याचं सामाजिक काम उभं केलंय. पण त्याच्या या सामाजिक कामाने भारतासह अनेक देशांच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालंय.