जरी आंधळे आम्ही, तुला पाहतो रे

२३ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


तुला पाहते रे सुबोध भावेची ही झी मराठीवरची ही सिरियल सध्या तुफान गाजतेय. पण ती जितकी टीवीवर गाजतेय, त्याहीपेक्षा सोशल मीडियावर दणादण वाजतेय. त्याची फिरकी घेणाऱ्या, टीका करणाऱ्या अनेक पोस्ट वायरल होत आहेत. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि वॉट्सअपवरही गाजत आहेत. निमित्त आहे सरंजामेंच्या लग्नाचं.

तुला पाहते रे या टीवी सिरियलबद्दल गेल्या काही दिवसांत टीका करणाऱ्या अनेक पोस्ट वायरल झाल्या. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि वॉट्सअपवरही गाजल्या. सुबोध भावेसारख्या मराठीतल्या आघाडीच्या अॅक्टरला घेऊन करण्यात आलेली झी मराठीवरची ही सिरियल सध्या तुफान गाजतेय. महिलांसोबत पुरुषांमधेही या सिरियलची चर्चा आहे.

या तुफान लोकप्रियतेसोबतच टीकेची धनी होणाऱ्या तुला पाहते रेबद्दल महिला, पुरुषांशी चर्चा केली. त्यानंतर मला मिळालेली उत्तरं जितकी रंजक होती, तितकीच विचार करायला लावणारीही होती.

सुरवात सुरवातीपासून

ज्यांना तुला पाहते रेबद्दल काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी थोडसं. जर तुम्हाला तुला पाहते रे सिरियलबद्दल काहीच माहीत नसेल, तर सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. तुम्ही सुखी आहात. पण जर ट्रेन किंवा बसमधे तुम्हाला सरंजामे किंवा निमकर किंवा अगदी सर सर हे शब्द सातत्यानं एका चर्चेत ऐकू आले असतील, तर ती चर्चा तुला पाहते रेवरच सुरु आहे, हे लक्षात घ्या. काय आहे हे सरंजामे आणि निमकर प्रकरण?

सरंजामे आणि निमकर, अशी दोन कुटुंब झी मराठीवरच्या एका सिरियलमधे दाखवण्यात आलीत. या सिरियलचं नाव आहे तुला पाहते रे. यात सरंजामे म्हणजे प्रचंड श्रीमंत घराणं तर निमकर म्हणजे गरिबातलं अत्यंत गरीब कुटुंब. श्रीमंत घरातल्या वयस्कर विक्रमला गरीब घरातली लहानशी ईशा आवडते.

इशा म्हणजेच गायत्री दातार आणि विक्रम म्हणजेच आपला सुबोध भावे यांच्या वयातलं अंतर खूप असल्याचं सिरियलमधे दाखवण्यात आलंय. पण प्रेमाला वय नसतं आणि अक्कल कोणत्याही वयात येऊ शकते, या थिअरीवर संपूर्ण सिरियल, त्यातली पात्रं, प्रसंग दर आठवड्याला साडेआठ वाजता झी मराठीवर मनोरंजन करण्यासाठी येतात.

हेही वाचाः महागुरू सचिन पिळगावकरांना लोक शिव्या का घालतायंत?

काय आहे ते रिअलायझेशन

काहीही हां श्री म्हणणारी जान्हवी जशी वॉट्सअपवरुन लगेच वायरल झाली होती. तशीच तुला पाहते रे मिम्सच्या दुनियेत तुफान गाजतेय. इतकी की त्याच्या बातम्याही होत आहेत. 

तर मुद्दा असा की, गेल्या काही दिवसात तुला पाहते रेचे मिम्स मोठ्या प्रमाणात शेयर झालेत. त्यामुळे आपसूकच तुमच्याही न्यूज फीडमधे ते दिसले असतीलच. याचा अर्थ असा की, तुला पाहते रेवर होणारी टीका लोकांना आवडतेय. सिरियलवर झालेली चेष्ठा लोक चवीनं चघळतात. तुला पाहते रेची चेष्टा फक्त सोशल मीडियातच होतेय, असं नाही. सर्वसामान्य प्रेक्षक तुला पाहते रे आता हसण्यावारी घेतोय, हे नाकारुन चालणारच नाही.

हा घ्या पुरावा

अनेक बायकांशी मी रस्त्याने येता-जाता तुला पाहते रेचा विषय काढला. यावर बायका इतक्या भरभरुन बोलल्या की त्यावर प्रबंध लिहला जावू शकतो. पण त्यातल्या दोन प्रतिक्रिया काहीशा अशा होत्या.

पहिली बाई, असं कुठं असतं का. काहीही दाखवतात सिरियलमधे. इतकं अतिही दाखवू नये.

दुसरी बाई, या पुरुषांचं असंच असतं. सगळे त्या विक्रमसारखेच असतात. लग्नाचं वय असतं तेव्हा मजा मारायची. आणि लग्नाचं वय सरल्यानंतर मुलगी मात्र धुतल्या तांदळासारखीच हवी.


दुसऱ्या काकूंना मी सांगत होतोच, की विक्रांतने त्याच्या लग्नाच्या वयावेळी काय मजा मारली हे दाखवलं नाहीच आहे, सिरियलमधे. पण हे सांगेपर्यंत काकूंची बस आली आणि त्या सिरियलची वेळ होतेय, घरी सगळं साडेआठच्या आधी आटपून घ्यायचंय, असं म्हणून घाईघाईत निघून गेल्या. 

बायकांना ईशा आणि विक्रांतच्या लग्नाचा दोन तासाचा महाएपिसोड काही केल्या चुकवायचा नव्हता. सोमवारी प्रत्येक ऑफिसात पुरुषांमधे एकच चर्चा होती. ते दोन तास तू घरी थांबला होतास की बाहेर गेला होतास. काही पुरुषांनी ईशा आणि विक्रांतच्या लग्नाचा एवढा धसका घेतला होता, की त्यांच्या बायकांना घरी मन एकाग्र करुन सिरियल कशी पाहता येईल, यासाठी आधीच प्लान आखले होते. हा गंमतीचा भाग किंवा अतिशयोक्ती वाटेल, पण खरंच असं घडलेलं आहे.

हेही वाचाः कादर खान: झीरोतून हीरो बनलेला लाखमोलाचा माणूस

पुरुषांना एकूणच कोणत्याच सिरियलमधे फारसा रस नसतो. त्यांचा रस इशासारख्या किंवा शनायासारख्या मुलींमधेच असतो, यावर समस्त महिला मंडळाचं एकमत आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात तर दोन तासाचा महाएपिसोड रेकॉर्ड करुन वारंवार पुरुषांना दाखवता कसा येईल, याची काळजी महिलांनी घेतलीय.

पुरुषांमधे आणि बायकांमधे या सिरियलची चर्चा वेगवेगळ्या लेवलवर होते, हे आता आपल्याला चांगलंच कळालंय. पुरुष सिरियलच्या लॉजिकल गोष्टींवर बोलतात, त्यावेळी ते लॉजिक बायकांनाही पटतं. पण बायका ईशाच्या लग्नाची साडी, त्यांचं ग्रॅण्ड वेडिंग असा भरभक्कम पॉईन्ट घेऊन भांडतात, तेव्हा पुरुषांचा युक्तीवाद बायकांची मन जिंकण्यात कमी पडतो.

ऑन अ वेरी सिरियस नोट

तुला पाहते रे ही सिरियल अतिरंजित, वाढीव आणि उगाच आहे. सुबोध भावेसारख्या अॅक्टरला अशा प्रकारच्या भूमिका करताना पाहणं, हे त्याच्या इतर दर्जेदार भूमिकांचा चाहता असणाऱ्या प्रेक्षकाला कितपत रुचेल, याची जरा शंकाच वाटते. सातत्यानं बायोपिक करणाऱ्या सुबोध भावेवरचे मिम्स सोशल मीडियावर गाजले.

माझा कट्टावर सुबोध भावे जेव्हा घाणेकरचं प्रमोशन करायला आला होता, त्यावेळी त्याने अॅक्टिंगबद्दलची त्याची परखड मतं मांडली. काठावर नापास होणाऱ्या सुबोध भावेला विक्रांत सरंजामेची भूमिका का साकारवीशी वाटली, हा प्रश्न अस्वस्थ करणार आहे. साधारणतः सिरियलमधे अॅक्टिंग हा अर्थाजनासाठीच केला जातो, असं म्हणतात. तसं असेल तर सुबोधची निवड योग्यच आहे. पण अशातही अनेक चांगल्या इनिंग खेळलेला बॅट्समन वाईट इनिंग कशी खेळायची, याचीच काळजी जास्त घेतो. तशी ती सुबोधनेही घ्यायला हवी.

अतिरंजित, वाढीव आणि उगाच

तुला पाहते रे ही वाढीव आणि अतिरंजित कल्पना दाखवणारी एकमेव सिरियल नाही. झी मराठीवर काल्पनिकतेचा कहर करणाऱ्या अनेक सिरियल याआधीही येऊन गेलेल्यात. पण अशातही काही सामान्य गोष्टींबाबत अक्षम्य चुका कधी कधी सिरियल बनवणाऱ्यांकडून होताना पाहायला मिळतात. माझ्या नवऱ्याची बायकोमधे कोट्यवधींचा टर्न ओवर अवघ्या काही वर्षात करणारी राधिका मसाले, हे अतिशयोक्तीचं उत्तम उदाहरण आहे.

ईशाचं घर तुला पाहते रेमधे इतकं गरीब दाखवलंय, की ते बघून डायरेक्टर, प्रोड्यूसर आणि एकूणच टीमची कीव येते. पण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मुंबईतल्या चाळीत राहणारे लोक अतिशय गरीब आणि बिच्चारे असतात, हे चुकीचं प्रतिबिंबित केलं जातं आणि त्यावर कुणालाच काही आक्षेपार्ह वाटत नाही, हे विशेष.

लाख रुपयांत जिथं लग्न होतात त्याच महाराष्ट्रात लाख दीड लाख रुपयाची फक्त पत्रिकाच विक्रम सरंजामे यांनी लग्नात छापली. हे अतिशयोक्तीचं दुसरं उदाहरण. म्हणजे करोडो रुपयांचा टर्नओवर असलेल्या सरंजामेंनी सामुहिक विवाह सोहळ्यात जावून लग्न केल्याचं झी मराठी आपल्याला दाखवेल, अशी अपेक्षा करणं चूक नाही तर काय? ग्रॅण्ड लग्न काय फक्त टाटा, अंबानी आणि बिर्लांनी करायची का? मराठी माणसानं लग्नावर पोटभर खर्च केला, तर चुकलं कुठं असा युक्तीवाद सिरियल बनवणाऱ्यांनी केला तर आश्चर्य वाटायला नको. 

विक्रमी पाहिली जाते रे

तुला पाहते रे झी मराठीवरची सध्याची नंबर वन रेटिंग देणारी सिरियल आहे. या सिरियलनं ओपनिंगच जोरदार केलं होतं. ओपनिंग रेटिंगमधे तुला पाहते रेने माझ्या नवऱ्याची बायकोलाही मागे टाकलं होतं. या सिरियलनं दहापर्यंत रेटिंग मिळवलं. दहा म्हणजे खूपच झालं. हिंदीतही कोणत्या सिरियलला इतकी पसंती क्वचितच मिळते. यावरुन तुला पाहते रे किती मोठ्या संख्येनं महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात बघितली जात असेल, याची कल्पना येईल.

सध्या ही टॉप रेटिंग असणारी प्राईम ट्राईम स्लॉटमधली मराठीतली नंबर वन सिरीयल आहे. डिजिटलच्या जमान्यात तुला पाहते रे नंबर वन होते, याचं अनेकांना नवल वाटंल. पण यात आश्चर्यकारक काहीच नाही. तुम्ही आता इंटरनेटवर हा लेख वाचत असाल, तिकडे ती इशा आणि विक्रम नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टारवर कोणती वेब सीरिज पाहायची हा विचार करत असतील. या सगळ्यात महाराष्ट्रातली ती तमाम जनता ज्यांच्याकडे अजून धड थ्रीजी आलेलं नाहीये आणि आलंच असेल तर ते वापरण्याची टेक्नॉलॉजी गवसली नाहीये, असा वर्ग करमणूक करण्यासाठी तुला पाहते रेच बघतो. 
असं का होतं, हे मी तज्ञ्जांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचाः तीन पैशांच्या तमाशासाठी `भाई`वाल्यांची सोईस्कर अस्मिताबाजी

वेब सिरीजच्या जमान्यात तुला पाहते रे सिरियलबद्दल तुम्हाला काय वाटतं. कशामुळे ही सिरियल यशस्वी झाली.

तुला पाहते रे ही तद्दन फालतू सिरियल आहे. पण घरात चारचौघात बसून बघण्यासारखी आहे. सर्वसामान्य माणसाची करमणूक करण्यासाठी जे जे लागतं, तो सगळा मसाला या सिरियलमधे आहे. वेबसिरिजच्या जमान्यात ज्यांच्याकडे मालिकांचा दर्जा उंचावण्याची क्षमता आहे, त्यांच्याकडून तुला पाहते रेसारखी सिरियल होणं, हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल. पण सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं असतं आर्थिक गणित. ते उत्तम कसं सांभाळायचं, हे झी मराठीला माहीत आहे. त्यामुळे दर्जा सोडा, मी त्यांच्याजागी असतो, तर कदाचित मीही अशीच सिरियल बनवली असती.
- प्रशांत जाधव, संपादक, टाईम्स नाऊ मराठीची वेबसाईट

प्रेक्षक सुजाण आहे, खरंच?

लोकांना काहीही दाखवा, ते बघतातच, असं होत नाही. किमान टीवीत तरी नाही. चटकदार, खुसखशीत आऊट ऑफ द बॉक्स देणारेच टीवी इंडस्ट्रीत टिकतात. झीला प्रेक्षकांची नस चांगली ओळखता येते. पण प्रेक्षक झीपेक्षा जास्त सुजाण आहे. तुला पाहते रे बघणारे प्रेक्षक फार विचार करुन सिरियल पाहणाऱ्यांपैकी नाहीत,हे नक्की. ते मज्जा म्हणून सीरियल पाहतात. टाईमपास होतो, म्हणून बघतात. इतर सिरियल त्याहूनही वाईट आहेत, त्यातल्या त्यात ही बरी म्हणून ते झी लावतात आणि मज्जा म्हणून दिवसभर त्यावर गप्पा हाणतात... हा सर्वसामान्यांच्या मजेचा भाग आहे. हा तोच प्रेक्षक आहे, ज्याला आपण सुजाण म्हणतो. ज्याला भलंबुरं सगळं कळतं.

शेवटाकडे जाताना

‘ती इशा सरंजामेपेक्षा वयाने लहान आहे. तरीही म्हणते तुला पाहते रे. थेट अरे तुरे. संस्कारच नाहीत.’ हे मी नाही तर मंदार भिडे बोलत होता. मंदार भिडे इंग्रजीत स्टॅण्डअप कॉमेडी करणारा मराठी मुलगा. जो हल्ली हल्ली मराठीतही स्टॅण्डअपही करु लागलाय. तुला पाहते रे पेक्षा भिडे जास्त मनाला भिडतो. कारण तो अतिशयोक्ती करत नाही. जे नाही ते दाखवत नाही, जे जसं आहे ते तेसं बोलतो, तसं मांडतो. झी मराठी याच्या बरेब्बर उलट आहे.

झी मराठीचं दुकान प्रेक्षकांना स्वप्न दाखवतं. त्याला ते मनोरंजनाच्या नावाखाली विकतात. अतिरंजित, वाढीव स्वप्न आपल्याकडे खूप आणि भारी किंमतीत विकली जातात. प्रेक्षक त्याला झेपतंय तो पर्यंत ते स्वप्न बघतो. त्या स्वप्नासोबत हसतो, रडतो, खिदळतो आणि त्यावर चर्चा करतो. झेपायच्या पलिकडे गेलं की तो तुला पाहते रे वरुन लस्ट स्टोरीज किंवा मग सक्रेड गेम्स किंवा अगदी नार्कोसचाही नाद करायला मागे पुढे पाहत नाही.

तो तुला पाहते रे आज बघतोय. उद्या बघेलच याची काही गॅरंटी नाही.

सब बढिया है

सुई धागा सिनेमात, वरुण धवन सारखं सब बढिया है, असं म्हणत असतो. प्रचंड हलाखीची परिस्थिती आहे, नोकरीवरुन त्याला काढलंय, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, तरीही वरुण धवन सब बढिया है असंच म्हणतो. दाही दिशांनी अडचणींनी वेढलेलंय, अशातही तो सब बढिया है असंच म्हणत राहतो. आतून किती पोखरलेलाय, हे त्याला माहिती आहे. पण बाहेरुन तो तसं कधीच दाखवत नाही.

झी मराठी आणि एकंदर मराठी मालिकांच्या बाबतीचही हेच झालंय.  फक्त मराठीच नाही तर जवळपास हिंदीतल्याही बहुतांश मालिकांचही तसंच आहे. बनवणाऱ्या सगळ्यांना त्याच्या दर्जाबद्दल माहीत आहे. पण कुणीच त्याचा दर्जा सुधारण्यावर बोलत नाही. त्यावर काम करताना दिसत नाही. त्यामुळे जे चाललंय ते बढिया है, असं वरवर म्हणायला ठिक आहे. मात्र आतून ते किती घटीया आहे, हे बनवणाऱ्यांनाही माहीत आहे आणि बघणाऱ्यांनाही.

हेही वाचाः 

लाखमोलाच्या टाटा नॅनोचं नॅनो लाईफ

सेन्सॉर नावाचं मांजर आपल्या आडवं का येतं?

क्रिकेटची पिढी घडवणाऱ्या आचरेकर स्कूलची स्टोरी

स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ