विजय शंकर अंबाती रायुडूची ४ नंबरची जागा घेऊ शकेल?

१८ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


सध्या निवडणुका आणि वर्ल्डकप हेच दोन चर्चेचे विषय आहेत. कुठे खासदारांच्या निवडीची चर्चा आहे, तर कुठे टीम इंडियाच्या निवडीची. महत्त्वाच्या ४ नंबरच्या जागेसाठी अंबाती रायुडूसारख्या गुणी खेळाडूचा पत्ता कट झालाय. पण विजय शंकर त्या जागेला न्याय देऊ शकेल का?

भारत विरुद्ध न्यूझीलंड या पाचव्या एकदिवसीय सामन्यात पहिली बॅटिंग करणाऱ्या भारतीय क्रिकेट टीमची सुरवात अतिशय खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा वैयक्तिक दोन रनवर तर शिखर धवन सहा रन करून आऊट झाला. त्यापाठोपाठ शुभमन गिल सात आणि धोनी एक रन करून माघारी परतले. ४ विकेटवर १८ रन अशी बिकट अवस्था भारताची झाली होती. 

या कठीण परिस्थितीत अंबाती रायुडूने ९० रन्सची झुंझार इनिंग खेळली आणि भारताने ५० ओवरमध्ये २५२ रन्सचा पल्ला गाठला. रायुडूच्या खेळीने भारताने सन्मानजनक आव्हान उभं केलं आणि मॅचही ३५ रननी जिंकली. 

रायुडूचं चुकलं तरी काय?

या मॅचमधली निर्णायक आणि मॅचविनिंग खेळी रायुडूचीच ठरली. त्यावेळी वर्ल्डकपसाठी भारतीय संघ चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन म्हणून रायुडूकडे पाहत होतं. गेल्या वर्षभरापासून वनडेत त्याला याच क्रमांकावर बॅटिंगसाठी पाठवलं जात होतं. 

रायुडूनं वनडेवर लक्ष केंद्रित करता यावं यासाठी रणजीतले ४ दिवसीय सामने खेळणंही सोडलं होतं. आपल्या बॅटिंगनं त्याने वर्ल्डकप टीममधल्या आपल्या चौथ्या स्थानावर पकड मजबूत केली होती असं वाटू लागलं. 

हेही वाचा: क्रिकेटची पिढी घडवणाऱ्या आचरेकर स्कूलची स्टोरी

मात्र ३ फेब्रुवारी ते १५ एप्रिल दरम्यान असं काय बदललं की भारतीय निवड समिती आणि कॅप्टन कोहलीने रायुडूवरील विश्वास गमावला. ज्यामुळं त्याचं वर्ल्डकपचं तिकीट कापलं गेलं. त्याच्याऐवजी भारतीय टीममधे चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरची निवड करण्यात आलीय.

विजय शंकर योग्य की अयोग्य?

विजय शंकरच्या निवडीमुळे भारतीय टीमचा चौथ्या नंबरच्या बॅट्समनचा प्रश्न सुटला आहे का? वर्षभर रायुडूवर भारताने जो विश्वास दाखवला तो चुकीचा आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

विजय शंकरच्या निवडीवर निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणतात, ‘चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आम्ही चौथ्या क्रमांकासाठी बरेच पर्याय तपासले. रायुडूलाही अनेक संधी दिल्या. विजय शंकर थ्री डायमेन्शनल क्रिकेटर आहे. अर्थात त्याच्याकडे क्रिकेटच्या तिन्ही बाजू म्हणजे बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग सांभाळण्याची क्षमता आहे. त्यामुळे नंबर चारवर बॅट्समन पहिला पर्यास म्हणून त्याच्याकडे पाहात आहोत.’ 

याचाच अर्थ विजय शंकर बॅटिंग ऑलराउंडर म्हणून निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटच्या गणितात फिट बसतो. रायुडू ज्या गोष्टी करू शकत नाही ते विजय शंकर करू शकेल असा विश्वास निवड समितीला आहे. 

हेही वाचा: मदतीला धावून येणाऱ्या टीम मॅनेजमेंटकडून नंतर वासीम जाफरने पैसेही घेतले नाहीत

चौथ्या नंबरला का एवढं महत्त्व?

वनडे क्रिकेटमध्ये चौथ्या नंबरवर बॅटिंगसाठी येणाऱ्या बॅट्समनला विशेष महत्त्व असतं. बॅटिंग करताना सुरवातीला झटपट विकेट गेल्या तर इनिंगला आकार देण्याचं आणि लोअर मिडल ऑर्डरच्या बॅट्समनला घेऊन इनिंग खेळण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर पडते. तसंच गरज पडल्यास रनची गती वाढवण्याची क्षमताही असावी लागते. 

करियरच्या सुरवातीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चौथ्या नंबरवर बॅटिंग करत जबाबदारी योग्यरित्या पार पाडली होती. याशिवाय युवराज सिंग, राहुल द्रविड, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अजहरूद्दीन हेसुद्धा चौथ्या क्रमांकावरील यशस्वी बॅट्समन ठरले होते. ब्रायन लारा, इंझमान ऊल हक, जॅक कॅलिस, एबी डिविलियर्स, केविन पीटर्सन, मार्टिन क्रो, ग्रॅहम पोलॉक, जावेद मियांदाद, ग्रेग चॅपेल या बॅट्समननी चौथ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येत आपापल्या टीमच्या विजयात वारंवार मोलाचं योगदान दिलं होतं. त्यामुळंच ते जगातील सर्वोत्तम क्रिकेटर म्हणूनही गणले जातात. 

हेही वाचा: आता वर्ल्डकपसाठी धोनीला टाळता येणार नाही

विजय शंकरबद्दल शंका 

चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनचं वेगळं महत्त्व असतं. त्याला इनिंग सावरत सेंच्युरीही मारावी लागते. ही क्षमता विजय शंकरमधे आहे का? अशी प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होईल. 

विजय शंकरच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह नाही. तो बॅटिंग करू शकतो, त्याच्याकडे सगळे शॉट्स मारण्याची क्षमताही असेल. फास्ट आणि स्पिन बॉलर्सचा तो नेटाने सामनाही करू शकतो. मात्र टॉप आर्डर अपयशी ठरली तर मोठी खेळी खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे का? मॅचचे चित्र पालटणारी सेंच्युरी तो मारू शकतो? 

अवघ्या ४ महिन्यात विजय शंकरने मोठी भरारी घेतलीय. वनडेतील पदार्पण ते वर्ल्डकप टीममधे निवड असा त्याचा यशस्वी प्रवास झालाय. आतापर्यंत ९ वनडे मॅचमध्ये त्याने सरासरी ३३.०० ने रन केलेत. यामधे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४६ हा त्याचा सर्वाधिक स्कोर आहे. या मॅचमधे त्याने कोहलीलाही रन स्कोअरिंगच्या बाबतीत मागे टाकलं होतं. या ९ मॅचमधे बऱ्यापैकी चांगली बॉलिंगही केली. मात्र यावरून तो वर्ल्डकपमध्येही अशीच कामगिरी करेल हे जज करणं चुकीचं ठरेल. 

हेही वाचा: पुरे झाली आता विराट कोहलीची कॅप्टनशिप?

इंग्लंडच्या बॉल स्विंग होणाऱ्या पीचवर खेळण्याचं तंत्र विजय शंकरकडे आहे का? विजय शंकर भारतातील सर्वोत्तम ४ नंबरचा बॅट्समन आहे का? असे प्रश्न निर्माण होत आहेत. टीममधे समतोल असला पाहिजे, असा कॅप्टन कोहलीचा गेल्या काही महिन्यांपासून आग्रह होता. 

वर्ल्डकप टीममधे ऑलराऊंडर महत्त्वाचे

न्यूझीलंड दौरा सुरू होण्याआधी कोहलीने जगातील बेस्ट टीमकडे सर्वोत्तम दोन ऑलराउंडर आहेत या गोष्टीकडे लक्ष वेधलं होतं. विजय शंकर आणि हार्दिक पांड्याच्या निवडीमुळे कोहलीला दोन ऑलराउंडर वर्ल्डकप टीममधे मिळालेत. 

शंकर, पांड्या, केदार जाधवची निवड झाल्सास कोहलीकडे ७ बॉलरचा पर्याय असेल. मात्र हे गरजेपेक्षा जास्त बॉलर तर नाही ना? त्यामुळे विजय शंकरऐवजी एका बॅट्समनला टीममध्ये घेतलं असतं तर नक्कीच फायदा झाला असता, असंही म्हटलं जात आहे. 

हेही वाचा: विनू मंकड महान क्रिकेटर, त्यांना फक्त मंकडिंगसाठी लक्षात ठेवणार?

टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीच्या ऑलराउंड निवडीकडे सकारात्मक दृष्टीनेही पाहता येईल. १९८३, २०११ साली भारताने वर्ल्डकप जिंकला तेव्हा बॅटिंगसह बॉलिंग करू शकणारे क्रिकेटर टीममध्ये होते. १९८३च्या टीममध्ये रवी शास्त्री, मदनलाल, रॉजर बिन्नी तर २०११च्या टीममध्ये युवराज सिंग, सेहवाग, रैना, युसूफ पठाण असे क्रिकेटर होते. असे क्रिकेटर वर्ल्डकपसारख्या स्पर्धेत निर्णायक ठरतात.

रायुडूची निवड न झाल्याने नाराजी

अंबाती रायुडूला वर्ल्डकपच्या टीममधे स्थान न मिळाल्याने दिग्गजांनी नाराजी व्यक्त केलीय. २००७ टी-२० आणि २०११ वर्ल्डकप विजयाचा हीरो असलेल्या गौतम गंभीरने रायुडूची निवड न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

‘काही महिन्यापूर्वी रायुडू हा ४ नंबरवर बॅटिंगसाठी कोहलीची पहिली पसंती होता. मात्र आता त्याला का निवडलं नाही यावर नक्कीच चर्चा झाली पाहिजे. प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं की वर्ल्डकपसारख्या स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करावं, तसंच रायुडूचंही होतं. त्यामुळे त्याची निवड न होणं वेदनादायी आहे. असाच अनुभव २००७ वर्ल्डकपवेळी आपल्याला आला होता`, असंही गंभीरने म्हटलंय. तसंच भारतात सद्यस्थितीत संजू सॅमसन हा सर्वोत्तम विकेटकिपर आणि चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन आहे हे सांगायलाही गंभीर विसरला नाही. 

‘या निर्णयामुळे रायुडूला प्रचंड धक्का बसला असेल. या वनडे फॉर्मटमध्ये खेळता यावं यासाठी त्याने चार दिवसीय सामन्यांमधून माघार घेतली होती. मात्र फॉर्मने घात केलाच. त्याने जितकी जास्त मेहनत घेतली तितकं अधिक त्याला झगडावं लागलं. रायुडूची निवड न झाल्याने खरंच वाईट वाटतंय’ असं ट्विट कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी केलं. 

खुद्द रायुडूलाही या निर्णयावर आपली नाराजी लपवता आली नाही. खोचक ट्विटच्या माध्यमातून त्याने आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘वर्ल्डकप मॅच पाहण्यासाठी आपण थ्रीडी चष्मा मागवलाय’ असं उपरोधिक पण खोचक ट्विट रायडूने केलं आहे. 

विजय शंकरची निवड करून चार नंबरच्या बॅट्समनचा प्रश्न सोडवल्याचा दावा निवड समिती करतेय. मात्र रायुडूला वगळल्याने खरंच हा प्रश्न सुटलाय की नाही याबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता वर्ल्डकप सुरू झाल्यानंतरच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मात्र काहीही झालं तरी भारतानेच वर्ल्डकप जिंकावा हेच तमाम भारतीय क्रिकेटरसिकांचं स्वप्न आहे. 

हेही वाचा: ऋषभ पंतचं वर्ल्डकपचं तिकीट का कापलं? ते कार्तिकला कसं मिळालं?