एअर स्ट्राईकविषयी आपल्याला हे माहीत असायलाच हवं

२६ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


मंगळवारी २६ फेब्रुवारीच्या पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात हवाई हल्ला केला. हल्ल्यात एकूण १२ मिराज २००० या प्रकारातली लढाऊ विमानं होती. त्यांनी तीन ठिकाणी हल्ला केला. यात कोणतंच नुकसान झालं नसल्याचं पाकिस्तान म्हणतंय, तर दोनशेहून अधिक दहशतवादी ठार केल्याचा दावा भारत सरकारने केलाय. 

भारत पाकिस्तान संघर्षातला हा एक महत्त्वाचा क्षण आहे. भारतीय सैनिक विमान घेऊन सीमेपार शिरले. नेमून दिलेलं काम केलं आणि अवघ्या २० मिनिटांत परतले. या ऑपरेशनची माहिती आता हळूहळू समोर येतेय. त्यातल्या आपल्या प्रत्येकाला माहीत असायलाच हव्यात अशा काही गोष्टी.

हल्ला केला ते बालाकोट आहे कुठे? 

मुजफ्फराबाद, चकौती आणि बालाकोट या तीन ठिकाणी दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पवर हल्ला केला. त्यातलं बालाकोट नेमकं कुठे आहे, यावर चर्चा होत राहिली. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीमुळे थोडी स्पष्टता येत गेली. बालाकोट नावाची दोन गावं आहेत. एक सध्याच्या नियंत्रण रेषेवर आहे. या गावातला अर्धा भाग भारतात आहे, तर अर्धा सध्याच्या पाकव्याप्त काश्मीरमधे. हे बालाकोट काश्मीर खोऱ्यातही नाही. ते जम्मूच्या पूंछ या जिल्ह्यात आहे. त्याच्या पाकिस्तानाच्या ताब्यात असलेल्या भागात कोणतेही ट्रेनिंग कॅम्प नाहीत, हे सर्वांना माहीत होतं. 

मात्र दुसरं बालाकोट हे पाकव्याप्त काश्मीरच्याही पलीकडे असणाऱ्या पाकिस्तानच्या खैबर पख्तून या राज्यात मनसेहरा जिल्ह्यात आहे. याच खैबर पख्तून राज्यातून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान निवडून येतात. तिथल्या जाबा डोंगरांवर दहशतवाद्यांचे कॅम्प होते. त्यावर भारतीय विमानांनी हल्ला केल्यामुळे हा हल्ला थेट पाकिस्तानात झाल्याचं सिद्ध झालं. तिथल्या स्थानिक रिपोर्टरनी बीबीसीला तशी माहिती दिली तसंच संरक्षण विषयांवरचे पाकिस्तानी अभ्यासक मुशर्रफ झैदी यांनीही सकाळी तसं ट्विट केलं. त्यानंतर चित्र स्पष्ट झालं. 

सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही प्रभावी 

उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर २९ सप्टेंबर २०१६ ला याआधीचा सर्जिकल स्टाईक केला. त्यात १९ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा भारताने केला. पण तो हल्ला फक्त पाकव्याप्त काश्मीरपुरताच होता. आताचा एअर स्ट्राईक त्यापेक्षाही मोठा होता. कारण त्यात अनेकपट दहशतवादी मारले गेले. शिवाय तो थेट पाकिस्तानी भूमीवर झाला. त्यामुळे या हल्ल्याचं महत्त्व अधिक आहे. 

आधीच्या स्ट्राईक झालाच नसल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. इथे मात्र भारताच्याही आधी पाकिस्तानने हल्ला झाल्याची माहिती दिली. ही काही लष्करी कारवाई नाही, तर केवळ यापुढे हल्ले होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं भारताच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केलं. 

भारताची अधिकृत भूमिका काय?

पाकिस्तानी सैन्य आणि सरकारांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीवर भारतातही बातम्या सुरूच होत्या. सकाळी साडेअकरापर्यंत भारत सरकारने अधिकृत निवेदन केलं नाही. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ती अशी, 
बालाकोट इथे पुलवामात हल्ला करणाऱ्या जैश ए मोहम्मदचा सर्वात मोठा ट्रेनिंग कॅम्प होता. जैशचा प्रमुख मौलाना मसूद अजहर याचा मेहुणा मौलाना युसूफ अजहर त्याचा प्रमुख होता. जैशची वारंवार माहिती देऊनही पाकिस्तान त्यांच्यावर कारवाई करत नव्हतं. पाकिस्तानात जैशचे तळ कुठे आहेत, याचीही माहिती दिली होती. त्यामुळे जैश यापुढे आणखी हल्ले करण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचे कॅम्प नेस्तनाबूद करण्यात आले. या हल्ल्यात कोणताही सामान्य नागरीक मारला गेला नाही. 

मिराज विमानांचा मारा 

मिराज २००० ही विमानं एअर स्ट्राईकमुळे सध्या चर्चेत आहेत. इतक्या रिस्की ऑपरेशनमधे या अत्याधुनिक लढाऊ विमानांनी यश मिळवून दिलंय. ही मूळ फ्रेंच बनावटीची आहेत. दसाँद एविएशन नावाच्या कंपनीने ती तयार केलीत. याच कंपनीने सध्या वादात सापडलेली राफेल विमानंही बनवलीत. पण मिराजमधे हिंदुस्थान ऍरॉनॉटिकल्सचाही त्यात सहभाग होता. त्यामुळे भारतातल्या मिराजना २०००टीएच असं म्हटलं जातं. त्यातल्या एचचा अर्थ हिंदुस्थान असा आहे.

१९७० च्या दशकात या प्रकारची विमानं पहिल्यांदा बनली. पुढच्या दशकात त्याची ऑर्डर देण्यात आली. सध्याची विमानं ही त्याची अत्याधुनिक वर्जन आहेत. या विमानांची लांबी ४७ फूट आणि वजन ७५०० किलो आहे. त्याचा कमाल वेग ताशी २००० किलोमीटर आहे. या विमानांनी १००० किलो स्फोटकं टाकून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. कारगील युद्धापाठोपाठ आज पहाटेच्या हल्ल्यातही मिराजने आपली उपयुक्तता सिद्ध केलीय. 

पाकिस्तानला कळलं कसं नाही? 

आता पाकिस्तानकडून योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याचे दावे होत असले. तरी भारतीय विमानं थेट पाकिस्तानच्या सरहद्दीत घुसली आणि ते पाकिस्तानी सैन्याला कळलंदेखील नाही, ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी नामुष्की ठरलीय. द इन्स्टिट्य़ूट फॉर डिफेन्स स्टडीजचे संचालक लक्ष्मण कुमार बहेरा यांनी बीबीसी हिंदीला सांगितलंय, पाकिस्तानी एअर फोर्सची एअर सर्विलन्स सिस्टम आणि जॅमर फारच कमकुवत आहेत. इतक्या कमी वेळात हल्ल्याला थांबवणं त्यांना शक्यच नव्हतं.

बीबीसी हिंदीनेच दिलेल्या बातमीनुसार एप्रिल २००० मधे भारतीय हवाई दलाने ए ५० ही एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल ही एअरक्राफ्ट रशियाकडून विकत घेतली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई तळांवरच्या सगळ्या हालचालींवर नजर ठेवणं भारतासाठी सोपं ठरतंय. तिकडे पाकिस्तानवर अमेरिकेने घातलेल्या बंदीमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळण्यात अडचणी येत आहेत.