सुरक्षित गुंतवणुकीचा प्रवाहाविरुद्ध पोहणारा म्हणजे काँट्रा फंड

१३ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


सेबीच्या नियमानुसार काँट्रा फंडमधील किमान ६५ टक्के गुंतवणूक ही इक्विटी म्हणजेच शेअर्स आणि इक्विटीशी संबंधित साधनांमधे झाली पाहिजे. आणि ती गुंतवणूक करताना फंड मॅनेजरने काँट्रारिअन इन्वेस्टिंग स्ट्रॅटेजीचा वापर केला पाहिजे.

सेबीच्या म्युच्युअल फंड वर्गवारीच्या कोष्टकमधे इक्विटी फंडांच्या ७व्या क्रमांकावर दोन प्रकारच्या फंडांना एकाच वर्गवारीमधे समाविष्ट करण्यात आलंय. एक वॅल्यू फंड आणि दुसरं काँट्रा फंड. इथे आपण प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा फंड अशी ख्याती असलेल्या काँट्रा फंडांची काही पैलूंविषयी बोलू.

काँट्रा फंड  म्हणजे काय?

सेबीच्या नियमानुसार, काँट्रा फंड आणि वॅल्यू फंड यांच्यातली किमान ६५ टक्के गुंतवणूक ही इक्विटी म्हणजे शेअर्स आणि इक्विटीशी संबंधित साधनांमधे करावी लागते. आणि ही गुंतवणूक करताना फंड मॅनेजरने कॉन्ट्रारिअन इन्वेस्टिंग स्ट्रॅटेजीचा वापर केला पाहिजे.

जगप्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार वॉरन बफे यांना कॉन्ट्रारिअन इन्वेस्टिंग स्ट्रॅटेजीचे सर्वात मोठे पुरस्कर्ते म्हणून ओळखलं जातं. या स्ट्रॅटेजीसंबंधीचं त्यांचं एक वाक्य जगप्रसिद्ध आहे. ‘बी फिअरफूल व्हेन अदर्स आर ग्रिडी अँड ग्रिडी वेन अदर्स आर फिअरफूल.’ या एका वाक्यात बफे यांनी कॉन्ट्रारिअन इन्वेस्टिंग स्ट्रॅटेजीचा सारांश सांगितलाय.

वॉरन बफे यांनी हे एकंदर शेअर मार्केटविषयी सांगितलं असलं तरी हेच तत्त्व स्टॉकमधे गुंतवणूक करताना अमलात आणलं जातं तेव्हा ती गुंतवणूक कॉन्ट्रारिअन इन्वेस्टिंग स्ट्रॅटेजीनुसार होते. मराठीमधे एका वाक्यात सांगायचं झालं तर कॉन्ट्रारिअन इन्वेस्टिंग स्ट्रॅटेजी म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं आहे.

वॅल्यू फंड आणि काँट्रा फंडमधला फरक

वॅल्यू फंड आणि काँट्रा फंड हे एकाच वर्गवारीमधे घालण्याचं कारण म्हणजे दोन्ही फंडांचं मूलभूत तत्त्व एकच आहे. आणि ते म्हणजे 'वॅल्यू स्टॉक्स'मधे गुंतवणूक करणं. मात्र कॉन्ट्रारिअन इन्वेस्टिंग फंड मॅनेजर अशा कंपन्यांमधे गुंतवणूक करतात, ज्या कंपन्यांची मालमत्ता मोठी आहे, व्यवस्थापन अतिशय चांगलं आणि ज्यांची भविष्यामधे विस्तार पावण्याची क्षमता प्रचंड आहे.

याउलट वॅल्यू इन्वेस्टिंग  फंड मॅनेजर अशा कंपन्यांमधे गुंतवणूक करतात, ज्या अगोदरच मार्केटमधे सुस्थापित झाल्या आहेत आणि त्यांचा लौकिक अतिशय चांगला आहे.

हेही वाचाः अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानींच्या मृत्यूने तिसरं महायुद्ध होणार?

कमी भावात करावी गुंतवणूक

इथे प्रश्न असा उत्पन्न होतो की, अशा कंपन्या इतक्या सुस्थापित असतील, त्यांचा लौकिक चांगला असेल, व्यवस्थापन उच्च दर्जाचे असेल आणि ताळेबंद भक्कम असेल, तर त्यांचे बाजारभाव इतके कमी होतातच कसे? डेविड ड्रेमॅन नावाचे एक कॅनेडीयन गुंतवणूक तज्ज्ञ आहेत. ते कॉन्ट्रारिअन इन्वेस्टिंग स्ट्रॅटेजिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत.  ‘कॉन्ट्रारिअन इन्वेस्टिंग स्ट्रॅटेजी : द नेक्स्ट जनरेशन’ या आपल्या पुस्तकामधे त्यांनी वरील प्रश्नाचं उत्तर दिलंय.

ते म्हणतात, मार्केटमधे नवनवीन घटना घडतात, विविध बातम्या येतात, ट्रेंडस् बदलत राहतात. या सर्वांना गुंतवणूकदार वाजपीपेक्षा जास्त प्रतिसाद देतात. अशावेळी नको ते स्टॉक्स ‘हॉट’ होतात आणि त्यांचे बाजारभाव वाढतात. त्यामुळे आणि इतरही काही तात्कालिक नकारात्मक बातम्यांमुळे वॅल्यू स्टॉक्स चे बाजारभाव खूप खाली येतात. कॉन्ट्रारिअन फंड मॅनेजर अशा स्टॉक्समधे संधी शोधत असतात. कारण त्यांना माहिती असतं, अशा स्टॉक्सची इन्ट्रिन्सिक वॅल्यू खूप जास्त आहे. कमी भावात अशा स्टॉक्समधे गुंतवणूक केली, तर थोड्याच काळामधे त्यांना योग्य तो भाव मिळण्याची खात्री असते.

अधिक परतावा देणारे फंड

आपण बाजारातील काँट्रा फंडांचा इतिहास पाहिला, तर अशा फंडांनी नेहमीच इतर फंडांच्या तुलनेत अधिक परतावा दिलाय. किंबहुना आगामी काळात मोठा नफा मिळवण्याची क्षमता असणं हाच या फंडांमधील गुंतवणुकीचा युनिक सेलिंग पॉईंट आहे. इथे वॉरन बफेंचं एक उदाहरण द्यावंसं वाटतं.

२००८ च्या मार्केट क्रॅशमधे सर्वात जास्त भरडले गेले ते अमेरिकन बँकिंग स्टॉक्स! बँकांचे बाजारभाव धडाधड कोसळत असताना वॉरन बफेंनी त्यांच्या बी ग्रिडी व्हेन अदर्स आर फिअरफूल या तत्त्वाचा अवलंब केला आणि गोल्डमन सॅचे या बँकेत पाचशे कोटी अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली. याच गुंतवणुकीने त्यांना २०१३ मधे म्हणजे पाच वर्षांनी ६२ टक्के परतावा दिला, तर १० वर्षांनी १९६ टक्के परतावा दिला.

काँट्रा फंडांमधील गुंतवणूक ही वॅल्यू स्टॉक्समधे होत असल्यामुळे ती सुरक्षित असते. वॅल्यू स्टॉकमधील गुंतवणूक असली तरी ती इन्ट्रिन्सिक वॅल्यूच्या खूपच खाली, म्हणजे अतिशय कमी भावात होत असल्यामुळे भावी काळात चांगला परतावा मिळण्याची शक्यताही अधिक असते. त्यामुळे सर्व थरांतल्या, वयोगटातल्या गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा थोडा तरी हिस्सा अशा फंडांमधे गुंतवावा. त्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या गुंतवणुकीचा कालावधी किमान पाच वर्षांचा असू द्यावा. कारण, काही वेळा वॅल्यू स्टॉक्ससुद्धा त्यांच्या योग्य पातळीवर येण्यास बराच कालावधी घेण्याची शक्यता असते. सध्या भारतामधे आघाडीवर असणारी काँट्रा फंडस् खालीलप्रमाणे आहेत.

१) इन्वेस्को इंडिया काँट्रा फंड
२) कोटक इंडिया इक्विटी काँट्रा फंड
३) एसबीआय काँट्रा फंड

हेही वाचाः 

बाबरी मशीद निकालानंतर मुस्लिमांनी काय करावं?

अचूक गुंतवणुकीतून महागाईवर मात कशी करायची?

आपण आपले म्युच्युअल फंड्स कधी विकले पाहिजेत?

टेस्ट मॅचेस चार दिवसांच्या, पण यात नक्की फायदा कुणाचा?

अडचणीच्या काळात म्युच्युअल फंड प्लॅन थांबवायचा की कर्ज काढायचं?

(साभार दैनिक पुढारी)