यूट्यूबवर एक विडिओ तुफान चालतोय. एचबीओ या अमेरिकन चॅनेलवरून कॉमेडियन जॉन ऑलिवर एक कार्यक्रम चालवतात. त्याचा हा विडिओ आहे. रविवारच्या एपिसोडमधे ऑलिवर यांनी नरेंद्र मोदींच्या कारभारावर भाष्य केलं. यूट्यूबवर तुफान चालणाऱ्या या विडिओला हॉटस्टार या अॅपने मात्र ब्लॉक केलंय. ऑनलाईन चालणारी गोष्ट हॉटस्टारने ब्लॉक करून स्वतःच्या पायावर धोंडा का पाडून घेतला?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या बायका मुलांना घेऊन सोमवारी भारतात आले होते. पहिल्यांदा ते गुजरातमधे उतरले. तिथून गांधींचा आश्रम पहायला गेले. मग मोटेरा स्टेडियमवर त्यांच्या स्वागताचा भव्यदिव्य कार्यक्रम झाला. त्यांच्या ताजमहाल दर्शनाच्या बातम्या आपण केल्या, वाचल्या. दिल्लीतल्या सरकारी शाळेतले त्यांचे आणि मिलेनिया ट्रम्प यांचे फोटो पाहिले. इकडे मराठमोळ्या ट्रम्पतात्यांनीही ट्रम्प नवराबायकोंच्या दौऱ्याची बितंबातमी दिली. दुसरीकडे दिल्लीत सीएए समर्थक आणि विरोधक आंदोलकांमधे दंगल झाली. आपण त्याबद्दलही ऐकलं.
या सगळ्या गदारोळात एक खूप महत्त्वाची गोष्ट घडली. ट्रम्प नवराबायकोच्या बातम्यांमधे आपलं लक्ष जाणार नाही असं बघून हॉटस्टार या इंटरटेन्मेट अॅपने चोरीचोरी छुपके स्टाईलने एक वीडियो काढून टाकला. कुणी म्हणेल काढला तर काढू दे की! एवढं काय त्यात? तर ट्रम्प यांच्या भेटीचं निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचा हिंदू राष्ट्रवाद आणि सीएए एनआरसीचा संदर्भ घेत मोदींवर जोरदार व्यंग करणारा हा वीडियो आहे. खरंतर, असे अनेक वीडियो भारतात अनेकदा दाखवले जातात. पण हा वीडियो भारतीय मीडियाने नाही तर चक्क अमेरिकन मीडियातून आलाय.
होम बॉक्स ऑफीस हे अमेरिकेतलं एक आघाडीचं चॅनल आहे. हे चॅनल त्याच्या एचबीओ या शॉर्टफॉर्मवरून जगभर ओळखलं जातं. भारतातंही हे चॅनल दिसतं. या चॅनलवर दर रविवारी रात्री लास्ट वीक टुनाईट नावाचा एक लोकप्रिय कार्यक्रम प्रसारित केला जातो. आपल्याकडे भारतात हा कार्यक्रम सोमवारी सकाळी ६ वाजल्याच्या सुमारास दिसतो.
या कार्यक्रमात जॉन ऑलिवर नावाचा एक कॉमेडियन राजकारणातल्या वेगवेगळ्या विषयांवर आपल्या नर्मविनोदी शैलीत व्यंगात्मक भाष्य करत असतो. चर्चा करताना त्याचे जोक चाललेले असतात. त्यामुळे कार्यक्रम फार मजेदार होतो. एप्रिल २०१४ पासून हा कार्यक्रम चालू आहे. साधारण अर्ध्या तासाचा एक एपिसोड असतो. हे सगळे एपिसोड भारतात हॉटस्टार या अॅपवरही दिसतात.
हॉटस्टार हेसुद्धा डिस्नी या अमेरिकन मीडिया कंपनीचंच अॅप आहे. गेल्या रविवारी म्हणजे २३ फेब्रुवारीच्या रात्री एचबीओवर प्रसारित झालेला द लास्ट वीकचा एपिसोड हॉटस्टारवर आला. काही लोकांनी तो पाहिलाही असावा. पण सोमवार रात्रीपर्यंत दुसऱ्या दिवशी हा अख्खा एपिसोडच हॉटस्टारने आपल्या अॅपवरून काढून टाकला.
का? कारण या एपिसोडमधे जॉन ऑलिवर मोदी, हिंदूराष्ट्र, आरएसएस आणि सीएएविरोधातली आंदोलनं अशा अनेक विषयांचा संदर्भ देत मोदींचा खरपूस समाचार घेतलाय. हा वीडियो हॉटस्टारवरून डिलीट झाल्यानंतर अनेक लोकांनी ट्वीट करत याची माहिती दिली. हॉटस्टारवरून डिलिट झाला असला तरी लास्ट वीक टुनाईट या कार्यक्रमाच्या यू ट्यूब चॅनलवर हा वीडियो उपलब्ध आहे.
एकूण १८ मिनिटांचा हा वीडियो आहे. यात जॉन ऑलिवर पहिल्यांदा ट्रम्पच्या भारतभेटीबद्द्ल माहिती देतात. त्यानंतर ते ट्रम्प आणि मोदी यांच्या दोस्तीवर बोलतात. मोदी युएसएमधे आले होते तेव्हा मोदी हे सगळ्या देशाला बांधून ठेवणारे राष्ट्रपिता आहेत, असं ट्रम्प म्हणाले होते. पण भारत देशाची निर्मिती झाली तेव्हापासूनच देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत, असं ऑलिवर म्हणाले.
या एपिसोडमधे ऑलिवर यांनी आणखी बऱ्याच मुद्द्यांना हात घातलाय. भारतीय मीडियानंही जे केलं नाही ते ऑलिवर यांनी करून दाखवलंय. कदाचित त्यामुळेच ऑलिवर यांचा हा एपिसोड भारतात यूट्यूवर खूप ट्रेंड झाला. यूट्यूब ट्रेंडिंगमधे एकावेळी तर या वीडियोने तिसऱ्या नंबरवर मजल मारली होती.
हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याबद्दल अमेरिकन मीडियाचं म्हणणं काय?
ऑलिवर आपल्या नर्मविनोदी शैलीत सांगतात, मोदी हे अग्रेसिव हगर म्हणजे आक्रमकपणे मिठ्या मारणारे आंतरराष्ट्रीय नेते आहेत. सगळ्या जगालाच त्यांचं व्यक्तिमत्व खूप आकर्षक वाटतं. बेअर ग्रील्स याच्या मॅन वर्सेस वाइल्ड या कार्यक्रमातही ते गेले होते. मोदी संपूर्ण जगाला, बेअर ग्रील्सला आणि आपल्या राष्ट्राध्यक्षांना इतके आवडतात याचंही एक कारण आहे.
भारतात मोदी नेहमीच वादग्रस्त राहिलेत. त्यांचं सरकार धार्मिक अल्पसंख्यांकांचा छळ करतंय. हा छळ इतक्या मोठ्या प्रमाणात होतोय की गेल्या दोन महिन्यांपासून भारतातले नागरिक निर्दशनं करत रस्त्यावर उतरलेत. आंदोलक रस्त्यावर उतरून बस जाळतायत.
जेव्हा कुणी रस्त्यावर उतरून बस जाळतं तेव्हा ते त्यांच्या सरकारवर समाधानी आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. तर ते आपल्या सरकारवर इतके नाराज असतात की आज मी घरी नीट जाऊ शकेन की नाही याचीही चिंता ते करत नाहीत. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीतले नागरिक एकतर मोदींचा मास्क घालतायत किंवा आंदोलनात सहभागी होतायत. अशी अवस्था असेल तर हे कशामुळे झालं, पुढे काय होईल आणि मोदींना भारताचा राष्ट्रपिता म्हणणं ही फक्त मुर्खपणाची नाही तर धोकादायक गोष्ट कशी आहे याची चर्चा आज रात्री करायला हवी.
मोदींनी अनेक चुकीचे निर्णय घेतलेत. २०१४ मधे ते निवडून आले त्यानंतर त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरू केली. त्यानंतर काही काळातच फक्त ४ तासांची नोटीस देत त्यांनी भारतातल्या दोन महत्त्वाच्या चलनावर बंदी आणली. मोदींची ही योजना पूर्णपणे फेल गेली. त्यामुळे खूप गोंधळ माजला. पण गंमत म्हणजे, त्यातून भ्रष्टाचारही संपला नाही आणि मोदींची लोकप्रियताही कमी झाली नाही.
काहीही होऊ दे, लोकांना कितीही राग येऊ दे, मोदी त्यांच्या आकर्षक किंवा करिश्माई व्यक्तिमत्त्वाने आणि त्यांच्या बोलण्यातून कुणाचाही राग घालवू शकतात. ही गोष्ट त्यांना सुपरपॉवर बनवते आणि मोदींसारख्या हिंदूराष्ट्रवाद्यानं सुपरपॉवर बनणं फार धोकादायक आहे.
हेही वाचा : केंद्रात मोदी आणि राज्यात कुणीही, असा फरक मतदार खरंच करतात?
भारत हा हिंदूंचा देश आहे असं या हिंदूराष्ट्रवाद्यांचं म्हणणं असतं. पण भारताची उभारणी करताना भारत हा सेक्युलर देश असेल, असं मूल्य स्वीकारण्यात आलं होतं. असं असलं तरी मोदींचा भाजप हा पक्ष आता हिंदूराष्ट्रवादाचा आग्रह धरणाऱ्या आरएसएसचा राजकीय चेहरा म्हणून ओळखला जातो.
आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १९२५ मधे स्थापन करण्यात आली होती. तेव्हापासून हा संघ हिटलरचं समर्थन करत आलाय. हिटलरने वंशाचं पावित्र्य जपण्यासाठी जे प्रयत्न केले ते संघाला समर्थनीय वाटतात. खरंतर, हिटलरचं एकाच गोष्टीसाठी समर्थन केलं पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे हिटरलने स्वतःला मारलं.
आता अशा विचारसरणीचा माणूस भारताचा पंतप्रधान असणं ही काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे. एकीकडे सहिष्णुतेचा आदर्श आणि दुसरीकडे धार्मिक संघर्ष यात समन्वय ठेवण्याचा प्रयत्न भारतात नेहमी केला जातो. इथं अनेकदा धार्मिक हिंसा होते.
दुर्दैवानं अशा एका धार्मिक हिंसेत म्हणजेच २००२ च्या गुजरात दंगलीशी मोदींचंच नाव जोडलं गेलंय. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि या दंगली थांबवण्यासाठी त्यांनी मुद्दाम काहीही केलं नाही असा आरोप त्यांच्यावर केला जातो. या आरोपामुळेच २००५ मधे त्यांना अमेरिकेचा विसा नाकारण्यात आला होता. या घटनेबाबत मोदींनी कधीही माफी मागितली नाही. एका पत्रकार परिषदेत तुम्हाला या दंगलीविषयी काय वाटतं असं विचारल्यावर मोदी तिकडून निघून गेले होते.
धार्मिक अल्पसंख्यांकांबद्दल मोदी सहसा काही बोलत नाहीत. पण त्यांचे सहकारी आणि भाजपमधले अनेक नेते वेळोवेळी मुस्लिमांना टार्गेट करत असतात. भाजपने निवडलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही कट्टर मुस्लिमविरोधी आहेत. त्यांच्यात इस्लामोफोबिया ठासून भरलेला दिसतो.
त्यांचं म्हणणं खरं करण्यासाठी मोदी आणि त्यांची पार्टी इतिहासही बदलू पाहते. मोदी निवडून आल्यानंतर राजस्थानमधेही भाजप आलं. तेव्हा तिथल्या अभ्यासक्रम बदलला गेला. नवीन अभ्यासक्रमात नेहरूंच्या कामाचा उल्लेखच केलेला नव्हता. गंमत म्हणजे, हे जग देवाने बनवलेलं आहे असं यात लिहिलं होतं.
देव माणसं बनवत होता. ओवनमधे त्याने माणसं ठेवली होती. तेव्हा लगेच त्याने ती बाहेर काढली आणि व्हाईट्स म्हणजे गौरवर्णीय माणसं अस्तित्वात आली. पुढच्यावेळी ओवन उघडायला देवाने वेळ लावला आणि निग्रो बाहेर आले. पण त्यानंतर मात्र लक्ष ठेवून त्याने ओव्हन बरोबर वेळेवर उघडला आणि भारतीय अस्तित्वात आले, असं लिहिलं आहे.
हेही वाचा : पोह्या, तुझा बहुरंगी इतिहास भाजपवाल्यांना कोण सांगणार?
दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर मोदी सरकारनं त्यांचा मुस्लिम द्वेष प्रत्यक्षात उतरवायचं ठरवलंय. सीएए आणि एनआरसी असे दोन कायदे ते देशात लागू करणार आहेत. यातून लाखो मुस्लिमांचं नागरिकत्व नाकारलं जाईल. एनआरसीद्वारे गरीब आणि अशिक्षित लोकांकडे भारतीय असल्याचा पुरावा नसणाऱ्या त्यांचं नागरिकत्व रद्द केलं जाईल. त्यानंतर सीएए लागू करून नागरिकत्व रद्द झालेल्यांपैकी फक्त गैरमुस्लिमांना परत नागरिकत्व दिलं जाईल. हे स्वतः अमित शाह यांनी सांगितलंय.
अमित शहा म्हणजे मोदींचा राईट हॅण्डच. हे बाहुल्याच्या खेळासारखं आहे. बाहुला काहीतरी बोलतो आणि त्याचा मालक काहीही न ऐकल्यासारखा करतो.
आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकणार नाहीत त्यांना डिटेन्शन कॅम्पमधे टाकलं जाईल. अशा डिटेन्शन सेंटरचं बांधकामही सुरू झालंय. विशेष म्हणजे, आसाममधे पूर्ण झालेल्या एनआरसी प्रक्रियेत नाव नसलेला नयाझ अली हा स्वतः या डिटेन्शन सेंटरच्या बांधकामात गवंडी म्हणून काम करतो. कधीतरी इथं राहण्याची वेळ त्याच्या स्वतःवरच येईल याची चिंता त्याला लागून राहिलीय.
मोदी सत्तेत आल्यापासून अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांमधे वाढ झाल्याचंही सांगण्यात येतंय. पण मोदींच्या या एका कायद्यामुळे संपूर्ण भारतातले लाखो लोक आज त्यांच्याविरूद्ध रस्त्यावर उतरलेत. आमच्या धर्मापेक्षा आमच्या संविधानानं दिलेलं धर्मनिरपेक्षतेचं मुल्य माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे या एका मुद्दावरून ते सगळे एकत्र झालेत. प्रेमाचं प्रतीक म्हणून जगप्रसिद्ध असलेला ताजमहाल भारतात आहे. अशा भारताचे पंतप्रधान आज द्वेषाचं प्रतीक बनलेत.
असा हा १८ मिनिटांचा वीडियो आहे. ब्लूमबर्ग क्विंटच्या एका बातमीनुसार हा वीडियो वायरल झाल्यानंतर २५ तारखेला अनेक लोकांनी हॉटस्टारवर जाऊन तो बघण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना फक्त जुनेच एपिसोड दिसले. त्यानंतर अनेक लोकांनी हॉटस्टारच्या मॅनेजमेंट कमिटीला मेल करून हा वीडियो का दिसत नाही असं विचारलं. पण त्यातल्या एकाही मेलला उत्तर दिलं गेलं नाही.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रासरण मंत्रालयाकडेही या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. पण हा वीडियो काढून टाकण्याची सूचना आम्ही दिलेली नसल्याचं त्यांनी सांगितलं. तेव्हा हा वीडियो हॉटस्टारने स्वतःहूनच ब्लॉक केला असावा असा अंदाज बांधला जातोय.
अशा प्रकारे एखाद्या अॅपनं स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरून एखादा वीडियो काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईमनेही असे वीडियो काढून टाकले आहेत. नेटफ्लिक्सवरून कॉमेडियन हसन मिन्हाझ याचा 'पॅट्रिओटीक अॅक्ट' नावाचा एक वीडियो काढून टाकण्यात आला होता. सौदी अरबच्या मोहम्मद सलमान या राजानं जमाल खगोशी या वॉशिंग्टन पोस्ट पेपरच्या स्तंभलेखकाची हत्या घडवून आणल्याचं त्यानं या वीडियोत सांगितलं होतं. तर काश्मिरी हिंदुत्ववाद्यांचा संदर्भ घेतल्यानं मॅडम सेक्रेटरी या सिरीजचा एक एपिसोड काढून टाकण्यात आला होता.
स्वतः डिस्नीनेही अनेकदा असे सत्ताविरोधी कंटेण्ट असणाऱ्या गोष्टींवर सेन्सॉरची कात्री चालवलीय. आपल्याला स्पॉन्सर करणाऱ्यांवर जोक किंवा टीका होत असेल तर असे वीडियो डिस्नी लगेच बॅन करते. त्यामुळे सध्या सत्तेत असलेल्या पक्षाचा रोष ओढून घेण्याच्या भीतीनं डिस्नीनंच हा वीडियो काढून टाकला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
हेही वाचा :
आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती
आपल्याच देशातल्या आठ राज्यांत मोदी, शाह का जात नाहीत?
आसाममधे फेल गेलेली एनआरसी महाराष्ट्राच्या उरावर बसणार?
एनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था?