जागतिक महिला दिन ८ मार्चलाच का साजरा केला जातो?

०७ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


गेल्या कित्येक वर्षांपासून आपण ८ मार्च हा दिवस जागितक महिला दिन म्हणून साजरा करतो. इतिहासात वेगवेगळ्या बायकांनी केलेल्या कामगिरीची आणि महिला हक्क चळवळींची आठवण काढायला हा दिवस साजरा केला जातो. आता ही आठवण काढायला ८ मार्च हीच तारीख का निवडली गेली यामागची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे.

औद्योगिकरणाला सुरवात होऊन काही वर्षच झाली होती तेव्हाची म्हणजे साधारण १९०८ मधली गोष्ट आहे. अनेक उद्योजकांनी नवनवीन फॅक्टऱ्या थाटल्या होत्या. त्यात काम करणाऱ्या पुरुषांपेक्षा बायकांना कमी पगार दिला तरी चालायचं. म्हणूनच फॅक्टरीचे मालक शक्यतो बायकांना कामावर घ्यायचे. पण आपल्यावर होणाऱ्या या अन्यायाविरोधात न्यूयॉर्कमधल्या कपड्यांच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या बायका पेटून उठल्या होत्या.

जवळपास १५ हजार बायका रस्त्यावर येऊन आंदोलन करत होत्या. बायकांचे कामाचे तास ठरवावेत, त्याप्रमाणे प्रत्येक बाईला कामाचे योग्य पैसे दिले जावेत आणि सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळावा अशा त्यांच्या मागण्या होत्या. अमेरिकेच्या सोशलिस्ट पक्षाकडून हे आंदोलन चालू झालं होतं.

त्यानंतर एक वर्षाने सोशलिस्ट पक्षातल्या महिला एकत्र आल्या आणि २८ फेब्रुवारी १९०९ हा आंदोलनाचा दिवस त्यांनी राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं. जगाच्या इतिहासात साजरा झालेला हा पहिला महिला दिन असेल. त्यादिवशी रविवार होता. त्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी अमेरिकेत महिला दिन साजरा करायचा असं ठरलं.

हेही वाचा : या तीन लेखिका जग गाजवत आहेत

रशियात महिला दिनाला दिली जाते सुट्टी

अमेरिकेने घोषित केलेला २८ फेब्रुवारी हा महिला दिवस अमेरिकेपुरता मर्यादित होता. म्हणूनच त्याला राष्ट्रीय दिवस म्हटलं गेलं होतं. पण उद्या ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात, पृथ्वीवरच्या प्रत्येक देशात, खंडात हा दिवस महिलांसाठी राखून ठेवला गेलाय.

यादिवशी महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. बायकांची भाषणं आयोजित होतात, वेगवेगळ्या परिषदा, कार्यशाळा भरवल्या जातात, शाळा कॉलेजमधेही हा दिवस साजरा केला जातो. आझरबाजन, आर्मेनिया, बेलारस, कझाखस्तान, मोलडोवा, रशिया आणि युक्रेन या देशांमधे तर महिला दिनाच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी देण्यात येते.

आता जागतिक महिला दिन का साजरा होतो, तो ८ मार्चलाच का साजरा केला जातो आणि २८ फेब्रुवारीपासून ही तारीख ८ मार्च कशी झाली याची गोष्ट फार भन्नाट आहे.

१९ मार्च हा आमचा महिला दिवस

फेब्रुवारीचा शेवटचा रविवार हा अमेरिकेत महिला दिन म्हणून साजरा करणं चालूच होतं. पण त्याचवेळी १९१० मधे कामगार बायकांची दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद डेन्मार्कमधे भरली होती. जर्मनीतल्या सोशलिस्ट डेमोक्रेटीक पार्टीच्या महिला दलाच्या प्रमुख क्लारा झेटकीन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची कल्पना मांडली. जगभरातल्या सगळ्या देशांची एकाच दिवशी महिलांच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करावा अशी त्यांची इच्छा होती. 

या परिषदेत १७ देशांमधून वेगवेगळ्या सोशलिस्ट पक्षांचं, युनियन्सचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जवळपास १०० पेक्षा जास्त बायका जमल्या होत्या. क्लारा झेटकीन यांच्या या कल्पनेला सगळ्यांनीच दुजोरा दिला आणि जागतिक महिला दिवस साजरा करण्याचं ठरलं.

१८४८ मधे एका पर्शियन राजानं महिलांना मतदानाचा १९ मार्चला अधिकार देण्याचं वचन दिलं होतं. हे वचन तो कधीही पाळू शकला नाही. पण त्याच्या स्मरणार्थ १९११ मधे ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशात १९ मार्च हा दिवस महिला दिवस म्हणून साजरा केला गेला.

अनेक ठिकाणी रॅली काढण्यात आल्या होत्या. या रॅलींमधे जवळपास १० लाख महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला होता. बायकांना मतदानाचा, हवं ते काम करण्याचा, स्त्री पुरुष समानतेचा अधिकार लोकांना मिळावा अशी मागणी ते करत होते. पण त्याच्या एकाच आठवड्यानंतर म्हणजे २५ मार्चला न्यूयॉर्कमधल्या एका फॅक्टरीत आग लागल्याने १४० महिला कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ट्रॅंगल फायर म्हणून ओळखली जाते. या घटनेमुळे अमेरिकेतलं कामाच्या ठिकाणचं वातावरण आणि कामगारांसाठीचा कायदा या दोन्ही गोष्टी किती गैरसोयीच्या आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं.

हेही वाचा : सिमोन द बोव्हुआर: महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो!

आम्हाला चांगलं अन्न आणि शांतता हवीय

त्यानंतर १९१७ मधे पहिल्या महायुद्धात रशियातले २० लाख सैनिक मृत्युमुखी पडले. त्याविरोधात रशियातल्या बायकांनी आम्हाला चांगलं अन्न आणि देशात शांतता पाहिजे अशी मागणी करणारं ‘ब्रेड अँड पीस’ हे आंदोलन सुरू केलं. चार दिवस हे आंदोलन सुरू होतं. त्यानंतर रशियाच्या राजाला आपलं पद सोडावं लागलं आणि नवं सरकार स्थापन झालं. या सरकारनं बायकांचा मतदानाचा हक्क मान्य केला गेला.

रशियामधल्या बायकांनी ज्या दिवशी आंदोलन सुरू केलं तो दिवस ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे २३ फेब्रुवारी असा मोजला गेला. पण जगात सगळीकडे वापरल्या जाणाऱ्या ग्रेगरियन कॅलेंडरप्रमाणे हा दिवस म्हणजे ८ मार्च. आणि म्हणून सगळीकडे ८ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जाऊ लागला.

१९७५ मधे संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच यूएनने पहिल्यांदा महिला दिन साजरा केला. त्यावेळी महिला दिनासाठी 'सेलिब्रेटींग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्युचर.' अशी थीम ठेवण्यात आली होती. यूएनने महिला स्वीकारल्यामुळे भारतासारख्या सभासद देशांनीही तो स्वीकारला. तेव्हापासून महिला दिवस खर्‍या अर्थाने जगभरात साजरा होऊ लागला, असं म्हणता येईल.

स्त्रीत्वाचं प्रतिक कोणतं?

सध्या जागतिक स्तरावर स्त्रीत्वाचं प्रतिक म्हणून जांभळ्या रंगाकडे पाहिलं जातं. खरंतर १९०८ मधे उदयाला आलेल्या महिलांच्या सामाजिक आणि राजकीय संघटनांनी  जांभळा, हिरवा आणि पांढरा हे तीन रंग स्त्रीत्वाचं प्रतिक म्हणून विचारात घेतले होते. यातला जांभळा रंग न्याय आणि सन्मानाचं महत्त्व अधोरेखित करतो.

हिरवा हा आशेचा रंग म्हणून पाहिला जातो. तर पांढरा हा पावित्र्याचं प्रतिक म्हणून पुढे आला. पण पावित्र्य ही वादग्रस्त किंवा थोतांड संकल्पना आहे असं काही स्त्रीवाद्यांना वाटू लागल्यामुळे हा रंग स्त्रीत्वाचं प्रतिक म्हणून विचारात घेतला जाऊ नये अशी मागणी पुढे आली.

जागतिक महिला दिनाचा एक लोगो किंवा चिन्हसुद्धा आहे. विनस या ग्रीक देवतेचं हे चित्र म्हणजे स्त्री असण्याचं प्रतिक मानलं जातं. पण आजच्या काळात वेगवेगळ्या देशातल्या, वेगवेगळ्या वर्णाच्या, वयाच्या, समाजातल्या सगळ्या स्त्रीयांचा चेहरा हेच महिला दिनाचं प्रतिक मानलं जातं.

हेही वाचा : 

या बायांमुळे मला रंडुलेपणाची लाज वाटत नाही

लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?

आता बायकांचा लढा युद्धभूमीवरच्या समानतेसाठी!

मराठी टीवी सिरियलमधल्या मुली असं का वागतात?