थिंग्ज फॉल अपार्ट

०८ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


चिनुआ अचेबे यांच्या थिंग्ज फॉल अपार्ट ही कादंबरी जागतिक साहित्यात मैलाचा दगड ठरली. आफ्रिकन संस्कृतीवरच्या /युरोपियन आक्रमणाची गोष्ट ही कादंबरी सांगते. आफ्रिकन साहित्याचा पाया रचणाऱ्या या कादंबरीतलं एक महत्त्वाचं प्रकरण पहिल्यांदाच मराठीत. 

 

चिनुआ अचेबे. फार मोठे साहित्यिक. आफ्रिकन साहित्याचा बापच. युरोपियन लेखकांनी लिहिलेल्या साहित्यात आफ्रिकनांचं चित्रण वाचून ते अस्वस्थ झाले. मेडिकलचा अभ्यास सोडला. इंग्रजी आणि इतिहास शिकू लागले. कहाण्या सांगण्याची स्वतःची आफ्रिकन पद्धत त्यांना माहीत होतीच. त्यांनी पहिली गोष्ट सांगितली, `थिंग्ज फॉल अपार्ट`.

मग अचेबे फक्त नायजेरियाचे उरले नाहीत. जगातल्या प्रत्येक शोषिताचा आवाज त्यांना सापडला होता. ती इंग्रजी साहित्यातला मैलाचा दगड ठरली. `थिंग्ज फॉल अपार्ट` ही अस्सल आफ्रिकन संस्कृतीची गोष्ट आहे. युरोपियन आफ्रिकेत येण्यापूर्वीचं आफ्रिकनांचं समृद्ध जगणं ती मांडते.

 

तिने आतापर्यंतच्या सगळ्या आफ्रिकन साहित्यावर आणि साहित्यिकांवर प्रभाव टाकलाय. जगभरातल्या अनेक युनिवर्सिटींमधे ती शिकवली जाते आजवर लिहिलेल्या सर्वोत्तम पुस्तकांमधल्या बारा कादंबऱ्यात ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियाने `थिंग्ज फॉल अपार्ट`चा समावेश केलाय. टाइम मॅगझीनने निवडलेल्या सर्वोत्तम कादंबऱ्यांमधेही तिला स्थान मिळालंय.

 

१९५८ ला पहिल्यांदा प्रकाशित झाल्यापासून इंग्रजीतच तिच्या दोन लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्यात. तिचा चाळीसहून अधिक भाषांत अनुवाद झालाय. पण अजून ती मराठीत नाही. डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी केलेला मराठी अनुवाद प्रकाशकाविना पडून आहे. त्यातलंच हे एक प्रकरण.

***

आजोळच्या नातेवाईकांनी ओकोंकोचं मबॅन्टामध्ये अगत्यानं स्वागत केलं. सोबत त्याचा म्हातारा मामाही होता. त्याच्या कुटुंबातली हयात असणारी सर्वात जेष्ठ व्यक्ती म्हणजे हे मामा. तीस वर्षांपूर्वी उचेंडू नावाच्या मामानं ओकोंकोच्या आईचंही स्वागत केलं होतं. तिला दफन करायला उमूओफियाहून तिच्या माहेरी आणलं. त्यावेळी ओकोंको अगदी लहान होता. त्यानं आईला आक्रोश करत दिलेला निरोप उचेंडूला आजही आठवतेय. आई... आई... आई... चाललीय माझी!'

 

तशी ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट म्हणता येईल. ओकोंको आज त्याच्या तीन बायका आणि अकरा मुलांच्या कुटुंबाला घेऊन आजोळच्या आश्रयाला आला होता. त्याला दु:खी, थकल्याभागल्या कुटुंबासोबत बघून उचेंडूनं घडल्या प्रसंगाचा अंदाज लावला. कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. दुसऱ्या दिवशी ओकोंकोनं सगळा वृत्तांत सांगितला. म्हाताऱ्या उचेंडूनं सगळं शांतपणे ऐकून घेतलं. सुटकेचा निश्वास टाकून तो म्हणाला, ‘हा तर स्त्री ओचूचा प्रकारआणि मग त्यानं गरजेच्या विधी आणि बळीची तयारी केली.

 

निवारा उभारायला ओकोंकोला जागा देण्यात आली. सोबतच येत्या हंगामात शेतीसाठी दोन, तीन वावरंही दिली गेली. आजोळच्या मंडळींच्या मदतीनं त्यानं स्वत:साठी एक आणि बायकांसाठी तीन झोपड्या शाकारल्या. त्याच्या घरगुती देवाची आणि पितरांच्या प्रतीकांची प्रतिष्ठापना केली. उचेंडूच्या पाचही मुलांनी याम धान्याचं प्रत्येकी तीनशे नग बेणं आपल्या आतेभावास दिलं. कारण पहिल्या पावसासोबत शेतीची पुढची कामं सुरू होणार होती.

 

एकदाचा पाऊस पडला. अचानक आणि जोरदार. दोन तीन महिन्यांपासून सूर्य ताकद गोळा करत होता. त्यामुळं असं वाटत होतं, जणू तो त्याच्या उच्छ्वासातून पृथ्वीवर ज्वाळाच फेकतोय. सगळीकडचं गवत होरपळून केव्हाच तपकीरी झालं होतं. वाळू पायांना जळत्या कोळशासारखी जाणवत होती. सदाहरित झाडांनी धुळीचं पांघरून घेतलं होतं. पाखरं जंगलात गपगार झाली होती. जग उष्णतेमुळं धापा टाकत होतं. त्यानंतर ढगांचा गडगडाट झाला. तो पावसाळयातल्या खोल प्रवाहासारखा नसून रागीट, तळपणारा आणि तहानलेला होता. वाऱ्याची जोरदार धुमश्चक्री सुरु होऊन हवेत धुळीचे लोट पसरले. ताडाची झाडं हेलकावे घेऊ लागली. वाऱ्यानं झाडांच्या पानांना चमत्कारिक केशरचना केल्यासारखं विंचरलं.

 

शेवटी एकदाचा पाऊस आला. पण तो आला मोठमोठ्या गारांच्या रुपात. या गारांना लोक स्वर्गातल्या पाण्याची कवचफळंम्हणत. या गारा टणक असतात. त्यांच्या माऱ्यानं अंग शेकून निघू शकतं. पोरंसोरं मात्र मोठ्या आनंदात पळत सुटली. थंडगार गारा वेचून तोंडात टाकू लागली. अवघा आनंदीआनंद झाला. जंगलातले पक्षी आसमंत कवेत घेत आनंदानं किलबिलायला लागले. एक अनोखा सुगंध सगळीकडं पसरला. पाऊस टपटपू लागला तसे बालगोपाळ आडोशाला गेले. सगळेजण ताजेतवाने झाले.

 

नव्या शेतात लागवड करायला ओकांको कुटुंबासोबत राबराब राबला. पण ते सगळं तारुण्य ओसरल्यावर एका नव्या आयुष्याची सुरूवात करण्यासारखं होतं. तो जणू म्हातारपणी डावखुरा बनायचा एक प्रयत्न होता. एकेकाळी कामात मिळणारा आनंद आता हरवला होता. रिकाम्या वेळेत त्याला गुंगी यायची. मग तो आपला शांत पडून राहायचा.

 

एका स्वप्नानं त्याला भारावून टाकलं होतं. त्याच्या जमातीतला उमराव बनायचं ते स्वप्न त्याच्या आयुष्याची प्रेरणा होतं. ते पूर्ण होतंच आलं होतं. तेवढ्यात त्याचे तुकडे झाले. एखाद्या माशाला कोरड्या वाळूत फेकावं, तसं त्याला त्याच्या जमातीनं बाहेर काढलं होतं.

 

ओकोंको निराश आणि त्रस्त झाल्याचं उचेंडूला कळालं. त्यानं इसा इफी समारंभानंतर ओकोंकोशी बोलायचं ठरवलं. उचेंडूच्या पाची मुलांपैकी सर्वात धाकटया अमिक्कूचे पहिल्यांदाच एका मुलीसोबत लग्न जमलं होतं. होऊ घातलेल्या वधूला हुंडा देण्यात आला होता. शेवटचा सोडून सगळे समारंभ पार पडले होते. अमिक्वू आणि त्याचे नातेवाईक ताडी घेऊन वधूच्या नातेवाईकांना भेटायला गेले होते. ओकोंकोचे मबॅन्टात आगमन होण्याच्या दोन महिने अगोदर हे घडलं होतं. आता वधूस्वीकार समारंभाची वेळ आली होती.

 

सगळ्या लेकीबाळी येऊन पोचल्या. त्यातल्या काहीजणींचं सासर लांबवर होतं. उचेंडूची थोरली मुलगी ओबोडोहून आली होती. या गावाला जायला जवळपास अर्धा दिवस प्रवास करावा लागायचा. उचेंडूच्या पुतण्याही तिथं हजर होत्या. जणू माहेरवाशिणींचं अख्खं संमेलनच भरलं होतं. एकूण बावीसजणी जमल्या होत्या.

 

सगळ्याजणी जमिनीवर गोल बसल्या होत्या. त्यांच्या मधोमध उजव्या हातात कोंबडी घेऊन नवरी बसली. आपल्या कुटुंबाचा वडिलोपार्जित दंड घेऊन उचेंडू तिच्या शेजारी बसला. बाकी पुरुष मंडळी वर्तुळाबाहेरुन पाहत होती. त्यांच्या बायकाही त्यांना साथ देत होत्या. इकडं दिवस मावळतीला निघाला होता.

 

उचेंडूची थोरली मुलगी नजिदेने प्रश्‍नांना हात घातला, तू जर खरी उत्त्तरं दिली नाहीस तर तू त्याची शिक्षा भोगशील किंवा बाळंत होताच मरशील, हे लक्षात ठेव. तिनं सुरुवात केली, माझ्या भावानं तुझ्याशी लग्न करायचं ठरवण्यापुर्वी तुझे किती पुरुषांशी संबंध होते?’

 

कोणाशीही नाही’, ती सरळ उत्तरली

 

खरं सांग’, बाकी बायकांचा गलका बोलला

 

कोणाशीही नाही?’ नजिदेचा प्रश्‍न

 

कोणाशीही नाही’, ती पुन्हा बोलली.

 

माझ्या वाडवडिलांच्या दंडावर हात ठेऊन शपथ घे’, उचेंडू म्हणाला

 

नवरी म्हणाली, ‘मी शपथ घेते

 

उचेंडूनं तिच्या हातातून कोंबडी घेतली. तिच्या मानेवर धारदार सुरी चालवत थोडंफार रक्त त्या दंडावर पडू दिलं.

 

त्या दिवसापासून अमिक्वूनं त्याच्या झोपडीत नव्या नवरीसोबत संसाराला सुरवात केली. लेकीबाळी लगेच सासरी न जाता आणखी दोन-तीन दिवस आपल्या माहेरातच मुक्कामी राहिल्या. उचेंडूनं दुसऱ्या दिवशी त्याची मुलं, मुली आणि भाचा ओकोंको या सगळयांना एकत्र बोलावलं. सोबत आणलेल्या शेळीच्या चामडी चटईवर पुरुष बसले. मातीच्या उंचवटयावर गवताच्या चटया पसरवून त्यावर स्त्रिया टेकल्या. आपल्या करडया दाढीवरुन अलगद हात फिरवत उचेंडू धीरगंभीर स्वरात बोलायला लागला.

 

मला खासकरुन ओकोंकोशी बोलायचंय’, त्यानं सुरुवात केली. पण मी जे काही सांगणार आहे त्याच्याकडं सर्वांनी लक्ष द्यावं. मी एक म्हातारा माणूस आहे. तुम्ही सगळेजण लहान आहात. जग तुम्हा कोणापेक्षाही मला जास्त कळलंय. तुमच्यापैकी कोणाला ते जर अधिक कळलं असंल तर त्यानं तसं सांगावं.तो थांबला. पण कोणाच्याही तोंडून एक शब्द फुटला नाही.

 

‘ओकोंको आज आपल्यासोबत का आहे? तो काही आपल्या कुळातला नाही. आपण फक्त त्याच्या आईचे नातलग. तो काही आपल्या इथला नाही. त्याला सात वर्षांसाठी एका अनोळखी प्रदेशात हद्दपार केलं गेलं. तो दु:खाच्या ओझ्यानं वाकून गेलाय. पण मला एक प्रश्न त्याला विचारायचाय. बऱ्याचदा आपण आपल्या मुलांचं नाव नेका असं का ठेवतो? नेकाचा अर्थ होतो आई ही सर्वश्रेष्ठ असते.तू सांगशील ओकोंको? पुरुष हा कुटुंबप्रमुख असून त्याच्या बायका त्याची आज्ञा पाळतात, हे सगळ्यांना माहीत आहे. कोणतंही मूल त्याचा बाप आणि त्याच्या कुटुंबाचं असतं. त्याची आई आणि तिच्या माहेरच्या लोकांचा त्यावर हक्क नसतो. कोणताही माणूस असतो आपल्या बापाच्या भूमीतला. तो कधीच त्याच्या आईच्या माहेरचा, त्याच्या आजोळचा असत नाही. तरीही आपण नेका म्हणजे आई ही सर्वश्रेष्ठ असते, असं का म्हणतो?

 

सगळेच शांत होते.

 

ओकोंकोनं माझ्या प्रश्नाचं उत्त्तर द्यावं’, उचेंडू म्हणाला.

 

ते मला नाही सांगता येणार’, ओकोंको म्हणाला

 

तुला नाही सांगता येणार? म्हणूनच तू लहान आहेस. तुला बऱ्याच बायका आणि अनेक लेकरं आहेत. माझ्यापेक्षाही जास्त लेकरं. तुझ्या कुळातला तू एक महान असामी आहेस. पण अजूनही तू एक लहान लेकरू आहेस. माझं लेकरू! मी जे काही तुला सांगेन ते नीट ऐक. पण मला एक प्रश्‍न विचारायचाय. एखादी स्त्री वारल्यानंतर तिला तिच्या माहेरच्या लोकांशेजारी दफन का केलं जातं? सासरच्या लोकांशेजारी तिचं दफन न करण्याचं कारण काय? तुझ्या आईला माझ्या गोतावळयासोबत चिरविश्रांती देण्यासाठी का आणलं गेलं?’

 

ओकांकोने माहीत नाही अशा अर्थाने मान हलवली.

 

त्याला हेही माहीत नाही’, उचेंडू बोलला. आणि तरीही आपण अल्पावधीसाठी दिवस कंठायला आजोळी आलोय म्हणून तो दु:खात बुडालाय. उचेंडू खिन्न हसत आपल्या मुलामुलींकडे वळला. द्याल तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर?’ सगळयांनी फक्त माना हलवल्या.

 

मग मी काय सांगतोय ते ऐका’, असं म्हणत उचेंडूनं घसा मोकळा केला, `मूल त्याच्या बापाचं असतं हे खरंय. जेव्हा बाप मुलाला मारतो त्यावेळी ते सहानुभुतीसाठी आईकडं धाव घेतं. माणसाच्या जीवनात सर्वकाही आलबेल असतं, आनंद असतो तेव्हा माणूस असतो त्याच्या बापाच्या गावचा. पण दु:ख आलं, कटुता आली की तो त्याच्या आजोळी आश्रय घेतो. इथं तुला पंखाखाली घ्यायला तुझी आई आहे. ती इथं चिरविश्रांती घेतेय. आणि म्हणूनच आई सर्वश्रेष्ठ असते, असं आपण म्हणतो. ओकोंको दु:खी मनानं आपल्या आईजवळ यावा आणि त्याच्या दु:खावर साधी फुंकर घातली जाऊ नये, हे योग्य आहे का? ओकांको, तू जर हे लक्षात घेतलं नाहीस, तर तू मृतात्म्यांना दु:ख देशील. तुझ्या बायकापोरांचं दु:ख हलकं करून सात वर्षानंतर त्यांना परत आपल्या घरी घेऊन जाणं हे तुझं कर्तव्य आहे. पण तू दु:खाच्या डोंगराखाली दबून स्वत:चा घात करून घेणार असशील, तर ते सगळे या परक्या प्रदेशातच जीव सोडतील.

 

त्यानंतर तो बराच वेळ शांत राहिला. मग त्याच्या मुलामुलींकडे बघत म्हणाला, ‘हे आता तुमचे नातेवाईक आहेत

 

उचेंडू बोलला, या जगात सर्वात जास्त दु:खी तू आहेस, असं तुला वाटतंय. कधीकधी लोकांना जन्मभरासाठी हद्दपार केलं जातं, हे तुला माहीत आहे का? तुला कधी कुणी हेही सांगितलंय का, कधी कधी लोकांना त्यांचा सगळा शेतमाल आणि कच्ची-बच्चीही गमवावी लागतात? एकेकाळी मला सहा बायका होत्या. पण आज त्या तरुण पोरीशिवाय कुणीही मागं उरलं नाही. त्या पोरीला अगदी डाव्या-उजव्यातला फरकही माहीत नाही. माझ्या पोटच्या किती पोरांना मी दफन केलंय तुला माहितंय? तब्बल बावीस! मी काही आत्महत्या केली नाही.`

 

`अकेउनिस, माझ्या पोरी, एखादी स्त्री देवाघरी गेल्यानंतर गायलं जाणारं गीत तू ऐकलं नाहीस?

 

कोणासाठी सगळं आहे छान, सगळं आहे छान?

 

असे कोणी नाही नाही, थोर असो वा लहान...

 

याउपर मला तुला काहीच सांगायचे नाही!