टॉयलेटच्या प्रेमकथेची होऊ शकते शोकांतिका

२० नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


स्वच्छ भारत योजनेमधे आपण घरोघरी संडास बांधण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यापुढची आव्हानं अधिक मोठी आहेत. सध्या मंबईत १८ वी वर्ल्ड टॉयलेट समिट सुरू आहे. त्यात जगभरातल्या तज्ञांनी संडासांच्या प्रेमकथेची दुसरी बाजूही सांगितली.

संडास करायला पूर्वी सर्रास उघड्यावर बसत, तेव्हा वास आणि घाणीचं साम्राज्य पसरायचं. आता ती सवय मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. संडास बांधलं की सगळ्या समस्या संपल्या, असं आपल्याला वाटतं खरं. पण अक्षय कुमारचा `टॉयलेट एक प्रेमकथा` हा सिनेमा जिथे संपतो, तिथे खऱ्या आव्हानांना सुरवात होते. स्वतः अक्षय कुमारसह जगभरातले अनेक तज्ञ या परिषदेत त्याविषयी चिंता व्यक्त करतायंत.

वर्ल्ड टॉयलेट समिट

जगभरात सगळ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित संडास मिळावेत, यासाठी वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन ही संस्था २००१ पासून काम करतेय. १९ नोव्हेंबरला जगभर साजरा होणारा वर्ल्ड टॉयलेट डे हादेखील या संस्थेचीच देणगी आहे. स्थापनेपासून या संस्थेने दरवर्षी जगाच्या वेगवेगळ्या भागांत वर्ल्ड टॉयलेट समिटचं आयोजन केलंय. यंदा त्यांचं यजमानपद मुंबईला मिळालंय. वांद्र्यामध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड टॉयलेट समिट २०१८मधे टॉयलेटशी संबंधित वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा सुरू आहे.

भारतात २०१४ ते २०१८ पर्यंत ८.८ कोटी शौचालयांचं बांधकाम झालंय, असं सरकारी आकडे सांगतात. २०१४ मधे ३८.७० टक्के लोकांना शौचालयं उपलब्ध होती. आता स्वच्छ भारत मिशनमुळे हा आकडा ९३ टक्के इतका झालाय. युनिसेफच्या एका आकडेवारीनुसार या स्वच्छतागृहांच्या वापरामुळे  डायरियाचे ३ लाख ७ हजार मृत्यू रोखण्यात यश मिळालंय. भारताच्या या यशावर दोन वर्षांपूर्वी दिल्लीत चर्चा झाली होती. आता यशापाठोपाठ आव्हानांची चर्चा करावी लागतेय.

खरी आव्हानं आता

आता संडास तर बांधले. त्या संडासच्या स्वच्छतेचा प्रश्न दुर्लक्षित राहता कामा नये, म्हणून तज्ज्ञांना कानी कपाळी ओरडावं लागतंय. आता कुठं सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करुन संडास तयार केलेत. अशावेळेस पावसाने दडी मारल्यामुळे संडासात पाणी कुठून आणायचं, हा प्रश्न आ वासून उभा आहे. त्यामुळे दुष्काळ, अवर्षण आणि पाणीटंचाईच्या काळातही संडासांना टाळं मारण्याची वेळ ते बांधणाऱ्यांवर येऊ शकते. किंबहुना तशी पाळी आलीच आहे.

देश हागणदारीमुक्त करण्याकडे आपण वाटचाल तर सुरू केलीय. मात्र इथून पुढे आव्हान खऱ्या अर्थाने सुरू होईल. सर्वात मोठं आव्हान आहे ते लोकांच्या सवयी बदलण्याचं. त्यांना शौचालयाची स्वच्छता शिकवणं, सेप्टीक टँक वेळेवर रिकामा करणं, संडासांपर्यंत पाणी पोचवणं आणि योग्य ठिकाणी योग्य प्रकारचे संडास बसवणं, हीदेखील आव्हानं आहेतच.

पण आज संडास नवे नवे बनलेत. अनेक ठिकाणी अजूनही त्यांचा वापर पूर्णपणे होत नाही. त्यामुळे त्यातून येणारा मैला नियंत्रित आहे. आपण या मैल्याचं नीट व्यवस्थापन केलं नाही, तर त्यातून भीषण समस्या निर्माण होऊ शकते. सेप्टीक टँकचा स्फोट होणं आणि सेप्टीक टँक स्वच्छ करण्यासाठी आलेल्या स्वच्छता कामगारांचा विषारी वायूमुळे मृत्यू होणं, या आजवर चर्चा झालेल्या समस्यांपेक्षाही ही समस्या अधिक गंभीर असू शकते.

तर संडास असणं नसण्यापेक्षा वाईट

प्रचंड मोठ्या प्रमाणावर संडास बांधून त्यातला मैला जमिनीत सोडला जातोय. बहुसंख्य ठिकाणी त्याच्यापासून खतनिर्मिती करण्याच्या पर्यायाला संपूर्ण फाटा दिला जातो. त्यामुळे मैला तसाच जमिनीत जातो. पण यातून माती आणि पुढे पाणी दूषित होऊ शकतं, यावर आज कुणीच बोलताना दिसत नाही.

वॉटर सप्लाय, सॅनिटेशन अॅण्ड हायजिन विभागाचे प्रोगॅम स्पेशालिस्ट युसूफ कबीर यांनी ‘नेचर्स कॉल’ या विषयावरच्या परिसंवादात याकडे लक्ष वेधलं. यंदाच्या टॉयलेट डेची थिमही ‘नेचर्स कॉल’ हीच आहे. आता पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ठीक आहे. उद्या काही कारणांमुळे पाण्याची पातळी वाढली तर संडासाच्या मैल्यामुळे दूषित होणारं पाणी, ही एक मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशनचे संस्थापक जॅक सिम यांनी यावेळी सांगितलं, की वाढत्या संडासांमुळे पाणी दूषित होण्याची समस्या भीषण रूप घेऊ शकते. लहान मुलं त्याचे सर्वाधिक बळी ठरतील. रसायनाने दूषित होणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त बळी मैल्याने दूषित पाण्यामुळे होऊ शकतात. संडास नसण्याची समस्या मोठी आहेच. पण उद्याची दूषित पाण्याची समस्या त्यापेक्षाही उग्र बनू शकते.

पर्यावरण क्षेत्रातले आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉ. अॅर्ने पॅनेसर यांनी या समस्येवर वेळीत पावलं उचलण्याची गरज समजावून सांगितली. फक्त संडास बांधून जबाबदारी झटकून चालणार नाही. सस्टेनेबल डेवलपमेंटच्या व्याख्येत स्वच्छ भारत मोहीम बसवायची असेल, तर सरकारला भविष्याचा वेध घेत, पाणी व्यवस्थापन, संडास बांधकाम आणि मलनि:सारण या सर्वांना एकत्र घेऊन पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी मांडलं. इतक्या मोठ्या संख्येने सेप्टीक टँक स्वच्छ करणं, हे भविष्यात मोठ्या कटकटीचं काम असेल.

संडासांचं मार्केटिंग का नाही?

गरजेनुसार पुरवठा हे मार्केटचं सूत्र. पण संडांसांच्या बाबतीत असलं काही होताना दिसत नाही. वॉटर प्युरिफायरचे प्रकार असतात, तसं संडासांचेही प्रकार आहेत. दोन पीट संडास १९३०पासून भारतात आहे. पण आज त्याचा प्रसार करावा लागतोय. ते खरं तर संडासाचं बेस्ट मॉडेल आहे. एकट्या भारतात संडास स्वच्छतेशी संबंधित उत्पादनांचं ६० अब्ज डॉलरचं मार्केट आहे. असं असतानाही संडास बांधणीच्या मार्केटला विशेष महत्त्व नाही. गरजेनुसार वॉटर प्युरिफायर बदलताना दिसतात. पण संडासाचे प्रकार मात्र गरजेनुसार बदलताना दिसत नाहीत.

शहरी, ग्रामीण या बरोबरीने पाणी असणारे, पाणी नसणारे, कायम कोरडे अशा वेगवेगळ्या प्रदेशांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संडासांची गरज आहे. पाणी नसणाऱ्या भागांमध्ये फ्लश टॉयलेट बसवले, तर ते अस्वच्छच राहतील किंवा ते वापरलेच जाणार नाहीत. अशा ठिकाणी वॅक्युम संडास उपलब्ध व्हायला हवेत. संडासांमधेही उत्तम टेक्नॉलॉजी आहे. पण गरजेनुसार आवश्यक त्या ठिकाणी ती पोचताना आढळत नाही. कारण त्याचं मार्केटिंगच होत नाही.

जातीच्या स्टेटसनुसार संडास बदलतात

ग्रामीण भागात जातीनुसार किंवा श्रीमंती गरिबीच्या स्टेटसनुसार संडास बांधले जातात, असं निरीक्षण युसूफ कबीर यांनी मांडलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीमंतांच्या घरात सेप्टीक टँकवाले संडास असतात. कथित वरच्या जातींकडेही सेप्टीक टँकच असतात. तर गरीब कुटुंबांमधे आणि कथित खालच्या जातीच्या घरांकडे दोन पीटचे संडास असतात.

दोन पीटचे संडास हा आज उपलब्ध असणारा सर्वोत्तम पर्याय आहे. पण तो सगळ्यांकडे आढळत नाही. श्रीमंतांना तो सहज शक्य असूनही ते सेप्टीक टँक वापरतात. एकीकडे जात किंवा श्रीमंतीनुसार संडास बदलतात. पण भौगोलिक परिस्थितीच्या गरजेनुसार संडासांचे प्रकार मात्र बदलत नाहीत. त्याची खरी गरज असूनही ते घडत नाही.  

आपण संडासांची संख्या वाढवलीय. त्याच्या स्वच्छतेसाठी लागणाऱ्या उत्पादनातील केमिकलमुळे मैल्यापासून तयार होणाऱ्या सोनखतावर दुष्परिणाम होऊ शकतो, हे संकटदेखील आपण विसरता कामा नये.

संडास बांधण्यासाठी आपण मोहिमा राबवतोय. कोट्यवधी रुपये खर्च करतोय. सगळीकडे जाहिराती करतोय. अगदी सिनेमेही काढतोय. आता त्यापुढे जाऊन त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत, यासाठीही आतापासूनच हालचाली कराव्या लागणार आहेत.