बळीराजाच्या मदतीला धावणाऱ्या जागृत तरुणांची गोष्ट

०४ मार्च २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


रविवारी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर सुरू असलेल्या कॅम्पने पुणेकरांचं लक्ष वेधून घेतलं. एका वेगळ्याच उपक्रमासाठी एकत्र आलेले तरुण ‘जागृती ग्रुप’च्या नावाने गेली अकरा वर्ष असे कॅम्प घेत आहेत. त्यातून पुणेकरांनी दिलेली मदत गरजूंपर्यंत पोचवत आहेत. 

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राला दुष्काळाचं ग्रहण लागलंय. प्रत्येक वर्षी दोन-तीन महिने थोडा पाऊस येतो आणि जातो. त्यानंतर मात्र महाराष्ट्र कोरडाठाक पडतो. महाराष्ट्राची विशेषतः ग्रामीण भागाची तहान काही भागत नाही. मार्च उजाडला की महाराष्ट्र विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ दुष्काळाच्या झळांनी होरपळायला लागतो. 

मग माणसांच्या जगण्याचा आणि जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न कायम भेडसावत राहतो. हे चित्र आता काही नवीन राहिलं नाही. शिवाय लोकांच्याही अंगवळणी पडलंय. अशा दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचं काम पुण्यातला ‘जागृती ग्रुप’ गेल्या ११ वर्षांपासून करतोय. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलतोय.

तरुणाईने सुरू केला जागृती ग्रुप

जागृती यात्रा नावाचा एक देशपातळीवरचा उपक्रम २००७ पासून सुरू आहे. या यात्रेत देशभरातले तरुण सहभागी होतात. यात्रा देशातल्या १२ शहरांमधून १५ दिवस रेल्वेच्या माध्यमातून ८००० किलोमीटर प्रवास करते. या प्रवासातून विविध मान्यवर लोकांशी संवाद साधला जातो.  

संपूर्ण भारतातील कॉलेजचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांची निवड या यात्रेसाठी केली जाते. या यात्रेत भाग घेतलेल्या पुण्यातल्या तरुणांनी २००९ पासून जागृती ग्रुपची सुरवात केली. यात  कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यावसायिक, पत्रकार अशा सर्वांचा समावेश आहे. जागृती ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी पुणे शहरात कॅम्प लावून होतकरू, गरजू, अनाथ, वृद्ध, विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी आवश्यक वस्तू गोळा करून त्यांच्यापर्यंत पोचवल्या जातात. 

फर्ग्युसनच्या कॅम्पमुळे लक्ष वेधलं

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धान्य आणि कपडे कलेक्शन कॅम्प रविवारी ३ मार्च २०१९ ला सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लावण्यात आला होता. पुण्यातल्या नागरिकांना धान्य आणि जुने कपडे, इतर वस्तू देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. लोकांनी कपडे, चादर, शूज, चप्पल, धान्य उत्स्फूर्तपणे या कॅम्पमध्ये आणून दिलं.

२००९ पासून दरवर्षी हा उपक्रम अविरतपणे राबवला जातोय. यंदाचं हे अकरावं वर्ष आहे. या कॅम्पमध्ये जवळपास १०० पेक्षा जास्त स्वयंसेवक सहभागी झाले होते. स्वयंसेवकांनी टीशर्टवर अभिनंदन वर्धमान यांचा फोटो असलेली थीम घेतली होती. यात मनीषा वाघमारे, शुभम राठोड, उमाकांत खेडेकर, सचिन कदम, ज्योती महाडिक, गजेंद्र दांगट यांनी महत्वाची भूमिका बजावली.

गेल्या काही वर्षांपासून कॅम्पमध्ये सहभागी होणारे मायभूमी विकास परिवाराचे विजय दरेकर म्हणाले, 'या वर्षीची महाराष्ट्रातील भीषण दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्ही धान्य कलेक्शन कॅम्प आयोजित करत आहोत. धान्य गोळा करून काही गावात धान्याचं वाटप करण्यात येईल. हडपसर, हिंजेवाडी, पिंपरी-चिंचवड, कोथरुड, सहकारनगर, येरवडा अशा पुण्यातल्या विविध परिसरातील व्यक्ती दरवर्षी आम्हाला आपल्याकडच्या वस्तू घेऊन येतात.' 

थेट बळीराजाचा पदरात दान 

कॅम्पमधे गोळा झालेलं धान्य मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त गावातल्या गरजू शेतकऱ्यांना दिलं जाईल. या शिवाय जमा झालेले जुने-नवे कपडे, खेळणी, भांडी, पुस्तकं, गरम कपडे, इतर उपयोगी वस्तू सोलापूरच्या माढ्यात काम करणारी आशामंत फाउंडेशन ही संस्था आणि बीडच्या माजलगावातल्या शेलापुरी इथं काम करणारी मानव विकास संस्थांना देण्यात येणार आहेत. या दोनही संस्था अनाथ, वृद्ध, अपंग मुलं मुली तसंच दुर्बल घटकातील आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी काम करतात.

जागृती ग्रुपच्या स्थापनेपासून महत्वाची भूमिका बजावणारे राज देशमुख सांगतात, 'जागृती ग्रुपच्या माध्यमातून आम्ही विविध भाषा, पंथ, धर्माचे लोक एकत्र येऊन काम करतो. समाजातल्या वंचित घटकांसाठी, शेतकऱ्यांसाठी खारीचा वाटा का होईना म्हणून मदत करतो. यातून मिळणारा आनंद हा सर्वोच्च असतो.'

त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय

२०१५-१६ च्या महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळात १८ टन धान्य गोळा करून ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळा, खामगाव, दुधगाव येथील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा अवर्णनीय होता. गेल्या वर्षी साडे सहा ट्रक जुने, नवीन कपडे जमा जमा झाले होते. हे कपडे समाजबंध, श्रावणबाळ, निर्मल बाल विकास, मिट्टी के रंग, स्नेहवन अशा संस्था आणि काही गावात जाऊन दिले.

ग्रुपमध्ये कार्यकर्ती म्हणून काम करणारी पल्लवी वाघ म्हणते, 'काल रात्री येऊन सर्वांनी मंडप लावला. आज सकाळपासूनच पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. इथं काम करताना आनंद मिळतो. आमच्याकडून कोणाला तरी मदत होतेय आणि आमचं छोटं काम कोणाला तरी हायस वाटतय. ही आमच्यासाठी  आनंदाची गोष्ट आहे.'

'गाव तिथं ग्रंथालयांची' स्थापना

धान्य, वस्तू याबरोबरच एका वर्षी ग्रुपने जुनी पुस्तकं देण्याचं आवाहन केलं. पुणेकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. जमा झालेल्या पुस्तकातून ग्रामीण भागात ग्रंथालय उभारण्याचं काम हाती घेण्यात आलंय. 'एकलव्य' या संस्थेला सर्व पुस्तकं देऊन 'गाव तिथं ग्रंथालया’ला सुरवात केली. बुलढाणा जिल्ह्यातील ५ गावात 'गाव तिथे ग्रंथालय' उभारले आहे. तसंच परभणी जिल्हयातल्या कात्नेश्वर या गावात याच उक्रमातून ग्रंथालय उभं राहिलंय.

नारायण चापके या कार्यकर्त्यानं आपल्या गावात ग्रंथालय उभारलंय. त्याविषयी तो म्हणतो, '२०१४ पासून या ग्रुपला जोडलो. सर्व लोकांना समाजाप्रती जाण आहे. हा ग्रुप उद्योगासाठी मदत करतो. तसंच विविध लोकांशी संवाद होतो. समाजाविषयी काही तरी देणं लागतो. म्हणून आपण काम करतो, तो आनंद फार निराळा असतो.'

हल्ली तरुणाईला पावलापावलावर अनेक सल्ले दिले जातात. या तरुणाईला सामाजिक बांधिलकी, समाजसेवेचं भान नाही, वगैरे. पण अशी सरसकट सर्वांनाच दूषणं देण्यात काही अर्थ नाही. आजची तरुणाई संवेदनशील आहे. सामाजिक जबाबदारीचं भानही बाळगते, याचंच जागृती ग्रुप हे एक उदाहरण आहे. दुष्काळाचा हा दाह थोडा वाटून घेऊन ग्रामीण भागातल्या माणसांचा भार हलका करण्याचं काम जागृती ग्रुप करतोय. 

(लेखक मुक्त पत्रकार असून अक्षरदान या दिवाळी अंकाचे संपादक आहे)