लोकशाही वाचवण्याचा वीस कलमी कृतीक्रार्यक्रम

०२ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


लोकशाहीवादी वैगरे लेबल लागली की आपल्याला पुढारलेले असल्याच आनंद मिळतो. पण लोकशाहीचा आधार घेऊन जी काही संकटं उभी राहतायत ती अधिक धोकादायक आहेत. अशावेळी लोकशाहीच्या संरक्षणाच्या दृष्टीने नेमकं काय करायला हवं हे सांगणारा अमेरिकन लेखक, इतिहासकार टिमथी स्नायडर यांचा वीस कलमी कार्यक्रम महत्वाचा ठरतो. या लेखाचा मुग्धा कर्णिक यांनी केलेला अनुवाद देत आहोत.

जगभरातल्या लोकशाही राष्ट्रांसमोर काही संकट नव्यानं उभी राहत आहेत. 'लोकशाही' हा शब्द त्यासाठी वेगळ्या मार्गाने वापरात आणला जातोय. लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं अशी स्थिती आजूबाजूला असताना दुसरीकडे अभिव्यक्ती आणि आविष्कार स्वातंत्र्याच्या अनुषंगाने चर्चा, वाद, संघर्षही होतायत. भारतही त्याला अपवाद नाही. अशा वेळेस लोकशाहीच्या संरक्षणासाठी आपण नेमकं काय करायला हवं, काय करू शकतो यावर विचार करायला हवा.

असाच विचार करून टिमथी स्नायडर या अमेरिकेतल्या लेखक आणि इतिहासकाराने लोकशाहीच्या संरक्षणाच्या दृष्टीने काय करता येईल हे सांगणारे वीस मुद्दे मांडलेत. हे केवळ मुद्दे नाहीत तर लोकशाहीचं भेदक वास्तव आहे. मध्य आणि पूर्व युरोपचा इतिहास, होलोकॉस्ट इतिहास या विषयातले तज्ञ म्हणून स्नायडर यांना जगभरात ओळख आहे. अमेरिकेतल्या येल विद्यापीठात ते इतिहासाचे प्राध्यापक आहेत. 

स्नायडर यांनी मांडलेले हे वीस मुद्दे आपल्या दृष्टीनेही  महत्वाचे ठरतात. आपल्याकडे लोकशाही नेस्तनाबूत करणाऱ्या घटना लोकशाहीच्या गोंडस नावाखाली घडताहेत. अशा सगळ्या परिस्थितीत नागरिक म्हणून आपल्याला अधिक गंभीरपणे या मुद्यांकडे पहायला हवं. स्नायडर यांच्या या वीस मुद्द्यांचा मुग्धा कर्णिक यांनी केलेला हा अनुवाद.

१. गरज नसताना अगोदरच माना तुकवू नका.

बऱ्याचशा अधिकारशहांना जी सत्ताशक्ती मिळते ती लोक स्वतःहून देऊ करत असतात. असल्या कठीण काळात तर अनेक व्यक्ती शासनाला आपण कसं वागलेलं रुचेल याचा विचार करून आधीच तसं वर्तन करू लागतात. तसं करू नका. त्यांना अपेक्षित असलेला आज्ञाधारकपणा आधीच देऊ केलात तर अधिकारशहांना लोकांना आदेश देणाऱ्या शक्यता लक्षात येतात. आणि त्यांची आपल्या स्वातंत्र्यावरची जुलमी पकड घट्ट होत जाते.

हेही वाचा : किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार?

२. संस्थांचे रक्षण करा.

न्यायालय, माध्यमं, किंवा वृत्तपत्र यांचा मागोवा घेत रहा. कुठल्याही संस्थेला आपली मानत असाल तर तिच्यासाठी काही कृती करावी लागेल. संस्था कधीच स्वतःच स्वतःला संरक्षित करू शकत नसतात. त्यांना सुरुवातीपासून विचारसामर्थ्याचे पाठबळ नसेल तर त्या झरझर गडगडत जातात.

३. न्यायबुद्धी हवी

 राष्ट्रनेते आणि पुढारी जर नकारात्मक उदाहरणं घालून देत असतील तर आपण आपलं काम अधिकच न्यायबुध्दीनं करणं महत्त्वाचं ठरतं. कायद्याचं राज्य मोडीत काढणं वकिलांशिवाय शक्य होत नाही, आणि दिखाऊ खटले चालवणं न्यायाधीशांशिवाय शक्य होत नाही.

४. फसव्या देशभक्तीबद्दल संताप

राजकारण्यांची भाषणं ऐकताना काही शब्दांकडे सावधपणे लक्ष असू द्या. दहशतवाद, अतिरेकी या शब्दांचा वापर वाढू लागला की सावध व्हा. अपवादात्मक परिस्थिती किंवा आणिबाणीची परिस्थिती या कल्पना मोठ्या धोकेबाज असतात. देशभक्तीच्या फसव्या शब्दयोजनांबद्दल मनात संतापच असायला हवा.

५.राइशटॅगच्या आगीची आठवण ठेवा

कल्पनेपलिकडची अवांच्छित परिस्थिती उद्भवली तर शांत रहा.दहशतवादी हल्ला झाला असेल, तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की अनेकदा सगळे अधिकारशहा अशा घटनांची फार वाट पाहात असतात. त्यातून त्यांच्या शक्तीचे एकत्रीकरण होत रहायला मदतच होणार असते. राइशटॅगच्या आगीची आठवण ठेवा. असल्या प्रकारची आपत्ती सत्तेचा तोल ढळवायला, विरोधकांना नामोहरम करायला उपकारक ठरते. हिटलरी पाठ्यपुस्तकातला फार महत्त्वाचा धडा आहे तो. त्याला बळी पडू नका.

हेही वाचा : चीनने धोका दिल्यानंतर नेहरूंनी आपली युद्धनीति कशी बदलली?

६. झोपण्यापूर्वी वाचा

भाषेचा सुज्ञ वापर करा. सगळेजण एकसाथ जे वाक्प्रचार वापरत आहेत ते वापरणं टाळा. स्वतःची वैचारिक बोली स्वतः घडवा. दुसरे लोक जे बोलत आहेत तेच तुम्ही मांडणार असलात तरीही. झोपण्यापूर्वी इंटरनेट वापरू नका. आपली गॅजेट्स दुसरीकडे चार्जिंगला लावा. आणि वाचा. काय वाचणार? वाक्लाव हॅवेलचे द पॉवर ऑफ द पॉवरलेस, जॉर्ज ऑर्वेलचं १९८४, स्झेस्लॉ मिलोझचे द कॅप्टिव माइन्ड, आल्बेर काम्यूचे द रिबेल, हॅना आरेन्डचे द ओरिजिन्स ऑफ टोटॅलिटेरियनिझम, किंवा पीटर पोमेरान्त्सेवचे नथिंग इज ट्रू अँड एव्रीथिंग इज पॉसिबल.

७. वेगळे उठून दिसा. 

कुणीतरी असायलाच हवं वेगळं. उक्तीने आणि कृतीने सर्वांसारखंच असणं सोपं असतं. काहीतरी वेगळं करणं थोडं विचित्र, अस्वस्थ करणारं वाटेल. पण थोडं अस्वस्थ झाल्याशिवाय मुक्ती मिळणार नसते. ज्या क्षणी तुम्ही उदाहरण घालून देता, जैसे थेचे गारूड भंग पावते. आणि मग इतर अनेक तुमच्या सोबत चालू लागतात.

८. सत्यावर विश्वास ठेवा.

वास्तव नाकारणं म्हणजे स्वातंत्र्यच  नाकारणं. काहीच सत्य नसेल तर मग सत्तेवर कुणी टीकाच करू शकणार नाही, कारण तसं करायला काही पायाच उरत नाही. काहीच सत्य नसेल तर मग सगळाचा देखावा. आंधळं करून सोडणाऱ्या झगझगाटावर कुणीतरी भरपूर पैसा खर्च करत असतं हे कधीही विसरायचं नाही.

९. शोध घेत रहा. 

घटनांचे अर्थ स्वतः लावायचा प्रयत्न करा. दीर्घ लेख वाचण्यासाठी वेळ काढा. शोधपत्रकारिता करणाऱ्या प्रिंट मिडियाला आर्थिक पाठबळ द्या. तुमच्या डोळ्यासमोरच्या चकचकत्या पडद्यावरच्या अनेक गोष्टी तुमचे नुकसान करण्यासाठीच तिथे चमकत असतात हे समजून घ्या. अपप्रचारांचा शोध घेणाऱ्या साइट्सबद्दल वाचा.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

१०. थोडं सक्रीय राजकारण करा.

सत्ताधाऱ्यांना तुम्ही खुर्चीत बसूनबसून थुलथुलं व्हावं, तुमच्या भावना पडद्यावरच्या चकचकाटात विरळ विरंजित व्हाव्यात असंच वाटत असतं. बाहेर पडा त्यातून. जरा अनोळखी लोकांत, अनोळखी जागी फिरा. नवे मित्र जोडा आणि त्यांच्यासोबत चार पावलं चाला.

११. डोळ्याशी डोळा भिडवा, बोला. 

हे केवळ विनम्रता दाखवण्यासाठी नाही. आपल्या परिसराशी जोडून घेण्यासाठी करावं लागेल. अनावश्यक सामाजिक भिंती पाडण्यासाठी, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही, हे समजण्यासाठी हे करावं लागेल. आपल्याला इतर सर्वांना तुच्छ लेखण्याच्या काळात जगण्याची वेळ आली तर आपल्या रोजच्या जगण्यात डोकावणाऱ्या मनोभूमिकांशी ओळख हवीच.

१२. जबाबदारी स्वीकारा

जगात जे घडतं आहे त्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल स्वस्तिक, झेंडे किंवा अशाच द्वेषचिन्हांकडे डोळे उघडून पहा. नजर फिरवून काहीच साध्य होणार नाही. या चिन्हांपासून स्वतःला दूर ठेवा आणि इतरांना तेच उदाहरण घालून द्या.

१३. एकछत्री सत्तेला काबीज

एकपक्षीय राष्ट्राच्या कल्पनेला विरोध करा. ज्या पक्षांनी आजवर एकछत्री सत्ता काबीज केली ते कधीतरी काही काळापूर्वी वेगळे होते. आपल्या विरोधकांना मोडून काढण्यासाठी त्यांनी एखादा ऐतिहासिक क्षण वापरून घेतला. असे होऊ नये म्हणून सर्व निवडणुकांत सहभागी होऊन मतदान करा.

१४. निवडीचं भान

चांगल्या कामांना आर्थिक मदत करा चांगलं काम करणारी एखादी संस्था शोधून तिला मदत करा. यामुळे आपण नागरी समाजाचा एक भाग आहोत आणि स्वतंत्र निवड करू शकतो हे भान जागं राहील.

१५. खाजगी अवकाश सांभाळा. 

हलकटपणे वागणारे सत्ताधारी तुमच्याबद्दलची माहिती वापरून तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. आपला काँप्युटर वेळोवेळी मालवेअरमुक्त करा. इमेल्स म्हणजे खुल्या आकाशावर लिहिण्यासारखेच आहे. इंटरनेटवरील पर्यायी मार्ग वापरून संपर्क करा. किंवा सरळ नेट कमीच वापरा. व्यक्तिगत निरोप व्यक्तिशः प्रत्यक्षच द्यायची सुरुवात करा. कायद्याशी संबंधित काहीही प्रकरणे असतील तर ती लवकरात लवकर निपटून टाका. अधिकारशहांचे राज्य अखेर ब्लॅकमेलवर चालते. कुठल्या हुकाला तुम्हाला टांगायचं त्याचा शोध घेत असते. फार जास्त हूक्स ठेवू नका.

हेही वाचा : न्यायमूर्तींनी संसदेत गेलं पाहिजे, पण गोगोईंसारखं नेमणुकीच्या दारानं नको!

१६. इतर देशांकडून शिका.

विदेशात आपले मित्र असू द्या. नवे विदेशी मित्र अवश्य जोडा. इथल्या अडचणींतून एक सार्वत्रिक दिशा दिसते आहे. कुठल्याच देशाला एकेकट्याने उत्तरे मिळणार नाहीत. तुमच्याकडे आणि तुमच्या कुटुंबियांकडे पासपोर्ट्स असतीलच असं पहा.

१७. अर्धलष्करीदलांकडे लक्ष असू द्या. 

व्यवस्थेच्या विरोधात असल्याचं बोंबलून सांगणारे लोक जेव्हा गणवेष धारण करून, मशाली पेटवून कवायती करू लागतात, एखाद्या नेत्याचं चित्र फडकवत फिरतात तेव्हा अखेर जवळ आली असं समजा. नेत्याचे निमलष्करी अनुयायी आणि अधिकृत पोलीस किंवा लष्कर मिसळू लागतात तेव्हा खेळ संपला असंच समजायचं आहे.

१८. शस्त्र धारण करण्यापूर्वी विचार करा. 

सार्वजनिक सेवेचा भाग म्हणून तुमच्याकडे शस्त्र असेल तर देव तुमचं भलं करो आणि तुमचं रक्षण करो. पण भूतकाळात पोलीस आणि शिपाई यांनी केलेली दुष्कृत्ये आठवा. नकार देण्याची मानसिक तयारी ठेवा. याचा अर्थ समजत नसेल तर एखादे होलोकॉस्ट म्यूजीयम अवश्य पहा आणि कर्तव्यातील नैतिकता पालनाच्या प्रशिक्षणाबद्दल थोडंसं जाणून घ्या.

१९. धैर्यवान रहाण्याचा प्रयत्न करा. 

आपल्यापैकी कुणीच स्वातंत्र्यासाठी मरायला तयार नसेल तर आपण सारेच स्वातंत्र्याविना मरून जाऊ.

२०. देशभक्त असा.

नवा राष्ट्रप्रमुख देशभक्त नाही. आपला देश काय आहे याचे भान येणाऱ्या पिढ्यांना असावं म्हणून चांगलं उदाहरण आपणच घालून द्यायला हवं. त्यांना त्याची फार गरज भासेल.

हेही वाचा : 

भिऊ नका, मीच तुमच्या पाठीशी आहे!

आपले राजकारणी पुस्तकं का लिहित नाहीत?

नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?

बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज

या बाळंतपणाने सरकारी आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास जन्माला घातलाय