सेल्फी विथ कुंभः स्वयंघोषित शंकराचार्य त्रिकाल- स्टंटबाज की क्रांतिकारक?

२४ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!

कुंभमेळ्यात मी खूप जणांना विचारलं, 'परी आखाडा कहां हैं, त्रिकाल भवंता किधर मिलेगी?' कुणालाच काही माहीत नव्हतं. इंटरनेटवर मात्र परी आखाड्याची वेबसाइट सापडली. त्याच्यावर असलेल्या रँडम पत्त्यावरून मी न्यू यमूना ब्रिजच्या खाली जाऊन पोचले. तिथे बऱ्याच लोकांना विचारल्यावर एका पोलिसानं मला दूरचं मंदिर दाखवलं. म्हणाला, 'वो मंदिर मेंही परी आखाडा है. वहां त्रिकाल मिलेगी. मंदिर और उसके आसपास की जमीनपर उसने अवैध कब्जा जमा रख्खा हैं!'

हेही वाचाः सेल्फी विथ कुंभः साधुंना कशाला पाहिजे लक्झरी, फिरंगी बाबाचा सवाल

इलाहाबादलाच २०१३ मधे झालेल्या कुंभमेळ्यात त्रिकालनं आपला स्वतंत्र आखाडा स्थापन करत स्वत:ला शंकराचार्य घोषित केलं. आखाडा परिषदेनं २०१७ मधे बनावट बाबा लोकांची लिस्ट जाहीर केलीय. त्यात त्रिकाल भवंताचंही नाव आलं. शिवाय आजवर जमिनीच्या वादातून आणि इतर कारणांनी तिच्यावर अनेकवेळा हल्ले झालेत. २०१६ मधे उज्जैनच्या कुंभमेळ्यात तिनं आत्मदहनाचा प्रयत्न केला होता आणि त्यावरून तुरुंगातही जाऊन आलीय.

न्यू यमुना ब्रिज संपतो तिथं जाऊन पोचल्यावर एक जुनं मंदिर दिसलं. मंदिरासमोर एक बॅनर्सची कमान उभी केलेली होती. त्यावर त्रिकालचा दोन्ही बाजूंना फुल साइज फोटो आणि लांबलचक नाव 'जगद्गुरू शंकराचार्य त्रिकाल भवंता सरस्वतीजी महाराज'. एक कॉलेजवयीन पोरगी उभी होती.

मी तिला विचारलं, 'त्रिकालजी मिलेंगी?' तिनं माझ्याबद्दल आधी विचारून घेत स्वत:चं नाव सांगितलं अपराजिता. म्हणाली, 'त्या थोड्याच वेळात येतील, तुम्ही आत बसा.' मंदिराच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर एक ओवरी दिसली. तिच्यावर एक बॅनर होतं. त्याच्यावर त्रिकालच्या महिला आणि पुरुष भक्तांचे फोटो होते.

तिथे बसल्यावर समोर मंदिराचा गाभारा दिसत होता. गाभाऱ्यात शंकराची पिंड, पिंडीच्या मागे एक मोठी बैठक, त्यावर एक खरं असेल किंवा खोटं, बिबट्याचं कातडं अंथरलेलं. बैठकीच्या बाजूला त्रिशूळ खोचून ठेवलेला. वर भिंतीवर नाशिकच्या कुंभमेळ्यात महाराष्ट्रातल्या राजकारण्यांसोबत घेतलेले फोटो लावलेले.

हेही वाचाः सेल्फी विथ कुंभ: इथे ४१ सेकंदाच्या डुबकीने स्वर्ग मिळतो

त्रिकाल मूळची मिर्जापूर जिल्ह्यातल्या चुनार गावाची. इलाहाबादच्याच एका खासगी हॉस्पिटलमधे नर्स होती. तिचे पती शालिक राम शर्मा शिक्षक आहेत. दोन मुलं रवी आणि अपराजिता. संन्यास घेतल्यावर सांसारिक जीवनाचा तिनं त्याग केला. 'श्री सर्वेश्वर महादेव बैकुंठधाम मुक्तिधाम आखाडा परी' हे तिच्या आखाड्याचं नाव. शिवाय ती 'भारतीय राष्ट्रीय विकास परिषद' नावाची एक एनजीओही चालवते.

अर्ध्या तासानं एका आलिशान कारमधून त्रिकाल आली. अपराजिता तिची मुलगी असल्याचं संवादातून कळालं. त्रिकाल लगेचच मुलाखत द्यायला तयार झाली. सुरवातीलाच तिचं नाव बनावट बाबांच्या लिस्टमधे आल्याबद्दल विचारलं.

ती म्हणाली, 'आखाडा परिषदेला मी किंमत देत नाही. तिथली संपूर्ण व्यवस्था भ्रष्ट आणि पितृसत्ताक आहे. माझ्यासारख्या महिलेला का सत्ता द्यायची या विचारानं ते असुरक्षित आणि आक्रस्ताळे झालेत. त्याचाच हा परिणाम आहे. म्हणूनच मी स्वत:ला शंकराचार्य घोषित केलंय. मला कुणाच्या शिक्क्यांची गरज नाही.'

त्रिकाल एकाएकी उठून आत जाते. आतून काही कागदपत्रं आणि बातम्यांची कात्रणं आणून दाखवते. म्हणते, 'बघ, मी दीर्घकाळ न्यायालयीन लढाही लढतेय. १३ ऑक्टोबर २०१३ ला मी स्वत:चा आखाडा स्थापन केला. नाशिक कुंभमेळ्यात मला आणि माझ्या महिला शिष्यांना सन्मानानं स्नान करता यावं म्हणून वेगळा घाट मागितला. तो मिळाला नाही. उज्जैनच्या सिंहस्थ कुंभातही मी आत्मदहनाचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी मला अटक केली.’

ती सांगते, ‘माझा आखाडा रजिस्टर्ड आहे. शिवाय मी शंकराचार्य म्हणून वैदिक पद्धतीनं पट्टाभिषेक करवून घेतलाय. सरकारही आखाडा परिषदेला मिळालेलंय. म्हणूनच या कुंभात तू पाहू शकतेस. प्रत्येक आखाड्याला सरकारनं एक एक कोटी रुपये दिलेत. फाइव स्टार सुविधाही दिल्यात. आमच्या मंदिर परिसराला मात्र एकही रुपया नाही. कुठलीच सुविधा, अगदी स्वच्छतागृहसुद्धा दिलं नाही!’

आपल्याला सुविधा दिल्या न जाण्यामागंच कारण सांगताना ती पुढे म्हणते, ‘त्यांना वाटतं, या सगळ्यामुळं मी आखाडा परिषदेला शरण जाईल आणि माझा आखाडा जुन्या आखाड्यासारख्या कुठल्या तरी मातब्बर आखाड्यात विलीन करेन. पण ते कधीच शक्य नाही. या इतर आखाड्यांमधेही महिला महामंडलेश्वर आहेत. पण त्या केवळ बाहुल्या आहेत पुरुष बाबांच्या हाताच्या. त्यातल्या अनेकींना माझ्या आखाड्यात सामील व्हायचंय. पण त्या तसं करायला भितात.'

हेही वाचाः सेल्फी विथ कुंभः अकाली प्रौढ करणारं 'अध्यात्म'

त्रिकालच्या म्हणण्यानुसार सध्या भारतभरात आणि बाहेरही तिचे पन्नास हजाराहून अधिक शिष्य आहेत. नुकतीच नेपाळमधे प्रवचनाचा दौरा करून आल्याचं ती सांगते.

तितक्यात तिची मदतनीस सगळ्यांना एक आयुर्वेदिक चहा आणून देते. बाजूला बसलेली त्रिकालची एक शिष्या सांगते, 'माताजी आयुर्वेदशास्त्र की बहोत बडी जानकार है. २५ सालसे कभी अॅलोपॅथी की एक दवाई भी नही खाई. आहार भी बहुत कडे बंधन से करती है.'

तो चहा पिताना मी तिला विचारते, 'किन्नर आखाडा जुन्या आखाड्यात विलीन झाला त्याबद्दल काय वाटतं?' ती लगेच म्हणते, 'ते तर बळी पडले यांच्या कटाला. त्यांना पुरुषांव्यतिरिक्त इतर कुणाचीही आखाड्यात स्वातंत्र्य ओळख नकोय. मग ते किन्नर असोत की महिला. त्यांना त्यांच्या आखाड्याचा भाग असलेला साध्वींचा माईवाडा चालतो. कारण त्या स्वत:चं वेगळं काही मागत नाहीत.’

‘आधी आबादी जो हैं उस महिला वर्ग का हिंदू धर्म में हजारो साल से खुदका एक आखाडा नहीं हो सकता? पुरुषसत्ताका इससे बडा प्रमाण और क्या चाहिये? मै धर्मक्षेत्र में समानता लाना चाहती हू. वो ऐसे कौन हैं जो उनकी दास्यता हम स्वीकार करें? क्यू उनके अधीन रहे?'

त्रिकालशी संवाद सुरू असताना एक विदेशी महिला तिकडं आली. तिचं नाव अॅन्टोनेट डेनापॉल. इकडचे लोक तिला अनिता म्हणतात. अनिता बऱ्यापैकी अस्खलित हिंदी बोलते.

टेक्सास युनिव्हर्सिटीत प्राध्यापक असल्याचं सांगत ती म्हणाली, 'मी त्रिकालजींवर सध्या एक पुस्तक लिहितेय. पहिल्या महिला शंकराचार्य आहेत त्या! धार्मिक क्रांती घडवत आहेत. आजवर प्रस्थापित धार्मिक ठेकेदारांकडून जी पितृसत्ताक धर्मसत्ता अबाधित राखली गेलीय तिला त्या उखडून टाकताहेत. केवढी मोठी हिंमत लागते ना त्यासाठी?'

अनिता २०१३ मधे इलाहाबादला झालेल्या महाकुंभमधे त्रिकालला भेटली. गेली पाच वर्ष त्रिकालच्या प्रचंड प्रभावाखाली आहे असं तिच्या एकूण देहबोली आणि बोलण्यातून कळत राहतं.

त्रिकालनं दोन पांढरे उंदीर पाळलेत. त्यांना पिंजऱ्यात खायला घालत ती पुढं बोलायला लागते, 'तुला सांगते, सगळे आखाडे भ्रष्ट आहेत. लोकांचं आर्थिक, मानसिक शोषण करतात. शिवाय नशाखोरीचं मोठं केंद्र बनलेत. तरुण पोरं नागा साधूंच्या नादानं आखाड्यात जाऊन गांजा ओढतात. आखाडा परिषदेचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी महाराजसुद्धा वादात अडकलेले आहेत. त्यांच्यावर तर पुरुष भक्त आणि मुलांचं शारीरिक शोषण करण्याचेही आरोप आहेत.'

निरोप घेताना त्रिकाल आवर्जून सांगते, माझं सामाजिक कामपण खूप मोठं आहे. अनेक पिडीत महिलांना मी आधार देते. पुढच्या भेटीत त्याच्याबद्दलही सांगते तुला. ही स्टोरी छापून आली, की मला वॉट्सअपवर पाठव. माझं मुंबईत प्रवचन असेल तेव्हा तुला कळवते, नक्की ये.’

त्रिकाल हातातला त्रिशूळ उंचावत एकदम स्टाइलीत निरोप घेते, 'जय महाकाल!'

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

 

हेही वाचाः

सेल्फी विथ कुंभः संसारात रमलेल्या साध्वीची गोष्ट

सेल्फी विथ कुंभः पोळपाट लाटणं घेऊन विमल, उषा कुंभमेळा गाठतात तेव्हा!

सेल्फी विथ कुंभः कुंभमेळ्यात रात्री मुर्दाबादची नारेबाजी का झाली