सुशांत सिंगला न्याय की राजकारण ?

१३ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


न्यूज चॅनेल गेले अडीच तीन महिने अहोरात्र सुशांतसिंग याच विषयावर बोलताहेत. बिहारचं विधानसभा निवडणूकही ऐन तोंडावर आलीय.  त्यामुळे कोरोना पेशंटच्या संख्येत भारत जगामधे दुसऱ्या स्थानी येणं, अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी ढासळणं, २ कोटी पगारदार बेरोजगार होणं आणि चीनने सीमेवर भारतावर अरेरावी करणं हे विषय बाजूला पडलेत. हे भाजपच्याच फायद्याचं आहे. हेडलाईन मॅनेजमेंट हे भाजपसाठी महत्वाचं साधन आहे.

सुशांत सिंग राजपूत या ऍक्टरनं १४ जून २०२०ला मुंबईत आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. तो मानसिक तणावाखाली होता. त्याच्यावर डिप्रेशन सारख्या गोष्टींसाठी काही महिने उपचार चालू होते अशी माहिती पुढे आली. सगळीकडे त्याविषयी हळहळ व्यक्त करण्यात आलीय.  एक दोन आठवडे गेल्यानंतर पहिल्यांदा चर्चा सुरु झाली बॉलिवूड जगातल्या नेपोटीजमची. म्हणजेच नात्यातल्या, मित्रपरिवारातल्या लोकांनाच चित्रपटांमधे काम देण्याच्या गोष्टीविषयी. 

चांगला कलाकार असूनही सुशांत सिंगला डावललं जात होतं. त्याला उत्तम सिनेमे करूनही पुरस्कार कसे दिले जात नव्हते. याविषयी चित्रपट जगातातले कलाकार, पत्रकार, नेटीजन्स बोलायला लागले. त्याची मानसिक स्थिती बिघडली त्यामागे हे तर कारण नाही ना असंही चर्चेला वळण मिळायला लागलं.

हेही वाचा : ऑन ड्युटी ठाण्यात बसून पांडेजी नेमकी कुणाची शिट्टी वाजवतायत?

आत्महत्येला राजकीय वळण

काही काळासाठीच सुशांत सिंगची मॅनेजर म्हणून काम केलेल्या दिशा सॅलियनने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. त्यामुळे या दोन्ही आत्महत्यांचं एकमेकांशी काय कनेक्शन आहे? त्यांची हत्या तर झाली नाही ना असा संशय व्यक्त केला जाऊ लागला. त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली जाऊ लागली. यातही वावगं वाटण्याचं काही कारण नव्हतं. मुंबई पोलीस तपास करत असतानाही सीबीआय चौकशीची मागणी केली जाऊ लागली तेव्हा या आत्महत्या प्रकरणाने राजकीय वळण घेतलं.

यामधे एकीकडे मुंबई पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न झाला तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी काहीएक संबंध आहे का अशी कुजबुज मोहीम भाजपच्या गोटातून सुरु झाली. आदित्य ठाकरे यांचे बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांशी मैत्रीचे संबंध आहेत. तोच धागा पकडून दिशा सॅलियनचा जी पार्टी सुरु असताना मृत्यू झाला त्या पार्टीमधे आदित्य ठाकरे सहभागी होते अशी तथ्यहीन माहिती काही न्यूज चॅनेल आणि सोशल मीडियावरच्या भाजप समर्थकांकडून दिली जात होती. 

दिशा सॅलियन हिची हत्या केली गेली, त्याची माहिती सुशांत सिंगला होती. त्यामुळे त्याची हत्या केली गेली अशी कॉन्स्पिरसी थियरी मांडली गेली. न्यूज चॅनेलसाठी तो अखंड चर्चेचा विषय झाला.

महाराष्ट्र पोलिसांच्या भोवती संशयाचा प्रयत्न

मुंबईमधे आत्महत्येची घटना घडली. त्याची चौकशी मुंबई पोलिसांकडून चालू झाली होती. तरीही सुशांत सिंगच्या बिहारमधे राहणाऱ्या कुटूंबियांनी पटनात एफआरआय दाखल केला. बिहारमधे जेडीयू आणि भाजपचं सरकार आहे. बिहार पोलिसांनी ती तक्रार ठरलेल्या प्रक्रियेनुसार मुंबई पोलिसांकडे वर्ग करायला हवी होती. तसं न करता त्यांनी बिहार पोलिसांचं एक पथकच मुंबईला पाठवलं. महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षेत्राचा केलेला हस्तक्षेप पाहून महाराष्ट्र पोलिसांनी बिहार पोलिसांना योग्य म्हणावा असा विरोध केला.

महाराष्ट्र पोलीस काही गोष्टी दडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा याचा अर्थ लावायला भाजपच्या बाजूने झुकलेले न्यूज चॅनेल आणि सोशल मीडियावरच्या भाजपच्या फौजेनं सुरवात केली. प्रकरण अपेक्षेप्रमाणे सुप्रीम कोर्टात पोचलं. जिथं घटना घडली त्या राज्याच्या विनंतीशिवाय सीबीआयकडे प्रकरण वर्ग करता येत नाही तरीही सुप्रीम कोर्टाने लोकभावनेचा हवाला देत घटनेच्या कलम १४२ अंतर्गत कोर्टाला जे विशेष अधिकार प्राप्त आहेत त्याअंतर्गत हे प्रकरण सीबीआयकडे दिलं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

शोध तपासयंत्रणेचा; अडचण भाजपची

हे घडत असताना रिया चक्रवर्तीला आरोपी करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. रिया सुशांतची प्रेयसी. ती बराच काळ त्याच्याबरोबर राहतही होती. त्याने आत्महत्या केली त्या दिवशी ती तिथे नव्हती. काही दिवस आधीच ते दुसरीकडे राहायला गेली होती. रियाने सुशांत सिंगला फसवलं. त्याचे पैसे घेतले असा आरोप तिच्यावर करण्यात आला. ईडीने तिच्यावर मनी लॉन्डरिंग अंतर्गत केसही दाखल केली. तिचा कथित हत्येत सहभाग आहे अशा वावड्याही उठवल्या गेल्या.

सीबीआयने चौकशी सुरु करून ३ आठवडे झाले आहेत. पण, सुशांत सिंगने आत्महत्या केलेली नव्हती तर त्याची हत्या झाली होती याला पुष्टी देईल असा एकही पुरावा सीबीआयला अद्याप सापडलेला नाही. सुशांत सिंग अमली पदार्थांच्या आहारी गेलेला होता हि आतापर्यंत प्रकाशात नसलेली माहिती मात्र पुढे आली. आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी या अजून एका तपासयंत्रणेचा प्रवेश झाला. यातून अमली पदार्थ विक्रेत्यांचा शोध घेतला गेला. मात्र यात भाजपचीच अडचण झाली. 

ज्या संदीप सिंग याचे नाव पुढे आले तो भाजपशी संबंधित निघाला. नरेंद्र मोदींवरील सिनेमाची निर्मिती त्यानेच केलेली आहे. महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांशीही त्याचे सलोख्याचे संबंध असल्याचं दिसतंय. गुजरात सरकारने त्याला १७७ कोटी रुपयांचं कंत्राट दिल्याचंही पुढे आलं. शेवटी एनसीबीने सुशांतसाठी रिया ड्रग्ज विकत घ्यायची असा आरोप ठेवत तिला अटक केली आहे. तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी झालीय. यातून सिद्ध झालं तरी एवढंच सिद्ध होईलकी सुशांत सिंग अमली पदार्थांचं सेवन करायचा. त्यातून त्याची हत्या झाली हे मात्र सिद्ध होत नाही.

सगळ्या घडामोडींना राजकीय संदर्भ

सुरवातीच्या टप्प्यात नेपोटीजम विषयी चर्चा सुरु झाली तेव्हा अभिनेत्री कंगना राणावतने सुशांत सिंगच्या निमित्ताने बॉलिवूड मधील बड्या मंडळींना लक्ष्य केलं. सुशांत सिंग संदर्भात भाजपला पूरक अजेंडा कंगना पुढे रेटत होती. शेवटी तिने जेव्हा मुंबईला पाकव्याप्त काश्मीर अशी उपमा दिली तेव्हा मात्र चर्चेला महाराष्ट्र विरुद्ध कंगना असं एक वळण मिळालं. तिला केंद्र सरकारने वाय सिक्युरिटी देणं हा सुरक्षेचा कमी आणि राजकारणाचा भाग अधिक आहे. शेवटी त्याची परिणीती कंगनाच्या ऑफिसचं अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेनं पाडण्यात झालं. 

या सर्व घडामोडींना राजकीय संदर्भ आहे. बिहार विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणं अपेक्षित आहे. कोरोना पेशंटची वाढती संख्या, बेरोजगारी यामुळे मतदार नेमका काय विचार करतील याची खात्री नाही. त्यामुळेच सुशांत सिंगची हत्या झाली, ती काँग्रेसचा सहभाग असलेलं महाराष्ट्र सरकार दडवत आहे त्यामुळे सीबीआयच्या माध्यमातून त्याला आपण न्याय देत आहोत अशी प्रतिमा भाजप तयार करू इच्छित आहे. संपूर्ण बिहार मढील मतदारांवर त्याचा सकारात्मक परिणाम नाही झाला तरी राजपूत वोटबँकेवर होईल अशी भाजपला आशा आहे. त्यामुळेच सुशांत सिंगच्यास मृत्यूचं भांडवल करणारे पोस्टर्स भाजपनं फिरवायला सुरवात केली.

हेही वाचा : अमर्याद सुरूय प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं

हेडलाईन मॅनेजमेंट महत्त्वाचं साधन

आगामी मुंबई मधल्या महापालिका निवडणूकीत मुंबईतल्या उत्तर भारतीय मतदारांनी शिवसेनाला नाकारत आपल्या पारड्यात सत्ता द्यावी असंही समीकरण भाजपच्या डोक्यात असू शकतं. न्यूज चॅनेल गेले अडीच तीन महिने अहोरात्र सुशांत सिंग याच विषयावर बोलताहेत. त्यामुळे कोरोना पेशंटच्या संख्येत भारत जगामधे दुसऱ्या स्थानी येणं, अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी ढासळणं, २ कोटी पगारदार बेरोजगार होणं आणि चीनने सीमेवर भारतावर अरेरावी करणं हे विषय बाजूला पडले. हे भाजपच्याच फायद्याचं आहे. हेडलाईन मॅनेजमेंट हे भाजपसाठी महत्वाचं साधन आहे.

शिवाय महाविकास आघाडीला या निमित्ताने अडचणीत आणणं, मतदारांच्या मनात सरकारविषयी संशय निर्माण करणं हा हेतू ही आहेच. म्हणूनच सुशांत सिंग च्या प्रकरणात आत्महत्या सोडून इतर तथ्य जरी नसले तरी बिहार निवडणुकीपर्यंत हे प्रकरण पेटतं ठेवणं भाजपच्या हिताचं आहे. भाजपसाठी तो राजकीय मास्टरस्ट्रोक हि ठरेल कदाचित. शेवटी जेव्हा ती आत्महत्याच होती हे सिद्ध होईल तेव्हा या प्रकरणामागच्या राजकारणावर शिक्कामोर्तब होईल.

हेही वाचा : 

आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

केशवानंद भारतीः संविधान रक्षणाला कारण ठरलेले धर्मगुरू

कोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा!

सुनील ईरावारांच्या आत्महत्येनंतर तरी नेत्यांनी शहाणपण शिकावं!

संघर्ष करायचा की शरणागती पत्करायची, हे ठाकरे कुटुंबाला ठरवावं लागेल