गंभीर सत्यघटनेचा विनोदी सिनेमा आपल्या चांगलाच लक्षात राहील 

२४ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


हंगेरीमधल्या एका सामान्य माणसाच्या घरात कम्युनिस्ट पोलिस घुसतात. त्यांना पाच दिवस नजरकैदेत ठेवलं जातं. ही सगळी परिस्थिती ऐकायला जितकी गंभीर वाटते, तितकाच विनोदी कॅप्टिव्ज नावाचा सिनेमा जगभर गाजतोय. सध्या गोव्यात सध्या सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामधे या सिनेमाचं स्क्रिनिंग करण्यात आलं.

इंटरनॅशनल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया अर्थात इफ्फी सध्या पणजीत सुरू आहे. दरवर्षी २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे आठ दिवस भरपूर सिनेमे घेऊन हा महोत्सव प्रेक्षकांच्या भेटीला येतो. यंदा इफ्फीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष. त्यामुळे या ५० व्या इफ्फीमधे दर्जेदार सिनेमांची पर्वणीच लागलीय. यामधल्या एका सिनेमाविषयी बोलायलाच हवं. 

पाच दिवस घरात डांबून ठेवलं

आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 'कॅप्टिव्ज' हा हंगेरी देशाचा सिनेमा इफ्फीच्या माध्यमातून प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे या सिनेमाची पटकथा सत्यघटनेवर आधारित आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं १९५१ मधे एक विचित्र घटना घडली होती. ४ जूनच्या सकाळी कम्युनिस्ट विशेष पोलिस एका घरात घुसले. आणि त्यांनी त्या घरातल्या कुटुंबाला नजरकैद केलं.

त्या कुटुंबाच्या ओळखीचे जेवढे लोक त्यांना भेटायला घरी येत होते. त्यांनासुद्धा ते सिक्रेट पोलिस घरातून बाहेर जाऊ दिलं जात नव्हते. घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते पोलिस एका व्यक्तीचा फोटो दाखवून त्याच्याबद्दल काही माहिती आहे का असं विचारत होते.

हेही वाचा : जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट

आणि पोलिस निघून जातात

नऊ जूनपर्यंत ते सगळं कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक घरात कोंडलेल्या अवस्थेत होते. अचानक पाच दिवसांनी त्या सिक्रेट पोलिसांचा प्रमुख घरात येतो आणि त्या घरातल्यांची चौकशी करून थोड्या वेळानं निघून जातो.

त्याच्यामागोमाग ज्या कम्युनिस्ट विशेष पोलिसांनी कुटुंबाला कैद केलं होते. ते दोघेसुद्धा काहीही न बोलता निघून जातात. आपल्याला ४-५ दिवस अशा पद्धतीनं का स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं होतं याचं उत्तरं ते संपूर्ण कुटुंब शोधत राहतं.

हे सगळं वाचताना कुणाला वाटेल की ही एक कल्पनिक गोष्ट असेल. पण असं खरंच १९५१ मधे घडलं होतं. बुडापेस्ट मधल्या एका सर्वसामान्य कुटुंबाला ४-५ दिवस नाहक त्रास सहन करावा लागला होता.

वाणसामान आणायचं मिशन

ही सगळी कथा वाचून फार गंभीर, महत्वाची घटना दाखवणारा सिनेमा असावा असाच एखाद्याचा समज होईल. पण अकॅडमी अवॉर्ड प्राप्त दिग्दर्शक ख्रिस्तोफ डेक याच्या डोकेबाज दिग्दर्शनामुळे हा संपूर्ण सिनेमा विनोदी अंगानं जातो. प्रेक्षकाला खळखळवून हसवणारा हा सिनेमा आपल्या चांगलाच लक्षात राहतो. 

त्या कुटुंबाला भेटायला येणाऱ्या व्यक्ती वाढत जातात तशी सिनेमातली रंगत वाढत जाते. घरातलं जेवण संपत आलंय एवढी साधी गोष्ट घरातली गृहिणी इलियोना त्या सिक्रेट पोलिसांना अनोख्या पद्धतीनं सांगाते. ती पोलिसांसमोर बसून कांदा कापत राहते. थोड्या वेळानं त्या कांद्यामुळे दोघांच्याही डोळ्यात चांगलंच पाणी येतं. तरीही पोलिस काही केल्या त्या घरातील सदस्यांना घराबाहेर सोडत नाहीत.

तीन दिवसानंतर घरातलं जेवण पूर्णपणे संपतं. तेव्हा एक सिक्रेट पोलिस घरातल्या दोन महिलांना सोबत घेऊन खाली जेवणासाठी लागणाऱ्या गोष्टी आणायला जातो. दिग्दर्शकानं जाणूनबुजून हा सीन स्लो मोशनमधे दाखवलाय. सारा आणि इलियोना या दोघींनाही त्या कुठल्यातरी मिशनवर चालल्यात असंच वाटत असतं.

हेही वाचा : प्रसिद्धीच्या झोतात असलेला बालकुमार तैमूर

घर निवडण्यात पोलिसांनी केली चूक

रात्री सगळे झोपलेले असताना अचानक सारा या तरुणीला जाग येते. घरात मिळेल तिथं सगळे झोपलेले असतात. तिथं इतकं टेन्शनचं वातावरण असतं तरीही सगळे छान घोरत झोपलेले असतात. त्या घोरण्याचा आवाज एका मागून एक असा आल्यावर ते ऐकून सारा चांगलीच घाबरते.

सरतेशेवटी त्या कुटुंबाला घरात एक कागद सापडतो. ते पोलिस ज्या व्यक्तीला शोधत असतात त्याच्या नावाचं ते वॉरंट असतं. त्यात जो पत्ता लिहिलेला असतो तो त्या घराच्या शेजारीच्या घराचा असतो. यावरून त्या कुटुंबाच्या लक्षात येतं की दरवाजाला नावाची एक नवीन पाटी लावायला हवी. 

आंद्रास वोरोस यांनी या सिनेमाची पटकथा लिहिलीय. मुळातच दिग्दर्शक आपल्याला अगदी सुरवातीपासूनच सिनेमाच्या कथेसोबत गुंतवून ठेवतो. आपण प्रेक्षक म्हणून शेवट पर्यंत सिनेमात नेमकं काय होणार याबाबत उत्सुक असतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात अशा पद्धतीचा विनोदी अंगाने जाणारा आणि सत्यघटनेवर आधारित असणारा सिनेमा प्रेक्षकांना चांगलाच आवडलाय.

हेही वाचा : 

जेम्स बॉण्डच्या जन्माचा ५७ वर्षांपूर्वी हलला पाळणा

मार्वलच्या सुपरहिरोंना मार्टिन स्कॉर्सेसी सिनेमा का मानत नाही?

जागतिक पुरुष दिन विशेषः लैंगिकतेला आधार बदलत्या माध्यमांचा

आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच