ट्रोलबडव्यांनो, कलावंतांना तरी सोडा

०८ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारताचं जगभरात नाव रोशन करणारे संगीतकार ए. आर. रहमान यांनी आपल्या मुलीचा बुरखा घातलेला फोटो ट्विटरवर टाकला. मुलीने बुरखा घातला म्हणून या बापलेकींवर धर्मांध ट्रोल तुटून पडलेत. असा प्रकार काही पहिल्यांदाच घडलाय असंही नाही. हे वेळोवेळी घडतंय, घडवलं जातं. यामुळे सर्वसामान्यांचं जगणं भरडलं जातंय. कलाकाराची कला बाजूला फेकली जातेय.

कलाकाराची ओळख एकच. त्याची कला. मग तो काहीही करत असो. तो गायक असो, अभिनेता असो किंवा संगीतकार. बरं तो कलाकार एखादा विशिष्ट धर्म पाळत असल्यास काय बिघडलं? ती त्याची जगण्याची पध्दती आहे. ते त्याच्यावर झालेले संस्कार आहेत. याचा अर्थ असा नाही ना की तो किंवा त्याच्या कुटुंबियांनी काय कपडे घालावेत, काय खावं याचे नियम बाकी समाजानं ठरवावेत.

रहमान टार्गेट का?

स्लमडॉग मिलीनियम या सिनेमाला दहा वर्ष पूर्ण होतायत. याचं सेलिब्रेशन होतं. त्या कार्यक्रमात ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहमानची मुलगी खातिजा बुरखा घालून वावरत होती. तिने बुरखा घालून फोटो काढला. मग काय ट्रोल कामाला लागले. काय-काय बोलत सुटले याचं त्यांनाही भान राहिलं नाही. तिनं लिहाफ घातल्याने किंवा ए आर रहमाननं स्कल कॅप घातल्याने त्याच्या संगीताचं महत्त्व कमी होतं का? तो गेली कित्येक वर्ष आपली कानं सुखावतोय ना?  मग कशाला फुकट टार्गेट करत बसताय.

The precious ladies of my family Khatija ,Raheema and Sairaa with NitaAmbaniji #freedomtochoose pic.twitter.com/H2DZePYOtA

— A.R.Rahman (@arrahman) February 6, 2019

देशात अजूनही लोकशाही कायम आहे. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्षता अजूनही संविधानाचा भाग आहे. उगाच हवा करायची, टार्गेट करायचं, विशिष्ट समाजात भीती तयार करायची आणि ती भीती आणि अंध भक्तांच्या हिंसक ट्रोल भक्तीवर आरुढ होऊन राजकारण करायचं. हे असं किती दिवस चालणार? इथे भाकरीचे वांदे, हाताला काम नाही, मग धर्म, जात काय चाटायचीय. जगा आणि जगू द्या की शांततेत.

कलाकाराला त्याच्या धर्मासहित कधी स्वीकारणार?

बरं हे फक्त रहमानच्या बाबतीत घडलंय का?  तर नाही.  धर्मानं मुस्लिम असलेल्या प्रत्येक कलाकाराला आजकाल या ट्रोलदिव्यातून जावं लागतंय. हा हट्ट कशासाठी? बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान तर टार्गेटवरच असतो. त्याने २०१५ मधे असहिष्णुतेबद्दल मत व्यक्त केलं, तर त्याला ट्रोल करुन हैरान केलं. असे काय तुटून पडले की जणूकाही तो जगण्यास लायकचं नाही. देशद्रोहच केलाय. कापा त्याला, फासावर लटकवा, अशी मागणी जमावानं केली.

आमीर खानच्या बाबतीतही तेच घडलं. अलिकडे नसीरुद्दीन शहाने माणूस म्हणून जी चिंता व्यक्त केली त्यावर तर उगाच हंगामा खडा करण्यात आला. झुंडशाही वाढत असताना, विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जात असताना अशी भीती का वाटू नये? बरं हा प्रश्न आयडेंटीटीचा आहे. माझी ओळख हा माझा धर्म नसून माझी कला, माझं शिक्षण, मी तयार करत असलेला समाज आहे. ही साधीसुधी गोष्ट या लोकांना कधी समजणार माहीत नाही.

बादशहा शाहरुखचा आयडेन्टीटी क्रायसिस

शाहरुख खानची गोष्ट सांगायची झाली तर ती फार गंमतीशीर आहे. १९९० च्या दशकात राम मंदिरावरुन कारसेवा करायला हिंदू माणूस धावत होता. बाबरी विध्वसानंतर देशात दंगली झाल्या आणि मार्च १९९३ ला मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्याच काळात भारतीय सिनेमा क्षेत्रात शाहरुखची इंट्री झाली.

बरं तो मुस्लिम आहे हे सर्वांना चांगलं माहीत होतं. पण तरीही तमाम भारतीय सिनेमाप्रेमींनी त्याला कधी राहूल, तर कधी राज, कधी राजू, कधी रवी तर कधी राम जाने म्हणून स्वीकारलं. तो या बेभरवशाच्या क्षेत्रात मोठ्या ताकदीने उभा राहिला. हिंदू पात्र करता करता तो मोठा होत होत़ा. प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला.

१९९० ते २००० या काळात शाहरुखने बहुतांश हिंदू नाव असलेले हिरो, अँटी हिरोचे रोल पडद्यावर केले. तेव्हा हिंदूच नाही तर मुस्लिम समाजाच्या लोकांनीही त्याला डोक्यावर घेतलं. त्याचे सिनेमे चालले. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमानं तर भारतीय सिनेजगतात सर्वाधिक आठवडे चालण्याचा पराक्रम केला. 

बरं असा हा कलाकार आपल्या पर्सनल लाईफमधे ही एक वेगळा आदर्श ठेवतो. हिंदू मुलीशी झालेलं लग्न हे या इंडस्ट्रीत येण्यापुर्वीचं. तो मुंबईत आला आणि मायानगरीचा बादशहा बनला. त्यात त्याचा धर्म आडवा आला नव्हता.

माय नेम इज खान एन्ड आय एम नॉट टेररीस्ट

जेव्हा माय नेम इज खान आला तेव्हा मात्र शाहरुख खान टार्गेट झाला. हा जागतिक पातळीवरचा सिनेमा होता. अमेरीकेत झालेल्या ९/११ च्या हल्ल्यानंतर मुसलमानांकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला होता. जगभरात मुस्लिमांना टार्गेट केलं जात होतं. एक कलुषित वातावरण तयार झालं. दाढी मिशी वाढवलेला मुसलमान म्हणजे अतिरेकी अशी प्रतिमा जागतिक स्तरावर तयार झाली.

या नव्यानं तयार झालेल्या प्रतिमेसमोर प्रतिभेचं भान राहिलं नाही. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट टेररीस्ट’ असं तो जीव तोडून सांगत असताना टार्गेट झाला. अमेरीकेत गेला असताना मुस्लिम नावामुळं तिथल्या सिक्युरीटीनं शाहरुखचे कपडे उतरवले. तिथल्या येल विद्यापीठात त्याचा सत्कार होता. मग त्याने मुसलमान म्हणून उगाच झालेल्या अतिरिक्त तपासणीबद्दल नाराजी व्यक्त केली. ती नाराजी अमेरीकेविरोधात होती.

पण त्याचे भलतेच पडसाद आपल्या देशात उमटले. हा धर्मावर जातोय अशी ओरड झाली. सिनेमाच्या नावाला विरोध झाला. मुंबईतल्या कांजुरमार्ग थिएटरमधे तोडफोड झाली. त्याने साकारलेले राहुल, राजू, रवी, राज मागे पडले आणि त्याच्यातल्या खानाला टार्गेट करण्यात आलं. हे आतातरी थांबलंय का? तर ते अजूनही सुरु आहे.

आता त्यानं कुठलंही मुस्लिम पात्र केलं तर हा लांड्या धर्मावर उतरलाय अशी ओरड होते. याने आतापर्यंत केलेल्या हिंदू पात्रांचा विसर पडतो आणि तो ज्या धर्मात जन्मलाय तिच त्याची ओळख बनतेय.

संविधानाचं ऐकणार की नाही?

समाजात जाती धर्माच्या लढाईमुळं आपण सर्वच भयंकराच्या दाराशी उभे आहोत. हा सर्व प्रकार समाज म्हणून आपल्याला अधोगतीकडे घेऊन चाललाय. हे थांबलं नाही तर मायक्रो आयडेंटीमधे अडकलेला हा समाज उध्वस्त होईल. तो तसा झाला ही आहे. 

हो. सर्व थांबलं पाहिजे. संविधानात जे सांगितलंय त्या प्रमाणे जगता आलं पाहिजे. नाही, तर आपल्या सगळ्यांचंच काही खरं नाही.

कलाकारांना तरी सोडा राव.

देशात खूप समस्या आहेत. बेरोजगारी वाढतेय. गरीबी वाढतेय. शेतकरी मरतोय. उगाच सोशल मीडिया आहे आणि बोटं दिलीयत म्हणून ती चालवू नका.
 

(लेखक जागतिक सिनेमाचे अभ्यासक आणि पत्रकार आहेत.)