माणसात असलेला काला बंदर कसा काढता येईल?

२४ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ९ मिनिटं


फेब्रुवारी २००९मधे राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित दिल्ली ६ सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाला समीक्षकांना ३ स्टारच्यावर रेटींग दिलं नाही. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बरी कमाई केली पण लोकांकडूनही ‘रटाळ सिनेमा’ असाच रिव्यू आला. रिव्यूच्या पलिकडे जाऊन माणसातल्या चांगल्या आणि वाईट बाजूचं दर्शन घडवणाऱ्या सिनेमातून आपण काय घेऊ शकतो, ते या लेखात वाचा.

त्याचं कुटुंब मूळचं तसं भारतामधलंच पण त्याचा जन्म अमेरिकेतला. अचानक आजीचा ट्युमर वाढला काय आणि तिचे जगण्याचे दिवस कमी उरले असं कळलं. आजीची इच्छा म्हणून त्यानं तिला दिल्लीच्या घरी आणलं. इतके वर्ष वयामुळे आणि आपल्या मुलामुळे अमेरिकेत रहावं लागलेल्या आजीला दिल्ली ६च्या गर्दीचा, ओळखी अनोळखी माणसांचा, वयाच्या सोळाव्या वर्षापासून आपण जिथं संसार मांडला, त्या घराचा सुगंध घेताना हायसं वाटत होतं. 

पण त्याच्यासाठी हे सारं नवीन होतं. अमेरिकेतल्या अति पॉश, अत्यंत शिस्तीच्या रस्त्यांवरुन तो थेट दिल्ली ६च्या आक्राळविक्राळ, गजबजाट कोलाहलात पोचला होता. हे सगळं पाहताना आपला इंग्लिश ॲक्सेंट जपत, त्याच्या डोळ्यात जी नवलाई होती त्यातून त्याला भारत नावाच्या गोष्टीची इंटरेस्टींग चव कळत चालली होती.

त्याचं नाव रोशन मेहरा. राकेश मेहरा आणि फातिमा शेख या दोघांचा हा मुलगा. मेहरांच्या घरी त्यांचा आंतरधर्मीय विवाह मान्य नव्हता त्यामुळं राकेश आणि फातिमा आपलं सारं घरदार सोडून गेले. आणि परतले त्यावेळी राकेशचे वडील म्हणजे रोशनचे आजोबा वारले होते. त्याच रात्री रोशनचा जन्म झाला. अशा कितीतरी त्याच्या जन्माच्या, त्या गल्लीतल्या, त्याच्या आजूबाजूच्या लोकांविषयीच्या गोष्टी तो ऐकत होता, हरखून जात होता. 

हेही वाचा: मोमीनच्या या शेरावर खुद्द गालिबही फिदा

आल्या आल्या ममदू या मुस्लिम दुकानदारानं दिलेली त्याच्या हातची जिलेबी खाताना तो बोललेले शब्द त्याच्या कानात होते, ‘अरे भूक है इसलिए जो खाते है वो तो कुत्ते होते है, हम तो दिल जोडने के लिए खाते है, खा लिजिए’ आणि त्याने त्या जिलेबीची चव आता कुठं चाखायला सुरुवात केली होती. या गजबजाटात, सुखसुविधा नसलेल्या गल्लीतल्या माणसांना पाहताना त्याला वाटलं, ‘यहां के नल को पानी हो या ना हो लेकीन यहां पे सभी के आंखो मे सावन होता है’ हा सावन नेमका काय आहे, त्याचं स्वरुप काय आहे, हेच तर त्याला अनुभवायचं होतं. भारत के इस सावन में निखरने सवरने के लिए ही तो वह यहां आया था.

इथल्या गल्ल्यांमधे राहणारे लोक वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या धर्माचे. रामलीला पहायला जाणारे मुस्लिम लोक, ममदूसारखा मुस्लिम ज्याच्या दुकानात हनुमानाचा फोटो, जो हनुमनाची भक्ती करतो. बिट्टूसारखी मुलगी जी घरात बांधलेली पण दिल्ली ६ मधून बाहेर पडते तेव्हा सार्वजिन टॉयलेट्मधे आपली ओढणी भिरकावून बेंबी दाखवणारी, इंडियन आयडॉल होण्याची स्वप्नं पाहणारी नखरेल मुलगी, लग्नाचं वय पालटून गेलेली बिट्टूची आत्त्या, आपल्या आईवरचं म्हणजेच फातिमावरचं प्रेम कधीही बोलू न शकलेला आणि म्हणून आजवर एकटं रहाणं पसंत केलेला अली अंकल, गोबरसारखा अनाथ पण तरी हवेलीतली सगळी कामं आपलीच अशापध्दतीनं जगणारा, बिजलीसारखी खालच्या म्हणवल्या जाणाऱ्या जातीतली कचरा गोळा करणारी मुलगी, लालाजींसारखा वयस्कर सावकार ज्यानं नुकतंच एका तरुण मुलीशी लग्न केलंय.

सगळे वेगवेगळ्या पध्दतीनं आपलं जगणं जगू पाहणारी ही माणसं एकत्र राहतात. हे पाहताना रोशन म्हणतो ‘यहां पे इतने अलग अलग लोग है लेकीन तब भी एक संतुलन है, एक बॅलन्स है’ आणि मी माझ्याच या प्रदेशाकडे रोशनसारख्या एका फॉरेन एलिमेन्टमुळे आणखीन नीटपणे पाहू लागले. मला भारतात असणारी ही इतक्या वेगवेगळ्या धर्माची, जातीची, पंथाची, लिंगाची, वेगवेगळ्या मानसिकतेची माणसं इतक्या सामंज्यसाने राहतात, राहू शकतात याच राहून राहून आश्चर्य वाटतं.

हेही वाचा: ऑस्करच्या आयचा घो!

जगतानाची ही बावीस वर्षं मी भारत नावाच्या देशात जन्माला आल्यानं भारतनेसला गृहीत धरलं असं वाटून गेलं. या रोशन मेहराने अर्थात दिल्ली ६च्या राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शकाने मला खडबडून जाग केलं आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांकडं पाहताना मला खूप प्रिविलिज्ड वाटलं, डोळ्यात ओल दाटून आली.

पण या अमेरिकन सिटीझन असणाऱ्या रोशनने एक खूप महत्वाची गोष्ट टिपलीय. ती म्हणजे भारताची राजधानी असणाऱ्या दिल्लीमधे म्हणे ‘काला बंदर’ घुसलाय. आणि हा काला बंदर आहे कोण? तो नेमका कसा दिसतो? याविषयी कुणालाच काही माहीत नाही पण त्याची दहशत पूर्ण दिल्लीमधे पसरली. त्याच्याविषयीचं पॅनल डिस्कशन्सही झाले. ‘वॉन्टेड’ म्हणून त्याच्याविषयीच्या जाहीराती छापल्या. 

त्याच्याविषयी वाटणाऱ्या भीतीचे इंटर्व्यू घेतले तेसुद्धा टीवी, पेपरात छापून आले आणि त्याच्याविषयीची भीती आणखी लोकांमधे परावर्तित झाली. काला बंदरशी रस्त्यात गाठ भेट होऊ नये म्हणून घरात दडून बसले आणि अशावेळी रोशनसोबत मीही नेमका हा काला बंदर ही चीज आहे काय, याचा शोध घेत निघाले. 

रामलीला सुरु असताना हनुमानाची एन्ट्री आली पण हनुमान स्टेजवर उपस्थित का होत नाहीय, म्हणून गोबर त्याला शोधायला बॅकस्टेजला जातो. त्याचा कुठल्यातरी शेपटीचा स्पर्श झाला म्हणून ‘काला बंदर, काला बंदर’ म्हणत घाबरुन पळून जातो. त्याच रामायणाचा दुसरा प्रयोग सुरु असताना दोन लहान मुलं शेजारच्या पोलिसांच्या गाडीत बसतात, गाडी सुरु करतात आणि त्यांना गाडी कन्ट्रोल होत नाही. तेव्हा त्यांच्या कमी उंचीमुळे ती दिसत नाहीत आणि काला बंदरने येऊन गाडी चालवली असं म्हटलं जातं. रोशन पळत जाऊन गाडी कन्ट्रोल करतो त्यामुळे त्याला विचारलं असता तो म्हणतो ‘काला बंदर इज इन्व्हेजीबल’ अशाप्रकारे काला बंदरनामक पात्राच्या गोष्टी सत्य न तपासता क्रिएट होत जातात. 

हेही वाचा: एका नाटकाचा प्रवासः सिंधुदुर्गातलं सरमळे ते न्यूयॉर्कचं ब्रॉडवे

नंतर तर लालाजीच्या तरुण बायकोचं फोटोग्राफरसोबत असणारे संबध रेडहॅन्ड पकडले जाऊ नयेत म्हणून फोटोग्राफरला खिडकीतून बाहेर पाठवून, ती तिची फिटलेली साडी तशीच ठेऊन ब्लाउज हातानं फाडून ‘काला बंदर, काला बंदर’ म्हणून ओरडते. तेव्हा तर काला बंदर नावाच्या आपण तयार केलेल्या भीतीचा आपणच आपल्या सोयीनं कसा वापर करुन घेतो याचा प्रत्यय येतो. 

काला बंदर ही नेमकी काय चीज आहे? खरंच ती कुठे बाहेर सजीव रुपात सापडणार आहे की ती आपल्या आतच असते? तिचा नेमका शोध कसा घ्यायचा? असे कितीतरी प्रश्न उभे ठाकतात. मग आपल्याला लक्षात येऊ लागतं काला बंदर दुसरं तिसरं काही नसून ती आपणच तयात केलेली भीतीची भावना. 

हेही वाचा: स्त्रीलिंग-पुल्लिंगः मराठीमधला एक धाडसी प्रयोग

माणूस म्हणून आपण अत्यंत दुबळे आहोत याची जाणीव आपल्याला होऊ लागली तसतसं आपण देव नावाची संकल्पना तयार केली. तिच्यामुळे आपल्यातल्या कितीतरी असुरक्षित, दुबळ्या जागा नाहीशा झाल्या किंवा त्यांना आधार मिळाला. पण देवही आपल्याला पूर्णपणे सुरक्षित आयुष्य देऊ शकला नाही कारण आयुष्य ही सुरक्षित गोष्ट नाहीच. आपण या अनित्य असणाऱ्या असुरक्षिततेसोबत डील करु शकलो तर आपण माणूस म्हणून सतत उत्क्रांत होत राहू.

नाहीतर हा काला बंदर आपल्याच दिल्ली ६ मधल्या ममदूच्या दुकानावर हल्ला करतो, मशिदीच्या जागी मंदिर होतं असं सांगून एकमेकांच्या अंगावर दगडं फेकायला प्रवृत्त करतो. त्यावर उपाय म्हणून पुजेसाठी काला बंदरचा केस हवा असं सांगतो तेव्हा आपण अनाथ असलेल्या, ज्याला काही आगा पिछा नाही अशा गोबरकडं हे काम आपण देतो कारण आपण डॉमिनन्ट असतो, आपण अभिजन असतो. 

खरंतर आपण अत्यंत घाबरट असतो. ‘गोबर एक के दो सिक्के लेगा या दस की एक नोट लेगा?’ असं त्याला विचारलं जातं तेव्हा तो आनंदाने ‘मै तो १ के दो सिक्के लूंगा’ असं म्हणतो कारण त्याला माहीत असतं जेव्हा तो दहाची एक नोट मागेल तेव्हा त्याला एकची दोन नाणी मिळणंही बंद होतील. आपण हे असं सतत आपली एक जागा, आपली एक पोझिशन टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. पोझिशन त्या आपल्या आतित्वाला जराही ठेच लागू नये म्हणून घाबरत असतो. त्या घाबरण्यातून आपण खालच्या  जातीतल्या जिलेबीला अपवित्र म्हणून टाकतो. कारण आपल्याला वाटतं कुणाला तरी खालचं केलं, कुणालातरी अपवित्र म्हटलं की आपण पवित्र होणारोत, आपली जागा निश्चित होणार आहे.

हेही वाचा: लुका छुपीचा डायरेक्टर लक्ष्मण उतेकरः पोलादपूरच्या शेतातून बॉलीवूडपर्यंत

खरं उत्तर हे असतं की आपण उठून घराच्या बाहेर पडून रस्त्याने चालत येणाऱ्या काला बंदरकडे पाहणार का, त्याच्याशी गळाभेट करुन त्याला भिडणार का? आणि आपल्या शेजारच्या आक्राळविक्राळ केस वाढवलेला वेडा माणूस जो आहे, जो आपल्याला कधीपासूनचा आरसा दाखवतोय, आपण त्यात स्वतःला पाहणार का? काला बंदरला छूमंतर करण्याचा तो एकच तर पर्याय आहे.

श्श, मी त्या वेड्याचे शब्द ऐकू पहातेय. 
तो म्हणतो,
‘झर्रे झर्रे मे उसका नूर है
झांक खुद मे वो ना तुझसे दूर है
इश्क है उससे, तो सबसे इश्क कर,
इस इबादत का यहिं दस्तुर है’

हेही वाचा: सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?