सफदर हाश्मीः नाटक थांबवत नाही म्हणून त्याचा भररस्त्यात खून केला

०२ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


कवी, नाटककार, कलाकार, गीतकार असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या सफदर हाश्मींची बरोबर तीस वर्षांपूर्वी भर रस्त्यावर हत्या झाली. आज त्यांचा हुतात्मा दिवस. अवघ्या ३५ वर्षांचा हा तरुण आपल्या कलेच्या माध्यमातून सत्तेला हादरे देत होता. त्या सत्तेविरुद्धच्या संघर्षातूनच त्यांची हत्या केली. सत्तेला हादरवणाऱ्या सफदर हाश्मींची ही स्टोरी.

आजपासून तीस वर्षांपूर्वीची १९८९ मधली गोष्ट आहे. दिल्लीला लागून असलेल्या गाजियाबादेत नगरपालिकेच्या निवडणुकीच रणधुमाळी सुरू होती. मतदानाची तारीख जवळ येत होती, तसं तसं कडाक्याच्या थंडीतही दिल्लीतलं राजकीय वातावरण गरम होत होतं. सीपीएमचे उमेदवार रामानंद झा यांच्या प्रचारासाठी एका वार्डात पथनाट्याचा प्रयोग सुरू होता. 

सकाळी अकराला सुरू झालेला पथनाट्याचा प्रयोग बघण्यासाठी फॅक्टरीतल्या मजुरांनी एकच गर्दी केलेली. त्याचवेळी विरोधी काँग्रेसचा उमेदवार मुकेश शर्मा आपल्या सहकाऱ्यांसोबत तिथे आला. आपल्याला जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्याची मागणी केली. पण पथनाट्याच्या सूत्रधाराने प्रयोग थांबवायला नकार दिला. नुक्कडची लिंक तुटेल म्हणून थोडावेळ थांबा किंवा मग दुसऱ्या रस्त्याने जा, असं सांगितलं.

पण मुकेश शर्मा आणि त्याचे साथीदार काही ऐकायला तयारच नव्हते. त्यांनी नुक्कडच्या कलापथकासोबतच जमलेल्या गर्दीवर हल्ला चढवला. लोखंडी हत्यारांचा वापर केला. यात रामबहादूर या मजूराचा जागेवरच मृत्यू झाला. नुक्कडचा सूत्रधार हे लोकांना वाचवण्याच्या नादात स्वतःच जखमी झाला. मग त्याला सीटू अर्थात सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियनच्या ऑफिसात नेण्यात आलं. तब्येत आणखी बिघडल्याने त्याला राममनोहर लोहिया हॉस्पिटलमधे अॅडमिट केलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याचा मृत्यू झाला.

मारल्या गेलेल्या त्या तरुण सूत्रधाराचं वय होतं उणंपुरं ३५ वर्ष आणि नाव होतं सफदर हाश्मी. दिवस होता २ जानेवारी १९८९.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व

नाटककार, कलाकार, डायरेक्टर, गीतकार यासारख्या बहुप्रतिभावान सफदर हाश्मी यांची वयाच्या ३५ व्या वर्षीच हत्या करण्यात आली. सत्तेला हादरे देणारा अवघ्या ३५ वर्षांच्या या तरुणाची जडणघडण समजून घेतली पाहिजे.

सफदर यांचा एका मार्क्सवादी मुस्लिम घरात जन्म झाला. खायची आबाळ असलेले हे घर पुस्तकांनी खच्चून भरलेलं असायचं. स्वातंत्र्यसैनिक असलेल्या आजोबांमुळे सफदरही लहानपणापासूनच फैज, साहिर यासारख्या दिग्गज शायरांच्या नज्म गुणगुणायचे. घरात खुल्या विचाराचं वातावरण असल्यामुळे कॉलेजला असतानाच सफदर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआयमधे सक्रीय झाले. तिथे ते संघटनेच्या सांस्कृतिक विभागाचं काम बघायला लागले.

काही काळ इंडियन पिपल थिएटर असोशिएशनशी अर्थात इफ्टाशीही जोडले गेले. हा सगळा काळ म्हणजे कष्टकरी, शेतमजूर, शोषित, वंचित यांच्या हक्कांच्या आंदोलनाचा होता. अशा या काळातच नाटककार, कलाकार, कवी असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून सफदर हाश्मींची वाटचाल सुरू झाली.

पथनाट्याला नवी ओळख

पथनाट्य या नाटक प्रकाराला वेगळी ओळख देण्याचं श्रेय सफदर हाश्मी यांना जात. प्रस्थापित नाटकाच्या मर्यादित चौकटीला छेद देत त्यांनी नूक्कडमधून समाजातल्या विरोधाभासांवर हल्लाबोल केला. परंपरागत रंगमंचापलीकडची त्यांची कला जाणीव ही शोषित वंचितांचे प्रश्न मुख्य प्रवाहात आणणारी होती. आपल्या लिखाणातून सफदर यांनी जनसामान्यांचे प्रश्न मांडले.

१९७३ मध्ये इफ्टामधून बाहेर पडून त्यांनी जन नाट्य मंच अर्थात जनमची स्थापन केली. वैचारिक भूमिकेशी जवळीक असलेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या सीटूसारख्या संघटनेशी त्यांनी स्वतःला जोडून घेतलं. विद्यार्थी, महीला, शेतकरी यांच्या प्रश्नांसंदर्भातल्या आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला.

जन नाट्य मंचाच्या माध्यमातुन नुक्कड नाटकं सादर केली. रस्त्यावर आणि कामगारांच्या वस्त्यांमध्ये जाऊन पथनाट्याचे प्रयोग केले. या प्रयोगांना शेतमजूर, कामगार, वंचित, शोषित वर्गाचा तुफान प्रतिसाद मिळायचा. मशीन, हत्यारे और अपहरण भाईचारेका, गांव से शहर तक, औरत या नाटकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची बिकट स्थिती, बेरोजगारी, महागाई, धर्मवादाच्या राजकारणला वाचा फोडली.

सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक

सफदर काहीकाळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. याच काळात पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम केलं. १९८४ मधे मात्र त्यांनी पश्चिम बंगाल सरकारचे प्रेस इन्फॉर्मेशन ऑफीसर पदाचा राजीनामा दिला. पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून राजकीय जीवनात प्रवेश केला. अनेक नाटके, माहितीपटांची निर्मिती करत असताना आपली स्वतंत्र ओळख जपली. सफदर सातत्याने हुकूमशाही राजवटीला विरोध करत सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक म्हणून डाव्या चळवळीचा आधार बनून उभे राहीले.

सफदर यांची पथनाट्य आणि कवितांनी समाजाला आरसा दाखवला. त्यांच्या नाटकांनी केवळ समाजातला विरोधाभास टिपला असं नाही, तर त्या नाटकांमधला जिवंतपणा हा थेट माणसांच्या प्रश्नांशी जोडलेला होता.

किताबें करती हैं बातें
बीते ज़मानों की
दुनिया की, इंसानों की
आज की, कल की
एक-एक पल की
ख़ुशियों की, ग़मों की
फूलों की, बमों की
जीत की, हार की
प्यार की, मार की
क्या तुम नहीं सुनोगे
इन किताबों की बातें?
किताबें कुछ कहना चाहती हैं
तुम्हारे पास रहना चाहती हैं

अशा कवितांनी लहान मुलांचं भावविश्व समृद्ध केलं. लहान मुलांसाठी त्यांनी केलेल्या कविता, चित्रं, शेकडो पोस्टर ही बालमनाशी जोडलेली खूणगाठ होती. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर त्यांची कविता ही गरीबांच्या हातातली मशाल होती.

सफदर आपल्या नावाप्रमाणे जगले. अन्यायाच्या विरोधात भूमिका घेत लोकसमूहाला प्रस्थापित व्यवस्थेला थेट प्रश्न विचारण्यासाठी भाग पाडलं. मनात आलं असतं तर सफदर ऐशोआरामात आपलं आयुष्य जगू शकले असते. मात्र शोषित, वंचितांच्या भूमिकेला केंद्रस्थानी आणण्यासाठी संघर्ष केला. किंबहुना आपल्या भुमिकेशी कटिबद्ध राहीले. त्यांनी उभारलेल सांस्कृतिक आंदोलन त्यांच्या बहुआयामी रचनात्मक कार्याचा भाग आहे.

कष्टकऱ्यांचा आवाज

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या वस्त्यांमध्ये जन नाट्य मंचाच्या माध्यमातून जाऊन सफदर यांनी कामगारांना आपल्या हक्काची जाणीव करुन दिली. देशभरातल्या अनेक भागात फिरत नाटकांच्या अनेक रचना आणि अभिनव पदधती लोकमानसाशी जोडल्या. परंपरागत रंगमंचीय नाटकांपेक्षा अधिक वेगळ्या पद्धतीने आशय, विषयाची मांडणी केली. त्यातूनच जनवादी साहित्यिक आंदोलनाची आखणी केली. 

पढना-लिखना सिखो ओ मेहनत करने वालो,
पढना-लिखना सिखो ओ भुखसे मरने वालो

असं आवाहन करत त्यांनी आपल्या लढ्याचा मार्ग निश्चित केला. सर्वसामान्यांच्या आयुष्याचा रंगमंच विस्तारीत करण्याच काम केलं. वस्त्यांमधल्या नाटकांच्या सादरीकरणातून रस्त्यावरच्या लढाईला आत्मबळ दिलं. व्यक्तिवादी अभिजन आणि सामूहिक जनवादी यांच्यातील अशक्यप्राय अशा न सुटणाऱ्या जटिल विरोधाभासाची मांडणी त्यांनी केलीच. त्यासोबतच दृष्टीकोन बदलावा लागेल, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

१९८९ मध्ये पथनाट्य सादर करताना जमावाने हल्ला केला. त्यात रस्त्यावरच्या लोकांसाठीचा हा रस्त्यावरचा आवाज कायमचा शांता झाला. पण त्यांच्या संघर्षाने लोकांना हक्कांसाठी लढायची उर्जा दिली. बळ दिलं. सन्मान दिला.कवयित्री सरला माहेश्वरी यांच्या शब्दात सांगायचं तर,

तुम्हारे ताजा खून की कसम
हम फिर वही खेल दिखायेंगे
हल्ला बोल, हल्ला बोल की
रणभेरी बजायेंगे

गरमायेंगे गरीबों का लहू
आग बनाकर शब्दों को तुम्हारे
फहरायेंगे परचम की तरह
गीतों को तुम्हारे

बस्ती-बस्ती नुक्कड़-नुक्कड़ हर चौराहे पर
खेल दिखायेगा जमूरा तुम्हारा
करेगा फिर बेआबरू
लोकराज का बाना पहने ढोंगी राजा को

दौड़ायेगा उल्टे पांव पंडित, मुल्ला, काजी को
चिमटे के जादू से बुलायेगा खाकी वर्दी को
तार-तार कर देगा उसकी हस्ती को

पडरिया, घटियारी, उजान मैदान
गिड़गिड़ायेगा वहशी शैतान

डम-डमा-डम डमरू बाजेगा
हर मजदूर का चेहरा चमकेगा
कुर्सी पर नेता झल्लायेगा

फायर! फायर! फायर
घायल होकर गिर पड़ेगा जमूरा
पर खत्म नहीं होगा यह नाटक
शुरू किया था जो तुमने

तुम्हीं तो थे इसके सूत्रधार
उठना ही होगा तुम्हें सफदर भाई
क्योंकि सफदर मरा नहीं करते
सूत्रधार मरा नहीं करते