प्रवास रानभाज्यांच्या शोधाचा

२० ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


पुण्यात रविवारी नऊ सप्टेंबर रानभाज्यांवर परिसंवादचं आयोजन करण्यात आलंय. यानिमित्त नीलिमा जोरेवार यांनी अकोले इथल्या स्थानिक लोकांशी बोलून रानभाज्यांविषयीची माहिती संकलित केलीय. रानभाज्या आणि त्या बनविण्याची कृती असलेल्या ‘बखर रानभाज्यांची’ या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. यानिमित्त लेखिकेच्या मनोगताचा संपादीत अंश.

First Published : 9 September 2018

पश्चिम घाटाचा उत्तरेकडील भाग म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पश्चिमेला असणारा अकोले तालुका. समृद्ध जंगल, उंच-सखल डोंगररांगा. यामुळे इथं असलेले हरिश्चंद्र, अलंग, मलंग, कुलंग, मदनगड, रतनगड आणि पाचपट्टा असे किल्ले तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईही इथंच. साहजिकच इथल्या निसर्गाची भुरळ न पडली तरच नवल..! याच निसर्गाच्या मोहात मीही पडले आणि निसर्गाच्या ओढीनं वारंवार येथे जाऊ लागले. त्यातूनच अकोले, राजूर महाविद्यालयातून युवक-युवतींसोबत ‘नेचर क्लब’ या उपक्रमाद्वारे प्रत्यक्ष निसर्गात जाऊन निसर्ग समजून घेणे व समजावून देणे हे सुरु झाले. २००९-१० साली तज्ञांच्या मदतीने अभयारण्य परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास प्रकल्प आम्ही वर्षभर येथे राबवला. यातूनच अनेक गोष्टी समोर येत गेल्या आणि येथील निसर्ग संवर्धनाची जबाबदारी वाटू लागली.

जंगल, जैवविविधता आणि पाणी इ. दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या अकोले तालुक्याची भौगोलिक आणि हवामानाच्या दृष्टीने उत्तर-दक्षिण तीन पट्ट्यात ढोबळमानाने विभागणी करता येईल. भंडारदरा, कळसुबाई, हरिश्चंद्रगड हा संरक्षित असलेला निमसदाहरित, पानझडी जास्त पावसाचा प्रदेश, दुसरा कोतूळ-धामणगाव-मोर्चेवाडी ते खिरवीरे हा मध्यम पावसाचा डोंगरभाग आणि त्यावरील जंगल भाग तर तिसरा टप्पा हा कोरडा, कमी पर्जन्यमानाचा परंतु सिंचनाच्या सोयीमुळे आता बागायती झालेला भाग. या प्रत्येक भागाचे वैशिष्ट्य हे वेगवेगळे. तीनही टप्प्यात पाऊसमानात जशी विविधता तशीच इथल्या मातीच्या रंग-आकारातही. 

इथं मुख्यत्वे महादेव कोळी आणि ठाकर या दोन आदिवासी जमाती राहतात. याशिवाय इतरही अनेक मुळ रहिवासी या भागात आहेत. या आदिवासी आणि इतर कष्टकरी जमातींची उपजीविका निसर्गाशी संबंधित बाबींवर अवलंबून असल्याचे दिसते. जसं की पशुपालन, शेती आणि जंगल आधारित उपजीविका. याला जोड असते परिसरात उगवणाऱ्या रानभाज्यांची आणि पारंपरिक जतन केलेल्या वेगवेगळ्या पिकांच्या विविधतेची. मुख्यतः भात, मिलेट, या पारंरिक पिकांबरोबरच आता कांदा, ऊस, टोमॅटो अशी नगदी पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यासोबतच वालवर्गीय, भोपळावर्गीय फळभाज्या मोठ्या प्रमाणात तर विविध पालेभाज्या आणि कडधान्य हेही थोड्या बहुत प्रमाणात पिकवले जातात. अशा मिश्र प्रकारच्या समाजव्यवस्थेत एक समान दुवा सर्विकडेच आढळतो आणि तो म्हणजे परिसरात मिळणाऱ्या आणि उगवणाऱ्या रानभाज्या आणि त्याशी जोडलेली खाद्यपरंपरा.

पूर्ण अकोले तालुक्यात मिळणाऱ्या रानभाज्या आणि त्यांची कृती वेळोवेळी पुस्तकात वाचायला मिळणार आहे. ज्यांनी ही खाद्यपरंपरा टिकवून ठेऊन विकसित केली त्या ठाकर समाजाचे योगदान यात महत्वाचे आहे. अर्थात हा त्यांच्या जगण्याचा भाग किंवा त्यांची खाद्यसंस्कृती म्हटले तरी चालेल. महादेव कोळी समाज शेतीवर अवलंबून असल्यामुळे किंवा इतर कारणामुळे त्यांचे याबद्दलचे ज्ञान आणि खाण्याचे प्रमाणही मर्यादित आहे. परंतु ठाकर समाज हा अजूनही समूहाधारित आणि जंगलाधारित आहे. आजही इथल्या लहान मुलालाही जंगलातील मेवा गोळा करून खाणे, खेकडे पकडणे, मासे मारणे याचबरोबर पक्षी मारून खाणे हे कौशल्य चांगल्या पद्धतीने जमते आणि त्याबद्दलचे ज्ञानही त्यांच्याकडे परंपरेने आणि अनुभवातून येत जाते. 

पूर्वी या भागाच्या दुर्गमतेमुळे नजीकच्या बाजाराशी जोडणारे रस्ते नव्हते तसेच पावसाळ्यात पिकणारी शेती. मग उरलेले वर्षभर अन्नाचा स्रोत म्हणून जंगल जवळ होतेच. ज्यातून प्रत्येक हंगामात विविध प्रकारची पाने, फुले, फळे, कंद आणि मुळे यांचा अन्नासाठी वापर केला जात असे. जे आजही चालू आहे. पावसाळ्यात शेतीची प्रचंड कामं, बाजारातून विकत आणून भाजीपाला खाणं ही न परवडणारी बाब. त्यामुळे इथं आपोआप उगवणाऱ्या भाज्या, रानात मिळणारी फळं ह्यांचा वापर आहारात मोठ्या प्रमाणात होता. काही भाज्या या वैशाखात सुकवून ठेवल्या जातात ज्या अडीनडीला उपयोगात येत. यात भोकर, सायरीचे दोडे, मोहाचे दोडे, अळू यासारख्या सुकवून ठेवलेल्या भाज्या यांचा वापर हमखास होतोच. 

भात, नाचणी आणि वरई ही भंडारदरा परिसरातील मुख्य धान्य पिके. नाचणी खाणाऱ्यांचे आणि उगवण्याचे प्रमाणही आता खूप कमी झाले आहे. नाचणीला उत्पन्न कमी असते त्यामानाने भाताचे संकरीत वाण घेतले तर त्याला जास्त भाव मिळतो. साहजिकच अतिशय तोकडी शेती असल्यामुळे वर्षभर गुजराण होईल व आर्थिक गरजाही भागतील असा भात पेरला जातो. वरई जास्त करून उपवासालाच खाल्ली जाते. भात हे अतिशय हलक्या प्रतीचे किंवा कमी जीवनसत्व असणारे धान्य आहे, अशा स्थिती आरोग्याच्या दृष्टीने या लोकांसाठी या जंगलातील भाज्या आणि फळे खूप महत्वपूर्ण भूमिका निभावतात.
शरीराला आवश्यक असणारी महत्वपूर्ण जीवनसत्वे, प्रथिने आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज या रानभाज्या पूर्ण करतात. शुध्द हवा, जंगलातील भाज्या आणि सोबतीला भरपूर कष्ट यामुळे जीवनशैलीतून उद्भवणारे बरेच आजार इकडे फिरकतही नाहीत. काही रानभाज्या औषधी असतात. भारंगी, टाकळा ही पावसाच्या सुरवातीला मिळणारी रानभाजी ही जंत आणि कृमी यांचा नाश करणारी आहे. त्यामुळे पावसानंतर वाहणाऱ्या नव्या पाण्याने पोटाचे आजार होण्याचा धोका कमी होतो.

खरंतर सुरवातीला जेव्हा मी इथं जायला सुरवात केली ती केवळ निसर्गाच्या ओढीतून, आत्मिक आकर्षणातून. पण जसंजसं इथल्या लोकांशी बोलत गेले तसंतसं त्यांचे अंतरंग मला कळू लागले. त्याबरोबर त्यांच्या समृद्ध पण संघर्षाने भरलेल्या जीवनाचीही ओळख होत गेली. जंगलासोबतचे त्यांचे अतूट नाते लक्षात येत गेले. प्रवासात गावकऱ्यांशी विशेषतः गावकरी महिलांशी गप्पा मारणे हा माझा आवडता उद्योग. २-३ तासाच्या या सार्वजनिक वाहनातून केलेल्या प्रवासाचा शीन यांच्याशी बोलून निघून जायचा. सुरवातीला हे लोक स्पष्ट बोलत नसत, एकदा अशाच एका जीपमधून प्रवास करताना, आमच्या सोबत शेंडीच्या बाजाराला निघालेल्या शेतकरी आणि इतर भारेकरी महिला होत्या. सुरवातीला आमचा संवाद काही नीट होईना, मग मी एका एका भाजीचं नावं घ्यायला सुरवात केल्यावर त्यातील एक महिला म्हणाली, “ह्या ताईला आपल्या सगळ्या भाज्यांची नावं माहित आहेत, म्हणजे ही आपल्याच इथली असणार.” हा अनुभव मला वेळोवेळी येत होता. आपलं बोलणं काही चुकतंय का असं त्यांना वाटे. मी बोलताना मुद्दाम जंगलातल्या वेगवेगळ्या भाज्यांची नावं घेत तेव्हा आमचे नाते अधिक आत्मीय बनत होते. या भाज्यांच्या प्रवासात मी खऱ्या अर्थाने त्यांच्याशी जोडत गेले.

‘आजही आमच्या गावाला आम्हाला भाज्या बाजारातून जास्त विकत आणाव्या लागत नाहीत. आम्ही अजूनही ९०% भाज्या या जंगलातून किंवा परिसरात मिळणाऱ्या खातो. शहरात आलो तर सर्वच तडजोड करावी लागतेय. कोबी, बटाटा, फ्लॉवर खावी लागते,’ शहरात नोकरी निमित्ताने राहायला आलेला बाळू सांगत होता. एकदा करवंदाचे वेगवेगळे पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण या भागात घेत असताना, आम्ही करवंदाची साखर घालून जॅम तयार केला. त्यातल्या एकाही लहान मुलाने हा गोड जॅम खाल्ला नाही. येथे गोडाची व्याख्या वेगळी आहे. साखर फक्त चहासाठीच वापरली जाते. इतर पदार्थासाठी नाही. अभयारण्य परिसरातील लोकांची ही स्थिती आहे.

याउलट खालच्या भागातील बागायतदार शेतकरी वेगवेगळी भाजीपाला पिके घेवू लागलेत. यात कोबी, फ्लॉवर, कांदा, टोमॅटो ही पिके जास्त आहेत. भरपूर रासायनिक खत आणि कीटकनाशक यांच्या वापरामुळे हे विषयुक्त अन्न त्यांचा खाण्याचा भाग झाला आहे. शेताला वसवा नको म्हणून, अन्न म्हणून उपयोगात असणारे अनेक वृक्ष, वेली, तन उपटून किंवा तोडून टाकले जाते. यामध्ये अनेक महत्वाचे वृक्ष जसं हदगा, भोकर, मुरमाठी तर पानभाजी, हरणदोडी, कुळू, शिंदळ माकडे, शेरण्या आणि अमरंथ या कुळातील रानभाज्या नष्ट होत आहेत. त्यामुळे जैव विविधता तर धोक्यात येतेच, सोबत लोकही आरोग्यपूर्ण खाण्यापासून दूर राहतात. शिवाय जे नष्ट होते ते कायमचेच. 

आजच्या शेतीचा विचार करता शेती ही जगण्यासाठी नव्हे तर बाजारासाठी केली जात आहे. यामुळे अनेक पारंपरिक पिके आणि त्यांची बियाणे आपण गमावून बसलोय. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमीन, पाणी या सगळ्यांचेच प्रदूषण झाले आहे. त्याचे परिणाम आरोग्यावर दिसत आहेत. गेल्या ७-८ वर्षात पांढऱ्या पेशी किंवा लाल पेशी यांच्याशी संबंधित आजार, कॅन्सर याचे प्रमाण वाढले आहे. 

एका अभ्यासानुसार जगातले ३ लाख लोक वर्षाला कीटकनाशकंच्या विषबाधेमुळे मरतात. (स्रोत- द बुक ऑफ इंडिअन ट्री). अन्न सुरक्षेसाठी जास्तीत जास्त उत्पादन आणि जास्तीत जास्त उत्पादनासाठी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर हे सूत्र असलेल्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेत पोषण सुरक्षा, आरोग्य सुरक्षा यांचा विचार होताना दिसत नाही. तसेच जंगलांपासून मिळणाऱ्या या अन्नाचा हिशोबही यात केला गेलेला नाही. 

शेती आणि शेती न करता उपलब्ध असणऱ्या रानभाज्या यांचा विचार केला तर आजच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हे न उगवता उपलब्ध असणारे अन्न आपल्याला जगवू शकेल अशी खात्री वाटते. यंदाच्याच २०१६ च्या जून महिन्यातली गोष्ट. शेतामध्ये कोथिंबीरचे पिक घेतले होते. परंतु कोथिंबीर काही नीट जमली नाही. तिला बाजारात भावही नव्हता. याच शेतात रानमाठ मोठ्या प्रमाणात उगवला होता. त्या पालेभाजीला लोक आवडीने खातात. म्हणून त्याच्या जुड्या बांधून बाजारात विकल्या जाऊ लागल्या. त्या शेतातील कोथिंबीर तोट्यात गेली पण त्याची भर भरून काढत या रानमाठाच्या भाजीने चक्क दीड महिन्यात ४० हजार रुपये कमवून दिले. दुसऱ्या एका शेतकऱ्याने हदग्याच्या झाडाची बाग लावली. कोणतेही खत न देता त्या बागेतून त्याला मोठ्या प्रमाणात फुले आणि शेंगांची विक्री करून चांगले पैसे मिळत आहेत. नागपूरच्या अनंत भोयर यांनी रस्त्याच्या कडेला उगवलेल्या टाकळयाची कॉफी बनविली, ती लगेचच संपली. पुढच्या वर्षी जास्त कॉफी बनविण्यासाठी आपल्या शेतातच टाकळा पेरायचा असे त्यांनी ठरवून टाकले.

पुस्तक लिहण्याचा उद्देश इतकाच, की या सर्व अन्नविविधतेला आपल्याला जपायचे आहे. ज्या काही थोड्या ठिकाणी हे शिल्लक आहे, ते टिकवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. लोकांच्या आहारात ते जरूर असायला हवे, पण त्यासाठी त्याचे जास्त उत्पादनही व्हायला हवे. जे आज फक्त गोळा केले जाते ते परसबागेत, शेतात, बांधाच्या कडेला लावले गेले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग झाले पाहिजेत, हे सर्व टिकविण्याच्या परंपरा पुन्हा पुनर्जीवित झाल्या पाहिजेत. देवराई किंवा ठराविक पूजा केल्याशिवाय नवीन येणाऱ्या अन्नधान्याचे सेवन न करणं किंवा ज्या घराण्याच्या देव्हाऱ्यात यापैकी कोणताही देव असेल त्या घराण्याने त्याचे सेवन न करणं अशा अनेक आदिवासी परंपरा आहेत. ज्या आजही काही प्रमाणात टिकून आहे. त्या पुन्हा संरक्षित करणं त्याचे नैतिक मूल्यसंवर्धन करणं या तितक्याच महत्वाच्या गोष्टी आहेत.