किसन वीरांच्या अमृतमहोत्सवी उडीला जिवंत ठेवायलाच हवं

०२ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


देशभक्त किसन वीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १ नोव्हेंबर १९४३ ला येरवडा तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केलं. या महापराक्रमाला ७५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यातल्या काही तरुणांनी येरवडा जेलबाहेर एक कार्यक्रम केला.

इंग्रजांनी पुण्यातलं येरवड्याचं सेंट्रल जेल १८७१साली बांधलं. आज ते आशियातल्या सगळ्यात मोठ्या जेलपैकी एक आहे. त्यात पूर्वी कधी घडली नाही आणि नंतर कधी घडणार नाही, अशी एक घटना बरोबर ७५ वर्षांपूर्वी घडली होती.

१ नोव्हेंबर १९४३ ला प्रतिसरकारमधील पाच स्वातंत्र्यसैनिकांनी येरवड्याच्या भिंतीवरून उडी मारली होती. त्यात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक देशभक्त किसन वीर प्रमुख होते. त्यांच्याबरोबर छन्नुसिंग चंदेले, पांडुरंग गणपती पाटील उर्फ पांडू मास्तर, भाई विभुते पैलवान आणि बलदेव प्रसाद होते. जवळपास ३० फूट उंच असणारी येरवड्याची भिंत कुणी उडी मारून पार करू शकेल, असं इंग्रजांना वाटलंही नव्हतं. पण त्या दगडाच्या भिंतींपेक्षा क्रांतिकारकांची देशभक्ती फार उंच ठरली. त्यामुळे इतिहास घडला.

येरवड्याच्या दारात इतिहास जागवला

आज या उडीचा बरोबर ७५वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी काही तरुण येरवडा तुरुंगाबाहेर जमले होते. विद्रोही सांस्कृतिक चळवळीने त्याचं आयोजन केलं होतं. सकाळी ११ ला येरवडा जेलसमोरच्या हुतात्मा स्मारकाजवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच तरुण जमले. त्यात प्रतिसरकार चळवळीचे अभ्यासक आणि पत्रकार संपत मोरेही होती. त्यांनी देशभक्त किसन वीर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. 

संपत मोरे यांनी यांनी प्रतिसरकार आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले, `महात्मा गांधींनी १९४२ ला छोडो भारत आंदोलन जाहीर करताच सातारा जिल्ह्यातलं वातावरण बदलून गेलं. तेव्हाच्या सातारा जिल्ह्यात आजचे सांगली आणि सातारा हे दोन्ही जिल्हे होते. तिथे क्रांतिसिह नाना पाटील यांच्या नेतृत्वात भूमिगत आंदोलन सुरु झाले. इंग्रज सरकारने त्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांना वेगवेगळ्या तुरुंगात अटक करून ठेवलं होतं. त्यात किसन वीर आणि त्यांचे सहकारीही होते. त्यांना १८ सप्टेंबर १९४२ ला अटक करुन येरवडा जेलमधे ठेवलं होतं.`

`पण तुरुंगात खितपत पडण्यापेक्षाही तुरुंगातून बाहेर पडण्याची गरज आहे, असा विचार ते करत होते. ते तुरुंगातुन निसटून जाण्याची संधी शोधत होते. त्यांच्या चरित्रात उल्लेख सापडतो त्याप्रमाणे डॉ. तुळपुळे यांनी तुरुंगाच्या पहारेकऱ्याला फितूर केलं होतं. त्यामुळे किसन वीर आणि त्यांचे सहकारी पोलिसांना चुकवून जेलच्या भिंतीपर्यंत पोचले. त्या किमान ३० फूट उंच भिंतीवरून उडी मारून ते पळाले.`

भूतो न भविष्यति अशी उडी

इतक्या उंचावरून उडी मारण्यात यश मिळालं तरीही मरण आणि पळून जाण्यात अपयश आलं तरीही मरण. असं दोन्हीकडे मरण असताना या पाच क्रांतिकारकांनी जोखीम उचलली. देशासमोर मरणाची कुणालाच तमा नव्हती. त्यामुळे ही उडी ऐतिहासिक ठरली. किसन वीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ही प्रचंड उडी भूतो न भविष्यति ठरली. 

त्यांचा हा पराक्रम कानोकानी पसरत गेला. महाराष्ट्रभर विशेषतः कृष्णा कोयनेच्या खोऱ्यात स्वातंत्र्याच्या चळवळीला नवी प्रेरणा मिळाली. इंग्रजांचे तुरुंगही आपल्याला थांबवू शकत नाहीत, असा आत्मविश्वास मिळाला. पण ही बहुजन समाजातल्या छोट्या गावांमधल्या देशभक्तांची उडी होती. त्याला स्वातंत्र्य संग्रामामधल्या इतर उड्यांसारखी प्रसिद्धी मिळाली नाही.
 
कार्यक्रमाचे आयोजक असणाऱ्या शिवराम ठवरे यांनी सांगितलं, `आज आमच्या पिढीला या आमच्या माणसांनी केलेल्या पराक्रमाची माहितीच नाही. त्याविषयी कुणी काही बोलत नाही, लिहत नाही. किसन वीर यांच्या या उडीची नोंद भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सुवर्ण अक्षरांनी व्हायला हवी. पण त्यासाठी कुठे प्रयत्न होत नाही. त्यामुळे ती आजच्या पिढीपर्यंत जायला हवी असं आम्हाला वाटलं. यानिमित्ताने आम्ही क्रांतिकारकांच्या कार्याला अभिवादन केलं आणि हा इतिहासातून प्रेरणा घेतली.`

या कार्यक्रमाला संपत मोरे आणि शिवराम ठवरे यांच्यासोबतच उत्कर्ष जाधव, सुनील गुलदगड, कुलदीप अंबेकर,  मंदार फाळके, युवराज जाधव, सागर गायकवाड हे तरुण उपस्थित होते. त्यांच्यापैकी कुलदीप अंबेकर हे आमदार कपिल पाटील यांच्या लोकतांत्रिक जनता दलाचे युवक प्रदेश सरचिटणीस आहेत. ते म्हणाले, `माझ्यासारख्याला विद्यार्थी चळवळीत काम करणाऱ्यासाठी हा कार्यक्रम प्रेरणा देणारा होता. आम्हाला आमच्या मातीतल्या प्रेरणा हव्या आहेत. मात्र या साऱ्या प्रेरणा विस्मृतीत गेलेल्या आहेत. यापुढे दरवर्षी अधिक तयारीने मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम करू.`

देशभक्तीसाठी अपूर्व त्यागाचा इतिहास

कार्यक्रम थोड्या धावपळीत आयोजित केला होता आणि तो येरवडा जेलच्या जवळच करायची आयोजकांची इच्छा होती. येरवडा तुरुंग प्रशासनाने विनंती करूनही त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे अनेकांची इच्छा असूनही अनेकजण याला जाऊ शकले नाहीत. त्यात उर्वरीत महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवारही होते. किसन वीर यांचा सहवास लाभलेल्या उल्हासदादांनी ‘कोलाज’शी बोलताना आठवणी जागवल्या.

उल्हास पवार म्हणाले, `प्रतिसरकारच्या आंदोलनात क्रांतिसिंह नाना पाटलांच्या खालोखाल किसन वीरांचं नाव घेतलं जाई. त्यांना आम्ही सगळे आबा म्हणायचो. ते अत्यंत निर्भीड होते. खूप धाडसी आणि तितकेच चपळ. खजिना लुटणं, तारा तोडणं, हल्ले करणं यात ते आघाडीवर होते. प्रतापराव भोसलेंनी मला त्यांची एक आठवण सांगितली होती. आबा भूमिगत असताना ते कुटुंबाला भेटण्यासाठी मध्यरात्री घरी आले. वाड्याच्या भिंत ओलांडताना त्यांची उडी त्यांच्या छोट्या मुलीवर पडली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. पण त्या कुटुंबाची निष्ठा इतकी घट्ट होती की कुणी आवाजदेखील केला नाही. इतका मोठा त्याग त्या कुटुंबाने केला होता.`

येरवडा फोडण्यात सोबत असणारे किसन वीर यांचे सहकारीही तोलामोलाचे होते. त्यांच्याविषयी उल्हास पवार सांगतात, `सोलापूरचे भाई छन्नुसिंग चंदेले हे फार मोठे क्रांतिकारक होते. त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबानेही त्यांचा वारसा चालवला. त्यांच्या सूनबाई सोलापूरच्या महापौर होत्या. पांडू मास्तर आणि भाई विभुते हे आबांचे जवळचे सहकारी होते. तर अंगाने धिप्पाड असणारे बलदेव प्रसाद गुप्ता हे पुण्यातले होते. जुन्या मंडईत त्यांचं मिठाईचं दुकान होतं. त्यांच्या घरी त्यांचा नेताजी सुभाषचंद्र बोसांबरोबरचा फोटोही होता.`

यशवंतरावांचे नेते आणि पाठीराखेही

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किसन वीर यशवंतराव चव्हाणांचे कट्टर पाठिराखे होते. त्यांनी १९६२ साली साक्षात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकलीदेखील. पुढच्या निवडणुकीत लोकसभेची जागा यशवंतरावांसाठी अगदी सहजपणे रिकामी करून दिली. इतकंच नाही तर गावकऱ्यांच्या हट्टामुळे वाई जिल्ह्यातल्या कवटे सुरूर या गावाचे १२ वर्षं सरपंचही बनले. फक्त लोकांसाठी एक खासदार सरपंच बनण्याचा चमत्कार तेव्हा झाला होता. मुळात या पदांचा त्यांना लोभच नव्हता.

उल्हास पवार म्हणाले, `यशवंतराव आबांना आपला नेता मानायचे. खरं ते शिंपी समाजाचे. म्हणजे ती मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी. पण त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं. जिल्ह्यात काँग्रेस संघटनेचं, सहकाराचं आणि विकासकामांचं जाळं विणलं. भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर होऊच शकत नव्हता. इतकं त्यांचं आयुष्य पारदर्शक होतं. 

यशवंतरावांच्या काही नातेवाईकांनी आबांविरुद्ध पक्षांतर्गत गटबाजी केली. तेव्हा यशवंतरावांनी उघडपणे आबांची बाजू घेतली. रक्ताच्या नात्यापेक्षा स्वातंत्र्यलढ्याने तयार केलेलं आमचं नातं अधिक बळकट आहे, असं ते म्हणाले होते. तेव्हाचं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या टेरेसवरचं भाषणही गाजलं. त्यातलं वाक्य होतं, मतभेदाला मनभेदाचं, मनभेदाला व्यक्तिभेदाचं, व्यक्तिभेदाला व्यक्तिद्वेषाचं रूप मिळतं तेव्हा लोकशाहीचं मांगल्य संपतं.`

नव्या पिढीला माहितीच नाही

किसन वीर यांच्याविषयी वैयक्तिक आठवणीही उल्हास पवारांकडे आहेत, `मी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आबांनी मला आपल्या गावी बोलावलं. आम्हा तरुण नेत्यांना सजवलेल्या गाड्यावरून फिरवून आमची मिरवणूक काढली. स्वतः रस्त्यावरून चालले. त्यांच्या नीटनेटक्या राहणीचा प्रभावही आमच्यावर होता. ते विशिष्ट अत्तर, आवळ्याचं सुवासिक तेल वापरत. ते नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीताचे भोक्ते होते. काँग्रेसच्या एखाद्या मेळाव्याचं आयोजन आबांकडे असायचं तेव्हा रात्री संगीताची मैफल व्हायचीच.`

आज किसन वीर यांचं नाव असलेला सहकारी साखर कारखाना प्रसिद्ध आहे. त्यांच्या नावाची मोठमोठी शाळा कॉलेजंही वाई तालुक्यात आहेत. पण आज किसन वीर यांच्याविषयी एक अक्षरही इंटरनेटवर उपलब्ध नाही. त्यांच्याविषयी पुस्तकंही फार कमी आहेत. आहेत ती दुर्मीळ झालीत. बाकी ऑडियो वीडियो डॉक्युमेंटेशनची गोष्टच सोडा. अशावेळेस किसन वीर यांच्या ऐतिहासिक उडीचा अमृतमहोत्सव साजरा करणारा कार्यक्रम छोटा असला तरी महत्त्वाचा ठरतो.