धर्मांतराच्या ६२ वर्षांनंतर तरी आत्मटीकेचा प्रवाह वाढायला हवा

lock
​​​​​​​बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या क्रांतीने वाढलेली आत्मिक ताकद गृहीत धरुनही हल्ली हे जे काही चाललंय, ते घसरणीच्या दिशेने आहे, असंच म्हणायला लागेल. हे रोखायचा विवेक कोणी दाखवला तर आजही बाबासाहेबांचे लिखित तत्त्वज्ञान त्याच्या साथीला नक्की आहे. पण हा विवेक दाखवणार कोण? त्याचीही शक्यता बौद्ध महिलांतच आहे.

माझ्या जन्मापूर्वीची ही गोष्ट आहे. बाबासाहेबांनी मेलेल्या जनावरांचं मांस खाणं सोडायला सांगितलं. मला आठवतं त्याप्रमाणे आमच्या घरात मृत सोडाच मोठ्याचं मांसही खाल्लं जात नसे. फक्त कोंबड्या बकऱ्याचेच मटण असे. आई त्याबाबत अधिक दक्ष असे. आमच्या नात्यातले, शेजारचे जे कोणी मोठ्याचं मांस खात, त्यांना ती कमी प्रतीची माने. आपण बौद्ध म्हणजे काहीतरी उच्च आहोत. असं मोठ्याचं मटण खाण्याने आपण भ्रष्ट होतो, असा तिचा माझ्यावरील संस्कार आहे.

आमच्या घरी बुद्ध आणि बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त कोणत्याही देवाचे फोटो मी पाहिले नाहीत. हे आमचं वैशिष्ट्य. काही बौद्धांच्या घरांत ते आजही दिसतात. ती या फोटोंना नित्यनेमानं हार घाली. त्यांच्यासमोर उदबत्ती-मेणबत्ती लावे. माझे वडील वंदना घेत. आम्ही घरातले हात जोडून त्यात सामील होत असू. दुसऱ्या कोणत्याही देवाला न भजणाऱ्या माझ्या आईच्या अंगात सात आसरा मात्र येत. या देवींना मोठ्या बाया असंही म्हणतात.

तिच्या अंगात आलं की लोक जमा होत आणि तिला आपल्या अडचणी सांगत, गाऱ्हाणं घालत. तिच्या अंगातली देवी त्यांना उत्तरं देई. मार्ग सांगे. या प्रकारात कुठेही कोणाकडून पैसे किंवा अन्य काही स्वीकारलं जात नसे. परोपकाराचीच भावना असे. आम्ही मुलांनी थोडे कळू लागल्यावर गावी आमच्या बौद्धवाडीत ज्या कोणाच्या अंगात येईल त्याला दंड बसवला जाईल, असं विद्रोही फर्मान काढलं. वाडीतल्या अनेक स्त्रियांप्रमाणे माझ्या आईच्या अंगात येणेही तेव्हापासून बंद झालं.

हेही वाचाः अविनाश डोळसः `मिलिंद’मधला मिनँडर

माझी आई माझ्या मित्रांशी अत्यंत आपुलकीने वागे. पण त्यांच्या जातींविषयी जागरुक असे. मांग ही जात आमच्या तुलनेत तथाकथित खालची. म्हणून मांगाच्या घरी जेवू नकोस, पाणी पिऊ नकोस अशी ती सांगे. फक्त सांगे. घरी आलेल्या मांग मित्राला तिने खाऊपिऊ घालण्यात काही कसर केल्याचं मला आठवत नाही.

आजच्या महाराष्ट्रातल्या बौद्धांचा, त्यातील महिलांचा विचार करताना बाबासाहेबांच्या ‘नवयानी’ बौद्ध धम्माचा संदर्भ घ्यावा लागेल. पारंपरिक बौद्ध धर्माशी इथल्या बौद्धांचा त्या अर्थाने संबंध नाही. म्हणूनच मग पारंपरिक बौद्ध धर्मात स्त्रीला दुय्यम लेखलं गेल्याचा तत्त्व म्हणून अंगिकार करण्याची सूट बाबासाहेबांनी दीक्षा दिलेल्या बौद्धांना मिळत नाही. शिवाय बौद्ध धम्म स्वीकार हा बाबासाहेबांच्या वैचारिक विकासाचा शेवटचा टप्पा धरला तर बाबासाहेबांनी थेट १९२७ च्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून संविधाननिर्मिती प्रक्रिया आणि १९५१ च्या हिंदू कोड बिलापर्यंत तसंच या दरम्यानच्या अनेक भाषणांतून स्त्रीविषयक भूमिका मांडली, ती चौकट स्वीकारावी लागते.

ही चौकट आधुनिक स्त्रीवादाची आहे. स्त्री-पुरुषांचा दर्जा समान, पती-पत्नी मित्र, स्त्रीला पिता-पतीच्या संपत्तीत हक्क, घटस्फोटाचा अधिकार, द्विभार्या प्रतिबंधाद्वारे पतीच्या श्रेष्ठत्वाला लगाम, कामाच्या ठिकाणी बाळंतपणाच्या रजेचा अधिकार, आंतरजातीय लग्नाचा पुरस्कार आदि भूमिकांनी बाबासाहेबांनी या चौकटीचा आशय संपन्न केला आहे. महाराष्ट्रातल्या नवदीक्षित बौद्धांना आपल्या बौद्धत्वाची हीच चौकट स्वीकारावी लागते.

मानवी समाजाच्या विकासक्रमात धर्माच्या स्थानाची चिकित्सा करताना अभ्यासक जी सूत्रं मांडतात, त्यात पुरुषाच्या तुलनेत स्त्रीचे गौणत्व हा सामायिक भाग आहे. त्याच्या तीव्रतेत कमीअधिक फरक असला तरी स्त्रीला सगळ्याच धर्मांनी पुरुषापेक्षा दुय्यम मानलेलं आढळते. स्त्रीला कमी लेखण्यात जैन वा बौद्ध हे प्रगतीशील धर्मही अपवाद नाहीत.

‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’ या आपल्या पुस्तकाच्या अखेरच्या भागात विविध धर्मांतील स्त्रियांच्या स्थानाविषयी डॉ. आ. ह. साळुंखे यांनी विवेचन केलं आहे. त्यात बौद्ध धर्माविषयी काही नोंदी ते करतात. आपले पालनपोषण केलेल्या सावत्र आईला ती स्त्री असल्याने भिक्षुसंघात प्रवेश देण्यास अनुत्सुक असलेले बुद्ध आपला शिष्य आनंद याच्या आग्रहाखातर काही अटींवर राजी होतात. मात्र त्याचवेळी स्त्रियांच्या भिक्षुसंघातील प्रवेशामुळे बौद्ध धम्म हजार वर्षांऐवजी पाचशे वर्षेच टिकेल असे उद्गार काढतात.

नुकताच संघात प्रविष्ट झालेला तरुण भिक्षू समोर आल्यास शंभर वर्षे वयाच्या भिक्षुणीनेही उठून उभे राहायला हवे, ही भिक्षूसंघाची प्रथा होती. भार्येचे प्रकार सांगताना सातवा दासीभार्या हा सर्वोत्तम प्रकार असल्याचे बुद्ध सांगतात. बुद्धांचा याबाबतीतला दृष्टिकोण ‘परंपरागत’ होता, असे डॉ. साळुंखे म्हणतात, पण त्याचवेळी ‘…तरीही तत्कालीन समाजाचा विचार करता तुलनात्मक दृष्ट्या तो खूप उदार होता,’ अशी प्रशंसाही करतात. त्यासाठी लिच्छवी सरदारांनी बुद्ध आपल्याकडेच यावेत यासाठी आटापिटा चालवला असतानाही ते आम्रपाली या गणिकेच्या निमंत्रणाचा स्वीकार करतात, या घटनेचं उदाहरण देतात. एकूण, ‘गौतम बुद्धांचा स्त्रीविषयक दृष्टिकोण संमिश्र होता’ असा डॉ. साळुंखेंचा निर्वाळा आहे.

हेही वाचाः साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले?

स्त्रीविषयक भूमिका ही अत्यंत महत्वाची असली तरी केवळ तिच्यावरुन एखाद्याचं संपूर्ण मापन करणे चुकीचं ठरेल, हे खरं. ऐतिहासिक क्रम लक्षात घेऊन गौतम बुद्धाच्या प्रगतिशील विचारांतली ती एक उणीव आहे, एवढी नोंद करुन आपण पुढे सरकायला हवं, हेही बरोबर. पण त्याचं आज कोणत्याही प्रकारे समर्थन होता कामा नये, हेही तेवढेच खरं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला स्वीकारताना ही दक्षता घेतली आहे. अडीच हजार वर्षांनी बुद्धाचे नेमकं काय स्वीकारायचं याचा निर्णय करताना मानवाच्या कल्याणाला ते उपयुक्त आहे का, अनुभवाच्या कसोटीला ते उतरते आहे का, हे बुद्धाने सांगितलेले निकषच ते वापरतात. ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा त्यांचा ग्रंथ या कसोट्यांवरच सिद्ध झाला आहे. बौद्ध धर्मात हीनयान, महायान असे पंथ तयार झाले. ते नाकारुन आम्ही स्वीकारलेला बौद्ध धम्म हे ‘नवयान’ आहे, असं ते जाहीर करतात.

ही चौकट हा अर्थातच आदर्श आहे. प्रत्यक्षात काय झालं? काय आहे? …डॉ. साळुंखेंचाच शब्द वापरायचा तर जे झालं आणि जे आहे त्याचं ‘संमिश्र’ असंच वर्णन करावं लागेल. महाडच्या परिषदेत आणि त्यानंतर अनेक ठिकाणी, खास करुन बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर आपली जातीची ओळख दर्शवणाऱ्या चिन्हांचा त्याग करायला बाबासाहेबांनी सांगितले. लुगडं नेसण्याची पद्धत बदलण्याचं त्यांचं आवाहन महार स्त्रियांनी लगोलग स्वीकारले. आमचं कुटुंब बौद्ध. म्हणजे पूर्वाश्रमीचं महार. माझ्या आईला मी कधीही ढोपरापर्यंतच्या लुगड्यात बघितलं नाही. ती व्यवस्थित घोट्यापर्यंत नऊवारी लुगड्यात असायची. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिने वाख्या म्हणजे कोपरापर्यंतचे चांदी किंवा कथिलाचे दागिने वापरणं बंद केलं. हे तिने सांगितलं.

एकूण महार समाजात बौद्ध होण्याने एक निराळेच चैतन्य निर्माण झालं. हे चैतन्य, ही अस्मिता त्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात क्रांती घडवणारी ठरली. मुलांचं शिक्षण, सामाजिक चळवळी या सगळ्याला विलक्षण धार आली. स्त्रिया संस्कारांच्या प्रभावी वाहक असतात, असं बाबासाहेबांसकट अनेकांनी म्हटलं आहे. त्याप्रमाणे या अस्मितेच्या, आपल्या मुलाबाळांना शिकवलं पाहिजे, या प्रेरणेच्या त्या वाहक नक्की झाल्या. मात्र जुन्या ईश्वरी संकेतांतून बाहेर पडून बुद्धाच्या विवेकवादाला त्यांनी स्वीकारलं किंवा समाजातील सर्वच विषमतेला त्यांनी नाकारलं असं झाले नाही.

बुद्धाला ईश्वरी शक्ती म्हणून भजणं, हीच बव्हंशी तिची भावना असे. मुलाला पाळण्यात घालताना या बौद्ध बाया आता पाळणा गाताना कृष्ण रामाच्या जागी ‘भिमाईच्या पोटी भीम जन्मला, जो बाळा जो जो रे’ म्हणू लागल्या. त्यात सिद्धार्थाचे नाव गुंफू लागल्या. लग्नातल्या गाण्यांचेही तेच. हिंदू सांस्कृतिक चौकट बव्हंशी तीच. तिच्यातील नावं, प्रतिमा बदलल्या गेल्या. हल्ली हिंदूंच्या चारधामांप्रमाणे बौद्ध स्थळांचं दर्शन सुरु झालं आहे. ही तीर्थस्थळांची यात्राच असते. स्त्रियांचा त्यात अधिक भरणा असतो.

मुलगा बाबासाहेब झाला पाहिजे, ही तिची प्रेरणा मुलीबाबत मात्र तेवढ्याच तोलाची नसे. अजूनही नाही. दारु पिऊन आलेल्या नवऱ्याच्या ती लाथा खाईल. प्रसंगी त्यालाही बदडून काढेल. घराचा सगळा आर्थिक भार उचलेल. पण उतरंडीत पुरुषाला ती वरचाच मानेल. ‘नवऱ्याला मित्र माना’, हे १९२७चं बाबासाहेबांचं विधान तिच्या मनात नीटसे रुजलं, असं दिसत नाही. एकूण व्यवस्थेचाच तो भाग आहे. बौद्ध म्हणून तिच्याकडून वेगळी अपेक्षा करणे हे कदाचित जादाचं होईल.

पॅंथरच्या काळात आणि त्यानंतरही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना अगदी मध्यरात्रीही शिजवून जेवायला घालण्याचे काम या माऊलींनी केलं आहे. आणि पुरुष कार्यकर्त्यांनी तिला गृहीत धरलं आहे. आई म्हणून तिच्यावर त्यांनी कितीही भावपूर्ण कविता केल्या असतील. पण रात्री उशीरा येऊन आई किंवा बहिणीला उठवून जेवायला वाढायला लावणं, सकाळी उशिरा उठल्यावर आईबहिणींनी आंघोळीचं पाणी काढणं, समोर चहा ठेवणं या सेवा घेताना तो पारंपरिक पुरुषच असतो. स्त्रीमुक्तीच्या वल्गना करणारे हे पुरुष बहिणीच्या सार्वजनिक वावराबाबत नैतिक रक्षकच असतात. आमचे मोर्चे, सभा, जयंत्या यांत स्त्रियांची संख्या मोठी. पण वक्त्यांत आणि निर्णयप्रक्रियेत नगण्य. आमच्या गावी कोकणात भावकीच्या किंवा गावच्या मंडळाच्या बैठका बसतात. तेव्हा स्त्रियाही असतात. पण त्या खळ्याच्या (अंगणाच्या) एका कोपऱ्यात. मुख्य गोलात सगळे पुरुष. विषय सावित्रीबाईंच्या जयंतीचा असला तरी हीच स्थिती.

हेही वाचाः धम्मदीक्षा समारंभात मध्यरात्री कूठून आणली बुद्धमूर्ती?

बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती ही वैचारिक, तत्त्वज्ञानात्मक होती. त्यातला विद्रोह, अस्मिता खूप खोलवर समाजात पोहोचली. त्याने त्यांच्या मानसिक-भावनिक प्रेरणांत आमूलाग्र म्हणावा इतका बदल झाला. पण विचारांचा भाग त्याप्रमाणात पोहोचला असं झालं नाही. बाबासाहेबांना ते मुख्यतः अपेक्षित होते.

बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात- ‘…लोकांना बौद्ध धर्माच्या वाङ्मयापेक्षा बौद्ध धर्मात पूजापाठ कशाप्रकारे होतो, हे जाणून घेण्याचं वेडच लागलं आहे. आम्हाला बौद्धधर्माचा पूजापाठ कसा असतो, यासंबंधी काहीतरी वाङ्मय द्या, असा सारखा तगादा लागून राहिला आहे. माझ्या शारीरिक अस्वस्थतेमुळे त्यांची जिज्ञासा पुरी करणं मला आतापर्यंत शक्य झालं नाही. तशात बौद्ध धर्मातील तत्त्वज्ञानापेक्षा बौद्ध धर्मातील पूजापाठ याचा या देशात अगदीच लोप झाला आहे. त्या कारणांमुळे या प्रश्नासंबंधी बौद्ध धर्मातील पूजापद्धती आणि त्यासंबंधी गाथा कोठेच उपलब्ध नाही. त्या फक्त ज्या देशांमध्ये बौद्ध धर्म प्रचलित आहे, तेथेच मिळू शकतात.’

बाबासाहेबांनी श्रीलंकेतून अशा गाथा मिळवल्या. त्या गुणतिलके नावाच्या आपल्या एका श्रीलंकन मित्राला गायला लावून त्याच्या रेकॉर्ड तयार केल्या. लग्नविधीबद्दल एका पत्रात ते म्हणतात, ‘बौद्ध विवाह विधी अगदी साधा आहे. त्यात होम किंवा सप्तपदी नाही. मातीचं एक कोरं भांडं मधे ठेवायचं. ते पाण्याने काठोकाठ भरायचे. त्याच्या एका बाजूला वधूने आणि दुसऱ्या बाजूला वराने उभे राहायचं. या भांड्यात कापसाचा धागा सोडायचा. या धाग्याची दोन टोकं एक वधूच्या हातात आणि दुसरं वराच्या हातात धरायचं. कोणीतरी महामंगल सूत्त म्हणायचं. वधू-वरांनी पांढरे कपडे घालायचे असतात.’

गाथांच्या रेकॉर्ड्स बौद्ध धम्माच्या दीक्षेपूर्वीच १९५० साली बाबासाहेबांनी मिळवल्या होत्या. पण विधिसंबंधीचे त्यांचं पत्र ४ डिसेंबर १९५६चं म्हणजे त्यांच्या महापरिनिर्वाणापूर्वी दोन दिवस आधीचं आहे. १४ ऑक्टोबरला त्यांनी दीक्षा घेतली आणि ६ डिसेंबरला ते गेले. जेमतेम दीड महिन्याचं हे अंतर आहे. त्यात त्यांचं आजारपण. अशा स्थितीत एका नव्या धर्माच्या तत्त्वज्ञानाला ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाच्या रुपाने ते आकार देऊ शकले. तरी विधींची रचना करायला त्यांना पुरेसा अवधी मिळाला नाही. त्यांचे प्राधान्य तत्त्वज्ञान होतं. ते त्यांनी पूर्ण केलं.

हे तत्त्वज्ञान आणि त्याला अनुरुप विधींची रचना करुन ती लोकांपर्यंत नेण्याचं काम हे बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांचं होतं. पण ते तेवढ्या प्रभावी वा अपेक्षेप्रमाणे झाल्याचं दिसत नाही. भारतीय बौद्ध महासभा तयार झाली. पण अंतर्गत वादांनी तिला पोखरलं. कोकणातील बौद्धजन पंचायत समितीने जातपंचायतीचेच मुख्यतः काम केलं. पुढे या दोन संस्थांच्या कामांच्या सीमारेषा काय, यावरुन वाद झाले. अनेक ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेने बौद्धजन पंचायत समितीचंच काम करायला सुरुवात केली. या काळात ज्यांनी विधीचं स्वरुप ठरवलं, त्यातील गाथा रचल्या, यात बाबासाहेबांच्या भूमिकेशी अनुरुपता ठेवल्याचं दिसत नाही.

हेही वाचाः धर्मांतराच्या ६२ वर्षांनंतर तरी आत्मटीकेचा प्रवाह वाढायला हवा

साधेपणाऐवजी ऐपतीप्रमाणे लग्ने होऊ लागली. विभूतिपूजेच्या विरोधात बाबासाहेब होते, पण त्यांच्यावरची ‘भीमस्तुती’ विधीचा अपरिहार्य भाग झाली. महामंगल सुत्ताऐवजी ‘जयमंगल अष्टगाथा’, ज्यात जातक कथांतील चमत्कारांचं वर्णन आहे, मंगलाष्टकांना समांतर चालीवर म्हणणं सुरु झालं. वधू-वरांच्या ज्या शपथा आल्या, त्यात स्त्रीचं पारंपरिक स्थान सुरक्षित ठेवायचा प्रयत्न आहे. त्यात पतीने पत्नीला अलंकारादि बाबींनी संतुष्ट ठेवायचं असतं आणि पत्नीने पतीने कमवून आणलेल्या संपत्तीचे रक्षण आणि घरच्यांचा मान राखायचा असतो.

हल्ली दोघेही कमावत असताना हे वचन वस्तुस्थितीशी विसंगत नव्हे काय? आणि घरच्यांचा मान राखायची जबाबदारी ही फक्त पत्नीची कशी काय? पती-पत्नी हे मित्र असावेत असे बाबासाहेब म्हणतात, शिवाय घटनेत दर्जाची आणि संधींची समानता स्त्री-पुरुष दोहोंना दिलेली आहे. तरीही लग्नातली ही शपथ या मूल्यांशी सुसंगत नाही, हे लोकांना कळत नाही. त्यांना त्यात काही वावगं आहे, असं वाटत नाही. म्हणजेच त्याला कर्मकांडाचं स्वरुप आले आहे.

बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षा घेताना ती चंद्रमणी या महास्थवीर भिख्खूंच्या हस्ते घेतली. प्राचीन बौद्ध परंपरेकडून एकप्रकारे त्यांनी वारसा घेतला. पण समोरच्या जनसमुदायाला त्यांनी स्वतः दिली. दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी, कोणत्याही विधीसाठी भिख्खूची गरज नाही, हे त्यातून त्यांना दाखवायचे होते. भिख्खूच्या रुपाने एक नवा पुरोहित मला तयार करायचा नाही, ही त्यांची भूमिका होती. भिख्खूचं काम धम्म समजावून सांगण्याचं. त्याचा प्रसार करण्याचं. आज भिख्खूकरवी विधी लावणं प्रतिष्ठेचं समजले जाते.

नामकरणापासून जलदानविधीपर्यंत भिख्खूंचा हस्तक्षेप सुरु आहे. ते त्यांच्या उत्पन्नाचंही पुरोहिताप्रमाणे साधन बनलं आहे. या काषायवस्त्रधारी पुरोहिताच्या भजनी लागणाऱ्यांत स्त्रियांचा मोठा भरणा असतो. भिख्खूंच्या चरणी माथा टेकणं, त्यांचे आशीर्वाद घेणं, भक्तिभावाने त्यांची प्रवचने ऐकणं आणि त्यांना दान देणं यांत बौद्ध महिला आघाडीवर असतात. देवळातल्या महिला भजनी मंडळांच्या धर्तीवर बुद्धविहारात वंदना म्हणणं आणि ग्रंथपठन करणं, या उपक्रमांत बौद्ध महिलांचा पुढाकार वाढतो आहे. ‘वर्षावासा’चे कार्यक्रम ‘चातुर्मासा’च्या भक्तिभावनेने केले जात आहेत.

बुद्धाने कार्यकारणभावाला महत्व दिले होते. बाबासाहेबांनी याच कार्यकारणभावाने धर्मग्रंथांची आणि बुद्धाचीही चिकित्सा केली. आज त्यांचे अनुयायी याला रजा देत आहेत. मंगळसूत्र वास्तविक पुरुषप्रधानतेचे प्रतीक. प्रारंभीच्या काळात त्याला नकार देण्याइतकी प्रगल्भता नसणं स्वाभाविक होते. पण हळूहळू त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याच्या त्यागापर्यंत समाजाची मानसिकता तयार करणं गेल्या ६२ वर्षांत का शक्य झालं नाही? याचं कारण आहे कार्यकारणभावाला, तत्त्वज्ञानाला रजा देऊन विचारशून्य कर्मकांडी मनःस्थितीला शरण जाणं.

महिला याच्या पहिल्या भक्ष्य आहेत. मंगळसूत्राचा त्याग राहिला बाजूला, आजही ते बौद्ध स्त्रियांच्या गळ्यात ऐपतीप्रमाणे तोळ्यांत डोलत असतं. एक बदल होतो आहे. आता लक्षणीय संख्येने विशेषतः शहरातील बौद्ध महिला पांढरं मंगळसूत्र घालू लागल्या आहेत. पांढऱ्या साड्या नेसतात. म्हणून बहुधा पांढरे मणी. आपण हिंदू नाही, म्हणून हिंदूंसारखे काळे मणी नको. आपण बौद्ध आहोत. म्हणजे वेगळे आहोत. म्हणून पांढरं मंगळसूत्र. यात काळ्याचं पांढरं झाल्याने मूळ ‘पुरुषप्रधानतेच्या मालकी’चं तत्त्व कुठे बदलतं? ते तसंच राहते.

जातिव्यवस्थेचा मध्यवर्ती बिंदू (चालक नव्हे) स्त्री असते. तिचं तथाकथित पावित्र्य जातीची प्रतिष्ठा टिकवते. या स्त्रीने परजातीतील पुरुषाला वरू नये, ही दक्षता जातव्यवस्थेत घेतली जाते. बाबासाहेबांनी जातनिर्मूलनाचा एक प्रभावी उपाय आंतरजातीय लग्न हा सांगितला आहे. बौद्धांनी आपल्या उद्धारकर्त्याचा हा उपदेश शिरोधार्य मानायला हवा. पण तसं होत नाही. एकतर जातीतच लग्नाची खटपट असते. झालेच आंतरजातीय तर तथाकथित वरच्या जातीची मुलगी आपल्याकडे आलेली चालते. पण आपली मुलगी तथाकथित उतरंडीत आपल्या खालच्या स्तरावरच्या मुलाच्या प्रेमात पडलेली बौद्धांना चालत नाही.

एकूण मुलीने दुसऱ्या जातीत जाणेच फारसे रुचत नाही. बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न एका संख्येने मागे पडते, ही समजूत हेही त्यामागे एक कारण असते. दुसऱ्या जातीची मुलगी आली तर हे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एका संख्येने पुढे तरी सरकता येते. भारत बौद्धमय करण्याच्या वैचारिक क्रांतीला माणसांवर बौद्धपणाचे ठप्पे लावण्याची ही प्रतिक्रांती गिळू पाहते आहे.

हेही वाचाः वाचा धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण

खुद्द बुद्धाने त्याचा धम्म विचारांनी पटला तर स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं. आज बौद्धांच्यात कागदोपत्री, विधीद्वारे परधर्मीय मुलगी तांत्रिकदृष्ट्या बौद्ध होणं पुरेसे असते. तिने आमच्या मुलाशी लग्न केले, म्हणजे ती आपोआपच बौद्ध झाली. बाबासाहेबांनी संविधानात विचार, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य व्यक्तीला दिले आहे. या परधर्मीय मुलीच्या व्यक्ती म्हणून असलेल्या या अधिकाराचा गळा त्यांचेच अनुयायी घोटतात या आरोपाला बौद्धांचे उत्तर काय?

बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या क्रांतीने जी आत्मिक ताकद वाढली, जी मिळकत झाली ती गृहीत धरुनही हल्ली हे जे काही चालले आहे ते घसरणीच्या दिशेने आहे, असेच म्हणायला लागेल. पण हे रोखायचा विवेक कोणी दाखवला तर आजही बाबासाहेबांचे लिखित तत्त्वज्ञान त्याच्या साथीला नक्की आहे. आणि ते खोटं आहे, असं कोणी म्हणणार नाही. पण हा विवेक दाखवणार कोण? त्याचीही शक्यता बौद्ध महिलांतच आहे.

पुरोगामी चळवळीच्या विविध उपक्रमांत सहभागी होण्याची संवेदनशीलता त्याच दाखवत असतात. मी स्वतः ‘वर्षावासा’च्या तसेच बौद्धांच्या अनेक कार्यक्रमांत व्याख्यानांना जात असतो. त्यावेळी जी आत्मटीका करतो, त्याला महिलांमधून विशेष प्रतिसाद मिळतो. नंतर त्या भेटूनही बोलतात. त्यांना ते वेगळे व विचारार्ह वाटते. आत्मटीकेचा हा प्रवाह गतिमान झाला, तर हा प्रतिसादही वाढेल. पण आत्मटीकेचा प्रवाह गतिमान कधी होईल? …तूर्त ठाऊक नाही.

हेही वाचाः 

धम्मचक्र प्रवर्तन दिन : तिथीनुसार की तारखेनुसार?

धर्मांतरः टोटल पोलिटिकल अॅक्शन

 

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…